मेरा भारत महान!

मी पुण्यात एका आघाडीच्या भारतीय आय. टी. कंपनीत काम करत होतो तेव्हाची ही गोष्ट आहे. एका जगप्रसिद्ध इन्वेस्टमेंट बँकेसाठी काम करणाऱ्या खात्यात मी होतो. मी ज्या संघात काम करत होतो त्या संघाचा व्यवस्थापक एक स्कॉटिश मनुष्य होता. स्कॉटिश लोक म्हणजे आपल्या पुणेरी लोकांच्याही वरताण. फोनवरून होणाऱ्या संभाषणातही त्याचा खडूसपणा आणि नकळत टोमणे मारायची लकब लगेच समजून यायची. शिवाय जे लोक लंडनला जाऊन त्याला भेटून येत ते त्याच्या विक्षिप्तपणाचे किस्से सांगत असतच. तर असा हा मनुष्य, जॉन म्हणूया त्याला, एकदा पुण्यात आला. आमच्याच कंपनीच्या दुसऱ्या खात्याने तयार केलेले एक सॉफ्ट्वेअर खरेदी करायचे की कसे ते ठरवण्यासाठी तो आला असल्याने त्याची जोरदार बडदास्त ठेवली जात होती. तो एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहणार असल्याने मध्ये येणाऱ्या सप्ताहांतात त्याच्या करमणूकीचा बंदोबस्त करावाच लागणार होता. वरून खालपर्यंत ढकलत ढकलत त्या जबाबदारीचा बोजा शेवटी माझ्या संघप्रमुखाच्या आणि माझ्या खांद्यावर पडला. जॉनची ही पहिलीच भारतभेट व पुणेभेट असल्याने त्याला थोडेफार स्थळदर्शन घडवावे असे आम्ही ठरवले आणि आखणी करू लागलो. तो साधारण एप्रिलचा काळ होता. आम्ही आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांची एक यादी केली. जसं जसं आम्ही एक-एका स्थळाचा विचार करून त्या यादीतून स्थळे बाद करू लागलो तशी तशी आमची तोंडे बारीक होऊ लागली. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या ऊक्तीप्रमाणे आधीच  छोट्या असलेल्या त्या यादीत परदेशी माणसाला एप्रिलच्या उन्हात नेऊन दाखवण्यासारखी स्थळंच मिळेनात. त्यात आम्हाला स्कॉटलंडमधल्या सृष्टीसौंदर्याची व उत्तमरीत्या जतन केलेल्या किल्ल्यांची कल्पना असल्याने त्या तोडीचं इथे काय दाखवावं असा प्रश्न पडला. शेवटी हो-ना करता करता सकाळी सिंहगड, दुपारी राजा केळकर संग्रहालय आणि संध्याकाळी शनिवारवाड्यातला 'लाईट शो' असा कार्यक्रम ठरला.

ठरल्यादिवशी आम्ही सकाळीच निघालो. बरोबर भरपूर पाणी आणि खाद्यपदार्थ घ्यायला अर्थातच विसरलो नव्हतो. गड चढून न जाता वरपर्यंत गाडी नेली आणि मग गडावर थोडे हिंडलो. आम्हाला माहिती होता तेवढा सगळा इतिहास शक्य तेवढा संक्षिप्त करून आम्ही सांगितला. पण हळूहळू असं लक्षात आलं की आम्ही दाखवण्यापेक्षा काल्पनिक वर्णनच जास्त करतोय. जॉनने विचारलेल्या काही साध्या साध्या प्रश्नांनी आमची चांगलीच गैरसोय झाली. त्याला किल्ल्याची व्यवस्था कशी चालायची या बद्दल उत्सुकता होती. भटारखाना कोठे होता, लोक कसे राहायचे, किल्लेदार कोठे राहायचा, अन्न-धान्य कोठे साठवले जायचे, तलवारी कशा होत्या वगैरे प्रश्न आम्हाला फारच जाचक वाटू लागले कारण प्रत्यक्ष दाखवायला तिथे फारच थोड्या गोष्टी होत्या. तरीही त्याला संग्रहालयात तलवारी वगैरे दिसतील असं सांगून आम्ही वेळ मारून नेली. टिळकांचे घर बंद का आणि तिथे त्यांच्या काही वस्तू पर्यटकाना पाहायला का ठेवत नाहीत या प्रश्नाला आमच्याकडे काहीच उत्तर नव्हते. शेवटी तो म्हणालाच, "कमीत कमी इथून डोंगरदऱ्या फार छान दिसत आहेत".  गडावरून खाली उतरल्यावर माझा कुटुंबवत्सल संघप्रमुख कौटुंबिक कारणाने अदृश्य झाला आणि आम्ही केळकर संग्रहालयाकडे निघालो. तिकीटखिडकीवर तिकीटांचे दर होते. भारतीयास १० रु. आणि परदेशीस १०० रु. हे असं का याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. संग्रहालय दाखवताना मात्र मी रंगून गेलो. तिथे ठेवलेल्या अनेक सुंदर वस्तू पाहताना केळकरांबद्दल माझ्या मनात आदर दाटत गेला. जॉनलाही संग्रहालय आवडले असे वाटले. 

त्यानंतर आम्ही शनिवारवाड्याकडे मोहरा वळवला. तिथे पोचल्यावर मला कळाले की ५ वाजता मराठी शो आहे आणि ७ वाजता इंग्रजी शो आहे. इतकावेळ थांबणे शक्य नसल्याने आम्ही मराठी शो पाहायचे ठरवले. पण जॉनला तहान लागली होती आणि पाण्याचा साठा संपला म्हणून आम्ही रस्ता ओलांडून (मी सहज ओलांडला आणि जॉनने अतिशय घाबरत घाबरत) पलीकडच्या एका छोट्या उपाहारगृहात गेलो. तिथून पाण्याच्या बाटल्या घेउन आणि एक थंड पेय पिउन आम्ही परत आलो आणि मी तिकीट खिडकीवर गेलो. आतमध्ये एक पाच फूट उंचीचा मस्त भरदार मिशा वाढवलेला मर्द मराठा गडी बसला होता. मी तिथे गेल्याबरोबर तो म्हणाला, "इथं गाडी पार्क करून दगडूशेट गणपती पाहायला गेले होते ना? चला १००० रु. दंड भरा".

"कसला दंड? ", मी.

"ती तिकडे लावलेली पाटी पाहा. इथे गाडी लावून बाहेर गेले तर १००० रु. दंड आहे".

मी पाटी पाहिली.

"अहो पण आम्ही फिरायला नव्हतो गेलो फक्त पाणी घेउन आलो. १० मिनिटात तर परत  आलो". संतापाने माझा आवाज थोडा चढला.

"ते काय आमाला सांगू नका. हजार रुपये भरा नायतर गाडी सोडून जावा". मग्रूर उत्तर.

त्याची ती पैसे उकळण्याची धडपड पाहून मला अतिशय किळस आली. मला वेळ लागत आहे हे पाहून जॉन माझ्याकडे आला आणि काय प्रॉब्लेम आहे ते विचारू लागला. त्याला मी खरं कारण सांगितलं नाही आणि वेळ का लागतोय हे मला माहिती नाही असं सांगून गाडीत जाऊन बसायला सांगितले. मला त्या तिकीटवाल्याचा भयंकर राग आला होता पण जॉनला ते कळू नये असेही वाटत होते. शेवटी मी त्या माणसाला म्हणालो, "हजार रुपये नाहीयेत माझ्याकडे किती द्यायचे ते सांगा आणि मिटवून टाका". त्या माणसाने निर्लज्जपणे दीडशे रुपये घेतले शिवाय माझ्या तिकीटाचे भारतीय दराने आणि जॉनच्या तिकीटाचे परदेशी दराने आणखी दीडशे घेतले. तिकीटे मात्र दोन्ही सारखीच होती. तेवढ्यात माझा संघप्रमुख पुन्हा अवतीर्ण झाला म्हणून त्याचेही तिकीट काढून आम्ही तिघे आत गेलो.

शो सुरू झाला. शनिवारवाड्याच्या त्या उरल्या सुरल्या चौथऱ्यावर रंगीबेरंगी कारंजी लावून मागे ध्वनिवर्धकावर मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाचे पवाडे चालू झाले. माझा संघप्रमुख जमेल तसा अनुवाद करून जॉनला सांगत होता आणि मी विमनस्कपणे समोरचा तमाशा पाहत होतो.