ह्यासोबत
- १. अध्यात्म : पूर्वभूमिका
- २. निराकाराला जाणण्यात एकमेव अडथळा : व्यक्तिमत्त्व
- ३. चमत्कार आणि रहस्य व ध्यान
- ४. वेळ, अंतर आणि काम
- ५. संसार / संन्यास / भक्तियोग / कर्मयोग
- ६. मन
- ७. पुन्हा एकदा : मन
- ८. भावनेचा गोंधळ आणि पैशाची मजा
- ९. निराकाराचे सर्व पैलू
- १०. काही आध्यात्मिक प्रश्नोत्तरे
- ११. आत्मस्पर्श
- १२. अस्तित्वाशी संवाद
- १३. स्त्री आणि पुरुष
- १४. न्यूनगंड
- १५. गेस्टाल्ट
- १६. (एक) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १६. (दोन) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १७. प्रेम
- १८. मित्र हो!
- १९. सजगता
- २०. हा क्षण
- २१. संगीत
- २२. काल, अवकाश आणि सर्वज्ञता!
- २३. सहल
- २४. या निशा सर्व भूतानां
- २५. (एक) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २५. (दोन) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २६. देव, दैव आणि श्रद्धा
- २७. स्वधर्म, साक्षात्कार आणि समाधी
- २८. पैसा
- २९. शरीर
- ३०. भोग
- ३१. (एक) स्मृती
वेळ ही कल्पना आहे हे लक्षात आलं (लेखांक १९ : सजगता) की तुम्ही बऱ्याच अंशी शारीरिक संलग्नतेतून देखील मुक्त होता कारण वय शरीराला आहे, तुम्हाला नाही. तुम्ही सदैव उत्साही राहू शकता कारण वेळेचं सगळं ओझं मनावर असतं, ते दूर झालं की मन हलकं होत. शीख पंथीयांचा जयघोष 'सत् श्री अकाल' हा वेळेपासून मुक्ती सूचीत करतो. तुम्ही जेंव्हा वेळेपासून मुक्त होता तेंव्हा 'अकाल' किंवा 'इटरनिटी' या स्वास्थ्याच्या परिमाणात जगू लागता. अकाल ही खरंतर स्थिती आहे आणि वेळ ही कल्पना आहे पण आपलं लक्ष सारखं घटना आणि आकार यांच्याकडे असल्यामुळे आपल्याला ही कायम असलेली स्थिती जाणवत नाही.
वरकरणी बघता जीवन अनंत क्षणांचे बनले आहे असे वाटते पण तुम्ही नीट पाहिलेत तर सदैव एकच क्षण चालू आहे असे तुमच्या लक्षात येईल आणि तो म्हणजे हा क्षण! घटना अनेक घडल्या असतील आणि घडायच्याही असतील पण हा क्षण कायम आहे.
ओशो आणि एकहार्ट यांची आध्यात्मिक शिकवण 'हा क्षण' या एकमेव बिंदूवर केंद्रित आहे. तुम्ही या क्षणात राह्यला शिकलात तर तुमचे सर्व प्रश्न एका क्षणात सुटतात कारण हा क्षण ही एकमेव वस्तुस्थिती आहे आणि बाकी सर्व कल्पना आहे. हा क्षण आणि या क्षणात जे काही आहे ते तुम्ही आत्ता मान्य केलेत की तुम्ही त्यापासून वेगळे होता.
जे काही घडायचे, आठवायचे, करायचे असेल ते फक्त याच क्षणात होऊ शकते. हा क्षण अपरिवर्तनीय आहे. ह्या क्षणाशी मैत्री म्हणजे स्वतःशी मैत्री. कृष्णाने म्हटलं आहे की मी सनातन वर्तमान आहे. सनातन वर्तमान म्हणजे हा क्षण.
जे कृष्णमूर्तीनि म्हटलं आहे की हा क्षण ही अल्टिमेट सिक्युरिटी आहे कारण ह्या क्षणावर कोणत्याही घटनेचा काहीही परिणाम होत नाही.
तुम्ही या क्षणाच्या आणखी खोलात शिरलात तर तुम्ही मनापासून (मेंदूत चाललेला दृकश्राव्य चलतपट, भावना व मनस्थिती) मुक्त होता कारण मन म्हणजे हालचाल आणि हा क्षण अचल आहे. मनस्थिती, भावना, डोळ्यासमोर तरळणारी दृश्ये आणि मनाचे संवाद बदलत राहतात पण हा क्षण तसाच राहतो.
एकहार्ट ज्या लेखनामुळे प्रकाशात आला त्या पुस्तकाचं नांवच 'पॉवर ऑफ नाऊ' आहे, सगळं अस्तित्व वर्तमानात असल्यामुळे तुम्ही वर्तमानात कमालीचे सक्षम होता. ओशोंची सारी शिकवण 'नाऊ अँड हिअर' 'आत्ता आणि इथे' या एका सूत्रावर आधारीत आहे. हे थोडं मजेशीर आहे 'आत्ता' म्हणजे हा क्षण पण 'इथे' म्हणजे काय हे दाखवता येत नाही आणि हीच सत्याची जादू आहे, या क्षणासारखं ते जाणवू शकतं पण ते इतकं सर्वत्र आहे की नक्की कुठे आहे हे दाखवता येत नाही.
हा क्षण म्हणजे मुक्ती. हा क्षण म्हणजे अमृत. हा क्षण म्हणजे तुम्ही!