२६. देव, दैव आणि श्रद्धा

देव ही संकल्पना समजण्यासाठी गुरुत्वाकर्षण ही सर्वज्ञात आणि सर्वानुभूत कल्पना फार उपयोगी आहे!

गुरुत्वाकर्षणाचे तीन पैलू आहेत, एक, गुरुत्वाकर्षण सर्वमान्य आहे पण ते कुठे आहे हे दाखवता येत नाही आणि तरीही दाखवता येत नाही म्हणून तुम्हाला ते नाकारता येत नाही! दोन, गुरुत्वाकर्षण हे माणसानं दिलेलं नांव आहे, कोणतंही नांव दिलं किंवा काहीही नांव दिलं नाही तरी गुरुत्वाकर्षण आहे तसंच राहील. गुरुत्वाकर्षण शोधलं म्हणून ते आहे असं नाही तर शोधण्यापूर्वी ही ते होतंच, माणसाला त्याचा फक्त बोध झाला! तीन, गुरुत्वाकर्षण व्यक्तिनिरपेक्ष आहे म्हणजे मानणारा आणि न मानणारा यात ते फरक करत नाही.

गुरुत्वाकर्षणा सारखे अनेक ज्ञात आणि अज्ञात नियम ज्यांनी हे अस्तित्व निर्माण झालं, चालू आहे आणि लयाला जाईल त्या सर्वांना मिळून माणसानं देव हे नांव दिलं आहे!

जगाची सारी मानसिकता आस्तिक आणि नास्तिक या दोन धारणांत विभागली गेली आहे, आता मजा म्हणजे आस्तिक आणि नास्तिक दोघंही गोंधळात आहेत. आस्तिक म्हणतात की देव हा आकार आहे, फक्त मुस्लिम धर्म देव निराकार आहे असं मानतो, म्हणजे देव मानणाऱ्यात आणि न मानणाऱ्यात पुन्हा दोन गट आहेत देव आकार आहे का निराकार आहे आणि त्यामुळे आस्तिक मानवता देखील एकसंध नाही. आकारवादी आस्तिक सुद्धा अनेक देवांमुळे पुन्हा विभागले गेले आहेत.

आस्तिक श्रद्धावान असतो आणि तो देव मानत असल्यामुळे पर्यायानंच दैव किंवा नियती मानतो, म्हणजे प्रसंग घडणे, घडवणे किंवा ओढवणे यात तो देवाचा हात मानतो, विशेषतः प्रसंग त्याच्या आवाक्या बाहेरचा असेल तर. नास्तिक अनिवार्यपणे दैव मानत नाही, तो स्वतःवर (खरं तर स्वतःच्या भूतकाळावर) विश्वास ठेवून असतो, म्हणजे मागे असं घडलं म्हणजे पुढे असं घडेल अशी त्याची भूमिका असते. अगदी सखोल पाहिलं तर नास्तिक माणूस यशस्वी असावा लागतो तरच त्याला स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवता येतो. तसंच बहुतांश आस्तिक हे यश मिळावं किंवा मिळालेलं यश टिकावं म्हणून दैववादी असतात.

आता मजा म्हणजे सगळी सजीव आणि निर्जीव सृष्टी अस्तित्व चालवणाऱ्या या अव्यक्त नियमांनी बांधली गेली आहे. माणूस सोडता इतर सर्व सृष्टी या अव्यक्त नियमाशी एकरूप आहे म्हणजे आपण वेगळे आहोत ही जाणीव (खरं तर आपण आहोत ही जाणीव) त्यांच्यात नाही. भूक लागली तर पक्षी घरट्यातून बाहेर पडेल, भूकच त्याला कुठे जायचं ही दिशा दाखवेल, भूकच त्याला काय खावं, किती खावं हे सांगेल आणि मग तो कुठेही असला तरी पुन्हा त्याला स्वतःच्या घराचा पत्ता, रस्ता नसताना कळेल! फक्त माणूसच त्या अव्यक्त नियमा विरुद्ध जाण्याचा विचार करू शकतो आणि त्याची दखल न घेता स्वतःची मनमानी काही प्रमाणात करू शकतो, ते त्याला मिळालेलं अस्तित्वागत स्वातंत्र्य आहे. म्हणजे भूक लागली तरी तो उपवास करू शकतो, झोप आली तरी दुर्लक्ष करून जागा राहू शकतो, अणुबॉम्ब बनवू शकतो आणि सत्तेसाठी युद्ध करू शकतो आणि एवढं सगळं करून पुन्हा अस्वस्थ राहू शकतो!
 
आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अस्तित्वात वेळ नाही, किंवा अप्रकट नियम कालबद्ध नाही. अस्तित्व प्रकट आणि अप्रकट दोन्ही गोष्टींनी मिळून बनलं आहे आणि वेळ ही प्रकट गोष्टींवर काम करते त्यामुळे माणसानं कितीही प्रयत्नांनी सृष्टी विरुद्ध काम केलं तरी त्याचे प्रयत्न थकल्यावर सृष्टी विनासायास हवं ते घडवते. म्हणजे तुम्ही कितीही झोपायचं नाही म्हटलं तरी तुमचा प्रयत्न थकल्यावर झोप येणारच!   तुम्ही कितीही गुरुत्वाकर्षणा विरुद्ध काम करा, तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी थकल्यावर गुरुत्वाकर्षण आपसूक काम करेल, ते इतकं सहज घडेल की जणू काही ते घडायचंच होतं!

अस्तित्वाचे नियम निर्वैयक्तीक असल्यामुळे खरं तर सगळ्या घटना आपोआप घडतात हे उघड आहे, तुम्ही ते मान्य करा किंवा करू नका, वस्तुस्थिती अशी आहे. जर घटना आपोआप घडत असतील तर सगळ्यांना नेहमी पडणारा प्रश्न की नियती आहे का नाही, व्यर्थ आहे कारण प्रसंगाकडे किंवा घटनेकडे वैयक्तिक दृष्टिकोनातून बघितलं तरच ती नियती वाटते! म्हणजे घटना सुरुवातीला निव्वळ फिजीकल (वस्तू-बद्ध) असते पण आपण तिचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा व्यक्तिमत्त्व सक्रिय होऊन ती नियती वाटते.

मी ज्या वेळी हा विषय चर्चेसाठी ठेवला होता तेव्हा ‘सामूहिक प्रयत्नांनी नियती बदलू शकते’ असा विचार मांडला गेला होता. आता जेव्हा सामूहिक प्रयत्न हा संलग्न झालेल्या प्रत्येकाच्या भल्यासाठी असतो तेव्हा खरं तर अस्तित्वच प्रत्येक व्यक्ती मार्फत कार्य करत असतं. म्हणजे एखादा प्रचंड मोठा भूकंप झाला तर जगातल्या अनेक व्यक्तींच्या मनात तिथे पुनर्वसन व्हावं अशी इच्छा निर्माण होते आणि अनेक व्यक्तींमार्फत अस्तित्व पुन्हा पुनर्निमाण सुरू करतं. पण बऱ्याच वेळा सामूहिक प्रयत्न हा व्यक्तीगत इच्छेतून निर्माण झालेला असतो, म्हणजे मला श्रीमंत व्हायचं आहे पण एकट्याचे प्रयत्न अपुरे पडतात म्हणून मी अनेक लोकांना 'माझ्या उपक्रमात त्यांचं कसं भलं आहे' हे संभाषण कौशल्यानं पटवून देऊ शकतो आणि मग 'कंपनी मोठी करायची' असा निर्वैयक्तीक मुलामा देऊन माझा स्वार्थ साधू शकतो. ही घटना वरून सामूहिक दिसली तरी यातून काही ठराविक लोकांचं भलं होत असतं. राजकारण हे सामूहिक प्रयत्नांनी स्वार्थ साधण्याचं आणखी एक उदाहरण आहे. युद्ध हा राजकारणी व्यक्तींनी केलेला दुसरा सामूहिक प्रयत्न आहे. असे सामूहिक प्रयत्न निव्वळ व्यक्तीगत इच्छे खातर असतात आणि त्यांचे यशापयश हे देखील शेवटी वैयक्तिक दृष्टिकोनातूनच मोजले जाते, त्यात नियती वगैरे काही नसते.

आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे; जीवनातल्या कोणत्याही घटनेनं, प्रसंगानं किंवा साध्यातल्या साध्या संवेदनेनं आपली स्मृती सक्रिय होते, स्मृती सक्रिय झाल्यानं अनिवार्यपणे व्यक्तिमत्त्व सक्रिय होते आणि आपण प्रत्येक संवेदना, प्रसंग किंवा घटना वैयक्तिक दृष्टिकोनातून बघतो त्यामुळे काही कळायच्या आत आपण प्रसंगात सापडतो किंवा संवेदना आपल्याला स्मृतीत आणि पर्यायानं भूतकाळात किंवा भविष्यकाळात घेऊन जाते त्यामुळे आपला स्वतःशी संपर्क तुटतो!

मी हे आणखी सोपं करतो, जाणीव म्हणजेच जग आहे, जोपर्यंत एखाद्या गोष्टीची जाणीव होत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी ती गोष्ट अस्तित्वात नसते, मग ती गोष्ट तुमच्या कितीही जवळची असो; म्हणजे माणसाचा प्रकट जगाशी किंवा घडणाऱ्या कोणत्याही घटनेशी संबंध फक्त जाणीवे मार्फतच होऊ शकतो. जर तुम्ही जाणीवेचं रुपांतर विचारात होऊ दिलं नाही तर कोणतीही घटना वैयक्तिक होऊ शकत नाही, तिचा तुमच्यावर मानसिक परिणाम होऊ शकत नाही आणि मग दैव किंवा नियती असं काही उरत नाही! देव या कल्पनेला तुम्ही अस्तित्व चालवणारा नियम म्हणून सहज स्वीकारू शकता कारण घटना फक्त शरीरावर काम करते, घटनेतला दंश पूर्णपणे निघून जातो कारण तुम्ही तिच्याकडे वैयक्तिक दृष्टिकोनातून बघत नाही, घटनेचा तुम्हाला स्पर्श होत नाही आणि  तुम्ही नेहमी जसेच्या तसे राहता!

नैनं छिंदंती शस्राणि, नैनं दहती पावकः

न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयती मारुतः (गीता २:२३) 

या श्लोकाचा खरा अर्थ असा आहे!

संजय