घर राहावे बांधून ! १

      लहानपणापासून ते थेट लग्न होईपर्यंत भाड्याच्याच घरात राहिल्यामुळे आपण सदैव भाड्याच्याच घरात रहायचे हीच संकल्पना माझ्या मनात पक्की रुजली होती. मूर्ख लोक घरे बांधतात आणि शहाणी माणसे त्यात रहातात,अशी एक म्हणही आहे आणि मी स्वत:ला शहाणाही समजत असल्याने या विधानावर माझा ठाम विश्वास होता ( पण तो आपला मूर्खपणाच होता हे बऱ्याच उशीरा लक्षात आले ) तसाच तो माझ्या वडिलांचाही असावा. कारण आमच्या पाच हजार वस्तीच्या गावात त्यांना निरनिराळ्या कारणाने सात आठ वेळा तरी भाड्याचे घरे बदलावी लागली होती तरी स्वत:चे घर बांधायचे त्यांनी काही मनावर घेतले नव्हते.आणि त्यानी मनावर घेतले असते तरी त्यांच्या अर्थिक परिस्थितीत ते शक्य झाले नसते. 
         आमच्या गावात स्वत:च्या घरात रहाणाऱ्या लोकांची संख्या अगदी कमी होती अशातला भाग नव्हता. ब्राह्मण आळीत माझे जे मित्र होते ते त्यांच्याच मूळपुरुषांनी बांधलेल्या घरात रहात होते,गावालगत त्यांची शेतीवाडीही होती. तर शेतकरी मित्र त्यांच्या शेतावरील खोप्यात रहात होते.आम्ही मात्र गावात उपरे कारण आमचे मूळ गाव तेथून दहा मैलावर असून आणि तिथे आमची शेती आणि वाडा दोन्हीही असल्याचे फक्त वडिलांना माहीत होते. त्या दोन्ही गोष्टी कधीतरी गावी नेऊन आम्हाला त्यानी दाखवल्या आणि नंतर तेही आपले घर आणि शेती होती हे जणु पूर्ण विसरूनच गेले. या शेताचा खंड म्हणून आमचे कूळ न चुकता मोठ्ठी रक्कम म्हणजे एका बंद्या रुपयाची मनीऑर्डर अगदी न चुकता पाठवायचा आणि वडील तोही न स्वीकरता त्यालाच परत पाठवत एवढे मलाही आठवते.
    अशा पार्श्वभूमीवर मी नंतरही घर बांधायचे हे आपले काम नाही अशा समजुतीतच वावरत होतो. मी औरंगाबादला नोकरी करायला लागलो तेव्हां आपण तेथे स्थायिक व्हावे असा विचारही डोक्यात येणे शक्य नव्हते.जाऊ तेथे घर बांधून राहू इतका लांब पल्ल्याचा सुविचार त्यावेळी सुचणे आणि सुचण्यापेक्षा परवडणे शक्य नव्हते. तेवढ्यात अगदी कमीतकमी भाड्यात उपलब्ध होणाऱ्या शासकीय निवासस्थानात मला घर मिळाले आणि घर बांधण्याचा थोडाफार विचार मनात येण्याची शक्यताही मावळली.
    तरी पण त्याही काळात काही दूरदर्शी मित्र मला मिळाले होते आणि स्वत:चे घर बांधणे कसे शहाणपणाचे आहे याविषयी काही सुविचार मौक्तिक आम्हाला बरेचदा ऐकवायचे. आणि आता घर बांधायचे नसेल तर बांधू नका पण निदान प्लॉट तरी घेऊन ठेव असेही सांगायचे.  पण प्लॉट कितीही कमी किंमतीत मिळाला तरी ती किंमत आणि माझे अर्थिक बळ यात नेहमीच पार पाडता न येणारे अंतर असे.
           पण एकदा मात्र या मित्रांपैकी एकाने आम्हाला त्याच्या जाळ्यात ओढण्याचा जणु चंगच बांधला.या माणसाला लोकांना एकत्र जमवून सहकारी संस्था स्थापन करायचा नादच होता म्हटले तरी चालेल आणि त्यासाठी आमच्यासारख्या अशा सत्कृत्याचा अगदी पुरेपूर तिटकारा असलेली मंडळीच त्याला भेटायची.त्यामुळे जणु काय त्याच्यावरच उपकार करत आहोत अशा थाटातच आम्ही त्याचे बोलणे ऐकून  घ्यायचो  आणि तितक्याच बेपर्वाईने ते कानाबाहेर टाकत असू.
    अशीच एक घर बांधणी सहकारी संस्था स्थापन करायचे त्याने मनावर घेतले.त्यावेळी औरंगाबादेतीलच एक जमीनदार व्यक्तीला आपल्या मालकीच्या जमीनीत प्लॉट पाडून विकायचे होते. ती जमीन सालारजंग या निजामाच्या वंशजाची होती.औरंगाबाद हे राज्यपुनर्रचनेपूर्वी निजामशाहीत होते त्यामुळे त्यावेळी अशा बऱ्याच जागा या सालारजंगच्या वारसांच्या नावावर होत्या आणि आता त्या आमच्या जमीनमालकासारख्या औरंगाबादस्थित माणसांनी त्यांच्याकडून विकत किंवा बक्षीस म्हणून मिळवल्या होत्या. त्यावेळी त्या जागेचे मालक असणारे गृहस्थ आणि त्यांचे दोन भाऊही  सार्वजनिक बांधकामखात्यात कार्यकारी अभियंता होते.या तीन भावांच्या नावावर ही मालमत्ता होती आणि तिला बागशेरजंग असे नामाभिधान होते.
       त्यातील काही प्लॉट घेऊन संस्था स्थापन करावी हा आमच्या या मित्राचा विचार.त्यावेळी अशी संस्था स्थापन करायला कमीतकमी अकरा सदस्य लागत.तेवढेही त्या बिचाऱ्याला मिळत नव्हते आणि त्यावेळी ते प्लॉटदेखील अगदी फुकटातच मिळत असल्यासारखे म्हणजे पन्नास पैशापेक्षाही कमी दरात एक चौरस फूट या दराने कमीतकमी ३६०० चौरस फूटाचा प्लॉट फक्त १५०० रुपयात आम्हाला त्याच्या मध्यस्थीने आम्हाला मिळणार होता.पण त्यावेळी मी आणि सगळेच आमचे मित्र इतके श्रीमंत होतो की तेवढेसुद्धा पैसे आमच्या खिशात तर नव्हतेच पण आमच्याकडे पाहून कोणी आम्हाला कर्जाऊ देईल अशीही शक्यता नव्हती.(त्यामुळे यापूर्वीही फक्त पाचशे रुपायात अख्खा प्लॉट देण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या एका गृहस्थालाही मी निराश केले होते. यावरही  आमच्यासारख्या गर्भश्रीमंत लोकांसाठी त्यानी महिन्याला शंभर रुपये भरून १५ महिन्यात प्लॉटची किंमत भरावी असा त्याने तोडगा काढला,आता यावर आमचा नाइलाज झाला आणि त्याच्या आग्रहाला मी आणि माझ्यासारखे काही जण बळी पडलो आणि औरंगाबादमध्ये प्रवेश केल्यानंतर पाच वर्षांनी मी तेथील एका प्लॉटचा मालक झालो.आमच्या या गृहनिर्माण संस्थेला आम्ही दिलेल्या चिंतामणी या नावातून  आमच्या गणेशभक्तीपेक्षा आपण घर कसे बांधणार ही आमच्या मनी असलेली चिंताच अधिक ध्वनित होत होती. 
       अशा बाबतीत माझा उत्साह इतका अवर्णनीय की आपण घेतलेला प्लॉट कोठे आहे याचीसुद्धा कधी मी चौकशी करण्याच्या फंदात पडलो नाही,कागदावरील नकाशातच तो मी   पाहिला.त्यात आणखी एक मेख अशी होती की  चिंतामणी सह.गृह निर्माणसंस्था म. च्या नावावर सर्व प्लॉट्स होते आणि आम्ही दहाबाराजण त्या संस्थेचे सदस्य होतो म्हणजे आपला प्लॉट कुठला हे कोणालाच माहीत नव्हते.विनोबांच्या " सब भूमी गोपालकी ’ या उक्तीप्रमाणे सगळे प्लॉट्स आमच्या सगळ्यांचेच होते. पण आम्ही सगळेच मराठवाड्या बाहेरूनच औरंगाबादला आलेले असल्यामुळे  इथे कुणा लेकाला घर बांधून औरंगाबादेत रहायचेय अशीच सगळ्यांची धारणा होती..त्यात जे काही पुण्याचे होते त्यांचे तर पुण्यात भाड्याचे का होईना घर होते आणि पुण्यात भाड्याच घर म्हणजे आपलेच घर त्यात रहाण्यासाठी भाडे म्हणून जे पैसे द्यावे लागत होते त्यापेक्षा ते सोडताना मिळणाऱ्या पैशाचाच विचार प्रामुख्याने त्यांच्या मनात असेल.थोडक्यात अशा लोकांची मोट आमच्या मित्राने बांधल्यामुळे घर बांधण्याचा विचार मात्र कित्येक वर्षे  कुणाच्याच डोक्यात आला नव्हता.
       १९६९ मध्ये संस्था स्थापन करून आम्ही जागेचे मालक झालो तरी १९७४ पर्यंत दरवर्षी संस्थेची सर्वसाधारण सभा घेण्यापलीकडे बांधकामाच्या दृष्टीने संस्थेची प्रगती शून्यच होती कारण संस्थापक मित्रासह आम्ही बरेच जण शासकीय सदनिकांच्या खुराड्यात रहात होतो आणि आता त्यातच आम्हाला बरे वाटू लागले होते शिवाय त्या खुराड्याचे भाडे त्याच्या बांधकामकाळातील किंमतीस अनुसरून जास्तीत जास्त ४१ रु.दरमहा तर कमीतकमी ज्यांचे दरमहा पगार मूळ वेतन २०० रु.होते अशांसाठी त्याच्या दहा टक्के म्हणजे केवळ वीस रुपयेच होते अर्थात आमच्यापैकी प्रत्येकाला जास्तीत जास्त द्यावे लागले तरी दरमहा ४१ रु.च द्यावे लागत होते.शिवाय इसापच्या गाढवाला जसा त्याचा मालक आपल्या सुंदर मुलीशी आपले लग्न करून देईल अशी आशा वाटत होती तसे हे गाळे महाराष्ट्र गृह निर्माण मंडळाच्या गाळ्यासारखे सरकार कधीतरी आपल्या नावावर करून देईल अशीही आशा काही जणाना वाटत होती त्यामुळे संस्थेची नोंदणी,वार्षिक सभा,त्याचे इतिवृत्त,वर्षातून एकदा संस्थेचे ऑडिट अशा तांत्रिक बाबीच काय ते आम्ही पार पाडत होतो. 
        आमच्या जमिनीच्या मालकाने आम्हाला प्लॉट पाडूनच जमीन विकली होती पण त्यात एका बाजूच्या जमिनीच्या तुकड्यावर    तीन प्लॉट्स आणि थोडी मोकळी जागा होती आणि खरेदीखत करताना ती आम्हालाच विकल्याचे दाखवले होते.खरेदीखत संस्थेच्या नावावर असून आम्ही सर्वजण सभासद आहोत असे दाखवण्यात आले होते. 
        एका सर्वसाधारण सभेत प्लॉटची वाटणी असा विषय होता आणि त्या सभेला अर्थातच बहुतांश सभासद हजर होते एकूण सतरा प्लॉट्स आणि मोकळ्या जागेत तीन प्लॉट्स व त्याशिवाय थोडी मोकळी जागा होती.या प्लॉट्समध्ये काही जरा मोठे म्हणजे ७२ फूट लांब व ५५ फूट रुंद तर बाकीचे ७२ बाय ५० या क्षेत्रफळाचे होते.मोकळ्या जागेतील तीन प्लॉट्स चे मोजमाप जरा विचित्र असे होते पण सध्या सभासद पंधराच असल्याने त्यांचा विचार वाटणी करताना करायचा नाही असे ठरले.माझ्या मित्राने संस्था स्थापन करताना जे अकरा सभासद घेतले होते त्यातील आता पाच सहाच उरले होते त्यातील एक ज्येष्ठ सभासद सध्या संस्थेचे अध्यक्ष होते,त्यांच्या मते ते मोठे प्लॉट्स या मूळ सभासदांनाच द्यावेत आणि आमच्यासारख्या नंतर सभासद झालेल्यांना उरलेल्या प्लॉट्सचे वाटप करावे.आम्हाला मोठ्या प्लॉटचा मोह होता म्हणून नव्हे तर मूळ सभासदांपेक्षा थोडी जास्तच रक्कम आम्ही भरलेली असून आम्हाला हा कमीपणा घेण्यास सांगण्यात आल्याचा राग येऊन आम्ही त्याला जोरदार निषेध नोंदवला.अर्थातच अध्यक्षांचे त्यापुढे काही चालले नाही आणि सर्व सभासदांच्या चिठ्ठ्या टाकून प्लॉट्सचे वाटप करण्यात आले.
        अशा प्रकारे झालेल्या वाटपात  माझ्या वाटणीस छोटा प्लॉट क्र.१३६ आला तर अध्यक्ष आणि संस्थापक मित्र या दोघांच्याही वाटणीला मोठे प्लॉट्सच आले. म्हणजे वाटणीची पद्धत त्यांच्या मनासारखी नसली तरी परिणाम त्यांना अनुकूलच झाला होता अर्थात त्याबद्दल आम्हाला मुळीच वाईट वाटले नाही,पण आमच्या संस्थापक मित्राने (याचे नाव अरविंद)  मात्र त्याच्या वाटणीस आलेला मोठा प्लॉट फारच उंचसखल आहे म्हणून तो बदलून उरलेल्या पाच छोट्या प्लॉटमधून एक आपल्याला मिळावा अशी त्याने मागणी केली आणि त्याला विरोध करण्याचे आम्हाला तरी काही कारण नव्हते.आणि अरविंदने मोकळ्या जागेतील तीनपैकी एक प्लॉट घेतला पण अशा प्रकारे ज्या मोठ्या प्लॉटच्या वाटणीसाठी संस्थेच्या सभासदात काही काळ दुफळी पडली होती त्यापैकी एक शेवटी रिकामाच राहिला .
        १९७४ मध्ये आमचे प्लॉट वाटप झाले आणि सर्व सभासदानी एकदा त्या जागेकडे जाऊन आपाआपल्या प्लॉटकडे डोळे भरून पाहिले आणि नंतर आम्ही ती गोष्ट पार विसरूनच गेलो म्हणाना ! मधल्या काळात त्या सदस्यांपैकी ज्याना खरोखरच औरंगाबादमध्ये स्थायिक व्हायचे होते असे काही डॉक्टर होते त्यानी इतरत्र जागा घेऊन घरही बांधून टाकले आणि ते आणि असेच काही सदस्य यांनी आपले प्लॉट्स विकूनही टाकले आणि त्यांच्या जागी आम्हालाही माहीत नसलेले दुसरे काही सदस्य आले. अर्थात त्याचे सोयरसुतक कोणालाच नव्हते.
 १९७६ मध्ये आणीबाणीमुळे मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आणि अगदी माझ्या संस्थापक मित्रासह आमचे सर्व सदस्य निरनिराळ्या ठिकाणी पांगले माझी बदलीही सोलापूरला झाली.त्यानंतर  परत कधीकाळी बदली झालीच तर ती औरंगाबादलाच होईल याविषयी मला काहीच शाश्वती वाटत नव्हती  आणि औरंगाबादमध्ये केवळ हा प्लॉट ही  एक स्थावर मालमत्ता आहे म्हणून त्यासाठी औरंगाबादला परत येण्यातही मला फारसे स्वारस्य नव्हते. त्यामुळे काही अडचण येऊन पशाची फारच जरुरी भासली असती तर  मी आपला प्लॉट विकूनही मोकळा झालो असतो यात शंका नाही.
          पण दैवगती मोठी विचित्र असते कारण  निरनिराळ्या ठिकाणी पांगलेले आम्ही सर्व चिंतामणी सदस्य चारच वर्षांनी पुन्हा औरंगाबादलाच परत आलो.इतकेच काय पण यापूर्वी आम्ही ज्या सदस्याना पाहिलेही नव्हते असेही काही सदस्य आता औरंगाबादलाच बदलून आले होते. आता आम्ही सगळेच भाड्याच्या जागेत राहू लागलो होतो आणि त्यामुळे स्वतःच्या घरात राहावे अशी इच्छा बऱ्याचजणांच्यां मनात मूळ धरू लागली होती.