सत्य म्हणजे काय?

"बरे सत्य बोला, बरे सत्य  चाला /

बहु मानती लोक येणे तुम्हाला/" संत रामदास

रामदास असोत की तुकाराम, साऱ्याच संतानी एकमुखाने सत्याची महती गायली आहे. एवढेच नव्हे तर, सर्वच धर्मात सत्याचे गोडवे गायलेले दिसतील. अधुनिक जगातील सर्वच विधी आणि न्याय व्यवस्था, आज सुद्धा नागरिकांकडून सत्य वर्तनाचीच अपेक्षा ठेवतात.

पण सत्य म्हणजे काय?

'सत्य' हा शब्द सत् पासून बनला आहे. सत् म्हणजे चांगले.  सदाचरण या शब्दात सत् + आचरण असे दोन शब्द असून त्याचा अर्थ चांगले वर्तन आहे. 

पण सत्य शब्दाचा मला वाटणारा अर्थ थोडा वेगळा आहे- पहा पटतो का?

"सत्य कथन म्हणजे- जे मला कळले, समजले / उमगले ते तसेच - तिखट-मीठ न लावता, तसेच काही ही न वगळता, जसेच्या तसे सांगणे - होय."

सात आंधळे व हत्तीची गोष्ट प्रसिद्ध आहे. ज्याच्या हाती हत्तीचा पाय लागला त्याने हत्तीचे वर्णन खांबासारखा प्राणी असे केले. ज्याला शेपटी सापडली तो हत्ती हा दोरीसारखा प्राणी आहे, म्हणाला. प्रत्येक जण खरेच- सत्यच बोलत होता. प्रत्येकाची अनुभूती निराळी! अर्थात नित्कर्ष निराळा!

ज्याने पृथ्वी सपाट बशीसारखी आहे, असे प्रतिपादन केले तो मुळीच खोटे बोलत नव्हता.

जसजसे आपल्याला परिस्थितीचे आकलन नव्याने होते, तसे आपले विचार ही पालटत जातात. सत्याच्या शोधाचा मार्ग असा नव-नव्या आकलनातून जातो. आपली आकलन शक्ती वाढती ठेवणे, जिज्ञासू रहात निसर्गाचे कोडे आपल्या बुद्धीने सोडवित राहणे ही दीर्घ काळ,  नव्हे अनंत काळ चालत राहणारी प्रक्रिया आहे!

अशा प्रकारे जसजशा मानवाच्या आकलनाच्या मर्यादा रुंदावत जातील तसतसे सत्याचे स्वरुप देखील बदलत राहील. म्हणूनच येथे त्रिकालाबाधित सत्यास थारा नाही. कालचे सत्य आज खोटे ठरते , आणि हे सततच होत राहणार यात शंका नाही!

मग पुढला प्रश्न अपोआप उभा राहतो, - असत्य म्हणजे काय?

युधिष्ठिराच्या गोष्टीत त्याची नेमकी व्याखा सापडेल.  युधिष्ठीराला नेमके माहित होते- अश्वथामा नावाचा हत्ती मारला गेला आहे-द्रोणाचार्यांचा मुलगा नाही! तरी ही त्यांने द्रोणाचार्यांच्या प्रश्नावर " हो, अश्वथामा मेला, हे खरे आहे " असे म्हटले. आणि मग द्रोणाचार्यांना ऐकू न जाईल अशा आवाजात पुटपुटला-" माणूस की हत्ती, माहित नाही " (नरो वा कुंजरो वा! ) इथे त्यांने सत्याची पुरी वाट लावली! द्रोणाचार्यांचा युधिष्ठिराच्या सत्य-प्रियतेवर पूर्ण विश्वास होता आणि ते फसले!

अनेक जण सत्याचा वापर हित-अहित पाहून करावा असे म्हणतात. म्हणजेच 'आपले हित साधत असेल तर खोटे बोलण्यास हरकत नाही! ' या अशा सोयीच्या सत्यतेवर माझा बिलकूल विश्वास नाही. खरे बोलणेच योग्य!

असे म्हणतात- खरे बोलण्याचा एक फायदा असतो-आपण काल काय बोललो होतो हे लक्षात ठेवायला लागत नाही!

पण  तरी ही सत्याचा आग्रह किती धरावा याचा ही विवेकाची बाब! विवेक शक्ती ही माणसाला मिळालेली मोठी देणगी आहे! तिचा त्याग केल्यास, तर सावरकरांच्या भाषेतील -सद्गुण-विकृती- निर्माण व्हायची!