शांत किनारा...

शांत किनारा, स्तब्ध नाव अन वारा थिजला
सागरा, तुझा सांग कशाने नूर बदलला?...

डोंगरा तुझ्या माथ्यावरती झाड एकटे
ताठ उभा तू म्हणून कोणी तुरा खोवला?...

चांदण्यात तू दिसशिल म्हणुनी रात्र जागलो
बघून गर्दी ताऱ्यांची मी बेत बदलला...

नका विचारू, कशी इथे ही फुले कागदी?
सुकणाऱ्या त्या खऱ्या फुलांनी जीव उबगला...

खिडकी माझी आता नसते कधीच उघडी
कळतच नाही, श्रावण कितिही जरि रिमझिमला...

प्रियकर आता तुझा न उरला माझ्यामध्ये;
जो होता तो आयुष्यातुन कधीच उठला!...

बेचैनीतच जगतो आहे जगणे मी, पण
'अजब' अशा ह्या बेचैनीवर उपाय कुठला?...