परिस्फोट.... कै.ग. दि. माडगूळकर

कै. माडगूळकरांची प्रतिभा अप्रतिम होती. तितकाच त्यांचा व्यासंग देखील दांडगा होता. त्यामुळेच त्यांची प्रत्येक कविता गेय असेच पण आशयगर्भ सुद्धा असे. पण त्या वेळच्या प्रथितयश साहित्यिकांनी त्यांना 'गीतकार' म्हणून हिणवले. 'यांना स्वतःच्या भावना नाहीतच; इतरांच्या भावना ते लिहतात. ' असा काहीसा सूर असे.  माडगूळकरांचा 'जोगिया' हा काव्य संग्रह हे त्यांनी दिलेले उत्तर! रसिकांनी तो अवश्य पाहावा! त्याच जोगियातील मला आवडलेली ही एक कविता-

परिस्फोट!

गीत हवे क गीत?

एका मोले विकतो घ्या रे विरह आणखी प्रीत

गिर्हाइकाच्या लहरीखातर

कांतूनि मी आणियले 'अक्षर'

सुरेख केल्या बघा बाहुल्या वरी बांधली फीत

नीटस गोंडस, वजनी हलक्या

मुक्या तरीही दिसती बोलक्या

नयनी यांच्या भाव कोरिले जे सर्वां माहित

हसऱ्या, रडव्या, सुप्त, खेळत्या

कळसूत्री कुणी सहज नाचत्या

भडक घातले वेष, सहज जे करिती जन मोहित

कोण हंसे ते दबल्या ओठी!

सौदा करितो पोटासाठी

रस्तोरस्ती फिरुनी पोटच्या कन्या नाही विकीत 

हसणारांनो, वेळ काढुनी

या गरिबांच्या प्रसन्न सदनी

अरुणरम्य त्या बघाल लेकी, बघाल त्यांची रीत

उरात माझ्या अग्नी लपला

पोटी आल्या समूर्त चपला

असेल साहस तर या गेही, होऊ नका विचलित 

दिसतो तुम्हा तो मी नाही

कसले येता माझ्या गेही

उन्मेषाच्या  वनी नांदतो, तेजाच्या जाळीत

तेथे येतील ते तर ज्ञानी

तसे म्हणावे तुम्हास कोणी?

फिरते छाया पथात माझी, तीच बसा न्याहळीत

मी 'हंसण्याने' तुमच्या 'हंसलो'

बोलू नये ते गूज बोललो

तुमच्या दारी रोजच बसणे माल मला खपवीत