आता तरी ....... ?

तो एक ज्यूनियर ऑफिसर; आरक्षित वर्गातला.

ती एक कारकून; खुल्या वर्गातली.

तो नुसताच काळा नाही, तर ओबडधोबड चेहऱ्याचा. बघणाऱ्यावर कसलीच छाप न पडणारा.

ती गोरीपान, नाकीडोळी नीटस. अनेकांना पुन्हा पुन्हा पहायला लावणारी.

त्याचं तिच्यावर मन गेलं. तिला पत्ता नाही.

आडून आडून केलेले प्रयत्न तिच्यापर्यंत पोचलेच नाहीत.

शेवटी त्यानी हिय्या केला. आपलं मनोगत कागदावर उतरवलं. पाकीट तिच्यापर्यंत पोचेल अशी व्यवस्था केली.

'उत्तराची घाई नाही' त्यानी लिहिलं होतं.

तो रोज लवकर यायचा. ती नेहमी उशीरा यायची. पण पाकीट मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी तीही लवकर ऑफिसला आली.

पर्स जागेवर ठेऊन ती त्याच्या जागेकडे येऊ लागली. हातात त्याचंच पाकीट.

तिच्या प्रत्येक पावलागणिक त्याच्या छातीची धडधड वाढत होती. तो कॉन्शस झाला. 'आज आपण जरा चांगले कपडे घालायला पाहिजे होते' त्याच्या मनात येऊन गेलं.

त्याच्यापासून हातभर अंतरावर ती थांबली. नापसंतीच्या नजरेनी तिनी त्याच्याकडे पाहिलं. हातातलं पाकीट त्याच्याकडे भिरकावलं. साहेब कधीकधी त्याचा पेपर भिरकावत असे तसा.

'असलं काही लिहायच्याआधी स्वतःचं तोंड आरशात पाहायचं होतं' त्यालाच ऐकू जाईल अशा आवाजात ती बोलली. त्याला ती कडाडल्यासारखं वाटलं. ऑफिसभर ऐकू गेलं की काय अशी भीती वाटली. सुदैवानी वेळेच्या अगोदर कोणी येत नसे.

तिनी फेकलेलं पाकीट उचलून त्यानी बॅगेत टाकलं. संधी मिळताच ते फाडून फेकून द्यायचं होतं.

दिवस संपला. घरी गेल्यावर रात्री त्यानी आपलं तोंड आरशात पाहिलं. आपण खरंच कुरूप आहोत याबद्दल त्याची खात्री पटली.

रात्रभर तो झोपला नाही. अपमान नव्हता पण निराशेचं दुःख होतं.

काही दिवस गेले. त्याच विभागात आणखी एक ज्यूनियर ऑफिसर रुजू झाला. गोरापान. खुल्या वर्गातला.

काय होणार हे कोणालाही सांगता आलं असतं. आणि तसंच झालं.

खुल्या वर्गातला तो आणि ती विवाहबद्ध झाले.

तो काही वाटण्याच्या पलीकडे गेला होता. तीच काय पण दुसरी कोणतीही ती आपल्या आयुष्यात न आलेलीच बरी असं त्यानी ठरवून टाकलं होतं.

दीडएक वर्षात ऑफिसात पेढे वाटले गेले. त्यानी तिच्या त्याचं अभिनंदन केलं. मॅटर्निटी लीव्ह वरून परत आल्यावर तो सोडून सर्वानी तिचं अभिनंदन केलं.

वर्षही लोटलं नाही तोच पुन्हा वीज कडाडली. पण यावेळी त्याच्यावर नाही तिच्यावर कोसळली.

तिचा तो मोटार अपघातात ठार झाला होता.

ती रुजू झाल्यावर ऑफिसात अश्रूंचा पूर लोटला तिच्या सांत्वनासाठी.

सांत्वनाच्या उपचारासाठीही तो धैर्य गोळा करू शकला नाही.

एक दिवस जवळपास कोणी नाही असं पाहून त्याचा हितचिंतक त्याच्या जवळ आला. त्याला त्याची लवस्टोरी माहीत होती.

'देवाकडे न्याय असतो' हितचिंतक मनापासून म्हणाला. 

'हू' त्यानी प्रतिसाद दिला.

'त्यावेळी तुला झिडकारलं नसतं तर ...... ' हितचिंतक सहानुभूतीच्या स्वरात बोलू लागला.

त्याला मध्येच थांबवून तो म्हणाला, 'तर त्याच्या ऐवजी मी वर गेलो असतो'. हे आपल्या अगोदर कसं लक्षात आलं नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं.

हितचिंतक जायला उठला. 'इथे सहानुभूतीची गरज नाही' त्याच्या लक्षात आलं.

त्याला बसवून घेत हळूच आवाजात तो म्हणाला, 'तिला विचार रे आता तरी तयार आहे का? '

हितचिंतक चकित झाला. त्याला फार वेळ गोंधळात न ठेवता तो मोठ्यानी हसला नि म्हणाला, 'ए, मी गंमत केली बरं का! '