नुक्त्याच जाहीर झालेल्या निवडणुकीच्या संदर्भात राजकीय पक्षांच्या गमती वाचायला मिळत आहेत तशाच
त्यासाठी शासनाकडून उचलली जाणारी पावले काय आहेत याविषयीच्या पण हालचाली वाचायला मिळताहेत. या
काळात निवडणूक ही सर्वोच्च महत्वाची बाब असते आणि शासनाच्या दृष्टीने त्यापुढे इतर कोणतीच गोष्ट महत्वाची
नसते, त्याचमुळे आय पी एल भारतातच खेळवण्याचे काही महत्वाच्या व्यक्तींचे मनसुबे पार धुळीस मिळाले त्यापुढे
सहकारी बॅंकांचे कामकाज ठप्प होणे आणि त्यामधील अधिकाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची भूमिका बजावायला
लागणे ही तर फारच किरकोळ बाब. निवडणुकीच्या कामात हयगय करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला पार घरीच
बसवण्याचे अधिकार निवडणूक आयुक्तांना असल्यामुळे काहीही झाले तरी निवडणुकीच्या कामाकडे दुर्लक्ष्य होऊ नये
याकडे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याचे कटाक्षाने लक्ष असते.
शासकीय सेवेत मी प्रवेश केल्यावर दोनच वर्षानी लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुकांचे पडघम वाजू
लागले आणि बुजुर्ग मंडळींनी आता निवडणुकीच्या कामाला आपल्याला जावे लागेल असे भयमिश्रित उद्गार काढायला
सुरवात केली. ते असे का घाबरतात याविषयी मी अनभिज्ञ होतो. कारण मतदानकेंद्र गुंडानी ताब्यात घेतले अशा बातम्या त्यावेळी ऐकायला मिळत नसत.
जिल्हाप्रमुखांच्या कार्यालयातून एकदिवस नेमणुकांच्या कागदपत्रांचे भेंडोळे घेऊन तेथील एक तृतीय वा चतुर्थ श्रेणी
कर्मचारी येऊन महाविद्यालयात फिरू लागला आणि दिसेल त्याच्या हातात नेमणुकांचे पत्र ठेऊ लागला. तेव्हां मी अगदीच
बच्चा असल्यामुळे आपल्याला कसले इतक्या महत्वाच्या कामाला पाठवतात अशा समजुतीने मी गाफील असतानाच
"हे कुलकर्णी कुठे आहेत? " असे विचारत तो माझ्यापर्यंत आला आणि मीच तो असे कबूल करेपर्यंत ते नेमणुकपत्र
माझ्या हातात ठेवून आणि ते मिळाल्याबद्दल माझी सही घेऊन पसारही झाला तेव्हां कोठे माझ्या
टाळक्यात शिरले की मीही त्या चरकात सापडलो होतो. कोणतीही फायद्याची गोष्ट असेल तेव्हां काटेकोरपणे सेवाज्येष्ठतेचा
विचार करणारे शासन जबाबदाऱ्या टाकण्याच्या बाबतीत मात्र फारच समदर्शी असते ही गोष्ट त्यावेळी मला समजली..
निवडणुकीच्या आधी साधारणपणे वीस ते तीस दिवस ही नेमणुकपत्रे येत. कारण त्यानंतर चार प्रशिक्षणवर्ग
त्यावेळी असत. त्या प्रशिक्षणवर्गाच्यावेळी अगदी वेळेवर हजर असणे आवश्यक असे. तेथे गेल्यावर हजेरी पत्रक ठेवलेले
असे त्यावर सही करावी लागे. सही केल्यावर निवडणुकीचा विधी आणि त्याचे नियम यांचे वर्णन करणारी
पुस्तिका केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना मिळे. माझी नेमणूक केंद्राध्यक्ष म्हणून होती. प्रत्येक मतदानकेंद्रावर
एक केंद्राध्यक्ष आणि त्याच्या हाताखाली तीन मतदान अधिकारी, केंद्राची व्यवस्था ठेवणे व सामानाची नेआण करण्या
साठी एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी व एक सुरक्षा कर्मचारी असा एकूण सहाजणांचा चमू असे, आणि आताही
त्यात फार फरक पडला असेलसे वाटत नाही, अर्थात आता कदाचित काही केंद्रावर सुरक्षा कर्मचाऱ्यांचीच संख्या आणखी
काही प्रमाणात वाढली असेल. या नेमणुका बहुधा वेतनश्रेणीवर आधारित असत. (असे असताना यावेळी सहकारी
बॅंकेतील अधिकाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नेमणुका कशा मिळाल्या हे आश्चर्यच)त्यामुळे आम्ही महाविद्यालयीन
प्राध्यापक केंद्राध्यक्ष, तर शाळेतील शिक्षक मतदान अधिकारी व निरनिराळ्या कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाई
म्हणून नियुक्त होत. पहिल्या प्रशिक्षणवर्गास केंद्राध्यक्ष आणि पहिला/ली मतदान अधिकारी यांनी हजर राहणे आवश्यक
असे. केंद्राध्यक्षाच्या अनुपस्थितीत त्याची कर्तव्ये पहिल्या मतदान अधिकाऱ्यास पार पाडावी लागतात.
त्यावेळी औरंगाबादेतील सादिया चित्रपटगृहात पहिला प्रशिक्षणवर्ग घेण्यात आला होता. त्या प्रशिक्षणवर्गात एकूण
मतदानाची प्रक्रिया आणि मतदान केंद्राध्यक्षानी पार पाडावयाची कर्तव्ये यांची माहिती देण्यात आली. त्यावेळी केंद्राध्यक्ष
आणि पहिला मतदान अधिकारी यांचा परिचय व्हावा अशी अपेक्षा असते अर्थात निवडणूक अधिकारी किंवा त्यांचे दुय्यम
अधिकारी यांच्यापैकी कोणीच हे काम करत नाही. केंद्राध्यक्ष आणि पहिला मतदान अधिकारी यांनी एकमेकाला शोधून
परस्परपरिचय करून घ्यावा अशी अपेक्षा असते आणि या कामात हयगय केली तर काय होऊ शकते याची कल्पना
असल्यामुळे अगदीच निर्ढावलेली व्यक्तीच प्रशिक्षणवर्गास गैरहजर राहू शकत असल्यामुळे या दोघांची गाठ न पडणे ही
अगदी "असंभव " या सदरात मोडणारीच घटना असते.
जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी या प्रशिक्षणवर्गास प्रथम संबोधित करत आणि नंतर त्यांच्या कार्यालयाशी
संबधित इतर कर्मचारीवर्ग प्रशिक्षणाची मोहीम सांभाळीत. त्यावेळी नुकत्याच जिल्हाधिकारीपदी नेमणूक झालेल्या एका
व्यक्तीने प्रथम संबोधन करीत असता, "हे काम व्यवस्थित पार पाडा नाहीतर तुमच्या गोपनीय अहवालावर परिणाम
होईल, तुम्हाला नोकरीवरूनसुद्धा काढून टाकण्यात येईल" अशी दमदाटीची भाषा वापरल्यावर आमच्या प्राध्यापकवर्गाला
जरा राग आला. त्यातील काही इतके ज्येष्ठ होते की त्या जिल्हाधिकाऱ्यापेक्षाही त्यांची वेतनश्रेणी जास्त होती.
त्यांनी उठून या भाषेचा निषेध केल्यावर त्या व्यक्तीने जरा नरमाईची भाषा सुरू केली.
जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला यथामति निवडणूक या विषयासंबंधी माहिती दिल्यावर
आमच्या काही शंका असल्यास विचारावयास सांगितले. त्यावर आमच्यापैकी एका प्राध्यापकाने इतक्या शंका विचारल्या
की नंतर त्यांना कोणत्याही केंद्रावर नियुक्त न करता राखीव केंद्राध्यक्ष म्हणूनच ठेवणे इष्ट असे जिल्हाधिकारी आणि
त्यांच्या चमूचे मत पडले.
हे चार प्रशिक्षणवर्ग आणि निवडणुकीचा कालावधी यात बराच काळ वाया जातो असे माझे निरीक्षण आहे कारण
निवडणुकीच्या दोन दिवस आधी त्यासाठी वापरावयाचे साहित्य घेण्यासाठी तहसील कार्यालय अथवा त्यांनी सांगितलेल्या
ठिकाणी केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी यांनी जमायचे असते. ते साहित्य नीट मोजून तपासून पोत्यात भरून सीलबंद
करून तेथेच ठेवायचे असते आणि त्यानंतर दुसऱ्या म्हणजे निवडणुकीच्या आधल्या दिवशी निवडणूक केंद्रावर जायचे
असते. निवडणूक केंद्र जर दुसऱ्या गावी असेल तर तेथे एक दिवस अगोदरच पोचावे लागते आणि मतदान केंद्र तयार
करावे लागते. म्हणजे आणखी एक दिवस घालवावयाचा. निवडणुकीचा दिवस आणि त्याचा दुसरा दिवसही असाच जातो
एकूण निवडणुकीच्या अगोदरचा एक महिना जवळ जवळ सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारीवर्ग निवडणूक एक्के
निवडणूक एवढाच कार्यक्रम पार पाडत असतो आणि त्यामुळे या सर्व कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झालेले असते.
निवडणूक साहित्य हा काय प्रकार आहे हे पुस्तिकेत दिलेल्या माहितीत दिलेले असले तरी ते ताब्यात घेणे म्हणजे
काय दिव्य हे त्याच वेळी कळते. कारण ज्या जागेवर हे साहित्य देण्याची सोय केलेली असते तेथे येण्यासाठी तहसील
कर्मचाऱ्यानी दिलेल्या वेळी पोचल्यावर तेथे एकादी जत्रा किंवा उरूस असावा अशी गर्दी जमलेली असते. जवळजवळ शंभर
दीडशे मतदानकेंद्राचे केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि सुरक्षीसाठी एक पोलिस असे चारशे
ते सहाशे शासकीय कर्मचारी, तेवढ्या मतदानकेंद्राचे साहित्य, ते संभाळणारे आणि त्याचे वाटप करणारे असे तहसील
कर्मचारी असा मोठा जमाव तेथे जमलेला असतो. एवढी मोठी बंद जागा क्वचितच आपल्याकडील शहरात उपलब्ध
असल्यामुळे तहसील कार्यालयापुढील मोकळ्या जागेत निवारा म्हणून मंडप टाकलेला असतो, कडक ऊन वर तापत
असते (कारण बहुतांश निवडणुका उन्हाळ्यातच होतात. ) आणि त्याखाली घाम पुसत केंद्राध्यक्ष आपल्या सहकाऱ्यां
समवेत साहित्य मिळण्याची वाट पाहत असतात.
काही जिल्हाधिकारी सामानाच्या वाटपाचे जरा पूर्वनियोजन करतात तेथे फारसा गोंधळ न होता साहित्याचे
वाटप होते. परंतु असे प्रसंग कमीच. साहित्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे मतदान पेट्या, मतदानपत्रिका, मतदाराच्या
याद्या, मतदाराच्या बोटाला लावण्याच्या पक्क्या शाईच्या बाटल्या, शिक्के, ते मारण्यासाठी पॅड या असतात कारण त्या
त्या त्या मतदानकेंद्राशीच संबंधित असतात. मतदान केंद्र उभारणीचे साहित्यही केंद्राध्यक्षालाच बरोबर घेऊन जावे
लागते. त्यात त्यासाठी लागणारे पुठ्ठे, निरनिराळ्या सूचनांचे फलक, याशिवाय निरनिराळ्या फॉर्म्सचे नमुने, याशिवाय
मतदान झाल्यावर न वापरलेल्या मतपत्रिका, भरलेले फॉर्म्स, अहवाल या सगळ्या गोष्टी सीलबंद पाकिटातून परत
करण्यासाठी वेगवेगळी पाकिटे अशा जवळ जवळ शंभर एक वस्तू यादीप्रमाणे तपासून घेण्याचे काम केंद्राध्यक्ष व
प्रथम मतदानअधिकारी यांना करावे लागते. आता मतदान यंत्रावर करण्याची सोय झाल्यामुळे यातील बऱ्याच वस्तू
कमी झाल्या असणार. पण या सगळ्या गोष्टी एका हप्त्यात न देता वेगवेगळ्या जागी देतात त्यामुळे त्या वस्तू जमा
करण्यातच बराच वेळ जातो आणि त्या आपल्याच केंद्राशी संबंधित आहेत का नाहीत आणि योग्य तेवढ्या संख्येत
आहेत की नाहीत हे तपासून घेण्यात आणि पुन्हा त्या पोत्यात भरून सीलबंद करून ठेवण्यात संपूर्ण दिवस खर्ची
पडतो आणि तहसील कर्मचाऱ्यांना दिवस कारणी लावण्याचे आणि आमचा दिवस पुरेपूर भरून घेतल्याचे समाधान
मिळते कारण त्यातील बऱ्याच जणांनी रोहयो मध्ये काम केलेले असते.
जवळच्या खेड्यातील मतदानकेंद्रावर नेमणूक असेल त्तर दोन दिवस अगोदरच निघावे लागते. त्यासाठी काहीवेळा
बसेसची किंवा त्या उपलब्ध नसल्यास ट्रकची योजना केलेली असते. आपले सामान, आपले प्रथम मतदान अधिकारी, चतुर्थ
श्रेणी कर्मचारी आणि सुरक्षेसाठी नेमलेला पोलिस यांसह त्या गावी निवडणुकीच्या दोन दिवस आधी संध्याकाळपर्यंत
आपल्याला सोडले आणि तेथे आलेल्या गावचे पाटील किंवा ग्रामपंचायत सदस्य यांच्या ताब्यात आपल्याला दिले की
तहसील कर्मचाऱ्यांची त्यादिवशीची जबाबदारी संपली. त्यानंतर आपल्याला मिळालेल्या सूचनानुसार पुढील एक दिवसात
ग्रामसदस्यांच्या मदतीने निवडणुकीची तयारी करण्याची जबाबदारी आता केंद्राध्यक्षाची.
बहुधा मतदानकेंद्र या खेड्यातील शाळेत असते. त्यामुळे प्रथम तेथील भिंतीवर लावलेल्या सर्व पुढाऱ्यांच्या तसबिरी
काढणे, भिंतीवर जर काही आक्षेपार्ह मजकूर असेल तर तो पुसून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी
लागते. त्या इमारतीपासून चारी दिशांना ठराविक अंतरापर्यंत कोणतेही उमेदवाराचे किंवा तशा चिन्हांचे फलक असले
तर तेही ग्रामसदस्यांना सांगून काढावे लागतात. आपल्याबरोबर दिलेले फलक योग्य ठिकाणी लावावे लागतात.
मतदानकेंद्राची तयारी महत्वाची असते. केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या बसण्याच्या जागा ठरवून त्याप्रमाणे
टेबलांची व खुर्च्यांची रचना करावी लागते. मतदान पेटी केंद्राध्यक्षापुढे दिसेल अशा टेबलावर ठेवता येईल अशी रचना
करावी लागते म्हणजे मतदार मतपत्रिका पेटीत न टाकता बरोबर घेऊन जाणार नाही याकडे लक्ष देता येते. शिक्का
गुप्तपणे मारता यावा यासाठी एका टेबलावर कार्डबोर्डच्या सहाय्याने आडोसा तयार करावा लागतो. खेड्यात इतकी टेबले
कधीकधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कधी टेबलाऐवजी मोठे ड्रम पालथे घालून त्यावर काम भागवावे लागले. त्यामागे
खिडकी नसेल याची काळजी घ्यावी लागते, नाहीतर आडोशामागील व्यक्ती आपली मतपत्रिका खिडकीतून बाहेरील व्यक्तीला
देण्याची शक्यता असते. त्या ठिकाणी पुरेसा प्रकाश पडेल हे पाहावे लागते. केंद्राबाहेर आत येण्यासाठी रांग लावता
येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी वेगळ्या मार्गाची व्यवस्था करावी लागते.
निवडणुकीचे काम व्यवस्थित चालले आहे की नाही हे पाहण्यासाठी निरनिराळ्या झोनल ऑफिसर्स ची नेमणूक असते.
आदल्या दिवशी केंद्राची उभारणी कशी झाली आहे आणि काही अडचणी आहेत का हे पहायला ते त्याना नेमून दिलेल्या
विभागातील सर्व मतदानकेंद्राना भेटी देतात आणि काही सामान कमी पडत असल्यास त्याची पूर्तता करतात.
या बाबतीत एकदा एका झोनल ऑफिसरला फारच मजेदार(की अवघड? ) प्रसंगास तोंड द्यावे लागले. त्यावेळी शंभर
मतपत्रिकांची पावतीपुस्तकासारखी पुस्तके असत. आदल्या दिवशी त्यावर मतदान केंद्राचे शिक्के मारून काही पुस्तिकातील मतपत्रिकांवर केंद्राध्यक्षाने सह्या करून ठेवल्या तर सकाळी मतदान सुरू करताना घाई होत नाही. एका केंद्राध्यक्षाने तसे करून सर्व पुस्तिका एकाच मतपेटीत ठेवल्या आणि पेटी बंद केली. या पेट्यांची अशी विशिष्ट रचना असते की तिला झाकणाला
एक गोल छिद्र असते त्यातून बोट घालून आतील बाजूने विशिष्ट पट्टी ओढल्यावर ती पेटी उघडता येत असे. त्या
केंद्राध्यक्षाने मतपत्रिका ठेवताना अगदी वरपर्यंत भरून नंतर पेटी बंद केल्यामुळे पेटी उघडण्यासाठी छिद्रातून बोट घाला
यला जागाच उरली नाही आंणि किल्ली घरात राहून लॅचचे दार बंद व्हावे अशी परिस्थिती निर्माण झाली. झोनल ऑफिसरला हे
कळल्यावर त्याने कपाळावर हात मारून घेतला, कारण मतपत्रिका पेटीत अडकल्यामुळे ती उघडून त्या बाहेर काढल्या
शिवाय दुसऱ्या दिवशी मतदान सुरू करणेच शक्य नव्हते. शेवटी त्या झोनल ऑफिसरने ती पेटी आणि तो केंद्राध्यक्ष
याना आपल्या जीपमध्ये घातले आणि रात्रीच्या वेळी बऱ्याच ठिकाणी फिरून शेवटी एका लोहाराचा पत्ता शोधला आणि
त्याला बरेच पैसे देण्याचे कबूल करून त्याच्याकडून ती पेटी चक्क फोडून घेऊन त्यातून मतपत्रिकांची सुटका केली.
दुसऱ्या एका केंद्राध्यक्षाचा किस्सा काही औरच! त्यावेळी मतपत्रिकांची पुस्तके नसत. सुट्या मतपत्रिका असत. प्रत्येक
मतदानकेंद्रात ६०० ते सातशे मतदार असत तेवढ्या मतपत्रिका दिलेल्या असत. मतपत्रिकांना एक पासून सहाशे वा सातशेपर्यंत
क्रमांक छापलेले असत. मतदान संपल्यावर मतपत्रिकांचा हिशेब द्यावा लागतो आणि त्यात किती मतपत्रिका उरल्या
एवढेच नमूद करून भागत नाही तर त्या कोणत्या क्रमांकाच्या आहेत हेही नमूद करावे लागते. मतपत्रिका मतदाराना
देताना अगदी एकपासून सुरवात करून ओळीने दिल्यास कोणत्या मतदाराला कोणत्या क्रमांकाची मतपत्रिका मिळाली हे
निवडणूक प्रतिनिधीना कळण्याची शक्यता टाळण्यासाठी थोड्या मतपत्रिका घेऊन त्या वरखाली पिसल्यासारखे करून
द्याव्यात अशा सूचना आम्हास देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आम्ही सुरवातीच्या काही मतपत्रिका पिसून दिल्या
आणि शेवटी मात्र तसे न केल्याने उरणाऱ्या मतपत्रिकांचे क्रमांक क्रमानेच होते त्यामुळे उरलेल्या मतपत्रिकांची संख्या
आणि त्यांचे क्रमांक यांचा हिशेब जमवून आम्ही आमच्या सर्व सामानासह आम्हास परत नेण्यासाठी येणाऱ्या वाहनाची
वाट पाहत बसलो पण बराच वेळ झाला तरी त्या वाहनाचा पत्ताच नव्हता.
एकाच मागावरील सर्व केंद्रांसाठी एकच वाहन असते आणि ते क्रमाने सर्व केंद्रावरील साहित्य आणि क्र्मचाऱ्यांना गोळा करतात. आमच्या अगोदरच्या केंद्रातील केंद्राध्यक्षाने उत्साहाच्या भरात सगळ्याच मतपत्रिका पिसून मतदारांना दिल्यामुळे उरलेल्या मतपत्रिकांचा हिशेब लावणे हे काम अवघडात अवघड सुडोकू सोडवण्याइतकेच अवघड झाले होते, त्यामुळे त्या केंद्रावर वाट पाहण्यातच झोनल ओफिसरचा दम निघाला शेवटी ते केंद्र तसेच सोडून त्यांच्याकडे पुन्हा परत येण्याचे आश्वासन देऊन तो आम्हाला नेण्यास आला होता. त्या केंद्रातील मतपत्रिकांचा हिशेब बहुधा रात्री बारापर्यंत चालू होता. अर्थातच ते केंद्राध्यक्ष व झोनल ऑफिसर यांनाच तेवढावेळ थांबावे लागले.
पहिल्याच वेळी मला एका खेड्यात केंद्राध्यक्ष म्हणून जावे लागले. त्या खेड्याचे नाव अजूनही आठवते ते होते
बुटे वडगाव. अर्थातच झोनल ऑफिसरने ट्रकमधून मला माझ्या सहकाऱ्यांसह आणि सामानासह त्या गावच्या हद्दीपर्यंत
नेऊन पाटलांच्या ताब्यात दिले आणि त्यांना आम्हाला सर्वप्रकारर्ची मदत करायला सांगून ते निघून गेले. सुदैवाने
त्यावेळी एकूणच भारतातील आणि त्यातूनही महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती आजच्याइतकी सुधारली
नव्हती त्यामुळे आपण एका अपरिचित वातावरणात आहोत यापलिकडे जाऊन आपल्यावर अतिरेकी हल्ला होईल. किंवा
केंद्रावर हल्ला करून मतपेट्या पळवण्याचा किंवा केंद्रच काबीज करून धाकदपटशाने सर्व मतपत्रिकांवर ठसे मारून मतपेटीत
टाकण्याचा प्रयत्न होईल वगैरे भीती मला नव्हती. त्यामुळे अगदी मोकळेपणाने मला माझे काम करता आले. पाटीलही
निमूटपणे आपल्या गावातील इतर पोरांना गोळा करून मला माझी कर्तव्ये पार पाडण्यात मदत करत होते.
पहिला मतदान अधिकारी तर माझ्याबरोबरच आला होता, आणि त्याचबरोबर पोलिसही. दुसरे दोन मतदान अधिकारी
आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्या गावच्या शाळेतच काम करत होते आणि तेही तेथे गेल्यावर आमच्या पथकात सामील
झाले. पाटलांनी आम्हा बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांची त्यांच्या कुवतीनुसार चांगल्यातचांगली बडदास्त ठेवण्याचा प्रयत्न
केला. मतदान केंद्र तयार करून रात्री आम्ही दुसऱ्या दिचशी करावयाच्या कामाची उजळणी करत व त्यानंतर इतर गप्पा
मारत बसलो. मध्येच झोनल ऑफिसर येऊन केंद्राची उभारणी व एकूण तयारी पाहून समाधान व्यक्त करून गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच उमेदवारांचे प्रतिनिधी आले व त्यांच्यासमोरच सह्या करून मतपेटी बंद करून मतदानाला
सुरवात केली. येथे टेबले पुरेशी नसल्यामुळे मतपत्रिकेवर शिक्के मारण्यासाठी केलेला आडोसा लोखंडी ड्रमवर कार्डबोर्डने
तयार केला होता. संध्याकाळी पाच वाजता मतदान थांबवले आणि पुढील मतपेट्या, कागदपत्र सीलबंद करणे इ. कामे
पुरी केली आणि आम्हाला नेण्यास येणाऱ्या वाहनाची वाट पाहत बसलो तेवढ्यात पहिला मतदान अधिकारी माझ्या
कानात कुजबुजला, "साहेब, सगळे सामान आवरताना हे सापडले बघा. "पाहतो तो त्याच्या हातात एक फुली मारलेली
मतपत्रिका. बहुधा कोणत्यातरी मतदाराला ती पेटीत टाकण्या ऐवजी ड्रममध्येच टाकायची असे वाटले असावे. हे अगोदरच
झाले असते तर कोणत्या तरी एका मतपेटीत ती टाकता आली असती. पण आता सगळ्याच गोष्टींना सील लागले होते.
त्या मतदान अधिकाऱ्याकडून ती मतपत्रिका घेऊन तिचे तुकडे केले आणि ते जाळून टाकायला सांगितले आणि या
गोष्टीची वाच्यता कोठेही करू नकोस अशी त्याला सांगितले. आता मतपत्रिकांचा हिशेब जमणार नाही, याची मला कल्पना
होती. आणि ती माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आपल्याला जिल्हाप्रमुखाच्या
कार्यालयात बोलावणे येते की काय अशी भीती मनात वाटत होती, पण त्यावेळी जिंकून येणारा उमेदवार काही हजार
मतांच्या फरकाने जिंकून येत असल्यामुळे एका मताच्या हिशेबाची फारशी किंमत नव्हती आणि त्यामुळे मी त्या अनपेक्षित संकटातून बचावलो.
सोलापुरात तर आम्हाला एकाच निवडणुकीसाठी दोन ठिकाणी केंद्राध्यक्षाचे काम करावे लागले. कारण सोलापूर ग्रामीण
आणि सोलापूर शहर मतदारसंघ दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी मतदान होते आणि दोन्ही ठिकाणी वेगवेगळे
पाठवण्याइतके शासकीय कर्मचारी उपलब्ध नव्हते त्यामुळे प्रथम सोलापूर शहरातील मतदान पार पाडून मग आम्हाला
बार्शीला नेऊन तेथून आमची एका खेड्यात रवानगी करण्यात आली. बार्शीला आम्हाला सामानाचे वाटप करण्याचे वेळी
हजर असणारे जिल्हाधिकारी सेवानिवृत्तीला आले असल्यामुळे इतक्या साबधानतेने काम करत होते की त्यांच्याकडून
साहित्य मिळवणे म्हणजे अगदी माशाने गिळलेले माणिकच मिळवण्यातला प्रकार होत. त्यावेळी मीही बराच ज्येष्ठ
शासकीय अधिकरी झालो असल्यामुळे त्या जिल्हाधिकाऱ्याला जरा दमात घेण्याचा प्रयत्न केला अर्थातच त्याचा काही
उपयोग जरी झाला नाही तरी नंतर मला त्याने उपद्रवही काही केला नाही हे माझे नशीब. मात्र निवडणूक पार पाडून
सर्व साहित्य परत करायला आम्ही आलो तेव्हां नुकतीच नियुक्ती झालेली एक तरुण जिल्हाधिकारी त्या कामाची प्रमुख होती
तिने मात्र फारच तडफेने कामाचे नियोजन करून सर्व केंद्राध्यक्षांकडून अगदी थोड्याच वेळात साहित्य परत घेऊन
सर्वांना घरी जाण्यास उशीर होईल म्हणून बार्शीतीलच हॉटेलमध्ये जेवण घेण्यासाठी कुपने देऊन अगदी वेळेत आम्हाला
सोलापुरात पोचवण्याची काळजी घेतली. ती १९७७ ची निवडणूक होती आणि लगेचच दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता.
ती निवडणूक नंतर भारतीय इतिहास घडवणारीच ठरली.
हळू हळू हे काम इतके सोपे न राहता बरेच कठीण बनत चालले आहे आणि त्याचमुळे प्रशिक्षणर्गातच हृदयविकाराच्या झटक्याने शिक्षकाचे निधन अशा बातम्या ऐकू येऊ लागल्यात. त्याचमुळे सेवानिवृत्त होताना सगळ्यात जास्त आनंद मला कशाचा झाला असेल तर आता निवडणुकीचे काम करावे लागणार नाही याचा !