बाग समजावून थकली, फूल कोठे ऐकते
ऊन जर भाग्यात आहे, का दवावर भाळते ?
भोगुनी दररोज दुःखे, लागले आहे व्यसन
भंगल्या हृदयास लज्जत वेदनेची भावते
मीलनाचे गूज मी सांगू कसे, लाजेल ती
एव्हढे सांगेन, धुंदी आजही रेंगाळते
पारध्याचे नाव मी ओठी जरी ना आणले
जाणतो पण कोण पडद्याआडुनी डोकावते
प्रेम केल्याने अवस्था काय हृदयाची, पहा
भग्न अवशेषात कोणी प्रेमिका का राहते ?
राहिली, 'भृंगा', कुठे दिनरातची धुंदी जुनी ?
मद्य काव्याचे न पूर्वीसारखे फेसाळते
माझ्या ह्या गजलेचा आंशिक व स्वैर अनुवाद.