मराठी-देवनागरी लिपी-फाँटसबद्दल चुकीची माहिती ?

     आजच्या (०२-०५-०९) लोकसत्ता मध्ये संगणकीय मराठीचे पाऊल पडते पुढे..‘एसगांगल’ फॉन्ट ही बातमी वाचली व काही प्रश्न पडले. मी संगणक-क्षेत्रातील नसल्यामुळे मनोगतावरील संगणक-तज्ज्ञ शंकानिरसन करतील ह्या आशेने हा चर्चा-विषय मांडीत आहे.

     बातमीदार लिहितो, "शुभानन गांगल यांनी सांगितले की, आतापर्यंत वापरले जाणारे सर्व फॉन्ट्स अ‍ॅक्टिव्हेट होण्यासाठी एक ‘एक्झिक्युटेबल फाईल’ ‘रन’ करावी लागते. ‘युनिकोड’ही त्याला अपवाद नाही. केवळ फॉन्ट इन्स्टॉल करून तो वापरता येऊ शकत नाही." मी दहा वर्षांहून अधिक काळ संगणक वापरत आहे व ह्या दरम्यान अनेक मराठी फाँट त्यावर स्थापित केलेले आहेत. त्यासठी एकदाही मला एक्झिक्युटेबल फाईल 'रन' करावी लागली नही. 'शिवाजी', 'शुशा' ते अगदी 'एरियल युनिकोड MS' - सारे फाँट संगणकाच्या फाँट फोल्डरमध्ये टाकले की चालतात हाच अनुभव आहे. बातमीत पुढे म्हटले आहे, "हा फॉन्ट शब्दातील प्रत्येक अक्षर वेगळे करून दाखवतो." देवनागरी लिपीत टंकन करू देणारा कोणताही फॉन्ट हे करतोच असा माझा समज होता. हे न करू शकणारा एखादा मराठी फॉंट आहे का ?
     फॉंट व संगणकाच्या तांत्रिक बाबींनंतर मराठी भाषेकडे वळत वार्ताहर लिहितो, "...गांगल सांगतात की, मराठीने देवनागरी ही लिपी आचरणात आणण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे ऱ्हस्व, दीर्घ अशी वेगवेगळी चिन्हे वापरण्याचीही गरज नाही. सध्या वापरात असलेली मराठी लिपी १९५० सालानंतर अस्तित्त्वात आली आहे. गेली ५९ वर्षे तीच लिपी वापरत असल्याने तीच योग्य, असा सर्वाचा समज झाला आहे. प्रत्यक्षात १९५० पूर्वी ऱ्हस्व आणि दीर्घ अशी दोन चिन्हे अस्तित्वात नव्हती." साधारणत: एकोणिसाव्या शतकापर्यंत मराठी भाषा मोडी लिपीत(ही) लिहिली जात असली तरी विसाव्या शतकापासून ती देवनागरीतच लिहिली जाऊ लागली. जर देवनागरी लिपी आचरणात आणण्याची आवश्यकता नाही असे गांगलांना वाटते तर काय पुन्हा मोडी वापरावी असे त्यांना सुचवायचे आहे का? "मराठी लिपी" ह्या शब्दप्रयोगातून त्यांना नक्की काय म्हणायचे आहे ते समजले नाही. मराठी भाषा आहे, लिपी नाही. ज्या देवनागरी लिपीत मराठी लिहिली जाते त्यात "प्रत्यक्षात १९५० पूर्वी ऱ्हस्व आणि दीर्घ अशी दोन चिन्हे अस्तित्वात नव्हती" हे विधान तर अजिबात पटण्यासारखं नाही. माझा जन्म १९५०च्यानंतर झाला असला तरी त्यापूर्वी लिहिलेली व छापलेली पुस्तकं मी वाचलेली आहेत व त्यांत हृस्व व दीर्घ चिन्हं याची देहि, याची डोळा पाहिली आहेत.
    वार्ताहराने ".. ‌सांगितले की", ".. ‌सांगतात की" च्या पळवाटा ठेवून स्वतःची सोडवणूक जरी केली असली तरी लोकसत्तासारख्या दैनिकाने असली विवादास्पद, बेजबाबदार विधाने विनाचौकशी छापणे कितपत योग्य आहे? आजही हजारो सामान्य वाचक वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या ( विशेषतः तांत्रिक स्वरूपाच्या) विनासंशय विश्वासार्ह व खऱ्या मानतात ह्याचे भान त्यांनी ठेवायला हवे.
   प्रत्येकाला आपल्या मालाची जाहिरात करण्याचा हक्क असला तरी एकतर त्या जाहिरातीने ग्राहकांना चुकीची वा दिशाभूल करणारी माहिती दिली जाऊ नये, व दुसरे म्हणजे दैनिकांनीही जाहिरात ही जाहिरात म्हणून छापावी, बातमी म्हणून नव्हे अशी अपेक्षा करणे गैर आहे काय?