घर राहावे बांधून --- ७

     जोत्याचे काम अशा रीतीने संपवायला फार तर पंधरा दिवस लागले व त्याच बरोबर माझ्याकडील पुंजीही संपुष्टात आली त्यामुळे आता विश्रांती घेण्याचा मी निर्णय घेतला. अशी कित्येक जोत्यांची कामे आमच्या त्या भागात अनेक वर्षे बांधून पडलेली होती आणि आपल्याही जोत्याची हीच अवस्था होणार अशीच भीती माझ्या मनात होती.
    जोत्याचे काम झाल्यावर काही दिवस आराम करायचा असतो ही कल्पना माझ्या मनात इतकी ठाम बसली होती की जोत्याचे काम पूर्ण होणे म्हणजे घरच बांधून झाले अशा मानसिक अवस्थेत मी आलो.आणि मी खरोखरच आराम करू लागलो.कदाचित मी ते काम पुढच्या पिढीवरही ढकलले असते  पण माझ्या अशा अवस्थेकडे काही मित्रांचे बारीक लक्ष होते त्यापैकी एक माझे सहाध्यायी प्राध्यापक मी पूर्वी रहात असलेल्या  शासकीय सदनिकेतच रहात होते.त्यानीही नुकतेच घराचे काम पूर्ण केले होते पण काही किरकोळ कामे राहिल्यामुळे अजून ते तेथे रहायला गेले नव्ह्ते.त्यानीच एकनाथ मिस्त्रीची आणि माझी गाठ घालून दिली होती अर्थातच आमच्या बांधकामाची पूर्ण कुंडली त्यांच्याकडे होती.
        एक दिवस सकाळीच माझ्या  घराचा दरवाजा ठोठावण्यात आला .मी नाइलाजाने तो उघडला पहातो तो हे गृहस्थ. " काय चालले आहे ?" असे त्यानी विचारले.अर्थात मी काहीच करत नसल्याचे त्याना दिसतच होते.आणि थोडे फार बोलणे होताच मूळ मुद्याला हात घालत विचारले,"काय घराचे काम पुन्हा केव्हां सुरू करणार?"खरे तर हा मला अगदी न आवडणारा विषय पण तो माझ्याच हितासाठी ते काढत असल्यामुळे त्यांच्यावर तोंडसुख घेणेही शक्य नव्हते.
"अरे माझी खूप इच्छा आहे घर पूर्ण करायची पण पैसा कुठून आणू ?’
" हे पहा एसजी (माझ्या आद्याक्षरानेच बरेच लोक मला संबोधत) काम सुरू केले की पैसा कुठूनतरी उपलब्ध होतो,पण तुम्ही कामच थांबवले तर ते शक्य नाही उद्या परवाच मी परत येतो आपण लाकूड खरेदी करून टाकू." घराचे वीटकाम सुरू करताना  प्रथम चौकटी उभ्या कराव्या लागतात आणि त्यासाठी लाकूड आणून चौकटी तयार करणे आवश्यक होते.चाकणकरांनी असा दट्ट्या लावल्यावर नाइलाजाने मला काहीतरी हातपाय हलवणे भाग होते म्हणून कोठून पैसा उभा करता येतो का याचा मी शोध घेऊ लागलो.त्यावेळी आमच्या बायकोच्या कडून मिळालेली एक मुदत ठेव पिकायला आली आहे असा शोध लागला आणि त्या रकमेचा विनियोग या कामासाठी करावा असा विचार मी केला.आणि तो ताबडतोब अमलातही आणला.
   तिसऱ्याच दिवशी चाकणकर एकाद्या पठाणासारखे दारात उभे माझ्या घराची माझ्यापेक्षा इतरांनाच जास्त काळजी असावी (हे नंतर महापालिका अधिकारी बांधकामाला भेट द्यायला आल्यावरसुद्धा जाणवल. अर्थात त्यांना त्या घरापेक्षा त्यातून होणाऱ्या प्राप्तीची जास्त काळजी होती.)आता पैशाचीही अडचण नसल्यामुळे त्यांच्याबरोबर जाणे भागच पडले.चाकणकरांचे नुकतेच बांधलेले घर मी बांधत असलेल्या माझ्या घरापासून अगदी जवळ होते त्यावेळी तर मध्ये सगळेच प्लॉट्स मोकळेच असल्यामुळे ते माझ्या घराजवळ उभे राहिल्यास दिसतही असे.त्यामुळे कधी त्यांच्या बांधकामाकडे माझी चक्कर होत असे.तेथे माझ्या भावाच्या एका मित्राचेही काम चालू होते.त्याचा पत्ता मला मी सीमेंटची पोती ठेवण्यासाठी शेजारच्या घराच्या पडवीचा शोध घेत असताना लागला होता.त्या पदवीत सीमेंटची पोती ठेवणे त्यावेळी मला सोयिस्कर होते म्हणून त्याच्या मालकास मी शोधत असताना कोणीतरी त्याचा मित्र औरंगाबाद जिल्हा सहकारी बॅंकेत काम करतो असे सांगितले म्हणून मी त्याला भेटायला गेलो तर तो माझ्या भावाचा मित्रच निघाला आणि त्या पडवीत मी काही दिवस सीमेंटची पोती ठेवली.
      त्याचेही घराचे बांधकाम चालू होते ते पहायला गेलो तर तेथे लाकूडकाम चालू होते आणि रामराज म्हणून एक सुतार त्या कामावर होता.आश्चर्य म्हणजे सगळीकडे लाकूडकाम करणारे उत्तर प्रदेशातले किंवा राजस्थानी असेच होते.मराठी मिस्त्री मिळण्यासाठी मला पेपरात जाहिरातच द्यावी लागली असती.बांधकाम करणाऱ्या मिस्त्री मंडळींपैकी नव्वद टक्के परदेशी (या नावाचे)च होते.माझा बांधकाम करणारा मिस्त्री सुद्धा जरी मराठी उत्तम बोले तरी होता मूळ परदेशीच म्ह. राजस्थानी किंवा उत्तरेकडीलच.खरे तर आमच्या महाविद्यालयातील मिस्त्री आम्हाला सहज उपलब्ध झाले असते पण त्यांचे दर आम्हाला परवडण्यासारखे नव्हते.रामराजला मी विचारले तर तो एका पायावर तयार झाला.त्यामुळे चाकणकर येताना त्यालाही घेऊन आले होते त्यामुळे आता कसलीच सबब सांगणे शक्य नव्हते. मुकाट्याने जालना रस्त्यावर त्यावेळी असणाऱ्या अनेक सॉ मिलकडे मोर्चा वळवला.दोन तीन सॉ मिल्स पाहिल्यावर रामराजने एका सॉ मिलला पसंती दिली आणि तेथून आवश्यक सागवान लाकडाच्या निरनिराळ्या लांबी व छेद क्षेत्रफळाच्या लाकडांची मागणी नोंदवली.अर्थात इतके सगळे लाकूड कापून तयार ठेवण्यासाठी बराच वेळ लागणार असल्यामुळे काही रक्कम अनामत देऊन त्याला घरचा पता दिला.माझे घर म्हणजे यावेळी फक्त पायाचे भरलेले व न भरलेले खड्डे या स्वरुपात असल्यामुळे चौकटी सॉ मिलमध्येच बनवून रामराज घेऊन येणार होता.नंतर कळले की मिलमध्येच हव्या त्या आकाराच्या चौकटी पण बनवून मिळतात.(रेडी मेड कपडे घ्यावे तश्या) अर्थात त्यामुळे रामराजची मजुरी बुडली असती.(त्याला सॉ मिलचे कमिशन मात्र मिळाले)
      आता नुसत्या चौकटी करून भागणार नव्हते त्या उभ्या करायच्या म्हणजे वीटकाम सुरू करायला हवे होते.चौकटी उभ्या करून विटांच्या भिंती बाजूस उभ्या कराव्या लागतात.चौकटी त्यात घट्ट बसाव्या म्हणून चौकटींना बाजूला लोखंडी आडव्या पट्ट्या ठोकाव्या लागतात त्यामुळे चौकती वीटकामात घट्ट बसतात.रामराजने त्या सॉ मिलमध्येच तशा पट्ट्या चौकटींना ठोकूनच आणल्या होत्या.त्यावेळी बांधकाम साहित्य पुरवठा करणारे काही सरदारजी होते,पण त्याहीपेक्षा विटांचे ट्रक जालना रस्तावर जाताना एका पेट्रोल पंपावर थांबत तेथे जाऊन त्यांच्याशी संपर्क साधल्यास ते विटांचा पुरवठा करत.
       विटांचा व्यवहार करणारे बरेच लोक होते.अगदी आमच्या महाविद्यालयातील एक प्राध्यापक त्या व्यवसायात होते म्हणजे त्यांनी काही कुंभारांच्या मदतीने त्यावेळी गावाबाहेर वाटणाऱ्या दर्ग्यापाशी विटांची भट्टी लावली होती त्यामुळे असे बरेच वीटभट्टीवाले आम्ही घर बांधतो आहे म्हटल्यावर आमच्याकडून वीट घ्या असे मागे लागत.जाणकारांच्या मते कोपरगावची वीट चांगली असे आणि तेच ट्रक जालनारोडवर थांबत.आमच्या प्राध्यापक मित्राची भट्टी पण आम्ही पाहिली पण ती वीट चांगल्या प्रतीची नाही असा जाणकारांचा अभिप्राय पडला.
    या बाबतीत माझी खरी एकमेव सल्लागार काहीशी बाजूला पडली होती कारण अशा वीटभट्ट्या वगैरे स्थानी तिला नेणे मला प्रशस्त वाटले नाही.विटांच्या खरेदीत एका गृहस्थाने मला चांगलाच धडा शिकवला. माझ्या आणखी एक प्राध्यापक मित्राच्या ओळखीने तो मला भेटला आपण चांगल्या विटा पुरवू असे त्याने सांगितले आणि एक ट्रक वीट टाकली आणि तिचा दर्जा अगदी उत्तम नसला तरी किंमतीला साजेसा तरी होता.त्यामुळे त्याला(उबाळे) मी विटा पुरवायला सांगू लागलो.
     घर आपण आयुष्यातून एकदाच बांधतो असा गैरसमज त्यावेळी माझा आणि माझ्या मित्रांचाही असल्यामुळे दीड विटेची भिंत म्हणजे भक्कम घर असा त्यावेळी समज होता.या विटांचे मोजमाप ९"x ४.५"x २.२५" असे त्यामुळे दीड विटांच्या भिंतीची जाडी १३.५" होत असे.काही मित्रांनी काटकसरीच्या दृष्टीने एक विटेची भिंतही घ्यायला हरकत नाही असे म्हटले.खरे तर आमच्यासारख्याच्या घरात भिंत फोडून चोरी करायला कोण येणार होते आणि आलेच तरी त्याला काय मिळणार होते (हा पुढचा प्रश्न).पण तरीही काटकसरीपेक्षा सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याच्या प्रवृत्तीनुसार दीड विटेच्याच भिंती घेण्याचे ठरले फक्त आतील भिंती मात्र एक विटेच्या घ्याव्या असा विचार झाला पण त्यातही जाड भिंतीत कपाटे काढता येतात हा मुद्दाही विचार करण्यासारखा होता.मिस्त्रीला काय जितक्या जाडीची भिंत तेवढी मजुरी मिळणार त्यामुळे सर्व भिंती दीड विटेच्या घेण्याचाच एकनाथचा आग्रह.शिवाय त्याना बांधकाम करायला दीड विटेचे काम सोपे जाते.शेवटी गरजेनुसार बाहेरील सर्व भिंती दीड विटेच्या व आतील मात्र एक विटेच्या असे ठरले.
    उबाळेने सुरवातीस इमानेइतबारे वीट पुरवून त्याची किंमत माझ्याकडून नेली.पुढे त्याने काही पैसे अडव्हान्स दिले तर विटेचा भाव बराच कमी लावयाचे आमिष मला दाखवले आणि मीही त्याला बळी पडलो.सुरवातीला अडव्हान्स घेतल्यावर तो भट्टी लावायचा आणि त्यातील चांगल्या विटांचा पुरवठा करायचा असा माझा विश्वास संपादन केल्यावर एकदा त्याने बारातेराशे रुपये अनामत घेतले आणि त्यानंतर त्याच्या विटांचा पुरवठा थांबलाच.
           जवळच एका महाविद्यालयात तो शिपाई म्हणून काम करायचा तेथे जाऊन त्याला गाठणे काही अवघड नसे आणि मी त्याच्याकडे गेल्यावर अगदी नम्रपणे तो दुसऱ्याच दिवसाचा वायदा करायचा.असे काही दिवस गेले आणि त्याचा वायदा काही पुरा होण्याची लक्षणे दिसेनात आणि महाविद्यालयाच्या सुट्या सुरू झाल्यावर त्याचे महाविद्यालयात येणेही बंद झाले  मग त्याला गाठायला त्याची वीटभट्टी लावण्याची जागा शोधावी लागली ती बरीच औरंगाबद शहराबाहेर होती तरीही तिकडे जाऊन मी व ज्याच्या मध्यस्तीने मला तो विटांचा पुरवठा करू लागला होता त्या मित्रानेही त्याला खूप दम देण्याचा प्रयत्न केला त्याच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सांगू अशा धमक्याही दिल्या
पण तोही अमच्या दोघांचेही बारसे जेवून बसलेला असल्यामुळे शेवटी त्यावेळच्या हजारबाराशे म्हणजे आजच्या वीस पंचवीस हजारावर मला पाणी सोडावे लागले.
      विटेच्याच पुरवठ्यातून आणखी एका दुर्धर प्रसंगाला मला तोंड द्यावे लागले होते तो प्रसंग अर्थात घराच्या बांधकामाच्या दुसऱ्या टप्प्यातला होता.त्यावेळी मी अर्धवट बांधलेल्या घरात रहायला गेलो होतो आणि तेथून जवळ असणाऱ्या मियाभाई या सीमेंट व्यापाऱ्याकडून मी सीमेंट घेत असे.त्याचा माझा बराच परिचय झाला होता.घराच्या अंगणात लावण्यासाठी डाळिंबाची चांगली रोपेही त्याने मला दिली होती आणि पैशाविषयी त्याची काही तक्रार नसायची.एकदा त्याच्या दुकानात गेलो असता त्याने ," साब आपको वीट होना तो बोल देना" असे म्हटले आणि कोणतीही गोष्ट जवळ उपलब्ध झाली तर बरे या माझ्या संवयीस अनुसरून मीही त्याला हो म्हटले.प्रत्यक्ष वीट पुरवणारा त्याचाच कोणी नातेवाइक होता.हा एक अगदी अफझलखानाचा वारस शोभावा असा एक दांडगा खानच होता.त्याला पाहून मला जरा भीतीच वाटली पण मियाभाईवर विसंबून त्याला मी एक ट्रक टाकायला सांगितले.
       विटांचा ट्रक आला की प्रथम त्यातील काही विटा पाहून त्या पक्क्या भाजलेल्या आहेत की नाहीत हे पाहून मगच आम्ही तो उतरवण्याची परवानगी देत असू,पण या खानाचा ट्रक बरोबर मी कॉलेजला गेलो त्या काळात आला आणि माझ्या बायकोने मी ये ईपर्यंत थांबायला सांगूनही तिचे न ऐकता त्याने तो आमच्या घरासमोर उतरवला.नंतर मी पाहिले तेव्हा वीट योग्य दर्जाची नव्हती बऱ्याच विटांचा चुरा झालेला असे दिसले त्यामुळे मी लगेच जाऊन मियाभाईला तसे सांगितले.त्यावर त्याने,"थोडा रेट कम देना साब अब ट्रक आपके घरके सामने खाली किया है "
असे म्हणून पाहिले.ट्रकच्या बरोबर येणाऱ्या मजुरांना काहीतरी मजुरी माल उतर्वण्याची द्यावी लागते आता तो माल परत न्यायचा म्हणजे पुन्हा तो माल चढवण्याची मजुरी द्यावी लागणार तो त्याला फुकटच भुर्दंड बसणार होता पण त्यासाठी कमी दर्जाची वीट स्वीकारणे मलाही परवडण्यासारखे नव्हते.
        मियाबाईकडून परत आल्यावर त्याचा तो खानही माझ्या घरी येऊन विनवणी करून कमी पैसे दिले तरी चालेल असे म्हणून तो माल स्वीकारण्याची गळ घालू लागला,पण मिस्त्रीने तसल्या विटांचे काम चांगले होणार नाही असे निक्षून बजावून सांगितल्यामुळे मी ते मान्य केले नाही मग त्याने मला दमात घेण्याचा प्रयत्न केला
"फिर आपने ट्रक खाली क्यूं करके लिया ? अब माल आपकोही लेना पडेगा " ट्रकबरोबर तो स्वत: आलेला नव्हता आणि त्याच्या माणसाला ट्रक मी नसताना उतरू नको असे आम्ही सांगितले असताना त्याने उतरवला हे मी त्याच्या निदर्शनास आणले पण तो आपला आग्रह सोडायला तयार नव्हता.त्याच्या जबरदस्त व्यक्तिमत्वापुढे माझ्यासारखा किरकोळ माणूस सहज दबून जाईल असा त्याचा तर्क.तसा मी मनातून घाबरलो तर होतोच,तरीही
"माल हमारे ना कहनेके बावजूद आपके आदमीने उतार दिया आपको वो वापसही लेना पडेगा" असे ठामपणे सांगून त्याला निरोप दिला.दोन दिवस माल तसाच पडून होता.मियाभाईही,"काहेको जिद करते हो साहब जरा कम रेट दीजिये बस."अशी माझी समजूत पटवू लागला पण मी त्यालाही तेच सांगितले.
       त्यावेळी त्या भागात फारशी वस्ती नव्हती त्यामुळे हा पठाण एकाद्यावेळी आपल्याला गाठून मारहाण तर करणार नाही ना अशी भीती माझ्या मनात होती.जवळ जवळ आठवडाभर वीट आमच्या घरापुढे पडून होती आणि मी घाबरतच सर्व व्यवहार करत होतो.शेवटी आठव्या दिवशी अचानक एक ट्रक घरासमोर आला आणि त्यानी भराभर त्यात विटा भरायला सुरवात केली त्याना विचारल्याव्र मियाभाईने सांगितले असे त्यानी सांगितल्याव्र बयकोने त्याना विटा उचलू दिल्या.मी घरी आल्यावर घरासमोरील जागा मोकळी पाहून माझा जीव भांड्यात पडला.तरी एक दोन दिवस मी जरा दबकतच वागत होतो.