घर राहावे बांधून ! --- ६

घर बांधण्याची जरुरी आपल्यालाच काय ती असते.मिस्त्रीला आणि त्याच्या
हाताखाली काम करणाऱ्या मजुरांना ती फक्त आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मजुरी
वाटायची असते त्या दिवशीच असते हा मला मिळालेला पहिला धडा .

      घर बांधायला पूरक अशा फारच थोड्या गोष्टी त्यावेळी आमच्याकडे होत्या.पैसा तर नव्हताच पण तरीही त्यातील एक महत्वाची बाब म्हणजे बांधकाम साहित्य आता मिळणे सुलभ झाले होते.त्यातल्यात्यात सीमेंट ही महत्वाची वस्तू सुलभतेने उपलब्ध होती.थोड्याच काळापूर्वी त्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या पाया पडावे लागत होते आणि तरीही चांगलेच सीमेंट मिळेल याची निश्चिती नव्हती.त्यावरच अंतुले यांच्या इंदिरा प्रतिष्ठानची इमारत उभी होती पण त्याच सुमारास तिला हादरे बसून त्यांचीही गच्छंती झाली आमच्याच एका मित्राने सांगितलेला अनुभव भयानक होता.शासकीय कोट्यातून मिळालेल्या सीमेंटचा वापर करून घराचे छत त्याने तयार केले.बाकीचे बांधकाम करायला चुना वा तत्सम पूरकच वापरले होते.छतासाठी केलेली बांधणी (centring) एकवीस दिवस सतत पाण्याचा मारा करून त्यात योग्य ते सामर्थ्य आले असेल या कल्पनेने जेव्हा सोडवली तेव्हां एकाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखे सगळे छत आणि त्यामुळे बाकीचे बांधकाम कोसळले इतके ते सीमेंट खराब होते.पण आता सीमेंट उघड उघड उपलब्ध झाल्याने दर्जाची खात्री करून ते महाग का होईना विकत घेणे शक्य होते.दुसरी गोष्ट  मी बरेच दिवसापूर्वी म्हणजे जवळ जवळ सात आठ वर्षापूर्वी बजाज स्कूटरसाठी लावलेला नंबर फलद्रूप होऊन मला स्कूटर मिळाली होती.( आज हवी ती स्कूटर,मोटर सायकल वा मोटर कार मनात आले की विकत घेण्याची इच्छा व्यक्त करायचा अवकाश की कर्ज देणाऱ्यांची रांग दारात उभी रहाते  ही परिस्थिती अनुभवणाऱ्यांचा विश्वासही यावर बसणार नाही.)त्यामुळे आम्ही दोघे कामाच्या जागी स्कूटरवरून जाऊ शकत होतो किंवा कामासाठी व सामान विकत घेण्यासाठी मला सहजपणे फिरणे आता शक्य होते.
     त्यावेळी आम्ही रहात होतो ते भाड्याचे घर उस्मानपुरा भागातील अगदी शेवटचेच होते म्हणावे लागेल. त्याच्या पूर्वेकडे आता श्रेयनगर नावाची वसाहत झाली होती.त्याच्यापुढे मात्र एक शेतच होते.त्या शेतातून एक पायवाट जात होती.शेतात दोन विहिरी होत्या.ती जागा झांबड नावाच्या व्यक्तीची होती त्यामुळे नंतर त्या जागेवर त्याने काढलेल्या गृहप्रकल्पास झांबड इस्टेट असे नाव पडले पण त्यावेळी मात्र ते एक शेतच होते.त्यातील काही भाग अजून लागवडीखाली पण होता.त्याला लागूनच डावीकडे आमच्या जमिनीच्या मालकांची हद्द होती त्यामध्ये त्यांनी स्वत:साठी घरे पण बांधली होती आणि ती चांगली मोठी बंगलेवजा होती.त्याच्या पूर्वेकडे एक चांगला रुंद आणि खोल नाला होता.आमच्या प्लॉटकडे जाताना झांबड इस्टेटवरील पायवाट ओलांडल्यावर हा नाला पार करावा लागे.आमचे मित्र खोले त्यांच्या स्कूटरवरून लीलया हा नाला पार करत पण मी मात्र स्कूटर नुकतीच वापरू लागल्यामुळे तसे करायला घाबरत असे कारण नाल्याच्या मध्ये जाऊन स्कूटर बंद पडली तर अरत्र ना परत्र अशी आपली परिस्थिती व्हायची अशी भीती होती त्यामुळे सुरवातीस आम्ही दोघे(मी व सौ.) प्लॉटवर जाताना नाल्याच्या काठी स्कूटर बंद करून ठेवून पुढील एक किलोमीटर अंतर पायी जात असू.नाला ओलांडला की लगेचच काही घरे आमच्याच मालकांच्या प्लॉट्सवर बांधलेली दिसू लागत.तसे त्यावेळी तेथे रहायला येणाऱ्या लोकांना धाडसीच म्हणावे लागेल.कारण संध्याकाळी साडेसहा सातनंतर त्या भागात इतका अंधार पडे की त्या अंधारात नाला ओलांडणे अवघडच होते.त्यामुळे बाहेर पडणाऱ्या माणसास त्यापूर्वीच घरी येणे आवश्यक असे.
         आमच्या भागातून आणखी पूर्वेस जाऊन जवाहरनगर व आकाशवाणीवरून जालना रस्त्यावरून गावात मोठा फेरा घेऊन जाणे शक्य असे आणि हा रस्ता लांबचा असला तरी  तेथे विजेचे खांब बसवलेले असल्यामुळे वाहन घेऊन उशीरा येणाऱ्या लोकांना त्या भागात येण्यासाठी पर्याय म्हणून वापरता येत होता.
          स्कूटरची सवय झाल्यावर मात्र हळू हळू दिवसा स्कूटरवरून नाला पार करणे मला जमू लागले.तरीही मी सौ.ला घेऊन अनेकदा स्कूटर नाल्यातून चढवताना नाल्याच्या मध्यभागी बंद पडण्याचे प्रसंग ओढवायचे अशा वेळी स्कूटर नाल्यातून वर चढण्या ऐवजी मागे मागे उतरू लागायची किंवा सपशेल आडवीच व्हायची आणि आम्हा दोघांनाही
नाल्यातील धुळीत लोळण घ्यावी लागायची.शिवाय त्याच वेळी नाल्यापलीकडील घरातील मंडळी त्यांच्या घराच्या बाल्कनीत उभी राहून आमची ही कसरत पहात असायची.सौ.ला पडण्यापेक्षा आपली ही फजिती कोणीतरी पहात आहे ही गोष्ट फारच अपमानास्पद वाटायची पण त्याला इलाज नव्हता.पहाणारी मंडळी आमच्या चांगल्याच परिचयाची होती आणि आमची फजिती त्यांनाही फार आनंददायक वाटत होती अशातला भाग नव्हता.बऱ्याच वेळा आमची स्कूटर वर काढण्यात त्यानीच हातभारही लावला होता.नाल्यात स्कूटर बंद पडणे व सौच्या मदतीने ती वर नेणे आमच्या चांगले अंगवळणी पडू लागले.
           पण हा नाला मोठा त्रासदायक होता आणि प्रसिद्धही होता.सुरवातीला आमच्या घराच्या पत्त्यातही श्रेयनगर नाल्याच्या पलीकडे असा उल्लेखही बरेच दिवस आम्ही करत असू.नंतरही आमची मुले सायकलीवरून उस्मानपुऱ्यात गेल्यावर घरी परतताना त्यांच्या सायकली पण नाल्यात घसरून किरकोळ इजा अनेक वेळा त्यांनाही सोसाव्या लागल्या होत्याच.पावसाळ्यात तर नाल्यात भरपूर पाणी व रस्त्यात चिखल होत असल्याने तो रस्ता न अवलंबता आकाशवाणीच्या दुप्पट तिप्पट अंतराच्या रस्त्याचाच अवलंब करणे भाग पडे.माझ्या घराच्या वास्तुशांतीसाठी आलेल्या माझ्या मुंबईच्या बहिणीस व तिच्या पतिराजांना रिक्षावाल्याने या नाल्यापर्यंत आणून सोडले आणि पुढे जाता येणार नाही असे सांगून त्याना तेथेच सोडले.नाइलाजाने सामान घेऊन त्यांना नाला ओलांडण्याची कसरत करावी लागली आणि त्यात एकदोनदा लोटांगण घालायची वेळ आल्याने ते इतके वैतागले की येथूनच ते परत मुंबईस जायला निघाले.त्या काळात नोबाइलच काय पण साधी टेलिफोन सेवाही उपलब्ध नसल्याने घरी संपर्क साधणेही शक्य नव्हते मग कसेबसे आले तसेच घरी.पण पुढे तेच गृहस्थ औरंगाबादेतच आणि त्याच नाल्याच्याच पलीकडे आमच्या घराजवळच स्थायिक झाले.कालाय तस्मै मन: दुसरे काय.
           अशाही परिस्थितीत स्वत:चे घर बांधण्याच्या कल्पनेने आम्हाला इतके झपाटले होते की या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून बांधकाम हेच एक लक्ष्य आमच्यासमोर होते.आमच्या (म्हणजे मी आणि खोले यांच्या ) घराचे बांधकाम जोडीने चालणार होते.त्यानुसार प्रथम माझ्या घराच्या
पायाचे काम करण्याचे ठरले व त्यानुसार घराच्या आराखड्यानुसार आखणी (मारकुट )करण्यात
आली.ही आखणी चुन्याच्या रेषांनी भिंतींच्या मध्यरेषांची असते व खड्डे
खणताना या रेषांच्या दोन्ही बाजूस भिंतींच्या पायाच्या रुंदीच्या निम्मी
रुंदी राहील असे खोदकाम जोपर्यंत कडक जमीन लागत नाही तोपर्यंत करावे
लागते.जेव्हां जमीन काळ्या मातीची असते तेव्हां पाया बराच खोल घ्यावा
लागतो आणि त्या प्रमाणात बांधकामाचा खर्च वाढतो.सुदैवाने आमच्या प्लॉटची
जमीन फारच थोडी खणताच कडक लागू लागल्यामुळे अगदी आवश्यक तेवढ्याच
खोलीपर्यंत खणावे लागले.मात्र प्लॉटमध्ये मागील बाजूस जवळ जवळ खड्डाच होता
त्यामुळे घराच्या इमारतीच्या आतील जमिनीची पातळी सर्वत्र सारखी ठेवावयाची
असेल तर मागील बाजूस पायाच्या भिंती बऱ्याच उंचीच्या घ्याव्या लागणार
होत्या.दगडी बांधकामास जोते (plinth) म्हणतात.त्यावरील बांधकाम विटेचे
करतात व खिडक्या व घरातील कपाटे यांच्या पातळीपर्यंत जे बांधकाम करतात
त्याला लिन्टेल पातळी म्हणतात व त्यावरील सर्वात वरचे बांधकाम छताची पातळी
(slab level)म्हणतात.
     आमच्या प्लॉटच्या आकारमानानुसार (७२’ लांबी व ५०’रुंदी) आम्हाला ४०%
क्षेत्रफळावर म्हणजे जवळ जवळ १४४० चौ.फू.बांधकाम आम्ही करू शकत होतो,पण
प्लॉटच्या दोन्ही बाजूस रस्ते आल्यामुळे व त्यावेळच्या महापालिकेच्या
नियमानुसार रस्त्याच्या बाजूस १५’ जागा सोडणे आवश्यक असल्याने मला जवळ जवळ
१२०० चौ.फुटाचे बांधकाम करता येत होते व त्यात स्वयंपाकघर,दिवाणखाना व चार
खोल्या असे सहा खोल्यांचे घर बांधणे शक्य होते,त्यासाठी लागणाऱ्या पैशाचा अर्थातच आमयाकडे खडखडात होता आणि कर्ज द्यायला आजच्यासारख्या बँका दारात उभ्या नव्हत्या.त्यामुळे जवळ असलेल्या पैशांचा वापर करून पायाचे काम
जोत्यापर्यंत करून मी गप्प बसणार होतो.त्या काळात असणाऱ्या बांधकामाच्या
साहित्याच्या स्वस्त दरानुसार (वाळू १२५रु.ट्रक,डब्बर १०० रु.ट्रक,सीमेंट
७५ रु.गोणी) हे  काम करायला मला दहा पंधरा हजार रु.खर्च येणार
होता. 
     आमच्या काही सल्लागारानी आम्हाला जोते जमेल तितके उंच ठेवावे असा
सल्ला दिला होता कारण त्यामुळे घरातील जमीन रस्त्याच्या बरीच वर राहून
रस्त्यावरील धूळ चिखल इ.घरात कमी येतात.अर्थातच जितकी उंची वाढवू तितकाच
खर्चही वाढतो हे उघडच पण तरीही या सल्ल्याचे मात्र मी इमानेइतबारे पालन
केले,त्यामुळे माझ्या घराच्या जोत्याची कमीतकमी उंची तीन फूट ठेवली तीच
मागील बाजूस खड्डा असल्यामुळे जवळ जवळ नऊ फूट झाली थोडक्यात ती अजून एका
फुटाने वाढवली तर   त्या बाजूस छत टाकले तर तेथे आरामात तळघर निघू शकले
असते.यात अडचण फक्त एकच होती ती म्हणजे हा भाग मागील बाजूस असल्यामुळे
त्या तळघराचा उपयोग करणे अवघड गेले असते.अर्थात हा फार पुढचा विचार होता
कारण अजून आम्ही सर्व दृष्टीने खरोखरच खड्ड्यातच होतो.खड्डे खणेपर्यंतच
आम्ही दमून गेलो होतो.                    
    सुरवातीचा पायाचे बांधकाम हा प्रकल्प छोटाच होता.त्यासाठी दहा बारा ट्रक डब्बर,तेवढीच रेती व वीस पंचवीस पोती सीमेंट इतक्या सामुग्रीचा एकनाथ आणि त्याच्या कारागीरांनी फडशा पाडला आणि आठवड्यापूर्वी जी जागा मोकळी दिसत होती त्याठिकाणी दगडांच्या तीन फुटापासून आठ फुटांच्या उंचीच्या भिंतींच्या सहा चौकोनी विहिरी दिसू लागल्या.एकनाथचे दुसऱ्या ठिकाणी एक काम चालू होते त्याठिकाणी बराच भाग पाडण्यात आला होता आणि तो माल आमच्या विहिरी बुजवण्यासाठी वापरता येईल अशी त्याने कल्पना मांडली व फक्त वाह्तूकीच्या खर्चात तो माल आणून टाकण्याचा सल्ला त्याने  मला दिला.आमचे घरबांधणीचे ज्ञान अगदीच तुटपुंजे असल्याने तो सल्ला मी मान्य केला आणि पाडलेल्या घराचा बराच माल त्याने माझ्या प्लॉटवर आणून टाकला अर्थात तो सहापैकी तीन चार खड्ड्यात टाकून ते बुजवण्याची वेगळी मजुरी त्याच्या हाताखालील मजुरांना देऊन आम्ही पाया जवळ जवळ पूर्ण केला.मागील बाजूचे दोन खड्डे तसेच ठेवले कारण ते खरोखरच विहिरीसारखेच खोल होते आणि ते बुजवण्यासाठी बरेच ट्रक माल आणि तोही नुसत्या वाहतूक खर्चात नाही तर विकतच घ्यावा लागला असता.त्यावर पत्रे झाकून सीमेंटची पोती ठेवायला त्या भागाचा उपयोग करता येईल असे वाटले. शिवाय पुढील बांधकामात खूप कचरा तयार होईल तो त्यात भरता येईल.त्या विहिरींचा तळघर म्हणून वापर करणे शक्य होते पण त्यासाठी त्यांचे स्थान रस्त्याच्या बाजूस असणे आवश्यक होते.मागील बाजूस तळघर काढणे अवघड होते.कारण मग सांडपाणी बाहेर काढता आले नसते.
     जोत्याचे काम अशा रीतीने संपवायला फार तर पंधरा दिवस लागले व त्याच बरोबर माझ्याकडील पुंजीही संपुष्टात आली त्यामुळे आता विश्रांती घेण्याचा मी निर्णय घेतला. अशी कित्येक जोत्यांची कामे आमया त्या भागात अनेक वर्षे बांधून पडलेली होती आणि आपल्याही जोत्याची हीच अवस्था होणार अशीच भीती माझ्या मनात होती.