गझलांची `सप्तरंगी` मैफल !

अनेक दिवसांपासून अनिरुद्ध अभ्यंकर, ओंकार जोशी आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या मनात गझलवाचनाचा एखादा कार्यक्रम पुण्यात घ्यावा असे होते. कविवर्य सुरेश भट यांच्या ७७ व्या जन्मदिनानिमित्त सप्तरंग हा गझलवाचनाचा कार्यक्रम पुण्यात भरत नाट्यमंदिरात १८ एप्रिल रोजी झाला. अनिरुद्ध अभ्यंकर आणि त्यांच्या मित्रमंडळींनी गझलांवरील एक सुंदर कार्यक्रम ऐकण्याची संधी त्यांनी पुण्याच्या चोखंदळ गझलरसिकांना दिली, त्याबद्दल अभ्यंकर आणि मित्रमंडळींचे आभार वृत्तान्ताच्या सुरुवातीलाच मानणे अनुचित होणार नाही. कवी म. भा. चव्हाण, चंद्रशेखर सानेकर, वैभव जोशी, अभिमन्यू आळतेकर, डॉ. अनंत ढवळे, चित्तरंजन भट व प्रदीप कुलकर्णीअशा सातजणांनी या गझलमैफलीत भाग घेतला. गझलकार सात म्हणून कार्यक्रमाचे नावही सप्तरंग ! या मैफलीने खरोखरच मराठी गझलेचे विविध रंग रसिकांपुढे आणले आणि त्यांना उपस्थितांनी दादही भरभरून दिली. अरुण म्हात्रे यांच्या संयत आणि नेटक्या निवेदनाने या मैफलीची रंगत वाढविली.

सप्तरंग मैफलीची सुरवात अर्थातच कविवर्य सुरेश भट यांच्या छायाचित्राला सहभागी सर्व कवींनी आदरांजली वाहून झाली. दीपप्रज्वलन झाले आणि मराठी गझलेची ही ज्योत उपस्थित सर्वांच्याच मनात पुढील तीन तास अखंड तेवत राहिली. रात्री साडेनऊला सुरू झालेली ही मैफल साडेबाराला संपली. ही मैफल आणखीही पुढे सुरू राहिली असती तर बरे झाले असते, अशी भावना मनात घेऊनच गझलरसिकांनी आपापल्या खुर्च्या सोडल्या.

गझलमैफल सुरू होण्यापू्र्वी कविवर्य सुरेश भट यांच्यावरील दृक्-श्राव्य फितीचा काही अंश दाखविण्यात आला. या अंशात, मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, हे गीत सादर करत असताना भट यांचे पडद्यावरील दर्शन सर्वांना झाले आणि नाट्यमंदिर त्यांच्या आठवणींनी अबोल, स्तब्ध झाले. ह्यानंतर भटांच्या असंख्य कार्यक्रमांत निवेदकाची भूमिका पार पाडणारे सुरेशकुमार वैराळकर ह्यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले आणि गझलगायक सुधाकर कदम ह्यांच्या सोबतीने गझलकारांचे स्वागत केले.

या मैफलीत प्रत्येक कवीने चार आवर्तनांमध्ये प्रत्येकी एक अशा चार गझला सादर केल्या. 'सारेच विसरू दे मला' या गझलेने प्रदीप कुलकर्णी यांच्या गझलेनेया मैफलीची सुरवात झाली.
त्यानंतर म. भा. चव्हाण, चंद्रशेखर सानेकर, डॉ. अनंत ढवळे, वैभव जोशी, अभिमन्यू आळतेकर आणि चित्तरंजन भट या क्रमाने गझलांचे सादरीकरण झाले.

प्रदीप कुलकर्णी यांनी या गझलेशिवाय `कधीपासूनचे`, `व्यास` आणि `थांब की जरा` या गझला सादर केल्या.

बडवे, विठोबा, पंढरी...सारेच विसरू दे मला
तेथे न माझी पायरी...सारेच विसरू दे मला

अशी सुरवात झाल्यावर

शहरात या उपऱयापरी, माझ्यात मी दुसऱयापरी
ते गाव, घर, ती ओसरी...सारेच विसरू दे मला

या शेरातून त्यांनी शरीराने शहरात राहणाऱया पण मनाने आपल्या गावातच, त्या गावातील घरात वावरणाऱया माणसाची घालमेल व्यक्त केली. यानंतर कुलकर्णी यांनी--

कोणीतरी काळास या दळते कधीपासूनचे

हे पीठ काळे-पांढरे गळते कधीपासूनचे

ही गझल सादर केली.याच गझलेतील एक शेर होता...

भेटू कुठे त्याला कुठे ? बोलू कधी त्याच्या सवे
आयुष्य थांबेनाच हे...पळते कधीपासूनचे

या शेरातूनही आपणच आपल्यापासून आधुनिक जगात जगताना कसे दुरावत चाललो आहोत, ते दाखविण्याचा प्रयत्न केला.

म. भा चव्हाण यांनी त्यांच्या नेहमीच्याच दमदार गझला त्यांच्या आवेशयुक्त पद्धतीने सादर केल्या.

घातले स्वतःला ज्यांनी जातीचे कुंपण आहे
त्या प्रत्येकाशी माझे ठरलेले भांडण आहे
ही त्यांची खास गझल त्यांनी सादर करताच तिला जोरदार प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर सानेकर यांच्या गझलांनी गझलरसिकांचा ताबा घेतला. गझलसादरीकरणाच्या संवादी पद्धतीने सानेकर यांच्या गझलांनी रसिकांशी मनमोकळे हितगुज केले.
सानेकर यांचा एक शेर आहे -

उगाच का दवबिंदू सगळे खिन्न थरारत होते !
कुठेतरी डोळ्यात रात्रभर अश्रू जागत होते

त्यांच्या गझलांनी या मैफलीत असाच अनुभव दिला.

एक वेडी आजमावू पाहते आहे मला
अन् तरीही ऐनवेळी टाळते आहे मला

हा इरादा तर नसावा एक घरट्याचा तिचा ?
एक चिमणी रोज हल्ली भेटते आहे मला

चिमणीचा शेर सानेकरांनी ऐकवला आणि...दादच दाद मिळाली.

शेतकऱयांच्या आत्महत्यांबाबतची वस्तुस्थिती किती चपखलपणे सानेकरांनी या शेरातून मांडली आहे, पाहा

झूठ आहे हा समज की नापिकी शेतात आहे
ती जरी शेतात दिसते, पण खरी देशात आहे

सानेकर यांची पुढची गझल होती -

पुढ्यात माझ्या काळ छान बागडतो आहे
काय आज मी त्याच्याशी बडबडतो आहे...

सानेकर यांच्यानंतर डॉ. अनंत ढवळे यांनी तरल, सूक्ष्म अनुभवांच्या गझला सादर केल्या.

निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली

या शेराला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.

पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली

याही शेरातील तरलता अनेकांनी स्पर्शून गेली

कुणाचे स्वप्न प्रत्यक्षात आले
पहाडांवर उन्हे बघ उतरलेली

या चित्रमय शेराने तर उपसस्थितांच्या डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटातल्याप्रमाणे निसर्गदृश्यच उभे राहिले.

तुझी सय ठेवतिल ताजी तवानी
तुझ्या पश्चात राने बहरलेली...

ढवळे यांनी हा शेर ऐकवला...सुऱेश भट, गझल आणि गझल लिहिणारी आजची तरुण पिढी अशी सांगड या शेराशी त्यांनी घातली आणि मग या शेरातील गहिरेपणा अधिकच भावला.
ढवळे यांच्यानंतर वैभव जोशी यांनी गझला सादर केल्या.
साध्या-सोप्या आणि उपस्थितांशी थेट संवाद साधणाऱाय या गझलांना मोठी दाद मिळाली नसती तरच नवल...!

भूक जाळू लागली की चंद्र भाकर होत नाही
रक्त गोठू लागता आभाळ चादर होत नाही...
ही गझल जोशी यांनी सादर करायला प्रारंभ करताच अनेकजण सावरून बसले...या सावरून बसण्यामागचे कारण होते, या गझलेतील एक अफलातून शेर. हा शेर होता -

एकदा झाली चुकामुक, पण पुन्हा भेटूच आपण...
एक नश्वर जन्म काही फार अंतर होत नाही !

हा शेर पुन्हा पुन्हा सादर करण्याची फर्माईश श्रोत्यांमधून तर झालीच, पण मंचावरील अन्य काही कवींनीही या शेराला वन्स मोअर दिला.
जोशी यांनी दुसरी गझल सादर केली...

सोबतीचा तरी करार करू

मग कुठे जायचे, विचार करू

कायद्यानेच होउ द्या सारे...
मग निकालात फेरफार करू

या शेराला उत्स्फूर्त दाद मिळणारच होती. तसेच झाले.
जोशी यांची पुढची गझल होती - छान चालले आहे माझे ....

तुमच्याइतके नसेलही पण...छान चालले आहे माझे
पोटापुरते मिळते जेवण...छान चालले आहे माझे

मनात माझ्या नकोच आहे इमले कोसळण्याची भीती
छोटेसे घर, छोटे अंगण...छान चालले आहे माझे
या उपरोधपूर्ण, उपहासपूर्ण गझलेलाही मोठी दाद मिळाली.

जोशी यांच्यानंतर उपस्थितांपुढे आपल्या गझला घेऊन आले ते अभिमन्यू आळतेकर. आळतेकर यांनी रस्ता,बऱयाच वेळा, नाव माझे, अशा त्यांच्या बहारदार गझला सादर केल्या. भरपूर दाद त्यांनी घेतली.

मी चालतोच आहे, गेला दमून रस्ता
आता नवीन सांगा, दुसरा अजून रस्ता
आळतेकर यांनी मतला सादर करताच जोरदार दाद घेतली आणि पुढे एकेक शेर असाच रंगत गेला.

रस्त्याचे अनेक `चेहरे` त्यांनी या गझलेतून उपस्थितांच्या समोर सादर केले.
नावावरी जयांच्या, आहेत खूप रस्ते
त्यांनाच सापडेना त्यांचा अजून रस्ता

होता जुनाट जेव्हा, जवळीक फार होती
झाला नवीन तेव्हा, गेला दुरून रस्ता

झाली अलोट गर्दी, गेला भरून रस्ता
मी आज पार केला, खांद्यावरून रस्ता

या शेर उपस्थितांच्या मनात जाऊन बसले.

आळतेकर यांची दुसरीही गझल अशीच `यादगार`ठरली. ती म्हणजे - बऱयाच वेळा

लपवून आसवांना, हसतो बऱ्याच वेळा
मीही नको नको ते, करतो बऱ्याच वेळा

अंदाज याचसाठी, मी बांधणार नाही ...
अंदाज माणसाचा, चुकतो बऱ्याच वेळा

या शेराला वन्स मोअर हमाखास मिळणार होता. तसा तो मिळालाच.

लावू नकोस आता, हा मुखवटा पुन्हा तू
आतील चेहराही, दिसतो बऱ्याच वेळा

हा शेर प्रत्येकालाच आलेल्या सत्याचा रोकडा प्रत्यय सांगून गेला.

सोयी नुसार माझे, असणे हवे तुम्हाला
जाणून हेच मीही, नसतो बऱ्याच वेळा

...आणि या शेराने तर प्रत्येकाच्याच मनातील ढोंग उघड करत प्रखर वास्तवतेची प्रचीती आणून दिली.

आळतेकरांनतर चित्तरंजन भट ह्यांनी (अस्मादिकांनी) "वाटले बरे किती!" गझल सादर केली. छान दाद मिळाली. पुढच्या आवर्तनांत त्यांनी 'हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता', 'देवा' आणि 'राहिले माझेतुझे नाते घसाऱ्यासारखे ' ह्या गझला सादर केल्या. ह्या गझलांनाही अशीच दाद मिळाली.

एकूणच ही ही सप्तरंगी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. या सप्तरंगी मैफलीत आठवा रंगही होता, तो निवेदक आणि कवी अरुण म्हात्रे यांच्या निवेदनाचा. हे देखील कार्यक्रमतो रंगही वेगळा असा उठून दिसला... गझला सादर करण्याच्या कविवर्य सुरेश भट यांच्या पद्धतीविषयी म्हात्रे यांनी श्रोत्यांनी सप्रयोग माहिती दिली.`उठते रे काळजात कळ अजून` ही भट यांची गझल म्हात्रे यांनी सुरात सादर केली आणि या मैफलीची सांगता झाली.

(चित्रे त्यांवर टिचकी मारून मोठ्या आकारमानात पाहा : प्रशासक)