गुंता

आज असेही करेन म्हणतो
म्हणायचे ते म्हणेन म्हणतो

पुन्हा मनाचा गुंता झाला
पुन्हा जरा विंचरेन म्हणतो

टिपतो आता दु:खाचे कण
सवडीने कळवळेन म्हणतो

इथे जरी वापरात नाही
तरी नोट ही जपेन म्हणतो

मला सुचेना कविता आता
मी कवितेला सुचेन म्हणतो

मर्द मराठा "जगलो मी जर -
पुन्हा तुझ्याशी लढेन" म्हणतो

तुम्ही पुरावे मागा, शोधा...
मला मीच उद्धरेन म्हणतो