घर राहावे बांधून --- ३

       आपल्या मालकीच्या प्लॉटवरही घर बांधायला महापालिका किंवा नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत अशा संस्थेची परवानगी घ्यावी लागते,आणि त्या परवानगीसाठी त्या जागेचे मिळकत नोंद प्रमाणपत्र (पी.आर.कार्ड)आपल्या नावावर शहरमोजणी कार्यालया ( सिटी सर्व्हे ऑफिस )मधून मिळवावे लागते.त्याशिवाय बिगरशेती (नॉन ऍग्रिकल्चर) प्रमाणपत्रही मिळवावे लागते.म्हणजे घर बांधायला सुरवात करण्यापूर्वी,निरनिराळ्या तीन शासकीय कार्यालयातील अनेक महान कर्मचाऱ्यांना भेटण्याची सुसंधी मला प्राप्त झाली होती.आणि अशा कामात माझ्याइतका कच्चा माणूस क्वचितच सापडला असता.
          अशा कार्यालयातील एकच अनुभव सांगण्यासारखा आहे.अर्थात तो खूपच नंतर आला होता.त्यावेळी माझ्या धाकट्या भावाला आमच्याच गृ.नि.संस्थेतील एक प्लॉट हवा होता.त्यावेळी दादासाहेब सेवानिवृत्त झाल्यामुळे औरंगाबाद सोडून गेले होते आणि त्यामुळे ते आपला प्लॉट कदाचित विकण्याची शक्यता होती.परंतु दादासाहेबांची दोन कारणाने मी नाराजी मी ओढवून घेतली होती.पहिले कारण प्लॉट वाटपाच्या वेळी मी त्यांच्या विरोधी पवित्रा घेतला होता. त्यानंतर त्यानी बाब्रीकरांना दिलेल्या सल्ल्यामुळे संस्थेचे नुकसान झाले अशी भूमिका असलेल्या सभासदांच्या गटात मी होतो.त्यामुळे मी दादासाहेबांना बोललो तर त्याचा उलटच परिणाम होण्याची शक्यता होती म्हणून त्याने स्वतंत्रपणे त्यांना भेटून प्लॉटविषयी बोलावे असा सल्ला मी त्याला दिला.
        सुदैवाने दादासाहेबांचे माझ्या भावाविषयीचे मत त्यांच्या माझ्याविषयीच्या मतावर आधारित नव्हते,त्यामुळे शिवाय संस्थेतील इतर सभासदांच्या विरोधी पवित्र्यामुळे आपल्याला प्लॉट विकण्याचीही परवानगी मिळेल की नाही या शंकेमुळे त्यानी माझ्या भावाने विषय काढताच त्याला हसत हसत प्लॉट देऊ केला.संस्थेच्या सर्वसाधारण सभेत तो प्लॉट माझ्या भावाला देण्याचा ठराव पारित झाला आणि दोन तीन दिवसातच सिटी सर्व्हे ऑफिसला संस्थेकडून तशा अर्थाचे पत्र मिळाले.आता मिळकतीची नोंद भावाच्या नावावर करण्याचे काम सिटी सर्व्हे ऑफिसकडे होते.
     त्यावेळी मी संस्थेचा सचिवही होतो.त्यामुळे अर्थातच माझ्या सहीनेच या हस्तांतरणाचे पत्र सिटी सर्व्हे ऑफिसला गेले होते.त्यानंतर दोन तीनच दिवसांनी सकाळीच माझ्याकडे एक गृहस्थ आले.त्यांनी कपाळाला गंधाचा भला मोठा टिळा लावला होता.लांबलचक शेंडी त्यांच्या डोक्यावरील टोपीतून बाहेर डोकावत होती.घरात प्रवेश करून नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनीच स्वत:चा परिचय करून दिला."मी यंदे,मी सिटी सर्व्हे कार्यालयात काम करतो" या माणसाचे माझ्याकडे काय काम हे माझ्या ध्यानात येत नव्हते.तरी पण घरी येणाऱ्या माणसाचे स्वागत करायचे म्हणून मी बायकोला चहा करण्याची सूचना केली.पण यंदे यांनी मलाच अडवत "  नको नको  माझे अगदी कडक सोवळे असते..हल्लीच्या स्त्रिया बहुधा बाहेर बसण्याचे टाळतात त्यामुळे मी परक्या घरी काहीच घेत नाही " परक्या घरी तेथील स्त्रीला त्रास द्यायला नको म्हणून चहा किंवा खाणे टाळणाऱ्या व्यक्ती मी पाहिल्या होत्या पण या कारणासाठी ते टाळणारी आणि ती भूषणास्पद बाब असल्याप्रमाणे तसे सांगणारी व्यक्ती मी प्रथमच पहात होतो.
"बर ठीक आहे" असे म्हणून सौभाग्यवतीला चहा करू नको असे मी सांगितले.त्या गृहस्थाचे विचित्र बोलणे ऐकल्यावर तिने अगोदरच तसा निर्णय केला असेल अशी माझी खात्री होतीच.
"बरे आहे मग आपले काम काय आहे?" असे मी त्या व्यक्तीस विचारले.
" तुमच्या संस्थेचा एक प्लॉट तुमच्या बंधूंना नुकताच हस्तांतरित करण्यात आला."
"हो,बरोबर आहे " मी म्हणालो.
" मग आता त्यांचे पी.आर.कार्ड लागेल ना ?"
" हो हेही बरोबर आहे "
" ते काम माझ्याच कडे असते."
" वा मग आपण कशाला तसदी घेतली माझे बंधू आलेच असते ना आपल्या कार्यालयात.तसा अर्ज आम्ही संस्थेतर्फे दिलाच आहे " मी म्हणालो.
"अहो साहेब असा अर्ज देऊन शांत बसलात तर तुमचे काम कसे होईल ?"
" मग आणखी काय करावे लागते ?"
" शाबास, हे पण मीच सांगायचे का? बर ठीक आहे आता विचारत आहात तर सांगतो,मीच पी.आर. कार्ड तयार करतो आणि ते तुम्हाला घरपोच मिळेल."
" वा उत्तम !" मग थोडासा प्रकाश माझ्या डोक्यात पडल्यामुळे मी पुढे विचारले
" मग त्याबद्दल तुम्हाला काही द्यायचे का?"
" छे छे मला काहीच नको साहेब, पण ऑफिसमधल्या लोकांना मात्र जरा चहा पाणी करावे लागेल,त्यासाठी फक्त चारशे रुपये लागतील"
हे ऐकून मला रागच आला,आणि त्यामुळे मी त्याला म्हनालो,
" हे पहा यंदे,चहापाण्याला किती पैसे लागतात याची कल्पना मी करू शकतो.पण तुम्ही इतके धार्मिक,गंधाचा टिळा लावून आला आहात. स्त्रियांच्या हातचे खातही नाही, तरी पैसे मात्र खाण्यात काही गैर आहे असे तुम्हाला वाटत नाही ना?"
" अहो साहेब,मी म्हणालो ना की मला काहीच नको असते,हे सर्व साहेबांच्यासाठीच असते "
"ठीक आहे मग मी साहेबांनाच विचारतो " असे म्हणून मी त्याला वाटेला लावले.त्यानंतर आमच्या सहकाऱ्यापैकी एकाने उस्मानपुऱ्यात घर बांधले होते त्याला सहज ही घटना सांगितल्यावर ते म्हणाले," अरे मग देऊन टाक ना चारशे रुपये,चांगले घरबसल्या काम होते आहे."
याउलट यापूर्वी अशाच दुसऱ्या घर बांधून मोकळे झालेल्या मित्राला विचारले तर त्याने अगदी स्पष्टपणे " मी एक पैसाही कोणाला न देता घर बांधले " असे मला सांगितले होते.त्यामुळे आणि माझ्या भावालाही घर बांधण्याची घाई नसल्यामुळे मीही काही दिवस स्वस्थ रहायचे ठरवले.
        जवळ जवळ सहा महिन्यांनी मी शहर मोजणी कार्यालयाला भेट दिली.आणि एकदम मुख्य अधिकाऱ्याकडेच मोर्चा वळवला.माझ्याजवळ संस्थेने घेतलेल्या ठरावाची आणि कार्यालयास पाठवलेल्या पत्राची प्रत होती.ते पत्र प्रमुख अधिकाऱ्यास दाखवून मी या सभासदाचे पी.आर. कार्ड अजून का मिळाले नाही अशी विचारणा केल्यावर त्या अधिकाऱ्याने बेल वाजवून यंदेसच बोलावणे पाठवले.
   यंदे आत येताच अधिकाऱ्याने " कायहो यांच्या संस्थेच्या एका सभासदाने पी. आर.कार्डसाठी अर्ज दिला आहे ना मग त्याचे पी. आर .कार्ड दिले का ?" अशी पृच्छा केली.त्यावर यंदे यांनी " साहेब,आपण या हस्तांतरणाला कोणाची हरकत आहे का अशी नोटिस लावली आहे त्याच्या उत्तराची वाट पहात आहोत" असा खुलासा केला.यावर मी तशी नोटीस लावून सहा महिने झाले असून त्यावर यापूर्वीच्या सभासदाचीच काय ती हरकत असू शकते हे त्यांच्या निदर्शनास आणले.
" बरोबर आहे हे म्हणतात ते " असा साहेबांनी त्याला दुजोरा दिला.
" पण साहेब त्या पूर्वीच्या सभासदाकडून काहीच उत्तर नाही " असे यंदेने आपलेच घोडे पुढे दामटत म्हटले.जणु याच क्षणाची वाट पहात असल्याप्रमाणे मी पटकन " त्या सभासदाचे ना हरकत प्रमाणपत्रच मी बरोबर घेऊन आलो आहे." असे म्हणून मी माझ्याजवळचे ते प्रमाणपत्र पुढे केले.संस्थेचा सचिव असण्यामुळे सर्व कागदपत्रे मला सहज उपलब्ध असत त्याचा असा उपयोग झाला.
" मग काय अडचण आहे? त्यांना प्रमाणपत्र देऊन टाका." असा जणु आदेशच साहेबांनी दिल्यावर यंदेंचा नाइलाज झाला आणि तो मला बरोबर घेऊनच बाहेर पडला.त्याच्या टेबलावर नेऊन माझ्यासाठी चहा मागवत " काय साहेब,तुम्ही तर कमालच केली " असे म्हणून त्या प्रमाणपत्रासाठी असणारी फी रु.चार पैसे पन्नास फक्त माझ्याकडून घेऊन त्याच्याच शिपायाला बोलावून ती भरून येण्यास सांगितले पण मी त्याला थांबवून मी स्वत:च ते पैसे भरून येऊन मिळालेली पावती त्याला दाखवली आणि तयार असलेले प्रमाणपत्र ताब्यात घेऊनच बाहेर पडलो.
      बऱ्याच वेळा आपण केवळ कोणतीही गोष्ट अगदी आयत्या वेळी करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या त्या घाईचा फायदा निरनिराळ्या कार्यालयातील लोक कसे घेतात याचाच हा एक नमुना !