ही वाट न ठरो एकट्याची!

पूर्वी शहारुखची जाहिरात यायची. त्यात त्याने एक आशावाद व्यक्त केला होता की आता मराठी माणसे एकमेकांचे पाय ओढत नाहीत. ती परिस्थिती आता राहिली नाही.पण, मला अजूनही वाटत नाही की परिस्थितीत काही बदल झाला आहे म्हणून.  

गेल्या दहा वर्षांपासून सर्व मराठी वर्तमानपत्रांमध्ये, तसेच बऱ्याच मराठी माणसांच्या सतत बोलण्यात यायचे की, मुंबईत मराठी माणसे उरली नाहीत. परप्रांतीयांची दादगीरी असते,  त्यांनी नोकऱ्या हिरावून घेतल्या वगैरे. पण कुणी उघड उघड विरोध करू शकत नव्हते. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेवून, आता राज ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींना वाचा फोडली आहे. पण आपलेच दुर्दैव असे की, कुणीच मराठी नेता, अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता आणि साहित्यिक त्यांच्या म्हणण्याला म्हणावा तसा दुजोरा आणि पाठींबा सुद्धा देतांना दिसला नाही आणि अजुनही दिसत नाही. त्यापेक्षा कमीत कमी विरेन शहांच्या आणि माजिद मेमन यांच्या तोंडून एवढे तरी निघाले तरी की, "आम्हाला मराठी बद्दल आदर आहे. आपण एकत्र येवून मराठीच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करू." 

बाकी कुणीच मराठी नेता एवढे सुद्धा म्हणत नाहीये की "मराठीचा अभिमान असला पाहीजे, मराठी बोललेच पाहीजे."  साहित्यिकांकडून तर पाठींब्याची अपेक्षा खुप मोठी होती पण त्या आघाडीवरही अंधार आहे.ते गुतलेत साहित्य संमेलन परदेशात घ्यायचे की नाही या वादात.ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.सगळेच राजकारण करत आहेत आणि मराठीच्या मुद्यावर एकी होण्याची शक्यता धूसर वाटू लागली आहे. राज यांच्याच म्हणण्याप्रमाणे दक्षीणेकडे सगळे राजकीय पक्ष भाषेच्या मुद्यावर एकत्र येतात. महाराष्ट्रात एकेका नेत्याचे हितसंबंध गुंतलेले असल्याने कुणीही राजला साथ द्यायला तयार नाही. मुख्यमंत्र्यांचा मुलगा बॉलीवूडमध्ये असल्याने काही बोलले तर त्याच्या करीअरवर परीणाम होईल याची त्यांना भीती वाटत असावी.

"मला मराठीचा अभिमान आहे, जय महाराष्ट्र" असे म्हटले तर तो काय लगेच प्रांतवाद कीवा  नस्लवाद होत नाही. नुकतीच एक भोजपूरी भाषेतील महुआ नावाची वाहीनी सुरू झाली आहे. त्याला कुणी काही विरोध करीत नाही? प्रत्येकालाच आपापली भाषा टिकावी असे वाटते.   मग आपल्याला वाटले तर त्यात वाईट काय? असे असते तर मग भाषावार प्रांतरचना कशाला झाली असती आणि इतर राज्यांतील लोक हे म्हणतात तेव्हा तो होतो भाषेबद्दलचा अभिमान आणि मराठी माणसाने म्हटले तर तो प्रांतवाद म्हटला जातो. ही मराठी माणसाची मुस्कटदाबी आहे.  जेव्हा एखाद्या समाजाचे, भाषेचे अस्तित्त्व नष्ट होण्याच्या मार्गावर असते, तेव्हा असा कुणीतरी नेता येवून ते अस्तित्त्व टिकवण्यासाठी पुढे आलाच पाहिजे.   पण मात्र, मला असे वाटते की राज यांना हा मुद्दा ज्यांच्या साठी (मराठी बापूडा माणुस) उचलला आहे,   त्यांच्याच कडून असाच विरोध होत राहीला किंवा उदासिनता दिसली तर राज यांना पश्चातापाची पाळी येईल आणि ते खंत करत बसतील.   ही पाळी त्यांच्यावर न येवो आणि ही वाट त्यांची एकट्याची न ठरो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना.   मराठी माणसाचा न्यूनगंड कमी व्हावा, त्याने खेकडा वृत्ती सोडावी  आणि शहारूखचा आशावाद प्रत्यक्षात उतरावा (उतरवावा) हीच अपेक्षा. जय महाराष्ट्र.