६. मन

आपण निराकाराला जाणण्यातला एकमेव अडथळा व्यक्तिमत्त्व आहे हे दुसऱ्या लेखात बघितले. व्यक्तिमत्त्व हे  पूर्णपणे मनोनिर्मित असल्यामुळे 'मन म्हणजे काय?' या सगळ्यांना माहीत असलेल्या पण न उलगडणाऱ्या गोष्टीचा वेध घेऊ.

निराकार हा सगळ्याचा स्रोत असल्यामुळे शरीर आणि मन त्याच्या पासूनच निर्माण होणार हे उघड आहे. पुढे जाण्यापूर्वी ऐक गोष्ट लक्ष्यात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की निराकार म्हणजे नुसती पोकळी नव्हे, निराकार जाणीवेने परिपूर्ण आहे आणि म्हणूनच तो स्वतःला जाणू शकतो. आता या वस्तुस्थितीवर आधार ठेवून पुढे बघू. 

एकहार्टने त्याच्या 'स्टिलनेस स्पिक्स' मध्ये एक सुरेख उलगडा केला आहे. तो म्हणतो की जगात सगळीकडे निळा रंग असता तर तो निळा रंग आहे हे कळले नसते, अगदी तसेच जर विश्वात फक्त निराकार असता तर निराकाराला आपण निराकार आहोत हे कळले नसते. हेच वेगळ्या पद्धतीने : शांतता आहे हे कळण्यासाठी ध्वनी हवा, जेव्हा ध्वनी निर्माण होतो तेव्हा शांततेचा बोध होतो. त्यामुळे निराकाराने स्वतःला जाणण्यासाठी आकार निर्माण केला. ज्याप्रमाणे वाफ हे पाण्याचे सूक्ष्म रूप आहे आणि बर्फ हे घन रूप आहे त्याप्रमाणे विचार हे जाणीवेचे सूक्ष्म आणि शरीर हे घन रूप आहे. तो पुढे म्हणतो की भावना हे मनाचे शरीरात पडलेले प्रतिबिंब आहे.

आता हीच स्थिती आपण वेगळ्या पद्धतीने मांडू : मुळात मन असे काही नाही. विचाराच्या सातत्यामुळे मन ही भासमान कल्पना तयार झाली आहे.

त्यामुळे विचार आहेत, प्रबळ झालेला विचार जेव्हा शरीराचा ताबा घेतो तेव्हा भावना निर्माण होते, भावना शरीराला सक्रिय करते किंवा नवे शरीर निर्माण करण्याची संभावना निर्माण करते आणि हे सर्व जाणणारी ऐक निराकार स्थिती कायम असते तिला आपण जाणीव म्हणतो. ही जाणीव व्यक्तिनुरूप (किंवा इंद्रियाच्या प्रगल्भतेनुरुप) भिन्न भासत असली तरी मुळात ती एकच आहे, ऐक असलेल्या निराकाराचाच तो पैलू आहे. त्यामुळे ती जाणीव नेहमी एकसारखी, अस्पर्शित आणि अविभाज्य राहते.  विचार, भावना आणि शरीर यांच्यापासून वेगळे होणे म्हणजे या जाणीवेत स्थिर राहणे. ज्यावेळी तुम्ही या जाणीवेत स्थिर असता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वरूपाशी म्हणजे निराकाराशी संलग्न असता. याला आनंद म्हटले आहे.

इतकी सुरेख उकल झाल्यावर आता फक्त एकच प्रश्न राहतो आणि तो म्हणजे जाणीवेचे विचारात रूपांतरण कसे होते? कारण जाणीवेची स्थिर अवस्था हाच आनंद आहे. एकदा विचार निर्माण झाला की तो यथावकाश शरीराचा ताबा घेऊन भावना निर्माण करणार, भावना शरीर सक्रिय करणार आणि अशावेळी जाणीवेचा पूर्ण विसर पडल्यामुळे स्मृतीत लपलेले व्यक्तिमत्त्व सक्रिय होऊन उद्विग्नता निर्माण होणार. त्यामुळे जाणीवेचे विचारात रूपांतरण कसे होते हे कळले की जीवनातली उद्विग्नता संपेल आणि इतकेच नाही तर जाणीवेत स्थिर राहून विचार देखील करता येईल आणि त्यावेळी व्यक्तिमत्त्व सक्रिय होऊ शकणार नाही. प्रत्येक क्षण उत्स्फूर्ततेने  आणि नव्याने जगता येईल.

इथे अष्टावक्राने केलेली ध्यानाची आजपर्यंतची जगातली सर्वोत्कृष्ट व्याख्या उपयोगी ठरेल. तो म्हणतो ध्यान म्हणजे : अनावधानस्य् सर्वत्र! कुठेही लक्ष्य नसणे म्हणजे ध्यान! तुम्ही जाणीवेत स्थिर आहात म्हणजेच तुमची जाणीव स्वतःकडे परत आली आहे. निराकार निराकाराशी संलग्न आहे. याचाच अर्थ तुमचे ध्यान (किंवा लक्ष्य) कुठेही नाही. ज्या क्षणी तुमचे लक्ष्य वेधले जाईल त्या क्षणी स्व-विस्मरणाची शक्यता निर्माण होईल. जर तुम्ही सगळी कडून तुमचे लक्ष्य काढून घेतले तर या क्षणी तुम्हाला स्वतःची जाणीव होईल आणि तुम्ही शांत व्हाल. ही शांतता हे तुमचे स्वरूप आहे ते तुम्हाला कोणत्याही क्षणी  आणि कायमचे उपलब्ध आहे. 

आता या आधारावर जाणीवेचे विचारात रूपांतरण कसे होते ते स्पर्श या संवेदनेने बघू. तुम्ही आता तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवा. तुम्हाला  चेहऱ्याची त्वचा आणि तुमच्या हाताची त्वचा यांची जाणीव झाली असे वाटेल. खरं तर इतक्या साध्या गोष्टीत कुणालाही काहीही आध्यात्मिक उकल जाणवणार नाही. कुणीही म्हणेल की माझ्या हाताला चेहऱ्याची जाणीव झाली पण खरं तर निराकार जाणीव उन्मुख झाली, तुमचं लक्ष्य हाताला होणाऱ्या चेहऱ्याच्या स्पर्शाकडे वेधलं गेलं. आता ही क्रिया तुम्ही आणखी थोडा वेळ चालू ठेवली तर आणखी काही शारीरिक संवेदना निर्माण होतील आणि काही क्षणात त्या संवेदनेशी अनुरूप असे विचार चालू होतील. हे विचार पुढे पुढे श्वासाचा ताबा घेतील आणि मग पुरेशी घुसमट झाल्यावर एखाद्या विचाराचे भावनेत रुपांतर होईल (उदा. आता कमावले नाही तर म्हातारपणी कसे होईल?) आणि शरीर सक्रिय होईल, तुम्हाला वाटेल आपण निघालो, इथे आत्मविस्मरणाची प्रक्रिया सघन झाली. आता सहलीला गेलात तर थोडी उशीरा आणि ऑफिसला निघालात तर जवळ जवळ लगेच चिंता सुरू होईल.

आता तुमच्या लक्ष्यात येईल की जाणीव हे निराकाराचे स्वरूप असून, जाणीवेचे  बेसावधपणे उन्मुख होणे म्हणजे विचार सुरू होणे आहे. आता आपणच मुळात निराकार किंवा जाणीव स्वरूप आहोत म्हणून थोडक्यात तुमचे बेसावधपणे इंद्रियगम्य संवेदनेकडे (म्हणजे एखादा आवाज, दृश्य, गंध, स्पर्श किंवा चव) अथवा शारीरिक संवेदनेकडे (वेदना, भूक, तहान, झोप वगैरे) उन्मुख होणे स्व-विस्मरणास आणि पुढे विचार निर्माण होण्यास कारणीभूत ठरते.

आता चार्वाकाने सगळ्यांची केलेली दिशाभूल बघू आणि हा लेख संपवू. चार्वाक म्हणतो की आकारामुळे निराकाराचा भास होतो, निराकार असे काही नाही, फक्त आकारच आहे. ध्वनी मुळे शांतता होती असे वाटते, शांतता असे काही नाही. खरी परिस्थिती नेमकी उलटी आहे, जाणीव एकसंध आहे ती उन्मुख झाल्यामुळे शरीर जाणवते. शरीर असल्यामुळे तुम्ही आहात हा भास नाही तर तुम्ही आहात म्हणून शरीराची जाणीव आहे. शांतता मूळ आहे ती कानामार्फत उन्मुख झाल्यामुळे ध्वनी जाणवतो.

पण चार्वाकाच्या अश्या विचारामुळे संवेदना म्हणजे जाणीवेची उन्मुखता ही प्रार्थमिक झाली आणि जाणीव भासमान वाटू लागली. निराकार भासमान आणि आकार खरा वाटू लागला. भोग प्रार्थमिक झाला आणि भोगणाऱ्याचे विस्मरण झाले. अश्या तऱ्हेने निराकाराचा बोध दुर्लभ झाला. निसर्गदत्त महाराजाना कुणीसे विचारले की या 'स्व' ला जाणण्यात काय आड येते? ते म्हणाले तुमचे नित्यनवीन अनुभवासाठी आसुसलेले असणे!  हेच आणखी सोपे करता येईल :   जाणीव उन्मुख होताना तुमचे बेसावध असणे.