शिळा सप्तमी

  • तेल
  • तिखट
  • मीठ
  • कांदा
  • दाण्याचे कुट
  • शिळा भात
५ मिनिटे

आमच्याकडे एकत्र मोठ्या कुटुंबामुळे सुरुवातीला शिळं उरणे हा प्रश्न नव्हता तसेच अ-तिथी (तिथी न ठरवून अचानक येणाऱ्या पाहुण्यांची) कमी नव्हती पण कालौघात कुटुंबाचे विघटन झाले आणि शिळ्याचा प्रश्न उभा राहिला.

शिळ्या भाताचा शक्यतो लसणाच्या फोडणीचा किंवा कांद्याच्या फोडणीचा भात व्हायचा पण सर्वांत जास्त वेळा व्हायचा तेल, तिखट, मीठ भात.

कृती - शिळा भात प्रथम मोकळा करून घ्यावा आणि त्या भातात सढळ हाताने तेल घालावे. त्यात लाल तिखट भुकटी / उसळी मिरची (ताजी, ठसका लावणारी असेल तर प्राधान्य), मीठ, (पावभाजीसाठी करतो तसा) बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कुट आवडीनुसार घालून भात नीट मिसळून घ्यावा आणि वेळ न घालवता खावा.

शिळ्या भाकरीसाठी पण हीच कृती पण त्यासाठी भाकरीचे बारीक तुकडे करून घ्यावेत. भाकरीत ओलावा येण्यासाठी 
कांदा जरा जास्त घालावा आणि हे मिश्रण हाताने भरपूर मळावे.

पेशवाई भजी व पेशवाई थालिपीठे - शिळ्या भाज्या बारीक चिरून बेसनाच्या पीठात घालून अथवा भाजणीत घालून त्याची 
अनुक्रमे भजी व थालिपीठे करावीत.  (मात्र हे बेमालून पणे करावे. संशय येऊ देऊ नये). दूरदर्शनवर खाद्यविषयक 
मालिकांमध्ये दाखवितात तसे हे पदार्थ सजवून द्यावेत  .  

आपण आपल्या घरी शिळ्या पदार्थांचे जर का काही चविष्ट पदार्थ करत असाल तर त्याची कृती जरुर सांगा.

कांदा बारीक चिरू न शकणारे, शरीरयष्टी जागरूक (फिगर कॉशस) इ. लोकांनी या पदार्थाच्या वाटेला जाऊ नये (ही विनम्र विनंती).

घर