प्रेम चोपडा यांचे चित्रकर्तृत्व

   हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायकाच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांमध्ये प्रेम चोपडा हे नाव अनेक वर्षे गाजत आहे. प्रेम चोपडा यांना एकोणीसशे ऐंशीपूर्वी वैविध्यपूर्ण खलनायक साकारण्याची संधी मिळाली. ऐशीनंतरचे त्यांचे काही चित्रपट नुकतेच दूरचित्रवाणीवर पाहिले. त्या सर्व चित्रपटांत त्यांनी बिअरचा ग्लास हातात धरून प्रतिस्पर्धी चोराला संपविण्याचे कट रचणे, इन्सपेक्टर असलेल्या नायकाला लाच देणे, एखाद्या दुय्यम दर्जाच्या अभिनेत्रीवर बलात्कार करणे आणि अखेरीस कोणाला तरी पळवणे व खंडणी वसूल करणे हा चार कलमी कार्यक्रम राबविलेला आहे. सतत हीच कामे करताना चोपडा दिसतात.
   खरे तर वर सांगितलेल्या त्याच त्या गोष्टी करण्याचा आरोप अगदी जीवन, प्राण, रणजीत, अजित, शक्तीकपूर, अमरीशपुरी, कादरखान, गुलशन ग्रोव्हर, मुकेश तिवारी यांच्यासकट सर्व नव्या जुन्या आणि लहानमोठ्या कलाकारांवर होतो. पण या कलाकारांनी कधी सकारात्मक, कधी कधी विनोदी, कधी चरित्र भूमिकाही केल्या आहेत.
   चोपडा यांच्याबाबतीत सकारात्मक भूमिकांचे प्रमाण नगण्य आहे. २००० मध्ये आलेल्या 'चोरी चोरी चुपके चुपके' चित्रपटात त्यांनी बुजुर्ग डाक्टरची भूमिका केली आहे. सत्तरच्या दशकात एका चित्रपटात त्यांनी इन्सपेक्टरची भूमिका केली होती. तरुणपणी तर त्यांनी मनोजकुमारच्या 'शहीद' चित्रपटात 'सुखदेव' साकारला होता. हे काही तुरळक अपवाद आहेत. 

   चोपडा यांना तेच तेच करून कंटाळा कसा आला नाही ?
   वैविध्यपूर्ण भूमिका करणे ही कलाकाराची गरज असली पाहिजे.
   केवळ लाखो रुपयांचे मानधन मिळते म्हणून आधी जशी टाकली होती तशीच पाटी टाकायची, ही मानसिकता त्यामागे आहे का?