खोड ...


                   खोड



वादळाने पाठ माझी, सोडली आहे कुठे ?
अन् तरीही खोड माझी, मोडली आहे कुठे ?

भेटणारा भेटतो अन् टाळणारा टाळतो
मी तशी पाटी घरावर, लावली आहे कुठे ?

योजना असतात मोठया, छावणीच्या नेहमी
पण लढाई कैक वर्षे, जाहली आहे कुठे ?


संपलो आहे कधीचा, पाहुनी करुणा तुझी
जीवघेणी क्रूरता मी, पाहिली आहे कुठे ?

मी किनाऱ्याचा भरोसा, ठेवला होता जरी .....
आर्त माझी हाक त्याने, ऐकली आहे कुठे ?

आसवांच्या त्या पुरातच, काल सारे संपले
वादळाला आज संधी, राहिली  आहे कुठे ?

सर्व प्रेमाच्या कहाण्या, चांगल्या असतीलही
पण तुम्ही माझी  कहाणी, ऐकली आहे कुठे ?


मी फुलांचे घावसुध्दा  टाळतो आहे अता ...
सोसण्याला जिंदगीही, राहिली  आहे कुठे  ?

                                          - यादगार