२२. काल, अवकाश आणि सर्वज्ञता!

प्रथम सर्वज्ञता म्हणजे काय ते बघू. ओशो म्हणतात : "ज्ञानी सर्वज्ञ असतो म्हणजे तो पंक्चर काढू शकेल किंवा वेळ पडली तर विमान उडवू शकेल असा नाही तर ज्ञानी जाणण्याच्या 'क्षमतेला' उपलब्ध होतो आणि तो आपल्या जाणीवेचा रोख वळवून कोणतीही गोष्ट जाणू शकतो" (अष्टावक्र गीता)

निसर्गदत्त महाराज म्हणतात : "मला कोणतीही गोष्ट कळू शकते आणि ती वेळप्रसंगी तुमच्या कडून समजली म्हणून काही बिघडत नाही." (सुखसंवाद)

मी तुम्हाला सांगतोः  "कोणत्याही क्षणी काय करावं आणि कसं करावं हे तुम्हाला निव्वळ वर्तमानात राहिल्या मुळे समजू शकतं कारण अस्तित्व निष्प्रश्न आहे आणि प्रश्न सोडवण्याची त्याची क्षमता प्रश्नातच दडलेली आहे"

आता मी हे जे काय लिहिलं आहे त्याचे तीन अर्थ निघू शकतात: एक, मी स्वतःला सर्वज्ञानी समजतो काय? (खास मनोगती स्टाइल), दोन, ओशो सर्वज्ञानी होते कशा वरून? किंवा ओशो आणि आईन्स्टाईन (कारण त्याचा उल्लेख पुढे येईल) यांची तुलना होऊ शकते काय? ( करा तुफानी चर्चा सुरू) आणि तीन, जो की खरा अभिप्रेत अर्थ आहे : हा लेख तुम्हाला सर्वज्ञ करू शकतो. (अर्थात तुमची तशी इच्छा असेल तर!.. हे मनोगतवर लिहून लिहून हल्ली मला जमायला लागलं आहे! )

माझ्या संगीता वरच्या लेखावर प्रतिसाद देताना 'तुम्ही संगीत आणि विज्ञान यावर लिहू नका' अशी फर्माइश झाली (म्हणजे अभ्यास करून लिहा)  आणि काल आणि अवकाश यांना चार परिमाणं आहेत आणि ते समजायला अवघड असं ही म्हटलं गेलं. आता मी अध्यात्माला सर्वस्पर्शी आणि जगण्यात आनंद निर्माण करणारं शास्त्र समजतो त्यामुळे मी काय सापेक्षतेवर ही निर्विवादपणे लिहू शकतो पण आज ही फर्माइश पूर्ण करावीशी वाटते.

तर त्याचं असं आहेः

काल आणि अवकाश या दोन्हीही कल्पना आहेत. सूर्य सदैव प्रकाशमान आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते म्हणून कालाचा भास होतो हे उघड आहे. तसंच अवकाश हे प्रत्येक आकाराच्या आत बाहेर आणि सर्वत्र आहे कारण ते नसेल तर आकार हालेल कसा? पण ते नक्की कुठे आहे ते दाखवता येत नाही आणि म्हणून ते संपूर्णपणे नाकारता येतं.

आता आणखी एक मजा आहे : काल आणि अवकाश या दोन्हीही एकाच स्थिर स्थितीच्या दोन बाजू आहेत म्हणजे कोणताही आकार प्रकट होण्यासाठी या दोन्हीही गोष्टी एकाच वेळी उपस्थित हव्यात. ते असं आहेः

तुम्हाला घर बांधायचं झालं तर तुम्ही प्लॉट बरोबर आकाश ही विकत घेतलेलं असतं आणि बांधायला वेळ लागतो, बांधकामातला प्रत्येक टप्पा एकाच वेळी काल आणि अवकाश व्यापत जातो किंवा काल आणि अवकाशात प्रकट होत जातो. गणायचंही तसंच आहे प्रत्येक स्वर व्यक्त होण्यासाठी वेळ हवा आणि शांतता (किंवा स्पेस) सुद्धा हवी आणि, शांतता आणि काल या दोन्ही गोष्टी एकाच वेळी उपस्थित असायला हव्यात त्यामुळे काल आणि अवकाश या एकाच स्थिर स्थितीच्या दोन बाजू आहेत. मूल जन्मायला वेळ हवा आणि त्याला हालायला जागा ही हवी!.

कालाला तीन परिमाणं आहेतः एक लांबी, म्हणजे तुम्ही दुःखात असाल तर वेळ जाता जात नाही असं वाटतं, दोन खोली, म्हणजे अत्यंत उत्कट वेळी सगळा अनुभव एकाच क्षणात एकवटल्या सारखा वाटतो किंवा तुम्ही आनंदात असाल तर आता कुठे सुरुवात झाली असं वाटतं, आणि तीन वारंवारिता (सर्क्युलॅरिटी), म्हणजे गाणं वारंवार समेवर येतं, ऋतुचक्र फिरत राहतं, जन्मा नंतर मृत्यू आणि मृत्यू नंतर पुन्हा जन्म!

अवकाशाला सुद्धा तीन परिमाणं आहेत, ती आकारात सापडतात आणि सर्वज्ञात आहेत (लांबी, रुंदी आणि उंची किंवा खोली). अवकाशाला किंवा आकाशाला एक चवथं परिमाण आहे ते म्हणजे अनंतता, तुम्ही आकाशात कसे ही आणि कुठेही गेलात तरी त्याचा शेवट सापडत नाही, आकाश एकदम रहस्यमय होतं!

कालाचं चवथं परिमाण कालातीतता आहे, म्हणजे गाण्याचा पहिला स्वर कालात प्रकट होतो पण दुसरा स्वर प्रकट व्हायला एक कालरहीत शांतता हवी नाही तर दुसरा स्वर पहिल्या पासून वेगळा कसा दिसणार? ही दोन स्वरां मधली शांतता किंवा गॅप काल रहित आहे आणि ती कालरहीत आहे म्हणून अवकाश रहित ही आहे, अनिर्बध आहे कारण काल आणि अवकाश दोन्ही एकच आहेत. या चवथ्या परिमाणात काल ही रहस्यमय होतो कारण ही कालरहीतता स्वतः व्यक्त होत नाही पण तिच सगळ्या अभिव्यक्तीचा आधार आहे. या चवथ्या परिमाणात काल आणि अवकाश एकमेकात मिसळून पूर्णपणे अनाकलनीय आणि रहस्यपूर्ण होऊन जातात!

आईन्स्टाईन जेव्हा अवकाश हे कालाचं चवथं परिमाण आहे (किंवा काल हे अवकाशाचं चवथं परिमाण आहे, दोन्हीचा अर्थ एकच) असं म्हणतो तेव्हा त्याला हे कालाचं अवकाशात आणि अवकाशाचं कालात मिसळून जाणं जाणवतं!

इथून पुढे खरी मजा आहे. ज्याला अवकाशाचं चवथं परिमाण किंवा अनंतता कळली तो स्वतः अनंत होतो कारण तो आकारापासून वेगळा झालेला असतो आणि शोधू म्हणता सापडत नाही! आता पुढच्या क्षणी तुम्ही ज्याला समजलं तो कोण याचा शोध सुरू केला की परत तुम्हाला आपण शरीरात आहे असं वाटायला लागतं, आकार तुम्हाला पुन्हा घेरून टाकतो!

ज्याला कालाचं चवथं परिमाण गवसलं तो अकाल होतो निर्मीती, स्थिती आणि लयीच्या बाहेर जातो कारण प्रकटीकरण कालात आहे, ज्याला कालरहीतता कळली तो अनाकलनीय रहस्य होतो! आणि पुढल्या क्षणी तुमच्या मनात विचार आला की तुमचं व्यक्तिमत्त्व सक्रिय होऊन तुम्ही विचार चक्रात अडकता की परत तुम्हाला आपण व्यक्ती आहोत असं वाटायला लागतं!

आता इथे मला शास्त्रज्ञ श्रेष्ठ की ज्ञानी हा वाद घालायचा नाही तर कोणत्याही माणसाला कोणत्याही क्षणी उपलब्ध असलेले दोन पर्याय नमूद करायचे आहेत.

शास्त्रज्ञ अस्तित्वाच्या या रहस्याचा शोध आकाराच्या निर्मितीत, स्थितीत आणि विघटनात घेण्याचा प्रयत्न करतो पण हे रहस्य उलगडता उलगडत नाही म्हणून शेवटी निराश होतो. आईन्स्टाईन म्हणतो 'आय वुड रादर बिकम अ प्लंबर दॅन अ सायंटिस्ट इन माय नेक्स्ट लाईफ बिकॉज द मिस्टरी ऑफ लाईफ सीम्स टू बी अन्कव्हरींग इन अ शॉर्ट फ्युचर अँड इट अगेन बिकम्स मिस्टीरिअस'

साधक या रहस्याचा शोध स्वतःत घेतो (मी कोण आहे?) आणि ज्या क्षणी त्याला लक्षात येतं की हे रहस्य उलगडणार नाही त्या क्षणी तो त्या रहस्यात रममाण होऊन जातो, आनंदून जातो, ज्ञानी होतो!

माझ्या अध्यात्मात मी शास्त्रज्ञाला या न उलगडणाऱ्या रहस्याशी कृतज्ञ राहून रहस्या मागून रहस्य उलगडायला सांगेन आणि मग त्याला निराशेचं कारणंच उरणार नाही, तो मानवतेला उपकृत करणारं आणि अस्तित्वाची रहस्य उलगडणारं एक द्वार होईल. सामान्याहून सामान्याला मी या रहस्यात मग्न होऊन या क्षणी त्याचं आयुष्य जसं आहे तसं पूर्णपणे स्वीकारून कुठलंही वैषम्य न वाटून घेता मजेत जगायला सांगीन कारण सरते शेवटी ते रहस्य एकच आहे आणि आपण सर्वच ते रहस्य आहोत.

संजय