परतफेड -२

तू एक प्रतिष्ठित, यशस्वी व्यावसायिक. छोटासा सुखी संसार. एका बेसावध क्षणी तुझे पाऊल घसरते. त्या मोहाच्या क्षणातून जन्माला आलेला तुझा मुलगा. परिस्थितीच्या पिरगाळ्यातून तुला त्याला घरी आणावे लागते. तुझा संसार या वादळाने उध्वस्त व्हायला आलेला आहे. एका रात्री हा छोटा मुलगा घरातून गायब होतो. त्याला शोधायला रस्त्यावर तुझी तगमग होते आहे. मुलगा कुठेच दिसत नाही. तुझा मित्र तुला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो.   संवेदनाहीन मद्दड पोलीस इन्स्पेक्टर. तुझी -एका बापाची- अस्वस्थ घालमेल, मुलाचे वर्णन तू सांगतोस...
"बापका नाम? " इन्स्पेक्टर.
"बापका नाम लेकर क्या करेंगे आप? बच्चा मिलनेपर उसे बापका नाम पूछेंगे? " तुझा संताप अनावर
"बापका नाम? "  पोलीस इन्स्पेक्टर थंड.
"डी. के. मल्होत्रा" तू खालच्या आवाजात म्हणतोस.
"जरा जोरसे बोलिये.. "
"डी. के. मल्होत्रा... सुनाई नही देता क्या आपको? डी. के. मल्होत्रा! "  तू संतापाने फुटून टेबलवर मूठ आपटतोस. एका अगतिक, हताश बापाची कैफियत...

काळाच्या पुढे असलेला तू एक मनस्वी प्रतिभावंत शायर.   शब्दांनी रोज तुझी पूजा करावी अशी तुझी प्रतिभा. पण तू तितकाच अहंमन्य, गर्विष्ठ आणि फटकळ. कुणाशी जमवून घेणे तुला कधी जमलेच नाही. पण तुला याची फिकीरही नाही. 'शायर तो वो अच्छा है,   पर बदनाम बहोत है' असं तू स्वतःविषयीच म्हणतोस. धर्म, कर्मकांडे, देव यांनाही तू लाथाडून दिले आहेस. व्यवहारही तुला कधी जमला नाही. आता कर्जात गळ्यापर्यंत बुडूनही तुझी ऐयाशी सुरुच आहे. आज रात्री दारुला पैसे आहेत. उद्याचं काय? तुझ्या शायरीचा कदरदान सावकार मित्र दरबारीमल. त्याच्याकडे तू परत पैसे उसने मागायला जातोस.
"हम्म. " दरबारीमल तुझ्यापुढे पान ठेवतो. "पान तो आप खाते नहीं. सुना है जहर लगता है आपको...   " दरबारीमल हसतो.
"जहर होता तो खा लेता... " तुझ्याही चेहऱ्यावर मिस्किल हसू. "पान है, इसलिये नही खाता.. "  दरबारीमलकडून घेतलेले पैसे घेऊन ताबडतोब तू जुगाराच्या अड्ड्यावर येतोस. बाहेर एक फकीर तुझीच गजल गात हिंडतोय 'कोई दिन गर जिंदगानी और है.. ' तू हाताला येतील तेवढे पैसे त्याच्या कटोऱ्यात टाकतोस. अरे, इथे कुणाला फिकीर आहे? जिंदगी असली काय आणि नसली काय! 'हो चुकी गालिब बलायें सब तमाम, एक मर्गे नागहानी और है' जणू तुझी डेथ विशच...  

तू एक अपयशी, विस्मरणात गेलेला गोलंदाज. तुझी गुणवत्ता घाणेरड्या राजकारणाने कुजवून टाकलेली. आता तू चोवीस तास स्वतःला दारुत बुडवून घेतले आहेस. गावातला एक मुका-बहिरा पण जबरदस्त क्षमता असलेला मुलगा तुला सक्तीने स्वतःचा गुरू करून घेतो. तू थोडासा भानावर येतो आहेस.   तुझ्या डोळ्यांत आता थोडा प्रकाश आहे. तुला जे जमले नाही, ते याला जमेल कदाचित... तुझ्या शिष्याला... पण इथेही तेच घाणेरडे राजकारण येते. तुला ज्यांनी संपवले तेच गुरुजी इथेही सौदा करायला येतात.
"कोई डील  नही गुरुजी" तू कणखरपणाने सांगतोस.
"अस्सं. म्हणजे अजून तुझा पीळ गेला नाही तर. " गुरुजींच्या चेहऱ्यावर तेच मुत्सद्दी हास्य. "ठीक है. तो फिर मैं उसका भला चाहूंगा" जीभ चाटणाऱ्या एका शिकाऱ्याचे वाक्य.
तुझ्या आतून काहीतरी उफाळून येतं. हेच, हेच ते सगळे हरामखोर. सगळे कोंभ चिरडून टाकणारी हीच ती या साल्यांची सिस्टीम...
"बहुत दिनोंसे एक बात कहना चाहता था मैं आपसे, गुरुजी. " तू संथपणे बोलू लागतोस. "आपसे, अपने बापसे, और उन सबसे, जिन्होंने मेरा भला चाहा है... " तुझा उद्रेक होतो. "गो टू हेल! "

फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेला तू एक विख्यात गजल गायक. गजलांच्या कार्यक्रमाच्या बहाण्याने भारतात हेरगिरी करण्यासाठी तुला पाकिस्तान सरकारने पाठवले आहे. एकीकडे  तुला भारतातल्या आपल्या ऐश्वर्यसंपन्न  भूतकाळाविषयी  हुरहूर आहे. दुसरीकडे भारतातून हाकलून दिल्याबद्दल चीड. आज पाकिस्तान तुझा देश आहे. पण बोलताबोलता कुणीतरी तुझा उल्लेख मुहाजिर म्हणून करतो. आपण अजूनही मुहाजिर? परके? निर्वासित? तुझ्या डोळ्यांत, स्वरांत एक विलक्षण वेदना दाटून येते. मुहाजिर?

तू एक अंध पण स्वाभिमानी तरुण. तुझे अर्थपूर्ण पण कोरडे आयुष्य. तुझ्या संस्थेत काम करणाऱ्या अशाच एका अभागी, पोळलेल्या तरुणीबरोबर तुझे सूर जमतात. तुमचे लग्नाचे ठरते आहे. कधीतरी तिच्या बोलण्यात 'ड्यूटी' हा शब्द येतो आणि तू अचानक चमकतोस. ड्यूटी? म्हणजे हिला आपल्याविषयी वाटणारी भावना ही फक्त... कणव? सहानुभूती? आपण आंधळे, अपंग म्हणून.. फक्त करुणा? ड्यूटी?
'ड्यूटी' हा शब्द तू स्वतःशी फिरवून फिरवून पाहतोस. तुझा दुखावलेला अभिमान तुझ्या भावनाहीन डोळ्यांतून ओघळत असतो... आपण  ज्याला प्रेम वगैरे समजत होतो ती अशी फक्त दया?... फक्त  ड्यूटी?  

तू भास्कर कुलकर्णी. सरकारी वकील. तुझा अशील एक आदिवासी. त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. त्याला न्याय मिळावा म्हणून तुझा झगडा सुरू आहे. साऱ्या यंत्रणेशी, सगळ्या सिस्टिमशी. पण तुझा अशील काहीच बोलत नाही. तू त्याला बोलता करण्याचे सतत प्रयत्न करतोस. पण तो तोंडातून चकार शब्द काढत नाही. फक्त आपल्या गोठलेल्या थंड नजरेने बघत राहतो. तुला काही कळत नाही. तू अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत म्हणतोस, "कुछ तो बोलो, कुछ तो... "

तू इन्स्पेक्टर लोबो. एक प्रामाणिक पोलिस अधिकारी. भ्रष्टाचाराला नकार दिल्यानं तुला इतरांनी सापळ्यात अडकवलं आहे. आता तू पूर्णपणे दारुच्या आहारी गेलेला. एका गुत्त्यातच तुला अनंत वेलणकर भेटतो. तुझ्या दारुचे पैसे तो भागवतो. नशेने धुंद झालेल्या नजरेने तू स्वतःशी ओळख करून देतोस, "इन्स्पेक्टर लोबो. अंडर सस्पेन्शन ऍट प्रेझेंट, फॉर बिईंग अंडर दी इंफ्लुअन्स ऑफ अल्कोहोल, व्हाईल ऑन ड्यूटी... "

तू विनोद चोप्रा. एक व्यावसायिक फोटोग्राफर. बिल्डर तर्नेजा आणि आहुजा यांच्या कारवाया आणि कमीशनर डिमेलो याचा खून या लफड्यात अपघाताने सापडलेला.   घोळ वाढत जातो आणि शेवटी कमिशनरचे प्रेत द्रौपदी आणि अनारकली म्हणून स्टेजवर येण्यापर्यंत असंख्य भानगडी होतात. या सगळ्यात दैनिक 'खबरदार' ची एडीटर शोभा आपल्याबरोबर आहे असा तुझा समज आहे. पण तीही शेवटी त्यांच्यातलीच निघते. सगळेच किडके, पोखरलेले लोक... यात शेवटी तू आणि तुझा पार्टनर बळीचे बकरे होतात...

सुधा. तुझी कोणे एके काळची पत्नी. एक तडजोड म्हणून केलेले हे लग्न केंव्हाच अर्थहीन झाले आहे. सुधा तुला सोडून जाते. मायावर तुझे खरे प्रेम. पण तीही दूरवर निघून गेलेली. अचानक एका पावसाळी रात्री तुला एका स्टेशनच्या वेटिंग रुममध्ये सुधा भेटते. इतक्या दिवसांनी, अशी... तुम्हाला दोघांना जुने दिवस आठवतात. काही क्षण तसेच, वास्तवाकडे पाठ फिरवून जातात. पण अपरिहार्य अशी पहाट येते. सुधाचा नवरा तिला न्यायला येतो. तिने दरम्यान दुसरे लग्न केले आहे. हे सत्य तुझ्यावर कुणीतरी थोबाडीत मारावी तसे येऊन आदळते. तू पूर्ण उध्वस्त. सुधा  तुझा दुसऱ्यांदा निरोप घेते. उजाडणाऱ्या पावसाळी पहाटे फलाटावर तू खांदे पाडून उभा आहेस. दिशाहीन...

असे हे आठवणींचे आणखी काही तुकडे. आमच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण पेरल्याबद्दल  तुझी परतफेड करण्याचा हा एक प्रयत्न.