इंद्र जृंभकासुरास...!

कृष्णकुमार. द. जोशी ह्यांनी, 'पाहिजे/मिळेल' येथे 'इंद्र जिमि जंभपर' च्या मराठी अनुवादाबद्दल केलेली विचारणा पाहिली.
त्याबरोबर, 'इंद्र जिमि जंभपर' हे गाणे ऐकले, आणि त्याचा अनुवादही सुचला. तोच इथे देत आहे.

इंद्र जृंभकासुरास, वडवानल सागरास,
गर्वयुक्त रावणास, रघुकुलपति तो बली ।

वायु जसा मेघाला, शंभु जसा मदनाला,
आणि कार्तवीर्याला* राम विप्ररूप तो ।

वणवा जाळी द्रुमांस, चित्ता फाडी मृगांस,
मारी गजपुंगवास जैसा वनराज तो ।

तेज तमाच्या नाशा, कृष्ण जसा वधि कंसा,
म्लेंच्छांच्या ह्या वंशा, शिवराजा काळ हो ।

(*= कार्तवीर्य हे सहस्रार्जुनाचेच अजून एक नांव असल्याचे आठवते. चूक असल्यास कृपया कळवावे. )