ह्यासोबत
- १. अध्यात्म : पूर्वभूमिका
- २. निराकाराला जाणण्यात एकमेव अडथळा : व्यक्तिमत्त्व
- ३. चमत्कार आणि रहस्य व ध्यान
- ४. वेळ, अंतर आणि काम
- ५. संसार / संन्यास / भक्तियोग / कर्मयोग
- ६. मन
- ७. पुन्हा एकदा : मन
- ८. भावनेचा गोंधळ आणि पैशाची मजा
- ९. निराकाराचे सर्व पैलू
- १०. काही आध्यात्मिक प्रश्नोत्तरे
- ११. आत्मस्पर्श
- १२. अस्तित्वाशी संवाद
- १३. स्त्री आणि पुरुष
- १४. न्यूनगंड
- १५. गेस्टाल्ट
- १६. (एक) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १६. (दोन) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १७. प्रेम
- १८. मित्र हो!
- १९. सजगता
- २०. हा क्षण
- २१. संगीत
- २२. काल, अवकाश आणि सर्वज्ञता!
- २३. सहल
- २४. या निशा सर्व भूतानां
- २५. (एक) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २५. (दोन) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २६. देव, दैव आणि श्रद्धा
- २७. स्वधर्म, साक्षात्कार आणि समाधी
- २८. पैसा
- २९. शरीर
- ३०. भोग
- ३१. (एक) स्मृती
रूपक म्हणून पाहिले तर निराकार चित्रपटाच्या पडद्या सारखा आहे, तो असल्या शिवाय सृष्टीचा देखावा प्रकट होऊ शकत नाही. विश्वातला प्रत्येक प्रकट आकार त्रिमिती आहे त्यामुळे या पडद्याला चतुर्थमिती असं म्हटलं आहे. प्रत्येक प्रकट आकार हा काळात प्रकट होतो आणि मावळतो म्हणून आईन्स्टाईन अवकाशाला 'स्पेस इज द फोर्थ डायमेन्शन ऑफ टाइम' म्हणतो. तुम्ही निराकाराचा कोणताही एक पैलू घेऊन त्याच्या इतर पैलूंचा वेध घेऊ शकता त्यामुळे एका सत्याच्या शोधासाठी अनेक मार्ग निर्माण झाले आहेत. पडदद्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे : प्रसंग कोणताही असो पडदा जसाच्या तसा राहतो! व्यक्त जगात काहीही होवो निराकार अस्पर्शित राहतो. याचं अतिशय काव्यात्मक वर्णन जीजसनि ' दि व्हर्जिनीटी ऑफ ट्रुथ' असं केलंय. म्हणजे व्यक्ताच्या अनादी प्रणयात सत्याचे कौमार्य अस्पर्शित राहते. सत्य (किंवा निराकार) कळल्यावर तुमची स्थिती या जीवनाच्या चित्रपटात पडद्या सारखी होते म्हणजे कळतं सगळं पण होत काही नाही! जीवनाला लीला (प्ले) का म्हटलंय हे आता तुम्हाला कळेल.
आता आपण निराकाराचे सर्व पैलू बघू.
१) शुद्ध जाणीव : जागे असताना आपल्याला जे कळतं त्याला जाणीव म्हटलंय, झोपल्यावर जे नकळणं होतं ती नेणीव. जाग आणि झोप या शरीराच्या अवस्था आहेत. निराकार शरीराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आहे. तुम्ही या क्षणी डोळे मिटले तर शरीर बसले आहे ही जाणीव तुम्हाला होईल, ही शुद्ध जाणीव आहे. ज्या जाणीवेमुळे तुम्ही देह जाणू शकता ती जाणीव निश्चितच देहा पेक्षा वेगळी आहे. याच जाणीवेनं तुम्ही विचार चालू आहेत हे देखील जाणता. या जाणीवेला आत्मजाणीव म्हटले आहे. या जाणीवेत सतत राहून तुम्ही सत्य किंवा निराकाराचा बोध सघन करू शकता. गुर्जिएफ ने याला सेल्फ रिमेंमबरिंग म्हटले आहे. स्वतः निसर्गदत्त महाराजांनी सुखसंवादात असं लिहिलंय की त्यांच्या गुरुंनी त्यांना या आत्मजाणीवेची ओळख करून दिली आणि मग निसर्गदत्त महाराज हा पैलू आत्मसात करून सिद्ध झाले (म्हणजे आपण निराकार आहोत हा कायमचा बोध त्यांना झाला. )
२) अमृत : निराकार किंवा अवकाश हे अनिर्मीत आहे त्यामुळे त्याला मृत्यू नाही. जन्म आणि मृत्यू निराकारात निर्माण होणाऱ्या आकारांना आहे. यक्षाने धर्मराजाला जे प्रश्न विचारले त्यात तो म्हणाला जगात सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? तर धर्मराज म्हणाला मृत्यू ही इतकी अनिवार्य घटना आहे पण सगळ्यांना असं वाटतं की आपण मरणार नाही आणि हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे! आपल्या इतिहासात धर्मराजाच्या या उत्तराच मोठं कौतुक केलं गेलंय, पण तुम्ही कधी बघितलंय? आपण मरू असं आपल्याला रोजच्या जीवनात कधी वाटत नाही आणि याच खरं कारण मुळात आपण निराकार आहोत आणि हा अमृताचा पैलू आपल्याला उपलब्ध आहे. यथावकाश जसे आपण स्वतःला शरीरच मानू लागतो आणि शरीर मृत्यूकडे जाऊ लागते तेव्हा आपण मरू असं वाटतं. अमृताचा हा पैलू घेऊन तुम्ही शरीरापेक्षा आपण वेगळे आहोत हे जाणू शकता, तुमच्या जीवनात साहस येते, वृद्धत्व शरीराला येते पण तुम्ही तारुण्यात राहता.
३) कालरहितता : चवथ्या लेखात आपण बघितले की निराकारात वेळ नाही, वेळ ही माणसाने निर्माण केलेली कल्पना आहे आणि ती आकाराच्या निर्मिती आणि लयीशी संबंधित आहे. म्हणजे गाणे म्हणायचे असेल तर काळ (टायमिंग) महत्त्वाचे आहे पण शांत राहायचे असेल तर वेळेचा काहीही संबंध नाही. खरं तर आकाराच्या निर्मिती आणि लयीमुळे काळ भासतो. त्यामुळे निराकारात फक्त एकच काळ आहे आणि तो म्हणजे वर्तमान काळ. ओशोंची आणि एकहार्टची सगळी आध्यात्मिक शिकवण 'नाऊ' म्हणजे 'आता' वर आधारलेली आहे. तुम्ही सदैव वर्तमानात राहिलात तर तुम्ही निराकाराशी संलग्न होता, कोणत्याही प्रसंगाचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. कोणत्याही प्रसंगाचा परिणाम मनावर किंवा शरीरावर होतो, त्या दोन्ही काळात निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत, ज्यावेळी तुम्ही वर्तमानात असता तेव्हा काळाच्या बाहेर असता. वर्तमान आणि निराकार एकच आहेत कारण दोन्हीही जाणवू शकतात पण दाखवू शकत नाही. भूतकाळ हा स्मृतीमुळे तर भविष्यकाळ हा कल्पनेमुळे भासतो पण स्मरण किंवा कल्पना फक्त एकाच काळात करता येते आणि तो म्हणजे वर्तमान काळ! आता स्मृतीमुळे तुम्हाला मागे गेल्याचा भास होतो किंवा कल्पनेमुळे पुढे गेल्या सारखे वाटते पण तुम्ही कायम एकाच काळात असता आणि तो म्हणजे वर्तमान काळ.
या वर्तमान काळाला खरं तर काळ म्हणता येत नाही कारण काळ ही कल्पना किंवा भास आहे आणि वर्तमान ही न बदलणारी स्थिती आहे. त्यामुळे कृष्ण त्याला (किंवा कृष्णाला निराकार गवसल्यामुळे तो स्वतःला) 'सनातन वर्तमान' म्हणतो! आता सनातन वर्तमान ही कायमची स्थिती असल्यामुळे त्याला 'असणे' (इटरनिटी) असे म्हटले आहे. हे असणे सार्वभौम उपस्थिती सारखे आहे त्यामुळे त्याला 'साक्षी' (प्रेझन्स) म्हणतात. या उपस्थितीची जाणीव तुम्हाला स्वतःशी म्हणजे निराकाराशी जोडू शकते.
४) सृजनात्मकता : सर्व आकार निराकारात निर्माण होत असल्यामुळे सृजन ही आपल्या अंतरी कायम असणारी आस आहे. निर्मितीचा आनंद या सृजनामुळे वाटतो. तोच तोच पणा आणि कंटाळा जीवनातले हे सृजनाचे परिमाण हरवल्यामुळे आहे. तुम्ही कोणतीही निर्मिती करताना निराकाराशी संलग्न होऊ शकता. वेगवेगळ्या अभिव्यक्तीची आस ठेवून निराकाराच्या सृजनात्मकतेशी तुम्ही स्वतःला जोडू शकता. शास्त्रज्ञ, संगीतकार, चित्रकार हे आनंदी असण्याचे खरे कारण त्यांना हा निर्मितीचा स्रोत गवसलेला असतो.
५) एकसंधता / अपरिवर्तनीयता / अनिर्बंधता / व्यापकता / मुक्ती / शून्य आणि पूर्ण : कोणताही आकार निर्माण झाला तरी निराकार निराकारच राहतो त्यात कोणतेही परिवर्तन होत नाही, त्याच्या एकसंध पणाला काहीही होत नाही. याचे कमालीचे यथार्थ वर्णन ओशोंनी : 'निराकार बीना छुए हर आकार को सम्हाले हुए है' असे केले आहे.
या एकसंधतेमुळेच निराकाराला जाणणे आणि आपण निराकार आहोत हा बोध होणे एकच आहे.
निराकार हा आकारहीन असल्यामुळे अनिर्बंध आहे. निराकार संपला अशी कोणतीही जागा नाही त्यामुळे निराकाराला स्थानरहित किंवा व्यापक म्हटले आहे. तुम्ही कोणत्याही मोकळ्या पठारावर खुल्या आकाशाखाली उभे राहिलात तर तुम्हाला जाणवते की निराकार व्यापक आणि मुळातच मुक्त आहे त्यामुळे निराकाराच्या बोधाला मुक्ती म्हटले आहे.
या निराकाराला कोणतेही नांव न देता आल्याने बुद्ध त्याला शून्य म्हणतो पण या निराकारातच सगळे प्रकट झाल्यामुळे आणि त्याच्या बाहेर काहीही नसल्यामुळे उपनिषदे त्याला पूर्ण म्हणतात.
६) अचल आणि निष्काम : सगळी हालचाल शरीर आणि विचार यांची आहे तसेच सगळे कृत्य मन आणि शरीर यांच्याच स्तरावर होते आहे, निराकार अचल आणि निष्काम आहे. तुम्ही कितीही वेगाने धावत असला तरी एक स्थिर घटक तुम्हाला सतत जाणवत राहतो, ही निराकाराची जाणीव आहे. कोणतेही काम करताना तुम्ही स्वतः:ची जाणीव ठेवली तर शरीर थकेल, मन थकेल पण तुम्ही निर्लेप राहाल. आपण हालत नाही किंवा काहीही करत नाही ही जाणीव तुम्हाला निराकाराशी संलग्न करू शकते.
७) शांतता / अव्यक्तता : तुम्ही कधी विचार केला आहे की शांतता आहेच, ती निर्माण करता येत नाही. आपले बहुतेक सर्व आध्यात्मिक उद्घोष : ॐ शांती शांती शांती नि संपतात याचं कारणच शांतता हा निराकाराचा एक पैलू आहे. जसा निराकार अनिर्मीत आहे तशी शांतता देखील अनिर्मीत आहे. झेन संप्रदायात 'नुसते बसणे' (जाझेन) ही साधना आहे. नुसते बसून तुम्ही या शांततेची दखल घेऊ शकता आणि निराकाराला जाणू शकता.
निराकारात सृजनात्मकता आहे पण स्वतः निराकार नेहमी अव्यक्त आहे. संगीतात स्वर आणि स्वरांमधल्या श्रुती शिकवल्या जातात पण निस्वर शिकवला जाऊ शकत नाही. मजा अशी आहे की निस्वर समजल्या शिवाय स्वर समजूच शकत नाही, संगीत निर्माणच होऊ शकत नाही, सा आणि रे च्या मधली जागा निस्वर आहे, सा च्या आधीची जागा निस्वर आहे. हा निस्वर सगळ्या संगीताचा आधार आहे आणि तो नेहमी अव्यक्त आहे. ही अव्यक्तता समजून घेऊन तुम्ही निराकाराला जाणू शकता.
८) आनंद / प्रेम : 'असण्याची स्थिर अवस्था म्हणजे आनंद' असं निसर्गदत्त महाराज म्हणतात. तुम्ही प्रयोग करून पाहा : जो पर्यंत भोगणारा स्थिर नाही तो पर्यंत भोग कुठलाही असो तो सुख देत नाही.
प्रेमाच्या इतक्या व्याख्या आहेत पण एकहार्टनि किती सोपं केलंय तो म्हणतो 'प्रेम हे संबंधात आहे असे मानण्याची चूक आपण किती काळ करतो आहोत? पण प्रेम ही दुसऱ्यात तुम्हाला तुम्ही स्वतः दिसण्याची स्थिती आहे. ' ते दुसऱ्यावर अवलंबून नाही तर तुम्हाला तुमचे स्वरूप (निराकार) गवसण्यावर आहे कारण एकदा निराकार गवसला की रूपात लपलेला निराकार तुम्हाला जाणवू लागतो आणि तो सगळ्यात एकच आहे. अगदी सोप्या शब्दात : प्रेमही तुमची स्वतःशी एकरूपता आहे.
९) रहस्य : निराकाराचा सर्वात लोभस पैलू रहस्य आहे. जेव्हा आपण निराकाराचा बोध झाला असे म्हणतो तेव्हा कोण कुणाला जाणतो? कारण निराकार म्हणजे कुणीही नाही. एका अथांग शून्यतेत दुसरे शून्य विरून जाते आणि कधीही ठाव न लागू शकणारी व्यापकता परत रहस्यमय होते.
सगळे जाणण्याचे प्रयास सोडून देऊन तुम्ही या रहस्यात स्वतःला झोकून देऊ शकता. बुद्ध या अवस्थेला निर्वाण म्हणतो!
मला जेव्हा निराकार गवसला तेव्हा मी लिहीलं होतं :
ही कविता माझी नाही
हे अस्तित्वाचे देणे
कुणी न उरले कुणा मध्ये गं
हे असे निरंजन जगणे...