डोळे...

कसे अचानक आठवणींनी भरले डोळे?
इतक्या आल्या आठवणी की थकले डोळे...

स्वप्ने सगळी अर्धी-अपुरी अन फसलेली;
तरिही स्वप्ने अजून पाहत बसले डोळे...

समोर घडले प्रसंग माझ्या नकोनकोसे
'बघू नये' वाटले म्हणुन मी मिटले डोळे...

माझ्यापाशी मला पुरेसे असले तरिही
दुसऱ्यांचे का वैभव पाहत दिपले डोळे?...

नकाच लावू दिवे मला अंधार हवा...
संपली चेतना अन माझे विझले डोळे...

वाट पाहिली प्राण आणुनी डोळ्यांतच मी
अता वाटते नसत्या फंदी पडले डोळे!...

मी डोळ्यांना दटावले जरि "बघू नका"
नको-नको ते पाहत गेले चुकले डोळे...

दृश्य पाहिले जे-जे मी ते 'अजब'च होते
तंद्रीमध्ये जेव्हा माझे रमले डोळे...