आणखी एक जीवदान...!

मुंबईत स्थायिक होऊन तीन वर्षे झाली. काही आठवड्यापूर्वीच घेतलेल्या ब्लॅक होंडा सिटीतून कुठेतरी दूर बाहेरगावी जाऊन यावेसे एकसारखे वाटत होते. पण कधी, कसे, कुठे हे काही ठरत नव्हते.

"बायकोच्या गावी कोल्हापूरला का नाही? येता- येता आपलं बेळगावही करता येईल", चकली खाता-खाता एक सुपीक विचार माझ्या डोक्यात शिरला. तसा तो बोलून दाखवण्यासाठी मी माझ्या सौ ला- जानूला- हाक मारली.  तशी ती कधी डायरेक्ट येतच नाही माझ्याकडे. म्हणजे तसे नव्हे! हातातली कामं आवरत किंवा आपल्या बोलिभाषेत 'मल्टिटास्किंग' करत ती मलाही उरकते. गेली दोन-तीन वर्षं हे असंच सुरू आहे. याही वेळी असेच घडले. स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीत येताना तिच्या हातात होते रांगोळीचे डबे! ते डबे घेऊन ती बाहेरच्या दारापाशी गेली; परतताना वर्तमानपत्र घेतलं आणि ती अक्षरशः हबकलीच!

" बापरे, अहो, हे वाचलंत का? ", माझ्याकडं ती जवळजवळ किंचाळतच आली.
मीही म्हटलं, "नाही!".
"नेहमी कसली मस्करी करता?" - बायको.
आता मात्र खरंच काहीतरी गंभीर गोष्ट घडल्याची मला जाणीव झाली.

वृत्तपत्रात आतल्या पानांत कोल्हापूर विशेष पुरवणीमध्ये खालच्या बाजुला एक छोटीच पण लगेच नजरेत भरेल, अशी बातमी होती - " अदभुत जीवदान...!"
खाली लिहिलेला मथळा वाचला. थोडक्यात त्यात असं सुचवलं होतं की, रेल्वे-क्रॉसिंगवर बंद पडलेली ती गाडी केवळ भूत-शक्तीमुळंच सुरू झाली आणि होणारी एक मोठी दुर्घटना टळली".

आता मात्र मला खरंच हसू आवरेना!
"हे पेपरवाले सुद्धा कशाची बातमी करतील आणि काय मसाला लावतील याचा काही नेम नाही", मी हसत हसत म्हणालो.
"अहो, तसं नव्हे. पण हे खरंही असू शकतं. प्रत्येक गोष्ट कसली चेष्टेवारी नेता?" बायको रागारागाने म्हणाली.

दोन-एक आठवड्यानंतर बायकोच्या एका बालमैत्रिणीचा - सायलीचा फोन आला आणि माझा मनसुबा सफल झाला. पुढच्याच आठवड्यात सायलीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी म्हणून आमचा कोल्हापूर दौरा ठरला.
                                                                 -*-

लग्न, पन्हाळा, रंकाळा, मिसळ, तांबडा-पांढरा रस्सा, बायकोचं माहेर, तिथला आग्रह वगैरे सगळं मजेत पार पडलं. बेळगाव कोल्हापुरपासून जेमतेम तीन- साडेतीन तास अंतरावर आहे. राखून ठेवलेला एक पुर्ण दिवस बेळगावात घालवता यावा म्हणून आम्ही रात्रीच कोल्हापुरातून निघालो.

अर्धा तास झाला असेल नसेल आणि अचानक पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर सरायची काही चिन्हं दिसेनात आणि एवढ्यात स्टेशन रोडवर एका खड्ड्यात गाडीचं चाक घुसलं आणि जोराचा हिसका बसला. गाडीचं चाक खड्ड्यातून काही केल्या बाहेर निघेना! सगळीकडं सामसुम होतं. बायकोला स्टिअरिंगबद्दल काही सुचना करून गाडीमधून बाहेर आलो. शेवटी खूप कष्टानं चाक बाहेर काढण्यात यश मिळालं आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला.पण एव्हाना मी चिंब भिजलो होतो.

दहा-एक मिनिटात व्हिक्टर पॅलेस हॉटेलपाशी आलो. तिथं एक पानवाल्याची टपरी उघडी दिसली. दोन मिनिटं थांबावं असा विचार करून गाडी टपरीच्या कडेला घेतली. "एक ब्रिस्टॉल पॅकेट किंगसाईज..",
पण टपरीवाल्याचं माझ्याकडं लक्षच नव्हतं. पुन्हा शांतपणे गाडीतून बाहेर येवून विचारलं, "एक ब्रिस्टॉल पॅकेट किंगसाईज...?". तसं त्यानं माझ्याकडं पाहिलं आणि ब्रिस्टॉलचं पाकिट माझ्या हातात ठेवलं. त्याची नजर मला आवडली नाही.
तिथेच मस्त झुरके मारल्यावर मला थोडी तरतरी आली. फ्रेश वाटलं आणि थंडी निघून गेली. पाऊस काही केल्या थांबत नव्हता.

चावी लावली, पण गाडी सुरू होईना. ...किर्र.क..ख..ख..खॅ...  किर्र.क..ख..ख...
किर्र.क..खटॅक..ख..घॅ.. ह s S .....  "हुश्श... झाली बुवा सुरु"- मी.
बेळगावात सकाळी एकदा मेकॅनिकला दाखवून मगच रात्री मुंबईला रवाना व्हावे, असा जानूनं तातडीनं सल्ला दिला. तो मलाही पटला. त्र्यंबोली क्रॉसिंगवरून शिवाजी विद्यापीठमार्गे NH4 हायवे आणि तिथून सरळ बेळगावांत, अशी आमची इटिनररी होती.

एवढ्या अंधारात आणखी एकही गाडी या बाजूने वा त्या बाजूने येत नाहीये, हे पाहून थोडं आश्चर्य वाटलं. सगळीकडं काळाकुट्ट अंधार आणि जो काय उजेड तो फक्त  टपरीवाल्याच्या कंदीलाचा आणि माझ्या गाडीच्या हेडलँप्सचा. मी गाडी त्र्यंबोली क्रॉसिंगच्या दिशेनं गाडी वळवली. अर्धा एक किलोमीटर वर त्र्यंबोलीचे रेल्वे क्रॉसिंग होतं. क्रॉसिंगवर हिरवा, तांबडा कुठलाच सिग्नल दिसत नव्हता. "बहुतेक MSEB ची कृपा असावी, असो" मी मनाशीच म्हटलं. काही क्षणांतच क्रॉसिंग गाठलं आणि हे काय? निमिषार्धात माझ्या गाडीचे सगळे दिवे बंद पडले! मागे टपरीवाल्याचा कंदीलही दिसत नव्हता. क्रॉसिंग तरी पार करू या विचारानं मी ऍक्सिलरेटर दाबला.

[float=font:sagar;size:18;breadth:200;place:top;]एक जोरदार हिसका बसून गाडी शांत झाली. हिसक्यानं अर्धवट झोपलेल्या जानूचं डोकं दारावर आपटलं आणि ती जोरात किंचाळली.[/float]  बाहेर पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. "गाडी एकदम कशानं बंद पडली असावी?" मी विचार करत गाडीतून बाहेर आलो. आणि मगाशी ते खड्ड्यात अडकलेलं चाक तर नीट असेल ना?', हे पाह्ण्यासाठी चाकावर मोबाईलचा प्रकाश टाकला. चाक पंक्चर झालं होतं आणि चाकाखाली....
"देवा!" चाकाखाली रेल्वेचे ट्रॅक होते. त्या धक्क्यानं मला एवढ्या थंडीतही घाम फुटला.

" देवा!"
धप..धप्प....s sS मला घाबरायला वेळही न देता नशीबानं माझ्यापुढं कसोटीचा क्षण उभा केला. दूर अंतरावरून एक मालगाडी येत होती आणि त्यामुळं होणारी ट्रॅकची कंपनं मला जाणवली. मी जानूला गाडीतून उतरायला सांगितलं. तसाच मागे गेलो आणि गाडी ढकलायचा प्रयत्न केला. गाडी तसुभरही हलली नाही. 

मालगाडी बऱ्यापैकी जवळ अंतरावर आली. तसा तिचा वेग आम्हाला जाणवू लागला. इंजीन ड्रायव्हरला हा प्रकार काहीसा लक्षात आला असावा, कदाचित. त्यानं कळ दाबली आणि व्हिसल दिली. कदाचित एवढ्या वेगात मालगाडी थांबवणे, शक्य होत नसावे. एवढ्यात,
" अहो, सीटबेल्ट निघत नाहीयेत..", आतून जानू चा आवाज आला.
"क्काय??" घामानं अख्खं शरीर डबडबलं. थरथरत्या हातानी मी खिडकीतूनच तिचा बेल्ट काढायचा प्रयत्न केला. पण व्यर्थ! जानू चे सीटबेल्ट लॉक झाले होते.
माझं डोकं सुन्न झालं.

एव्हाना मालगाडीच्या इंजिनचा प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचला. मी काहीही विचार न करता माझ्या सीटवर बसलो. गाडी सुरु करण्यासाठी किल्लीला हात घातला. तशी किल्ली खाली पडली. कानावर कर्कश्श व्हिसल आली तसा मी जानूच्या डोळ्यांवर हात ठेवले , डोळे मिटून खाली वाकलो.

एक जोरदार धकका बसावा, एखाद्या हत्तीनं ढकलावी तशी आमची गाडी पुढं ढकलली गेली. जानूनं जीवाच्या आकांतानं ठोकलेली किंचाळी आणि मागून काही इंचावरून निघून गेलेल्या मालगाडीचा मिश्र आवाज कानावर पडला आणि माझ्या जीवात जीव आला.

" आई ग्गं..S, काय केलंस तु? कशी चालू झाली गाडी?", जानूनं भानावर येत विचारलं.
"म्मी? मी नाही केली गाडी सुरु, कुणीतरी ढकलली असं वाटलं" -मी म्हणालो.
गाडीबाहेर येऊन मी शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण तिथं कुणीच नव्हतं.

थोड्या खटपटीनंतर जानूही सीटबेल्ट काढून गाडीबाहेर आली.

पाऊस थांबला होता. आकाशात छान चांदणं होतं. गार वाऱ्याची मंद झुळुक आली आणि एखाद्या लहान मुलानं केसातून हात फिरवावा असा भास झाला.
मी जानूला मिठीत घेतलं,"कदाचित, आजचा दिवस...आपला शेवटचा..". जानूनं माझ्या ओठावर तिचं बोट ठेवलं.

"थँ s क्यू..", "...थँक्यू ss", मी आकाशाकडं पहात आम्हाला वाचवणाऱ्या त्या अनामिक व्यक्तीचे आभार मानले.

घरी फोन करून कळवण्यासाठी मी मोबाईलवर नंबर फिरवू लागलो. जानू माझ्या शेजारीच उभी होती. मोबाईलच्या प्रकाशात तिचं लक्ष गाडीच्या मागच्या काचेकडं गेलं आणि ती अक्षरशः ओरडली," अहो S ,  हे पाहिलंत का?"

गाडीची मागची काच थोडी फुटली होती, पण काचेवर ठसे उमटले होते, इवल्याशा हातांचे!
                                                              -*-
फोन लागला. जानूचे वडील स्वतः आम्हाला न्यायला आले. एव्हाना सकाळ झाली. घरी चहा वगैरे प्याल्यावर जरा बरे वाटले. मी त्या छोट्याशा हातांच्या ठशाबद्दल बोलताच जानूचे वडील एकदम गप्प झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.

जानुचा डोक्यावर हात ठेवून ते हताशपणे म्हणाले, " बाळ, तुला कदाचित आठवत नसेल. तू तिसरीत असतानाची गोष्ट. तुझ्या शाळेची सहल जाणार होती बेळगाव- हुबळीला. तुझ्या मैत्रिणीला- सायलीला - ताप आला होता. आणि ती नाही येणार म्हणून तूही सहलीला नाही गेलीस. पण ते तुम्हा दोघींसाठी चांगलेच ठरले. तुम्हा दोघींचे नशीब बलवत्तर!" "त्या सहलीला गेलेल्या मुलींचे दुर्दैव असे कि, त्यातलं कोणीच वाचलं नाही त्या क्रॉसिंगवरच्या अपघातात! एवढी जबरदस्त धडक दिली होती मालगाडीनं की बस्स!"

माझ्या हातात एक खुप जुनं वर्तमानपत्र देत पाहत तिचे वडील उद्गारले, " जावईबापू, तुमच्या गाडीवर तुम्हाला लहान लहान हातांचे ठसे दिसले ना? तुम्हा दोघांना त्या इवल्याशा मुलींच्या आत्म्यांनीच वाचवलं, त्यांनीच तुमच्या गाडीला धक्का दिला आणि तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं"

त्या जुन्या वृत्तपत्रात ती बातमी अशी होती-
" ...कोल्हापूरातील त्रंबोली क्रॉसिंगवर मालगाडीनं दिलेल्या जबरदस्त धडकेमुळे शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेवून जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. बसचा चक्काचूर झाला. कोणीही जीवंत सापडले नाही........."

का कोण जाणे ती बातमी वाचून झाल्यावर जानू एकदम उठली. आतल्या खोलीत गेली आणि तिने सायलीला फोन लावला. पाचच मिनिटांत जानू बाहेर आली. तिच्या नजरेत चमक जाणवत होती. तिचे डोळे बोलत होते - आम्ही दिवाळीत मुंबईत जी बातमी वाचली होती ती सायलीबद्दलच होती.
"सायलीलाही छोटे हातांचे ठसे दिसले होते", जानुनं सायलीशी फोनवर बोलून लगेचच खत्री करून घेतली होती.

सायली आणि जानू दोघींच्या नशीबात असलेला काळाचा आघात त्यांच्या वर्गमैत्रिणींनी झेलला होता.
                                                               -***-