पुन्हा नव्याने

काळाचे संदर्भ बदलले पुन्हा नव्याने
आणि काहींना अवघडले पुन्हा नव्याने

खोटे नाही! मी घुटमळलो जरा जुन्याशी
आशेचे काही क्षण दिसले पुन्हा नव्याने

उंची माझी सोसत नव्हती तशी कुणाला
आभाळाशी हात मिळवले पुन्हा नव्याने

दुःखाच्या तक्क्यावर बसलो उजाडलेला
मायेने काळीज उघडले पुन्हा नव्याने

मातीच्या देहात उकिरडे नको फुलाया
मातीच्या गर्भात मिसळले पुन्हा नव्याने

पूर्वेच्या लालीवत दिसला प्रकाश जेव्हा
या रक्ताचे डाग पुसटले पुन्हा नव्याने

अर्थाने जो दार किलकिले स्वतःच केले
शब्दांचेही भान हरपले पुन्हा नव्याने

प्रेमाने हा खेळ निवडला जुनापुराणा
कोणाचे काळीज निवडले पुन्हा नव्याने?