एक शोधयात्रा !

लहानपणापासून मला अन माझ्या बहिणीला वाचनाचं अतोनात वेड! कदाचित आमची आई ग्रंथपाल असल्याने असेल. ती दर सुटटीच्या दिवशी नवनवीन पुस्तके शाळेतून घरी आणायची, शिवाय "मंजूरी" साठीचे गठठेही येऊन पडलेले असायचे. दर शनिवारी शाळेतून घरी जाताना ' आज आपल्याला कोणते पुस्तक मिळणार? ' हाच विचार मनात घोळत असायचा. या शिवाय प्रत्येक पुस्तक प्रदर्शनाला आम्ही जायचो ते वेगळंच! फास्टर फेणे, चंदू अशासारख्या खास बाल / कुमार साहित्यापासून ते थेट कोरलईच्या किल्लेदारापर्यंत ( हे अगदी खास विविध घटनांनी भरलेले, चक्क दोन मोठठे भाग असलेले पुस्तक होते.. त्या काळी त्यात एकदम रंगून जायला व्हायचे खरे, पण तेव्हाही ते फारसे कोणाला माहीत नसलेले असे होते ) अशा सर्व पुस्तकांचा आम्ही फडशा पाडायचो. अशाच कुठल्यातरी एका प्रदर्शनात एक पुस्तक विकत घेतले गेले. " उमलती कळी" नामक, भा रा भागवतांनी अनुवादित केलेलं! अर्थात 'चॉईस", म्हणजे निवड ही आमच्या बहिणाबाईंची होती हे मान्य करावेच लागेल. पुस्तकातील गोष्ट म्हणाल तर अगदीच साधीसुधी! लॉरा नामक एका मुलीने, स्वत:च्या घराविषयी, आयुष्याविषयी लिहिलेलं! बरं, ही लॉरा सुद्धा अगदीच साधी, दिसायला फारशी सुंदर नाही, घरातली सगळी कामे करणारी अन त्याचबरोबर शाळेचा अभ्यास करणारी अन शिवाय घराला मदत म्हणून छोटया मोठया नोकऱ्या करणारी! पण गोष्ट इतकी काही छान होती की आम्ही दोघी ते पुस्तक वाचून लॉराच्या प्रेमातच पडलो अन तिच्या जागी स्वत:ला कल्पू लागलो ( अर्थात तिच्यासारखी आम्हाला नोकरीही करावी नव्हती आणि घरातही इकडची काडी तिकडे करावी लागत नव्हती तरीही! नाही म्हणायला तिच्यासारखाच कितीही कंटाळा आला तरी शाळेचा अभ्यास मात्र करत होतो ). त्यावेळचे ( खरे सांगायचे झाले तर अजूनही ) वाचन हे स्वांतसुखायच असल्याने त्या पुस्तकाच्या साहित्यिक गुणावगुणाबद्दल कसलीही चर्चा न करता लॉराशी आम्ही तन्मय झालो होतो. त्यानंतर काही दिवसांनी ( कुठून मिळाले हे आता आठवत नाही ), "मोठया रानातले छोटे घर" हे ही भा रा भागवत यांनीच अनुवाद केलेले पुस्तक मिळाले. त्यातही आमची लॉरा होतीच, पण अगदी चिमुकल्या वयाची! विस्कॉन्सिसच्या रानात राहणारी! मग अजून लॉराची काही पुस्तके असली पाहिजेत हे लक्षात आले आणि आमची शोधयात्रा सुरू झाली. त्यापैकी "आनंदीआनंद गडे" व " एक होते सरोवर" ही दोन पुस्तके मिळाली सुद्धा!

लॉराचे पा व मा, हे अमेरिकेतील काही पहिल्या वहिल्या रहिवाशांपैकी. आपल्या क्लेमसाठी जागा शोधत शोधत अनेक ठिकाणी वस्ती करत करत शेवटी ते एका ठिकाणी स्थायिक होतात. या सर्व वर्षात असंख्य घटना घडत जातात, त्या लॉराने स्वतः वर्णन केल्या आहेत. पण त्या ही "मी" म्हणून नाही. तर " एक होती लॉरा" या प्रकारेच ही गोष्ट किंवा तिच्या आयुष्याची सत्यकथा पुढे सरकत जाते. भा रा भागवतांचा अनुवादही खूप छान आहे. अगदी कुठेही न खटकता, आपण पुढे काय होतं? या उत्सुकतेने पुस्तक वाचत जातो. लॉराने स्वतःला येणारा कामाचा, अभ्यासाचा कंटाळा, तिचा स्वार्थीपणा, सर्वांनी आपल्याला चांगले म्हणावे म्हणून मुद्दाम केलेल्या काही चांगल्या, परोपकाराच्या कृती ( ज्या मी अजूनही करते अन मनात तिच्यासारखाच विचार करते ) हे सर्व प्रामाणिकपणाने वर्णन केले आहे. पण एवढी चार पुस्तके वाचूनही ती सलग वाटत नव्हती. काही मागे घडलेले प्रसंग म्हणून उल्लेख आला, तर तो प्रसंग वर्णन केलेला सापडत नव्हता. म्हणजे अजून काही पुस्तकं असली पाहिजेत! सगळीकडे शोधाशोध करूनही काही मिळेना. शिवाय त्या पुस्तकांमध्ये बाकीच्या पुस्तकांची नावंही दिलेली नव्हती. अखेरचा उपाय म्हणून मी श्री भा रा भागवतांनाच पत्र लिहिलं, त्यात कशावरून अनुवाद केला आहे त्या पुस्तकांची नावंही विचारली, पण त्यांचे उत्तर काही आले नाही. कदाचित त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे म्हणा किंवा शाळकरी पोरीच्या पत्राला काय उत्तर पाठवायचं म्हणून म्हणा. असो! होता होता आम्ही मोठे झालो. आम्ही, म्हणजे मी अन माझी ताई, लॉरा अन तिची बहीण मेरी सारख्याच. ( पण आमच्या दोघींपैकी प्रत्येकजण स्वतःला लॉराच समजत होती ते वेगळंच! ). आमचा सगळ्यात मोठठा बावळटपणा म्हणजे " उमलती कळी" हे एकमेव पुस्तकच आमच्या मालकीचं होतं. बाकीची तीन पुस्तकं ही लायब्ररीतून वाचली होती. एका सुप्रभाती त्या लायब्ररीवाल्याने सांगितले की ती पुस्तकं फार जुनी झाल्याने विकून टाकली. आमच्या हातात हळहळण्यापलिकडे व स्वतःला बावळट म्हणवून घेण्यापलिकडे काहीच नव्हतं. मोठं होत होत आमची लग्नं झाली व आता त्या "उमलती कळी " चा मालकी हक्क कोणाकडे यावरून खडाजंगीही झाली. पण मूळ "निवड" तिची असल्याने मी मुकाटयाने त्या पुस्तकाची झेरॉक्स काढून घेतली. केवढी ही सुविधा! यासाठी मला सर्व कॉपीराईट / रॉयल्टीवाले ( किंवा जे कोणी असतात ते! ) क्षमा करोत!

स्वतःला मुलंबाळं झाल्यावरही " लॉरा" मनातून जाईना व चैन पडेना! नवऱ्याच्या मते अजूनही माझी "बालबुद्धी" च राहिलेली आहे, त्यामुळेही असेल कदाचित, पण परत सर्वत्र शोधाशोध सुरू केली. या वेळेपर्यंत मराठी पुस्तके ही " out of print / out of stock " वगैरे झाली होती. वाचनाची सवय पूर्वीप्रमाणेच राहिली असल्याने ( आमच्या आईच्या मते पूर्वी भस्म्या रोग असायचा तसं, दिसलं पुस्तक की पाड फडशा, असे करायची सवय लागल्याने ) मी जवळपासच्या असतील नसतील त्या सर्व लायब्रऱ्यांची आलटून पालटून सदस्य! चक्क एका ख्रिश्चन ट्रस्टने चालवलेल्या लायब्ररीत मला " Little house in big woods! " ( मोठया रानातले छोटे घर! ) मिळाले. मी आनंदाने वेडीच झाले. त्या पुस्तकात इतरही पुस्तकांची नावे मिळाली. त्या पुस्तकाची किंमत होती फक्त " चार " रुपये. मी लगेच ते विकत देता का हे ही त्या ग्रंथपाल बाईला विचारले ( या वेळेपर्यंत चांगलीच शिंगे फूटली होती ना, हाच प्रश्न पूर्वी विचारला असता तर? ) ट्रस्टींची परवानगी पाहिजे असे उत्तर आले. ट्रस्टींची ओळख ही काढली. पण ते चार रुपये किंमतीचे पुस्तक ते आठ, बारा, सोळा किंवा असल्या कसल्याही पटीत द्यायला तयार होईनात. पुस्तक चक्क ढापून ते हरवलं असं सांगून दंड भरून टाकावा असाही एक सुविचार सुचला होता, पण तो मला, किंवा माझ्याही पेक्षा माझ्या बाबांच्या सदसद विवेकबुद्धीला न पटल्याने सोडून दिला अन परत झेरॉक्सच्याच सुविधेचा लाभ घेतला.

मात्र त्या पुस्तकावर पेंग्विनच्या पफीन बूक्सचा उल्लेख व दिल्लीचा पत्ता होता. त्या लायब्ररीत ते एकच पुस्तक होतं व त्या मालिकेतली बाकीची पुस्तके नव्हती. दिल्लीला पत्रव्यवहार केला पण आयात निर्यातीच्या धोरणातील काही बंधनांमुळे आता पुस्तकं देऊ शकत नाही असे उत्तर आले. ही गोष्ट १९९१ सालातली! पण आता मात्र पुस्तकांची नावे मिळाल्याने राजरोस दुकानात विचारता येत होतं. मुंबई पुण्यातले सगळे नवीन व जुनी ( secondhand) पुस्तके विकणारे दुकानदार धुंडाळून झाले. अनिवासी क्लायंटना विनंत्या करून झाल्या. त्यातल्या एकाने " ती पुस्तके नाहीत पण दुसरी छान छान लहान मुलांची पुस्तके आहेत, ती देऊ का आणून? " असं म्हटल्यावर प्रचंड लाजही वाटली व आज आपल्याला मुलं आहेत यातला मोठठा फायदाही लक्षात आला.

पुण्याच्या इंटरनशनल बूक डेपोच्या श्री दिक्षितांनी वर्ल्ड बिबलिओग्राफीत बघून कळवतो असे आश्वासन दिलं अन मी हूरळूनच गेले. पण छे! ही पुस्तके काही उपलब्ध नाहीत असेच उत्तर त्यांच्याकडूनही आले. अमेरिकन पुस्तके असल्याने ती ब्रिटिश काउन्सिलच्या लायब्ररीतही नव्हती. अमेरिकन काउन्सुलेट लायब्ररीला लिहून झाले. पण सगळीकडे नकारघंटाच! मात्र या वेळी ज्यांना ज्यांना पत्र लिहिलं, त्यांच्याकडून उत्तरं मात्र आली. कदाचित पदव्या जडवलेले लेटरहेड वापरल्याने असेल ( केवढे हे शिक्षणाचे महात्म्य बरे! ) किंवा पत्ता अन स्टँंप चिकटवलेले पाकीट जोडल्याने असेल. बहुधा दुसरेच कारण असल्याची शक्यता जास्ती.

आमच्या शाळेतली एक मुलगी भा रा भागवतांची सून झाल्याचे समजले तेव्हा एका मैत्रीणीमार्फत तिलाही पत्र लिहिण्याचा अव्यापारेषू व्यापार करून बघितला, पण बहुतेक ते पत्र तिच्यापर्यंत पोचलेच नाही. होता होता ९५ साल उजाडले. अलिकडे दिनदर्शिकेच्या मागेही बरेच वाड़ग्मय छापलेले असते. अन वाचनाच्या सवयीमुळे दिनदर्शिकाही अथपासून इतिपर्यंत वाचली जाते. त्यातच कुठेही राहून 'आमची मुंबई' ही भावना काही सुटत नसल्याने त्याची खास मुंबई आवृत्ती विकत घेतली जाते. तर अशा ९५ सालच्या कालनिर्णय मुंबई आवृत्तीमध्ये क्लासिफाईडस या सदरात " लोटस बूक हाउस" ची जाहिरात बघितली. जगातले कुठलेही पुस्तक काहीही जादा किंमत न घेता आणून देऊ अशी. चला, लग्गेच पत्रव्यवहार सुरू केला. त्याचबरोबर परत एकदा पेंग्वीन ओवरसीजलाही लिहिले. आयातीचे मुक्तकीकरण झालेले आहे, म्हणून फिरून यत्न करून पाहिला! आणि काय आश्चर्य! ही पुस्तके आहेत, या या किंमती.. असं लोटस बूक हाऊसचे पत्र आले. त्याचबरोबर यातली २ पुस्तके आहेत असे पेंग्विनकडूनही पत्र आले. मात्र चलनात डॉलर अन पाऊंड हा फरक होता. दिल्लीपेक्षा मुंबई बरी, शिवाय जास्त पुस्तके देत होते म्हणून लोटस बूक हाऊसला आपले म्हटले व ५० % पैसे आधी भरावे लागतील, पुस्तके पोस्टाने किंवा व्ही पी पी ने वगैरे पाठवणार नाही, स्वतः येउन न्यावी लागतील वगैरे वगैरे अटी मान्य केल्या. यथावकाश चार पुस्तके मिळालीही. नवी कोरी सुंदर अशी अन त्यातून लॉरा परत भेटल्यावर माझा आनंद "गगनात माईना" असा झाला.

त्याच पुस्तकात अजून तीन चार नावे मिळाली. लगेच ती ही मागवली. पण हे आहे, ते नाही असं करत करत व दोन महिन्यांचा डिलिवरी पिरीयड असें म्हणत म्हणत संपूर्ण मालिका मिळायला ९६ ऑगस्ट उजाडला. या वेळेपर्यंत पुस्तकांची माझ्या ताईबरोबर देवाणघेवाण झालीच होती अन मनात ठसून राहिलेल्या सर्व प्रसंगांची उजळणीही एकमेकींबरोबर करून, एकच पुस्तक "फार्मर बॉय" मिळायचे शिल्लक होते त्यात काय असेल याचा बराच उहापोह करून झाला होता. कारण बाकीची लॉराची पुस्तके बऱ्यापैकी सलग वाटत होती. मग या फार्मर बॉय मध्ये काय असेल बरे? या आधीच्या सर्व पुस्तकात काहीच नवीन, पूर्वी न वाचलेले उल्लेख दिसत नव्हते. मग हा फार्मर बॉय कोण, तिचे पा की काय? अखेरशेवटी ते ही पुस्तक मिळाले. त्यात आल्मांझो वाईल्डर, ज्याच्याशी लॉराचे शेवटी लग्न होते, त्याच्या बालपणाच्या गोष्टी आहेत. ते ही पुस्तक खूप छान वाटले. पण या मालिकेतल्या एकंदरीत ९ पुस्तकांमधील ८ पुस्तकेच लॉराने लिहिलेली आहेत. सर्वात शेवटचे पुस्तक " The first four years" हे घेतल्याबद्दल तर चक्क पश्चाताप झाला. ते पुस्तक रॉजर ली मक्ब्राईड या प्रकाशकाने बहुधा काही नोंदीवरून लिहिले आहे. त्यातली भाषा, प्रसंग, वर्णनाची पद्धत इत्यादी इत्यादी पहिल्या पुस्तकांपेक्षा फारच वेगळे आहे. शिवाय लग्नानंतर नानाविध संकटे लॉरावर कोसळतात ते वाचून जरा दुख्खीच व्हायला होतं. लहानपणीची, मा अन पांच्या घरटयाच्या उबदार छायेत राहणारीच लॉरा आपली वाटते. कदाचित ते पुस्तक लहानपणीच वाचले असते तर आवडलेही असते. किंवा भाषा शैलीचाही ते न आवडण्यामागे हात असेल, कारण फार्मर बॉय नवीन असूनही आवडलेच की.

आपली आई एवढी काय वाचते आहे, म्हणून माझ्या मुलाने बऱ्याच चिकाटीने "Little house in big woods" वाचून काढले. माझ्या धाकामुळे 'ते आवडले नाही' असं म्हणायला काही तो तयार झाला नाही, पण सगळे पुस्तक वाचून त्याच्या लक्षात फक्त त्यातले "smoked herring" राहिले यावरून चाणाक्ष वाचकांनी काय ते ओळखून घ्यावे. असो..

अमेरिकेत मध्यंतरी या पुस्तकांवर दूरदर्शन मालिका दाखवली गेली. अन "पेव फुटणे" हा शब्दप्रयोग सार्थ होईल अशा प्रकारे "लॉराचं कूकबूक", "लॉराची गाणी" अशी भरमसाठ पुस्तके प्रकाशित झाली. तसेच तिच्या पुढील आयुष्यावर तिची मुलगी व वर उल्लेख केलेला प्रकाशक यांनी चार पुस्तके लिहिली. तिच्या मा च्या लहानपणाबद्दलही पुस्तके प्रकाशित होऊ लागली होती. पण लॉराची पहिली पुस्तके अन ते शेवटचे "First four years" मधला फरक लक्षात घेता ती बाकीची पुस्तके फारशी वाचनीय असतील असे वाटत नाही. अशा तऱ्हेने लहानपणी सुरू झालेली ही शोधयात्रा ९६ साली संपूर्ण झाली अन आपल्या अनेक म्हणींची, उदाहरणार्थ "प्रयत्ने वाळूचे, किंवा थेंबे थेंबे तळे" इत्यादिंची यथार्थता मला पटवून गेली.

मध्यंतरी माहेर मासिकात आलेल्या एका लेखावरून लॉराच्याच पुस्तकांचा, अजून एका लेखकाने ( बहुतेक अ शं अग्निहोत्री ) अनुवाद केल्याचे समजले. त्या बाईंशी ही पत्रव्यवहार केलाच होता. त्या अमेरिकेत मालिका वगैरेही बघून आल्या होत्या. अर्थात पुस्तकांची सर नाहीच त्याला असेच म्हणाल्या.

अलिकडच्या ललित मासिकाच्या अंकात राजा प्रकाशनाची आम्ही लहानपणी वाचलेल्या, भा रा भागवत अनुवादित लॉराच्या चार पुस्तकांच्या पुनःप्रकाशनाची जाहिरात बघितली अन ताईला फोन फिरवला. "मला कशी ती जाहिरात दिसली नाही, तुलाच कशी दिसली? " यावर सुखसंवाद झडल्यावर, ही आपण घ्यायचीच यावर आमचे एकमत झाले ( असा फार दुर्मिळ प्रसंग बरं! ). हे ठरल्यावर त्यांचे ऑफिस शोधले. पण ती पुस्तके दिवाळीच्याच दिवशी प्रसिद्ध होणार होती. अर्थातच प्रथम ग्राहक अस्मादिकच, ते ही दोन दोन प्रती.... ताई अन मी. अशा तऱ्हेने आधीच्या अमेरिकन लॉराबरोबरच आता ही पूर्वीची मराठीतली आपली वाटणारी लॉराही माझ्या कडे अन ताईकडे सुखाने नांदू लागली.