कर लो "दुनिया' मुठ्ठी में

रुपेरी पडद्यावरील तारे-तारकांचं उंची राहणीमान, महागड्या गाड्या, तारांकित हॉटेलमधील त्यांच्या पार्ट्या यामुळे चित्रपट व्यवसाय बक्कळ पैसा कमावण्याचं साधन आहे, असा साधारण समज आहे. बहुतांशी तो खराही आहे. चित्रपट डब्यात गेल्यामुळे काही जण देशोधडीला लागल्याचीही उदाहरणं आहेत; पण ती अपवादात्मक आहेत. आता तर चित्रपटसृष्टी इंडस्ट्री झाली. त्यात छोटा पडदाही आलाच. या इंडस्ट्रीत सध्या बूम असली, तरी स्पर्धाही तितकीच तीव्र आहे. टीव्हीचं माध्यमही चित्रपटांशी सर्वार्थानं स्पर्धा करू लागलं आहे. म्हणूनच की काय, अमिताभपासून शाहरूख खानपर्यंत अनेक बडे कलाकार छोट्या पडद्यावर दिसू लागलेत. "कौन बनेगा करोडपती' आणि "पॉंचवी पास' ही त्याची दोन खास उदाहरणं. पूर्वी, रुपेरी पडद्यावर जम बसलेला कलाकार टीव्हीवरील मालिकेत काम करताना दिसत नसे. अभिनयाच्या क्षेत्रात नव्यानं पाऊल ठेवणारांचं हे माध्यम, असं समजलं जायचं; पण एकामागोमाग एक असंख्य चॅनेल्स उगवली. त्यानंतर चित्र पालटलं. या चॅनेल्सवरील महिनोन् महिने चालणाऱ्या मालिका, त्याला लोकांचा मिळणारा प्रतिसाद उद्योगजगतानं हेरला. आपल्या कंपनीची उत्पादनं घराघरांत नेणारं साधन म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रानं टीव्हीकडे पाहिलं. जाहिरातींचा भडिमार सुरू झाला आणि वाहिन्यांचं अर्थकारण बदलून गेलं. असंख्य मालिका, नवे चित्रपट, त्यात पाच-पाच मिनिटांना दाखविल्या जाणाऱ्या जाहिराती याविषयी थोडा विचार केला, तर छोट्या पडद्यामागील अर्थकारण चक्रावून टाकतं. रुपेरी पडद्याची तर गोष्टच निराळी. त्यामुळेच मोठे उद्योगपतीही टीव्ही चॅनेल्स, मालिका, चित्रपट यामध्ये प्रचंड गुंतवणूक करताहेत. उद्योजक अनिल अंबानी आणि अमिताभ बच्चन यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहेच; परंतु हे दोघं आता व्यावसायिक भागीदार झाले आहेत. अनिल यांची "रिलायन्स बिग एंफोटेन्मेंट' आणि "एबी कॉर्प्स' या कंपन्यांमध्ये तब्बल दीड हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. या दोन्ही कंपन्या संयुक्तपणे चित्रपट, मालिका, रिऍलिटी शोची निर्मिती करणार आहेत. अर्थातच आर्थिक बाजू अनिल अंबानींकडे आणि दर्जेदार चित्रपट आणि कार्यक्रमांच्या निर्मितीची जबाबदारी अमिताभ यांना सांभाळावी लागणार आहे. करारानंतर या दोन्ही कंपन्या केवळ छोटा आणि मोठा पडदा यापुरत्या मर्यादित राहणार नाहीत, तर इंटरनेट आणि मोबाईल वापरणारा मोठा वर्गही त्यांना काबीज करायचा आहे. त्यांचा व्यवसाय इंफोटेन्मेंट स्वरूपाचा असेल. ते केवळ एका भाषेपुरतेही मर्यादित राहणार नसून, हिंदीबरोबरच मराठी, तमीळ, कन्नड, बंगाली, तेलगू आणि पंजाबी भाषांतही चित्रपट आणि टीव्हीशी संबंधित कार्यक्रमांची निर्मिती केली जाणार आहे. निर्मितिमूल्य उच्च राहावं यासाठी "रिलायन्स'नं श्याम बेनेगल, अमोल पालेकर, संगीत सिवन, रितुपर्ण घोष, मधूर भांडारकर, प्रियदर्शन आदी दिग्गज दिग्दर्शकांना करारबद्ध केलंय. मोठी स्वप्नं पाहून ती साकार करण्याची अंबानी कुटुंबाची परंपरा आहे. त्यामुळे अनिल यांनी केवळ बॉलिवूड नव्हे, तर हॉलिवूडवरही लक्ष केंद्रित केलंय. प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्याबरोबर अनिल यांनी करार केला असून, हॉलिवूडमध्ये ते 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत, असं म्हणतात. हे खरंही असेल; कारण "कर लो दुनिया मुठ्ठी में' असं अंबानींचं ब्रीद आहे.