घर राहावे बांधून ---५

आमच्या प्लॉट्सवरून रस्ता जात आहे ही गोष्ट आमच्या घर बांधण्याच्या स्वप्नावर अगदी रोड रोलर फिरवून गेली.माझी अवस्था तर " आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास " अशी झाली.मला माघार घ्यायला एवढे कारण पुरेसे होते 

 प्रत्यक्ष रस्ता समोर दिसत असताना  न.र.का.(नगर रचना कार्यालया )मध्ये मात्र तो आमच्या प्लॉट्सवरून जाताना का दिसत होता याविषयी चौकशी करायला गेल्यावर हा आमच्या मूळ जमीनमालकाचा चालूपणा होता हे लक्षात आले.प्रथम श.र.का.ने रस्त्याची आखणी नकाशावर केल्यावर प्लॉट्स पाडताना जमीन मालकाला तो रस्ता आमच्या प्लॉट्सवरून जात होता हे लक्षात आले होते आणि त्यामुळे जेथे त्यानी पाठीस पाठ लावून दोन दोन प्लॉट्सची आखणी केली होती तेथे आता एकएक प्लॉटच पाडता येणे शक्य होते अशाप्रकारे त्या संपूर्ण आखणीत ३२ प्लॉट्सैवजी १६च प्लॉट्स आणि तेही कमी आकाराचे त्याना काढता येत होते,त्यामुळे त्यावेळच्या बाजारभावात त्यांना जवळजवळ पन्नासहजार रुपयांचा तोटा झाला असता त्याऐवजी काहीशे रु. शहर मोजणी खात्यातील (सिटी सर्व्हे ) लोकांना  चारून त्यांनी त्यांच्या जागेचा नकाशा करताना आता दर्शवलेल्या जागी रस्ता दाखवून त्यांच्या सोयीने प्लॉट्स पाडले.त्या खात्यास पैसे चारले असल्याने आम्हाला मिळकत नोंदणी पत्र (पी.आर.कार्ड) त्याच खात्याकडून सहज मिळाले पण आता बांधकाम परवान्यासाठी न.र.का.(नगर रचना कार्यालय -टाउन प्लॅनिंग)कडून हरकत घेण्यात आली होती.
     आमच्या दुर्दैवाने जमीनमालकाने आम्हाला पी.आर.कार्डसुद्धा मिळवून दिले होते त्यामुळे त्याच्याविरुद्ध आम्हाला काही कारवाई करता येत नव्हती आणि त्यात कालापव्यय होऊन आमचे घर बांधायचे बाजूलाच राहिले असते.सुदैवाने आमच्या अगोदरच काही लोकांनी त्याच पद्धतीने पडलेल्या प्लॉट्सवर बांधकामही केले होते.आमचे मित्र बाबरीकरही त्यात होते.याचाच अर्थ यातून काहीतरी मार्ग निघालेला होता.अर्थातच तो मार्ग नेहमीप्रमाणेच" मृदंगो मुखलेपेन करोति मधुरध्वनिम‍ " याच पठडीतला होता आणि शेवटी आम्ही न. र. का.ला पटवून दिले की रस्ता अस्तित्वात आहे आणि मूळ रस्ता योग्य पद्धतीने वळवल्यास आमचे प्लॉट्स रस्त्यावर येत नाहीत.या सुधारणेस न.र.का.ला मान्यता द्यावी लागली कारण यापूर्वी बांधलेल्या घरांच्या बाबतीत त्यानी हीच हरकत का घेतली नाही हा प्रश्न उपस्थित झाला असता,त्यामुळे त्यांच्यावरील हरकतीचे ज्या पद्धतीने निवारण झाले होते त्याच पद्धतीने आमच्यावरील हरकतही मागे घेण्यात आली(त्यासाठी दक्षिणा आदान प्रदानात मी जातीने भाग घेतला नसल्यामुळे त्यासाठीचा आकडा मला कळला नाही) फक्त पुढे मागे रस्ता प्रत्यक्ष तयार करताना आवश्यक भासले तर पुढील पंधरा फूट जागा रस्त्याच्या बाजूच्या प्लॉटधारकानी देण्याची तयारी ठेवली पाहिजे अशी अट घालण्यात आली आणि घर बांधताना पंधरा फूट जास्त जागा पुढील भागात सोडून घराचा नकाशा पुन्हा महापालिकेकडे बांधकाम खात्याकडे पाठवावा असे ठरले. माझा प्लॉट रस्ताच्या मागील बाजूस येत असल्याने ती अट मला लागू नव्हती मात्र माझ्या मित्राचा प्लॉत त्या प्रकाराचा होता व त्याने " अर्धम् त्यजति पंडित:" या उक्तीला स्मरून ते मान्य करून नकाशा पुन्हा सादर केला आणि एका सुप्रभाती आमचे दोघांचेही घराचे आराखडे मंजूर झाले. अशा प्रकारे औरंगाबाद महापालिका झाल्यावर घराचा आराखडा मंजूर होणारा पहिला भाग्यवंत मी ठरलो तर माझा मित्र दुसरा.
       १९८२ च्या दसऱ्याला आम्ही उभयतांनी आपापल्या जागेवर पहिली कुदळ मारली.त्या दिवशी आमच्या जागेचे भूमिपूजन केले आणि आमच्याबरोबर आलेल्या मित्रमंडळींना पेढे देऊन आनंदी अंत:करणाने आम्ही घरी परतलो. त्यावेळी औरंगाबादला आम्ही दोन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत रहात होतो.तर माझा मित्र एक शयनखोली असलेल्या शासकीय सदनिकेत.
        .अगोदरच तुटीचे आमचे अंदाजपत्रक वास्तुरचनाकाराला त्यात गुंतवून आणखी तुटीचे बनवण्याची आमची इच्छा नव्हती. कारण त्याला त्यासाठी काही टक्के ज्याचाच आमच्याकडे तुटवडा होता देणे आवश्यक होते. त्यामुळे घर बांधण्यासाठी सुरवात करायला बांधकाम साहित्य आणि त्याचा उपयोग करून घर बांधणारा मेस्त्री या दोनच गोष्टींची जरुरी होती त्यासाठी आमच्या अगोदर घर बांधण्याचा उपक्रम सुरू करणारे आमचे काही मित्र होते त्यांच्या सल्ल्याने  आम्ही एक मिस्त्री गाठला.त्याचे नाव होते एकनाथ. मी आणि खोले दोघांचे काम करण्याचे त्याने कबूल केले.वाळू सीमेंट ,डब्बर या तीन बांधकामसाहित्याच्या पुरवठ्याची जबाबदारी खोलेने घेतली.त्याचे महापालिकेत बऱ्याच ओळखी असल्याने पाण्याची तात्पुरती जोडणीही त्याने मिळवली.त्याच्याच प्लॉटवर त्याने प्रथम पाण्याची टाकी बांधली आणि त्यात पडणाऱ्या पाण्यावर दोघा मित्रांच्या घराचे बांधकाम करायचे ठरले.
       एक चांगला दिवस पाहून आम्ही काम सुरू करायचे ठरवले.त्यादिवशीही आमचे बरेच मित्र आणि आम्ही आता ज्या घरात रहात होतो त्याचे मालक,(हेही कार्यकारी अभियंता म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते.)ही सगळी मंडळी, आमची कुटुंबीय मंडळी, आम्ही दोघे मित्र आणि मेस्त्री एकनाथ या सर्वांनी प्लॉटवर घराच्या आराखड्याची आखणी (मार्क आउट त्याला मिस्त्री मारकूट असे म्हणायचा) करायला जमलो.त्यासाठी काथ्या सुतळी चुन्याची फक्की वगैरे सामान आम्ही घेऊन गेलो होतो.खरे तर वास्तुकाराने या मार्काउट्साठी उपस्थित रहाणे अपेक्षित असते पण आम्हाला त्याचा पत्ताच नव्हता आणि आम्ही त्याला त्याची कल्पना न दिल्याने त्यालाही आमच्या या प्रगतीचा पत्ता नव्हता.या सगळ्या मंडळींच्या सहाय्याने आम्ही दोन्ही प्लॉटवर एकनाथच्या भाषेत मारकूट केली. दुसऱ्या दिवशी त्याची माणसे आणून एकनाथने आखणीप्रमाणे भिंतींच्या खालील पायात चर खणायला सुरवात केली दोन तीन दिवसात आमच्या दोघांच्या प्लॉटवर खड्ड्यांची रांगोळी दिसू लागली.या सगळ्या कामासाठी आम्हाला काहीच साहित्य आणावे लागले नव्हते.आता मात्र दगडांचे चिरे ज्याला मिस्त्री डब्बर असे संबोधत,वाळू वा रेती आणि मुख्य म्हणजे या सगळ्यांना एकत्र जोडण्यासाठी लागणारे सीमेंट या गोष्टी पैदा कराव्या लागणार होत्या.
    कोणत्याही कामाचा अनुभव नसला की आपण निष्कारणच कसा त्रास करून घेतो याचा लगेचच अनुभव मला आला.यापूर्वी अंतुलेसाहेबांनी इंदिरा गांधी प्रतिष्ठान निर्माण करून सीमेंट मिळवणे अतिशय अवघड काम आहे अशी आमची समजूत  करून ठेवली होती आणि आता त्यावरील नियंत्रण उठूनही अजूनही ती एक कष्टसाध्या वस्तूच आहे ही आमची समजूत दूर झालेली नव्हती. त्यामुळे खोलेच्या एका मित्राने सीमेंट देण्याची इच्छा व्यक्त करताच खोलेने लगेच ५० पोती आणूनच ठेवली आणि ती कोठे ठेवायची याचा आम्हाला पेच पडला.ज्या मित्रांनी बांधकाम करण्याचा अनुभव घेतला होता त्यापैकी एकानेही प्रथम एक पत्र्याची शेड बांधून घ्या म्हणजे सामान विशेषत; सीमेंट त्यात ठेवता येईल असा सल्ला दिला नाही आणि आमच्या आर्थिक विवंचनेमुळे तशी शेड उभारण्यात पैसे घालवणे म्हणजे वाया घालवणे असे आम्हाला वाटत होते पण त्यामुळे आमच्या अडचणीत आम्ही भर घालत होतो हे लक्षात येऊनही काही उपयोग नव्हता.
        लगेचच सीमेंटची ५० पोती कुठे ठेवायची याचा पेच आम्हास पडला कारण ती जवळ जवळ आठ दिवसाच्या कामाची पोती होती.उघड्यावर तशीच ती पडू देणे आणि रखवालदारास त्यावर लक्ष ठेवावयास सांगणे यात आम्हाला धोका वाटत होता.शिवाय आमचा रखवालदार  इतका अशक्त होता की  सामान कोणीतरी पळवून नेत आहे याची फक्त माहिती आमच्यापर्यंत पोचवण्यापलीकडे त्याच्या हातून काहीही  होईल असे वाटत नव्हते.त्यामुळे आमच्या परिचितापैकी एकाच्या घराचे काम नुकतेच झालेले होते त्यांच्या घरात ती पोती नेऊन ठेवायचे ठरले.त्यासाठी प्रत्येक पोत्यास ५० पैसे मजुरी देऊन पोती सुरक्षित ठिकाणी ठेवल्यावर आम्हाला हायसे वाटलेम्हणजे काहीही बांधकाम न होता आम्ही २५ रुपये घालवून बसलो.
        दुसऱ्या दिवशी सकाळी काम सुरू करतो असे मिस्त्रीने सांगितल्यावरून मी अगदी भल्या पहाटे उठून प्लॉटवर जायची तयारी सुरू केली.कोणत्याही ठिकाणी वेळेच्या आधी जाण्याची शिस्त माझ्या अंगी बाणलेली  असल्याने मिस्त्री आणि त्याचे कामगार साइटवर येण्यापूर्वी आपण तेथे हजर असणे आवश्यक आहे या कल्पनेने मी अगदी साडेसातला जाऊन बसलो आणि त्यादिवशीच्या कामासाठी सीमेंटची दोन पोती पुन्हा प्रत्येकी ५० पैसे मजुरी देऊन आणून ठेवली आणि मिस्त्री आणि कामगारांची वाट पहात बसलो.ती सगळी मंडळी चक्क नऊ वाजता हळू हळू उगवली.हा मला पहिला धडा होता.
तो म्हणजे घर बांधण्याची जरुरी आपल्यालाच काय ती असते.मिस्त्रीला आणि त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या मजुरांना ती फक्त आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मजुरी वाटायची असते त्या दिवशीच असते.