निरोप

गेले चार दिवस चालू असलेली पावसाची रिपरीप थांबण्याचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. भिजट झालेली हवा दगडासारखी एका जागी गोठून पडली होती, आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला श्वास घेताना गळा घोटल्याची जाणीव छातीत उमटत होती. उजाडून बराच वेळ झाला तरी सूर्यप्रकाश तीव्रतेत कोपऱ्यात बारीक करून ठेवलेल्या कंदिलाच्या प्रकाशाशी स्पर्धा करीत होता.

अखेर संधीवाताने दुखणारे गुडघे दाबीत ती घोंगडीवर बसती झाली. तो मात्र छातीवर हात जुळवून आढ्याकडे टक्क उघड्या डोळ्यांनी पाहत पडला होता.

सराईत हातांनी तिने चुलीत जाळ केला. दमट गोवऱ्यांच्या करपट धुराने ढास लागली तेव्हा तो उठला. दरवाजाजवळ सरकत त्याने बाहेर चाललेल्या पावसाच्या बेबंदशाहीमध्ये आपलीही एक चूळ भिरकावून दिली.

चहाला उकळी आली तशी तिने विस्तव मागे घेतला आणि दोन भांड्यांत चहा घेऊन ती दाराशी आली.

उंचीत तिच्याशी बरोबरी करायला एखादे कोवळे झाडही अगदी पुरे झाले असते. वयोमानाने येणारा ओघळता स्थूलपणा तिच्यात जवळपास नव्हता. तिचा रंग निश्चितच उजळ होता आणि कपड्यांनी झाकलेला भाग लख्ख गोरा होता. तिचे सौंदर्य दृष्य स्वरूपात शिल्लक नसले तरी त्याची धूसर सावली तिच्या चेहऱ्यावरून अजून हटली नव्हती. तिच्या कपाळावर रुपयाच्या नाण्याइतके ठसठशीत कुंकू होते. केसांमध्ये अजूनही काळ्या रंगाचा वरचष्मा होता. नऊवारी लुगडे आणि चोळी या वेषावरून तिच्या सांपत्तिक स्थितीचा अंदाज बांधणे अशक्य होते.

तो दरवाजात बसला होता. त्याच्या अंगात बंडी आणि सदरा होता. त्याचे शरीर फाटके होते, पण एके काळी त्या शरीरात काटक ताकद होती हेही स्पष्ट होते. एरवी मुंडाशाने झाकलेल्या डोक्यावर मुंगीला लपायलाही जड जाईल एवढे केस होते. ते केस, मिशा, भुवया, सर्वत्र पांढरा रंग जोरावर होता. दोन्ही हातांची गुडघेमिठी घालून तो एकटक बाहेर बघत होता.

पावसाची रिपरीप जरा उणावली. शेजारच्या झोपड्यांतून इरले डोक्यावर घेतलेल्या माणसांनी बाहेर पडून बाजारचा रस्ता धरला.

बोलण्याला सुरुवात करण्याआधी त्याने एक खरखरीत खाकरा काढला. चहातून ऊबदार वाफा निघत होत्या.

"मग अखेर तुझा विचार पक्का आहे? " त्याच्या आवाजात असहाय्यता, स्वतःबद्दल संताप आणि कीव यांचे समप्रमाण मिश्रण होते.

"मला वाटते की ते आता पुरेसे स्पष्ट झाले आहे" तिच्या आवाजात कंटाळलेपणा समजूतदारपणाच्या मागे दडला होता.

"हं! पन्नास वर्षांपूर्वी कुणी सांगितले असते की अखेर हे असे होणार आहे तर... "

"तर हे असे झाले नसते? ही आशा म्हणून ठीक आहे, पण विचार म्हणून तर्काच्या कसोटीला नाही उतरत. अखेर मीदेखिल ही पन्नास वर्षे तुमच्याबरोबर काढली आहेत. मुलांना माझे रक्तमांस देऊन घडवले आहे. पण हा प्रश्न, नव्हे ही घटना, हा आकडा तुम्ही सतत जप करायला का घेता? "

"हे बघ, तू निर्दयी आहेस असे मला म्हणायचे नाही. पण माझ्यापुरते म्हणशील तर माझ्यादृष्टीने या पन्नास वर्षांना काही विशेष अर्थ आहे. सतत सहवासाने प्राण्यांच्या मनातसुद्धा आपलेपणाची भावना उमटते. माझ्याकडून चुका झाल्या. नाही असे मुळीच नाही. पण त्याचे प्रायश्चित्त म्हणून या स्मृती हिरावून घेणे हे.... हे मला अन्यायाचे वाटते. "

"प्राण्यांना आपलेपणाची भावना असते यात मला सवयीचा भाग जास्त वाटतो. पण ती सर्वच जीवमात्रांना होते. आणि त्या सवयीत अनिवार्यतेचा भाग मोठा असतो. उद्या जर मानवाखेरीज इतर प्राणी प्रबळ झाले, ही माणसाची अनिवार्य भीती त्यांच्या मनातून नाहिशी झाली, तर या आपलेपणाच्या भावनेतला आणि सवयीतला फरक कळेल.

"तुमच्या चुका होत होत्या तेव्हा दरवेळी माझी बाजू मी तुम्हांला समजावीत होते. त्यावेळेस दरखेपेला मला डावलून तुम्ही निर्णय घेत गेलात. तुमचीही काही विचारसरणी असेल. त्या विचारसरणीत मला स्थान नसेल. मग या घटनेची बीजे तेव्हाच अंकुरायला लागली होती.

"पन्नास वर्षांच्या स्मृती या सर्व त्या विचारसरणीशी निगडित झाल्या आहेत. हव्याहव्याशा वाटणाऱ्या स्मृतीदेखिल याच विचारसरणीने घडवल्या होत्या. आता 'चूक झाली' असे म्हणून तुम्ही जर ती विचारसरणी नाकारत असलात तर तिच्याशी निगडित स्मृतीही तुम्हांला नाकाराव्या लागतील.

"माझ्या दृष्टीने मला तरी या स्मृतींमध्ये काहीच निर्णयस्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे माझ्या दृष्टीने त्या केवळ घडून गेलेल्या, ज्यांच्या सत्यतेबद्दल मला खात्री आहे अशा घटना आहेत. "

"मला तरी तेव्हा निर्णयस्वात्रंत्र्य होते असे तुला वाटते का? आबा जी कर्जे आणि धाकट्या भावांची एक पलटण मागे सोडून गेले होते ते निभवायचे या एकाच विचाराने माझ्या हातून त्या गोष्टी घडत गेल्या. "

"तो विचार माझाही होता ना? ते निभवण्यात माझीही काहीतरी मदत झाली ना? मग तुम्ही एका वर्तुळात जखडले गेले होतात म्हणून मला त्याहून लहान वर्तुळात जखडण्याचा तुमचा अट्टाहास का होता?

"जे झाले ते झाले. ते आता नाकारता येणार नाही. आणि नाही म्हटले तरी त्यावेळेस घडून गेलेल्या घटनांमुळेच आज आपल्याला या गोष्टींची चर्चा करण्याइतके आर्थिक आणि कौटुंबिक स्वात्रंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे त्या स्मृती सुखद वाटत नसल्या तरी त्यांच्याबद्दल थोडी कृतज्ञता निश्चित वाटते. "

"मी अजूनही माझी विचारसरणी नाकारायला, सगळ्या गोष्टींची नव्याने सुरुवात करायला तयार आहे. "

"केवळ नव्याने सुरुवात करू म्हणून गोष्टी बदलत नाहीत. आपले अस्तित्व तर बदलता येत नाही ना? आणि खरे सांगायचे तर कार्यतत्पर रहायची माझी उभारी मोडली आहे. 'आता काही माझ्या मनाजोगे, माझ्या अस्तित्वाला स्वीकारून उमलणारे असे काही घडणार नाही' असे मला म्हणायचे नाही, कारण भविष्याचे ज्ञान मला निश्चितच नाही. पण असे काही घडेल या आशेवर इतकी वर्षे काढल्यावर माझी ती आशाच मरून गेली आहे.

"आतापर्यंत मी माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या मला गृहीत धरून टाकल्या गेल्या त्या पुरत्या करण्यासाठी धडपडले. आता एकदा तरी माझ्या मनाला पटणाऱ्या गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य मला खुणावते आहे. आपली शरीरप्रकृती पाहता ते स्वातंत्र्य काही वर्षांचे अथवा काही महिन्यांचेच असेल कदाचित, पण म्हणून त्या स्वातंत्र्याचे आकर्षण माझ्यादृष्टीने तरी कमी होत नाही. तेव्हा पुन्हापुन्हा हा काथ्याकूट करत बसण्यात मला तरी अर्थ वाटत नाही.

"मी तुम्हांला दोष देत नाही. कारण तुमच्या वा इतरांच्या दृष्टीकोनातून माझ्याही चुका झाल्या असतील. पण शेवटी हे सगळे तोलणारा माझ्या मनाचा तराजू मला झुकते माप घालणारच. म्हणून सर्वज्ञतेचा आव आणून मी कुणाला दोष देऊ इच्छित नाही.

"निरोप घेताना याहून काय सांगू? "

असंख्य ज्वालामुखींचे स्फोट घुमत राहावेत तसा आवाज झाला. एक थोरली दरड आभाळातून झेपावत आली.

त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्निग्ध समाधान होते. त्याचा चेहरा ओलसर विटक्या कपड्याच्या बोळ्यासारखा दिसत होता.