७. पुन्हा एकदा : मन

जाणीवेचे (किंवा तुमचे) बेसावधपणे उन्मुख होणे विचार निर्माण होण्याची शक्यता निर्माण करते हे आपण सहाव्या लेखात पाहिले. ही उन्मुखता ईंद्रियगम्य किंवा शारीरिक संवेदना जाणून घेण्यासाठी असते. म्हणजे तुम्ही शांत बसला आहात आणि अचानक एखादा आवाज आला तर तुम्ही त्या संवेदनेचा मागोवा घेऊ लागता. हा मागोवा घेणे अगदी स्वाभाविक आहे पण त्याच्या पुढच्या क्षणी तुम्ही बेसावध होता म्हणजे समजा तो आवाज कुत्र्याचा असेल तर ती प्रक्रिया तिथे थांबत नाही, तुम्हाला कुत्र्याचे चित्र दिसते, मग कुत्र्याबद्दल विचार सुरू होतात, कोणत्या जातीचे असेल? लोक कुत्री का पाळतात? कॉर्पोरेशनने भटकणाऱ्या कुत्र्यांना उचलले पाहिजे! मनेका गांधीना कुत्र्याचे प्रेम कशामुळे बरे असेल? कुत्री स्टरिलाइज करण्याची आयडिया कशी आहे? थोडक्यात, विचार मालिका सक्रिय होते, याला आपण मन म्हणतो. आता हे विचार म्हणजे कॉम्प्युटरच्या डेटा बाईट सारखे मेंदूच्या पेशींवर (बायोकॉम्प्युटर वर) झालेले रेकॉर्डिंग असते. जशी संगणकाची स्मृती लॉजिकल कोऑरडिनेशने काम करते तसे मेंदूच्या पेशींवरचे स्मृतीआलेखन तर्कपूर्ण रितीने उलगडत जाते. ते तर्कपूर्ण रितीने उलगडत गेल्यामुळे आणि माणसाला लहानपणा पासून तर्कसुसंगत वागायला आणि जगायला शिकवल्यामुळे आपणही सगळे अगदी बरोबर चालले आहे असे समजून त्या स्मृतीपटाशी निगडित होतो आणि बरोबर इथे स्व-विस्मरण होते. सुरुवातीला निरुपद्रवी वाटणारा कोणताही विचार सावकाशपणे शरीराचा ताबा घेतो. विचार शरीराचा ताबा अशामुळे घेतो की स्मृतीपट चालू ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि शरीर चालू ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा एकाच श्वासातून मिळत असते.

आता तुम्हाला बुद्धाच्या विपश्यनेचं महत्त्व कळेल. तो म्हणतो तुम्ही कोणत्याही प्रसंगात असा फक्त जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वास करा तुमचं मन सक्रिय होऊ शकणार नाही आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. त्याच्या इतक्या सोप्या उलगड्याची पुढे साधकांनी यथावकाश वाट लावून विपश्यना म्हणजे अवघड व्रत आहे, त्यासाठी घनघोर यमनियमांची आणि वैराग्याची आवश्यकता आहे असा बोलबाला करून ठेवला.

मुळात विचार म्हणजे काय, विचाराचा श्वासाशी संबंध कसा आहे, श्वासाची जाणीव झाली की प्राण कसा शरीराला परत मिळायला लागतो, त्यामुळे स्वास्थ्य येते आणि तुम्ही वर्तमानात येता; याचा काहीही पत्ता नसलेल्या लोकांनी इतके दिवस आधी एक शिबीर मग त्यानंतर प्रगत लोकांसाठी पुढचे शिबीर असे सगळे पुढेपुढे नेत अवघड करून ठेवले. बुद्धा सारख्या अत्यंत सोप्या आणि सहज उलगडा करू शकणाऱ्या सिद्धाने इतकी साधी वस्तुस्थिती सांगितली की 'तुमचं सगळं श्वासावर अवलंबून आहे, विचारावर नाही' पण  माणसाला हे समजायला नेहमी चालू असलेला श्वास नाही तर शेवटचा श्वास यावा लागतो! मी अतिशयोक्ती करत नाही तुम्ही प्रयोग करून बघा आपण एक मिनिट देखील श्वासाकडे जाणीव उन्मुख ठेवू शकत नाही, लगेच विचार करायला लागतो. या विचारामुळे व्यक्तिमत्त्व अबाधित राहतं आणि आपण निराकार नसून व्यक्ती आहोत हा गैरसमज पुन्हापुन्हा पक्का होत राहतो.

इथे मला ओशोंच्या बुद्धिमत्तेची कमाल वाटते, ते म्हणतात सतत चालू असणाऱ्या या स्मृतीच्या चलत्चित्रपटामुळे त्याच्या अलीकडे कुणीतरी आहे असा प्रत्येकाला भास होतो (आणि तो म्हणजे प्रत्येकजण स्वतःला मानत असलेली व्यक्ती!) पण वास्तवात अशी कुणीही व्यक्ती नाही.  हा चलत्चित्रपट काही क्षणांसाठी जरी थांबला तरी तुम्हाला समोर सदैव हजर असलेला निराकार दिसू लागेल.

 जाणीवेचे उन्मुख होणे स्वाभाविक असले तरी जाणीवेला (म्हणजे तुम्हाला) स्वतःचा विसर पडणे उद्विग्नतेला कारणीभूत होते. जाणीव पाच इंद्रियगम्य संवेदना (बघणे, ऐकणे, गंध, चव आणि स्पर्श) आणि सात शरीरगम्य संवेदना (तहान, भूक, झोप, विहार,  वेदना (उत्सर्ग), प्रणय आणि भय) यांच्याकडे स्वाभाविकपणे उन्मुख होते. एकहार्ट म्हणतो : एन्लाइटन्मेंट इज द गॅप बिटवीन नोइंग अँड इंटरप्रिटेशन (जाणणे आणि  उलगडा होणे यातल्या अवधीत निराकार आहे).  म्हणजे तुम्हाला जाणीवेचे स्वाभाविकपणे उन्मुख होणे जर कळले तर त्यातून पुढे निष्कारण सुरू होणारी वैचारिक प्रक्रिया थांबवता येईल, म्हणजे तुमचे स्व-विस्मरण थांबेल आणि कोणत्याही प्रसंगात तुम्ही स्थिर राहू शकाल.

वास्तविकात भय आणि वेदना या दोन शारीरिक संवेदना सोडल्या तर जाणीवेला स्वतःचे विस्मरण होण्याची सहज शक्यता नाही. अर्थात भय आणि वेदना या दोन निसर्गाने शरीराच्या संरक्षणासाठी केलेल्या योजना असल्यामुळे त्यांच्या बाबतीत तीव्रता असते आणि त्यामुळे अनवधानाने स्व-विस्मरण होणे स्वाभाविक मानायला हवे. पण बाकी दहा संवेदनांनी सहज आणि जवळजवळ कायमचे स्व-विस्मरण होण्याचे एकमात्र कारण संवेदनेचे विचारात रुपांतर, त्याचे पुढे भावनेत रुपांतर, भावनेचे मग (निष्कारण) भय किंवा वेदनेत रुपांतर हे आहे.  जसा विचार हे माणसाचे वैशिष्ट्य आहे तसे भावना हे देखील आहे. पण विचाराचे भावनेत  रुपांतर फार मजेशीर आहे. एकहार्ट म्हणतो : शरीराशी जोडला गेलेला विचार म्हणजे भावना. आता विचार शरीराशी जोडला जाण्याचे एकमेव ठिकाण आहे हृदय. ज्यावेळी विचार श्वासातला प्राण ओढू लागतो तेव्हा हृदयाला प्राण कमी पडू लागतो आणि एका बेसावध क्षणी हृदयात हलकासा कंप निर्माण होतो आणि विचाराचे भावनेत रुपांतर होते. या क्षणी तुम्ही कोणत्याही षड्रिपूंच्या तावडीत सापडू शकता. इथून पुढे स्व-विस्मरण सघन होत जाते आणि मग परत स्वतःप्रत येणे दुष्कर होते.

आता आपण संवेदनेचा योग्य उपयोग आणि त्यामुळे सहज जगणे कसे शक्य होते ते बघून हा लेख संपवू. मुळात ईंद्रियगम्य संवेदना या निव्वळ मजेसाठी आहेत, बघणे, ऐकणे, स्पर्श, गंध आणि चव यांचा बहुतेक वेळा शारीरिक धोक्याची सूचना असा अर्थ नसतो त्यामुळे त्यांच्यावर विचार आणि पुन्हा विचारावर विचार असे सहज जगण्यास अपेक्षित नाही. शरीरगम्य संवेदना या शरीर स्वास्थ्यासाठी आहेत. वेळ ही मनातली संकल्पना जर काढून टाकली आणि संतुलन हा निसर्गाच्या बुद्धिमत्तेचा मूलभूत पैलू समजला तर प्रत्येक शारीरिक संवेदनेचे निराकरण सहज (आपोआप) होऊन अत्यंत साधे आणि नैसर्गिक जगता येते. भय आणि वेदना निराकाराचा बोध होताच त्रासदायक न होता उपयोगी ठरतात कारण निराकार किंवा जाणीव ही नेहमी अस्पर्शित राहत असल्यामुळे त्या संवेदना शरीराच्या बचावासाठी आहेत, निराकाराला म्हणजे आपल्याला काही धोका नाही हे तुमच्या लक्ष्यात येते. संवेदनेचा योग्य उपयोग कळल्यावर, संवेदनेची जाणीव आणि उलगडा या अवधीत सुरू होणाऱ्या विचार मालिकेत न अडकता, त्या अवधीत निराकाराशी संलग्न राहून म्हणजे कधीही न बदलणाऱ्या जाणीवेत स्थिर राहून तुम्ही मजेत जगू शकता.