घर राहावे बांधून --- ४

घरावर रस्ता की रस्त्यावर घर ?
      सदनिका घेऊन घर बांधण्याचा त्रास चुकवण्याचा माझा बेत तडीस जाणे दैवाला मंजूर नव्हते किंवा मी स्वत:च्या स्वतंत्र घरातच रहायला जाणे माझ्या नशिबात लिहिले असावे. त्यामुळे थोड्याच दिवसात माझ्या मित्राच्या मेव्हण्याने प्रथम सांगितलेल्या खर्चाच्या अंदाजात काम होणार नाही आणि आणखी पैसे भरावे लागतील असे जाहीर केल्यावर फ्लॅटसाठी इतके पैसे भरण्याऐवजी आपले स्वत:चेच घर का बांधू नये असा मला विचार करणे भाग पडले.
       मधल्या काळात काही दुसऱ्याही घडामोडी घडल्या होत्या. त्यातील एक म्हणजे आमच्या जागेच्या मालकांचे औरंगाबादमध्ये आगमन.ते सेवानिवृत्त होऊन औरंगाबादमध्ये  त्यानी बांधलेल्या घरात स्वत: राहू लागले होते.त्यांच्या प्लॉट्सपैकी काही त्यांनी त्यांच्या नातेवाइकांच्या म्हणजे मुलींच्या नावावर केले होते आता त्यावर जावयाचे नाव लागणे आवश्यक होते. जावई म्हणजे महत्वाची व्यक्ती त्यामुळे त्यांच्या नावे  पी.आर.कार्ड मिळवण्यासाठी त्यांनी योग्य ठिकाणी मोर्चाबांधणी केली.त्यातच आमच्या कोषाध्यक्ष मित्राने आपलाही नम्बर लावला आणि त्यांच्या जावयांच्या बरोबर आमच्या सगळ्यांचे पी.आर कार्ड्स मिळवण्यात यश मिळवले.अर्थात त्यासाठी योग्य ती दक्षिणा आम्हालाही मोजावी लागली,पण आता आम्ही आपआपल्या जागेचे अधिकृत मालक झालो होतो.
      दुसरी घडामोड म्हणजे संस्थेतील मोकळा प्लॉट ज्या मित्राने घेतला त्याने लवकर घर बांधायला सुरवात करण्याचा निश्चय व्यक्त केला.आम्हा दोघांचे प्लॉट्स पाठीला पाठ लागून असल्यामुळे त्याच्या मते दोघांनी एकावेळी बांधकाम सुरू करणे फायदेशीर होते आणि स्वतंत्रपणे काहीही करायचे जिवावर येणाऱ्या मला असे कोणीतरी पाण्यात ढकलणारे मिळाल्यावर मग हात पाय हलवायला मी तयार असे.त्यामुळे सदनिकेसाठी भरलेले पैसे काढून त्याच दहा हजार रुपयात घर बांधायला सुरवात करावी असा मी विचार करू लागलो.अर्थात ही गोष्ट म्हणजे नाल सापडला म्हणून घोडा घेण्याचा विचार करण्यासारखेच होते.
      तरी अजूनही दोन गोष्टी घर बांधायला सुरवात करायला पूर्ण करणे आवश्यक होत्या त्यातील एक म्हणजे त्या प्लॉट्सचा बिगर शेती परवाना काढणे आणि त्यानंतर सर्वात महत्वाची म्हणजे महापालिकेकडे घर बांधणी परवाना मिळवणे.सुदैवाने बिगर शेती परवान्यासाठी संस्थेच्या सर्वच सदस्यानी जोर लावण्याचे ठरवले.त्यासाठी ज्या कार्यालयाची मदत लागते त्या कार्यालयातील एक कर्मचारी हे काम करायला योग्य दक्षिणा मिळताच तयार झाला.
       यात सर्वच सदस्यांनी आता उत्साह दाखवला.औरंगाबादमध्ये नसणारे सभासद बाहेरून पत्रे पाठवून "तुम लडो हम पैसे भेजते है"म्हणून आम्हाला उत्तेजन देत होते तर औरंगाबादमधील सदस्य स्वत:च लढायला उद्युक्त झाले होते त्यामुळे बिगरशेती परवान्याचाही गड सर झाला आणि यापुढील म्हणजे महापालिकेला घरबांधकाम परवान्यासाठी अर्ज करायला आम्ही पात्र झालो.
        घर बांधायचे ठरवताच आमच्या घरात बरेच समरप्रसंग सुरू झाले. घरात किती खोल्या असाव्या या गोष्टीपासून ते त्या कोठे कोठे असाव्या याविषयी आमच्या दोघांमध्ये वाटाघाटी आणि त्याचबरोबर भांडणेही सुरू झाली.अर्थात बऱ्याच लोकांची घरे पाहून त्यातील अडचणींचा विचार करून आपल्या घराचा आराखडा ठरवावा हा सर्वसाधारण विचार आम्ही केलाच त्यामुळे आम्हाला सल्ला देणाऱ्यांचीही संख्या फुगत चालली.आणि या सगळ्यांचे सल्ले मान्य करून घर बांधायचे ठरवले असते तर आम्हाला अनेक घरे बांधावी लागली असती.इथे एक घरच कसे बांधायचे याची विवंचना तेथे अनेक घरे बांधायचा प्रश्नच नव्हता. पण नकाशा तयार करताना प्रत्येक प्रकारात काहीतरी अडचणी या असतातच याची जाणीव झाली.
         सर्वात मोठी अडचण जी बाकी सर्व अडचणींची जननी होती,ती म्हणजे आपल्याकडे पैसे फारच कमी आहेत याचा विचार प्रामुख्याने करावा लागत होता. त्यावेळी आजच्यासारखे घरासाठी कर्जही मिळत नसे.या मुख्य अडचणीमुळे आम्हाला आता सरसहा वापरण्यात येणारी आर. सी. सी. पद्धत न वापरता लोड बेअरिंग बांधकाम पद्धतच अवलंबणे भाग होते.कारण आर सी सी पद्धतीत अगदी सुरवातीसच सांगाडा उभा करण्यासाठी लोखंड,सीमेंट,वाळू,खडी अशा महागड्या सामुग्रीचा वापर करणे आवश्यक असते.दहा हजार रुपयात सुरवात करणाऱ्यासाठी ती पद्धत उपयोगी नव्हती.
      आमचे बांधकाम टप्प्याटप्प्यानेच करावे लागणार हेही उघडच होते.त्यामुळे प्रथम जोत्यापर्यंत काम करून काही दिवस आम्हाला स्वस्थ बसण्याची पाळी येणार होती.या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही तयार केलेला आराखडा घेऊन आम्ही आमच्या एका माहितीच्या वास्तुशास्त्रज्ञा (आर्किटेक्ट)कडे गेलो.
      आम्ही घर बांधणार होतो त्याच वेळी औरंगाबादच्या नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतर झाले होते.त्यामुळे परवान्यासाठी  वास्तुशास्त्रज्ञाकडूनच घराचा नकाशा तयार करून घेणे बंधनकारक झाले होते नाहीतर यापूर्वी कोणत्याही स्थापत्य अभियंत्याची सही नकाशावर चालत असे आणि आमचेच बरेच विद्यार्थी किंवा सहकारी स्थापत्य अभियंते असल्यामुळे आम्हाला सह्या मिळायला काही अडचण आली नसती पण आता मात्र आणखी एका कार्यालयाची मध्यस्थी आमच्या घरबांधणी कार्यक्रमास आवश्यक झाली.
      आता औरंगाबादमध्ये जे काही चार दोन वास्तुशास्त्रज्ञ(वा.शा.) होते त्यांना एकदम तेजीचे दिवस आले. त्यातील बहुतेकांचे काम बांधकाम नकाशा तयार करून तो महापालिकेतील त्या खात्याच्या अभियंत्याकडून मंजूर करून घेणे एवढेच असल्याने प्रत्येक इमारतीमागे ठराविक दक्षिणा देण्यापुरतेच मर्यादित होते.त्यामुळे बांधकामात कोठले प्रकार असावेत आणि घर बांधणाऱ्याचे अंदाजपत्रक काय आणि त्याप्रमाणे त्याने कसल्याप्रकारचे बांधकाम करावे असा सल्ला देण्याच्या भानगडीत ते पडत नसत.आमचा  वा.शा. सुद्धा याच प्रकारात मोडणारा होता शिवाय आम्ही अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असल्यामुळे या गोष्टी आम्हाला माहीतच असाव्यात असा ग्रह त्यांनी करून घेतला असावा.त्यामुळे आम्ही त्याच्याकडे गेल्यावर नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याची भूमिका "जो जसे वांछील तसे बांधो "अशीच होती.म्हणजे आम्ही आमचा घर बांधण्याचा इरादा व्यक्त केल्यावर "ठीक आहे मग कुठल्या प्रकारचे घर बांधता?" असे त्यानी आम्हालाच विचारले. आम्ही आमचा आराखडा पुढे केल्यावर फक्त घराच्या मागे पुढे आणि बाजूला किती जागा सोडायची एवढाच विचार करून आम्ही पुढे केलेला आराखडाच त्यानी वा छान म्हणून महापालिकेस पाठवण्याचा विचार व्यक्त केला.
      आम्ही नेलेला नकाशाच त्यांच्या ड्राफ्ट्समनकढून काढून ठराविक नमुन्यात महापालिकेत सादर करणे एवढेच आपले काम आहे याविषयी त्याच्या मनात मुळीच शंका  नव्हती. बांधकामावर देखरेख ठेवण्याचे काम एकूण खर्चाच्या ३% घेऊन करण्याची तयारी त्याने दाखवली.अजून आमच्या बांधकाम सुरू करण्याचाच पत्ता नसल्यामुळे त्याविषयी काही करार करण्यात अर्थ नव्हता.म्हणून आम्ही  आमच्या इमारतीचा आराखडा मंजूर होऊन आल्यावर त्याविषयी चर्चा करू असे सांगितले. आराखडा पाठवण्यापूर्वी आमचा प्लॉट प्रत्यक्ष पाहून अशा प्रकारचे घर त्यावर बांधणे शक्य आहे का हे पहाण्याचीही त्याना आवश्यकता भासली नाही.किंवा आमचा आराखडा इतका क्षुल्लक असावा की तो कसल्याही प्लॉटवर बांधणे शक्य असावे.
       वा.शा.च्या ताब्यात आमच्या बांधावयाच्या घराचे भवितव्य सोपवून मी स्वस्थ बसलो,मधल्या काळात फ्लॅटसाठी गुंतवलेली रक्कम सोडवून घेतली.आणि मला घर बांधण्याच्या कामात पुढे ढकलणारा माझा मित्र आणि मी अशा दोघांनी आपले प्लॉट्स एकदा जागेवर आहेत का याची पहाणी केली.
     आम्ही एकदिवस महापालिकेकडून परवानगी येणार आणि आपण आपल्या प्लॉटवर पहिली कुदळ मारणार अशा स्वप्नात होतो पण अचानक आमच्या सगळ्या मनोरथावर पाणी फिरवणारा निरोप अंबादास म्हणजे आमच्या वाशाच्या सहाय्यकाने एक दिवस आणला.आणि आमच्या परवानगीच्या कागद्पत्रावर प्लॉट रस्त्याने आक्रमित आहे म्हणजे plot is affected by the road असा शेरा मारून ते वाशाकडे परत आले होते.ते आमच्या हातात देत वाशाने आता मी काही करू शकत नाही (नाहीतरी आपण फार काही करणार आहोत असा त्याचा दावा नव्हताच).महापालिकेने उपस्थित केलेल्या हरकतीच्या मुद्द्याचा अडथळा दूर करा आणि मगच माझ्याकडे या असे सांगितले.
       आश्चर्य म्हणजे शहररचनाकार्यालया( town planning office श.र.का.)तील नकाशात हा रस्ता  चक्क आमच्या दोघांच्या प्लॉटवरूनच जात होता. आमच्या पश्चिमेकडील काही प्लॉट्सवर बांधकाम झाले होते किंवा चालू होते आणि तो रस्ता तसाच जात असेल तर तो त्या प्लॉट्सवरूनही जात होता म्हणजे ती घरे त्या रस्त्यावरच येत होती.प्रत्यक्षात ८० फुटी रस्ता माझ्या मित्राच्या प्लॉटसमोरून जात असताना दिसत होता या दोन गोष्टींचा उल्लेख आम्ही श.र.का. मध्ये केला त्यांना आम्ही प्रत्यक्ष जागेवर येऊन पहाणी करायला सांगितली पण असे सहजासहजी आणि इतक्या तर्कशुद्धतेने थोडेच कोणते शासकीय खाते चालत असते?                               
      आमच्या प्लॉट्सवरून रस्ता जात आहे ही गोष्ट आमच्या घर बांधण्याच्या स्वप्नावर अगदी रोड रोलर फिरवून गेली.माझी अवस्था तर " आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास " अशी झाली.मला माघार घ्यायला एवढे कारण पुरेसे होते