श्री. सौरभ२००९ यांनी खाली दिलेल्या शंका विचारल्या होत्या. त्यासाठी हा लेख लिहित आहे.
भारतातील बचतगट हे विकेंद्रित आहेत असे आपण वर म्हटले आहे. मग नवीन बचतगट स्थापण्याचं काम कोण करत? म्हणजे मला अस विचारायच आहे की हे सर्व नियंत्रित कोण करतं? बांग्लादेशात युनुस यांची ग्रामिण बँक हे सर्व करते तर भारतात कोण?
अजून एक म्हणजे, हे बचतगट व त्याचे सदस्य कुठल्या प्रकारचे व्यवसाय करतात, साधारण किती दिवसात त्यांना कर्ज परतफेड करावे लागते, त्यांना व्यवसाय मार्गदर्शन कोण करतं? बांग्लादेशाप्रमाणे भारतातही महिलांचा सहभाग ह्यात अधिक आहे का... वगैरे मुद्द्यांवर अजून एक माहितीपूर्ण लेख आला तर (तर काही नाही, माझं ज्ञान वाढेल, बाकी काही नाही)...
विकेंद्रिकरणाबद्दल अजून एक म्हणजे, एकाच सदस्याने बऱ्याच बचतगटात सामील होऊन अधिक कर्ज घेतले तर त्यावर नियंत्रण कोण ठेवणार?...
भारतातील बचतगटांची निर्मिती - एक विकेंद्रित प्रक्रिया
१) समाजाचा कलुषित दृष्टिकोन : महंमद युनुस यांनी जेव्हा कार्य करायला सुरवात केली तेव्हाची परिस्थिती खूपच वेगळी होती कारण दारिद्र्यरेषेखालील लोकांकडे बघण्याची समाजाची दृष्टी कलुषित होती. गरीब लोकांना पैसे कर्जाऊ दिले तर ते व्याजासकट परत करतील यावर कोणाचा विश्वासच नव्हता. उलट या गरीब लोकांना पैसे दिले म्हणजे ते बुडीत खात्यात जमा होतील अशी ठाम समजूत होती. गावातील सावकार फक्त त्याला अपवाद होते. गरीब माणसांना पैसे देण्यात कोणताही धोका नाही हे त्यांना अनुभवाने कळले होते. या सावकारांचा अनुभव असा होता की, गरीब लोकांना पैसे कर्जाऊ दिल्यामुळे कोणत्याही सावकाराचे अजूनपर्यंत दिवाळे निघालेले नाही, उलट या मार्गाने सावकार अधिक श्रीमंत होतो.
२. महंमद युनुस यांचे वेगळेपण : दारिद्र्यरेषेखालील लोकांबद्दल समाजाच्या मनात अनुकंपा नव्हती असा मात्र याचा अर्थ नाही. फक्त त्यांच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज होती. समाजाची ही दृष्टी बदलण्याचे महत्कार्य महंमद युनुस यांनी प्रथम केले आहे. हे कार्य ते करू शकले, कारण भिकारी व दारिद्र्यरेषेखालील माणूस यामधील फरक ते जाणू शकले.
३. भिकाऱ्यांची मानसिकता : भीक मागणे हा ज्याने व्यवसाय मानला आहे त्याला तुम्ही नोकरी देऊ केली तरी तो ती स्वीकारणार नाही. लोकांकडून जे मिळते ते कधीही परत करायचे नसते यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. पण नाईलाजाने ज्यांच्यावर भीक मागायची पाळी आली आहे असेही भिकारी असू शकतात हे प्रथम प्रोफेसरांच्या लक्षात आले. इतकेच नव्हे तर त्यांनी हे सिद्धही करून दाखवले की, काही भिकारी असेही असतात की जर त्यांना उदरनिर्वाहाचे एखादे साधन मिळवून दिले तर ते त्यांचा भिकेचा धंदा कायमचा सोडून देतात.
४. दारिद्र्यरेषेखालील लोकांची मानसिकता : अगदी त्याचप्रमाणे दारिद्र्यात राहावयाची इच्छा नसूनही काही जणांना नाईलाजाने दारिद्र्यात खितपत पडावे लागते कारण दारिद्र्यातून बाहेर पडायची संधीच त्यांना मिळत नाही अथवा आपण ती त्यांना मिळवून देत नाही. पिढ्यांन पिढ्या दारिद्र्यात कुजत राहिल्यामुळे यातून बाहेर पडायचा मार्ग असू शकतो हे या लोकांच्या गावीही नसते. मुहंमद युनुस यांनी जेव्हा २७ डॉलरची मदत करून त्यांच्या कार्याला सुरवात केली तेव्हा त्या लोकांना ते देवदूत का वाटले हे यावरून समजून येईल. महंमद युनुस यांना सर्वप्रथम हे सगळे जाणवले हेच त्यांचे वेगळेपण आहे. आपल्या प्रयोगातून त्यांनी हेदेखील सिद्ध केले की, दारिद्र्यातून बाहेर पडण्याची संधी जर आपण गरीब लोकांना मिळवून दिली तर हे लोक दारिद्र्यातून बाहेर पडू शकतात. महंमद युनुस एक गोष्ट नेहमी सांगतात, "आपल्या समोर कोणते आव्हान आहे हे प्रथम नीट समजून घ्या. असे केले तरच त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी योग्य तो मार्ग मिळू शकेल.
५. बांगला देशात ग्रामीण बँक स्थापन करण्याची जरुरी : महंमद युनुस यांचे कार्य व त्या कार्यामागे असलेली विचारसरणी यावर लोकांचा विश्वास बसण्यासाठी त्यामागे कायद्याचे एखादे अधिष्ठान असणे अत्यंत जरूरीचे होते. ती एक त्यावेळच्या काळाची गरज होती. कारण अशा प्रकारचा प्रयोग हा जगातील पहिलाच प्रयोग होता. गरीबांना कर्ज देणारी, कायद्याचा आधार असलेली ग्रामीण बँकेची स्थापना त्यातून झाली. इतकेच नव्हे तर अशी बँक गरिबीतून बाहेर पडण्यासाठी धडपड करणाऱ्या लोकांच्या मालकीची असली पाहिजे या विचारावर ते ठाम होते. किंबहुना गरीब लोकांच्या प्रामाणिकपणाबद्दल ज्यांना शंका वाटते त्यांच्या हातात या बँकेची सूत्रे नसली पाहिजेत हे त्यांनी आपल्या मनात नक्की केले होते. यामुळे ग्रामीण बँकेचे कर्मचारी व गरीब कर्जदारांमध्ये, ग्रामीण बँक व तिचे कार्य याबाबत आत्मीयता निर्माण करण्यात त्यांना यश आले.
६. बदललेली मानसिकता व भारत : महंमद युनुस यांना भिकारी लोकांची मानसिकता व दारिद्र्यरेषेखालील लोकांची मानसिकता यातील नेमका फरक लक्षात आला. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या तसेच "आहे रे" वर्गातील लोकांच्या मानसिकतेला सकारात्मक वळण देण्याचे महत्त्वाचे कार्य मुहंमद युनुस करू शकले. गरीबांना कर्ज देण्यासाठी बांगला देशात जशी ग्रामीण बँक आहे तशी एक मध्यवर्ती बँक भारतातही असावी असे बऱ्याच जणांना वाटते. अगदी महंमद युनुस यांनाही वाटते. पण आजही भारतात अशी बँक अस्तित्वात नाही. असे असले तरीही भारतात बचत गटांची चळवळ जोर धरत आहे. याचे कारण एकच व ते म्हणजे आता परिस्थिती खूप बदललेली आहे. या बदललेल्या परिस्थितीचे कारण स्वत: महंमद युनुसच आहेत. बांगला देशातील त्यांच्या यशस्वी प्रयोगामुळे आज लोकांना विश्वास वाटू लागलाय की, गरीबांना जर पैसे कर्जाऊ दिले तर ते पैसे हे लोक व्याजासकट परत करतात. नेमका हाच विश्वास फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरायला लागलाय. गरीब लोकांनी बँकेची कर्जे थकविल्यामुळे नव्हे, तर ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्कृष्ट आहे अशा राजकारणी मंडळींमुळे किंवा बँकेच्या संचालक मंडळींमुळे बँका धोक्यात येऊ शकतात, हे आता लोकांच्या लक्षात येऊ लागलेले आहे.
७. भारतातील बचतगटांची स्थापना : बांगला देशातील ग्रामीण बँकेसारखी बँक, भारतात अस्तित्वात नाही म्हटल्यावर साहजिकच मनात शंका येते की, असे असेल तर भारतात बचत गट निर्मितीचे काम कोण करते? शासन, ग्रामपंचायत, बँका, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था किंवा समाजकार्याची आवड असणारी कोणतीही व्यक्ती अथवा व्यक्तिसमूह स्वयंसहायता बचत गट स्थापन करू शकतात. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. समाजसेवा करणे ही जशी ऐच्छिक बाब आहे अगदी त्याचप्रमाणे बचत गट स्थापन करण्याचे कार्य ऐच्छिक आहे असेच म्हणता येईल. थोडक्यात बचतगट कोणी तयार करावेत याबाबत काही निकष असले तरी याबाबत कोणत्याही कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वानुसार आर्थिक, सामाजिक किंवा शैक्षणिक पात्रता निश्चित केलेली नाही. थोडक्यात भारतात बचत गट स्थापन करण्याचे काम हे विकेंद्रित स्वरूपात चालू आहे. त्यासाठी कोणतीही मध्यवर्ती संस्था भारतात नाही. भारतातील बचतगटांमध्ये आजही महिलांचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण साधारणतः ७० टक्के पेक्षा जास्त आहे.
उदाहरणार्थ मार्च २००८ ला संपलेल्या वर्षात
१) स्वयंसेवी संस्थांनी १६२४ बचत गट स्थापन केले.
२) बँकांनी २८४९२ बचत गट स्थापन केले.
३) शासनाने ८९० बचतगट स्थापन केले.
४) व्यक्तिगत पातळीवर फक्त १०४ बचत गट स्थापन केले गेले.
८. अप्रत्यक्ष नियंत्रण : असे असूनही एका वेगळ्यापद्धतीने या सगळ्याचे नियंत्रण होत असते. हवे तर आपण याला अप्रत्यक्ष नियंत्रण म्हणू या. बचतगट हे बहुतांशी दारिद्र्यरेषेखालील सदस्यांचे असतात. हातावर पोट असलेली ही मंडळी असतात. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या कुठल्याही आर्थिक अडचणीला तोंड द्यायला ते सक्षम नसतात. याचाच अर्थ असा की, कर्जाद्वारे पैसे उभे करण्याची यांनाच खरी गरज असते. बचतगटाचे सदस्य दरमहा ठराविक रक्कम गटाकडे सुपूर्त करून, त्या जमा झालेल्या पैशातून आपल्या सभासदांना कर्जे देत असले तरी ही रक्कम खूप तुटपुंजी असते. खरेतर दरमहा काही निश्चित रक्कम शिल्लक टाकायची सवय लागावी. पैशाचे हिशोब ठेवण्याची शिस्त लागावी किंवा हिशोबपद्धतीचा त्यांना अनुभव यावा, ठराविक अवधीनंतर एकत्र येण्याची सवय व्हावी आणि मुख्य म्हणजे घेतलेले कर्ज फेडायची वृत्ती तयार व्हावी हेच यातून साधले जात असते. या सगळ्या गोष्टी बँकेचे कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक असतात. जेव्हा या लोकांना बँकेचे कर्ज मिळते तेव्हाच त्यांची खऱ्या अर्थाने उन्नती सुरू होते.
मी जे अप्रत्यक्ष नियंत्रण म्हणतो आहे ते बँकेकडून कर्ज मिळविण्याच्या संदर्भात आहे. कर्ज मागावयास आलेल्या बचतगटाचे १६ मुद्द्यांच्या आधारे बँक प्रथम मूल्यमापन करते व मगच कर्ज मंजूर करायचे किंवा नाही ते ठरवते. हे मूल्यांकन अतिउत्तम, उत्तम व असमाधानकारक या तीन श्रेणीत केले जाते. ते १६ मुद्दे पुढे देत आहे. त्यावरून बँकेला जोडलेला बचतगट म्हणजे नक्की काय त्याची कल्पना येऊ शकेल. तसे त्यामुळे अनेक शंकांचे निरसन होऊ शकेल.
९. बचत गटांचे मूल्यांकन करण्याचे निकष:
क्र. | निकष | तपशील |
---|---|---|
१ | सदस्य संख्या | १५ ते २० अतिउत्तम, १० ते १५ उत्तम, १० पेक्षा कमी असमाधानकारक. |
२ | आर्थिक स्तर | सर्व सभासद अत्यंत गरीब कुटुंबातील-अतिउत्तम, २-३ सभासद गरीब नसतील तर उत्तम, जर जास्तीत जास्त सदस्य गरीब कुटुंबातील नसतील तर असमाधानकारक. |
३ | बैठकांची संख्या | महिन्यातून ४ वेळेस अतिउत्तम, महिन्यातून दोनदा उत्तम, महिन्यातून दोनपेक्षा कमी असमाधानकारक. |
४ | बैठकीची वेळ | सायंकाळी ६ नंतर किंवा रात्री अतिउत्तम, सकाळी ७ ते ९ उत्तम, याशिवाय कोणत्याही इतर वेळेस असमाधानकारक. |
५ | उपस्थिती | ९०% पेक्षा जास्त अतिउत्तम, ७०% ते ९० % उत्तम, ७०% पेक्षा कमी असमाधानकारक. |
६ | सहभाग | भरपूर अतिउत्तम, मध्यम उत्तम, साधारणपणे कमी असमाधानकारक. |
७ | सभासदांनी बचत रक्कम बचतगटाकडे जमा करण्याची पद्धत | महिन्यातून ४ वेळेस अतिउत्तम, महिन्यातून ३ वेळेस उत्तम, ३ पेक्षा कमी असमाधानकारक. |
८ | बचतीची रक्कम | सर्वांनी एक ठराविक रक्कम देणे अतिउत्तम, सदस्यांच्या कुवतीनुसार बदलणारी रक्कम उत्तम, अन्यथा असमाधानकारक. |
९ | अंतर्गत कर्जावरील व्याजाचा दर | कर्जाच्या उद्देशानुसार व्याजदर अतिउत्तम, दरमहा २% ते ३% उत्तम, ३% पेक्षा अधिक असमाधानकारक. |
१० | गटाकडे जमा झालेल्या रकमेचा विनियोग | संपूर्णपणे सदस्यांना कर्जवाटपासाठी अतिउत्तम, एकूण जमा रकमेपैकी काही रक्कम कर्जवाटपासाठी उत्तम, कधीतरीच कर्जवाटपासाठी असमाधानकारक. |
११ | सभासदांकडून कर्जवसुली | ९०% ते १००% अतिउत्तम, ७०% ते ९०% उत्तम, ७०% पेक्षा कमी असमाधानकारक. |
१२ | हिशोब पुस्तके | सर्व रजिस्टर्स नियमीतपणे व वेळच्यावेळी अतिउत्तम, काहीच रजिस्टर्स नियमीतपणे व वेळच्यावेळी उत्तम, अनियमीतपणे अथवा काही दिवस उलटल्यावर रजिस्टर्स लिहिणे असमाधानकारक. |
१३ | एकूण बचत | ५, ००० पेक्षा जास्त अतिउत्तम, ३, ००० ते ५, ००० उत्तम, ३, ००० पेक्षा कमी असमाधानकारक. |
१४ | गटाने केलेले नियम किंवा अटी | सर्व सदस्यांना नियमांची संपूर्ण माहिती अतिउत्तम, काही सदस्यांना संपूर्ण माहिती व काहींना अपूर्ण माहिती उत्तम, बहुसंख्य लोकांना नियम व अटी यांची माहिती नसणे असमाधानकारक. |
१५ | साक्षरतेचे प्रमाण | ३०% किंवा अधिक अतिउत्तम, २०% ते ३०% उत्तम, २०% पेक्षा कमी असमाधानकारक. |
१६ | सरकारी योजनांबाबत असलेली जागरूकता | सर्वांना सरकारी योजनांबद्दल चांगली माहिती असते अतिउत्तम, बहुसंख्य सदस्यांना माहिती असते उत्तम, बहुसंख्य लोकांना माहिती नसते असमाधानकारक. |
वरील निकषांपैकी १३ किंवा त्यापेक्षा जास्त निकषांमध्ये अतिउत्तम श्रेणी मिळालेल्या बचतगटांना ताबडतोब कर्ज देण्यास हरकत नसल्याचे बँका समजतात. एकूण १० किंवा १२ निकषांमध्ये अतिउत्तम श्रेणी मिळविणाऱ्या बचतगटांना कोठे सुधारणा करायला हवी आहे ते सांगून कर्जमंजूरीसाठी ३ ते ६ महिन्यांची मुदत देतात. अर्थातच इतर बचतगट कर्ज मिळविण्यास पात्र नसल्याचे समजले जाते.
१०. कर्जमंजूरी : कर्जमंजूरी व कर्जाचे वाटप नेहमी बचतगटाच्या नावे होत असते त्यामुळे त्या कर्जाची जबाबदारी गटाच्या सर्व सदस्यांची सामूहिक असते. एखाद्या सदस्याच्या नावे संपूर्ण कर्ज मिळत नाही अगर वितरीतही होत नाही. त्यामुळे एखाद्या सदस्याने संपूर्ण कर्ज घेऊन ते कर्ज बुडविल्यामुळे सर्व बचतगट धोक्यात येण्याची शक्यता कमी होते. तसेच सर्व सदस्य गरीब असल्याने व सर्वांनाच पैशाची जरुरी असल्याने कोणा एका सदस्याला सर्व कर्ज देण्यास इतर सभासद तयार होत नाहीत. तसेच बँका कर्जाची रक्कम ठरविताना त्या बचतगटाची सामूहिक बचतीच्या १ ते ४ पट इतकेच कर्ज मंजूर करतात. यामुळे लाखो रुपयांचे घोटाळे एखादा बचतगट करू शकत नाही. आपल्या बचतीच्या प्रमाणात कर्ज मिळते हे लक्षात आल्याने जास्तीत जास्त बचत करण्याची वृत्ती वाढीस लागते. कर्ज साधारणतः ३ वर्षांसाठी असते.
एखादा सभासद एका पेक्षा अनेक बचत गटांचा सभासद होऊ शकत असला तरी तो कोणत्याही एकाच बचत गटाचा प्रतिनिधी होऊ शकतो. प्रतिनिधी म्हणजे सचिव अथवा अध्यक्ष होय ज्यांच्या हातात साधारणत: सर्व सूत्रे असतात. त्यामुळे अनेक बचतगटांचे सदस्यत्व असले तरी तो सर्व बचतगटांची कर्जांची सगळीच्या सगळी रक्कम हडप करू शकत नाही. तसेच इतर सभासदांना फसवणे इतके सोपे नसते.
एखाद्या गृहरचना संस्थेच्या ४ मजली इमारतीमधील २० सभासद हे जेव्हा तेथे राहावयास येतात तेव्हा त्यांची एकमेकांशी ओळख नसते. कालांतराने त्यांचे आपापसातील संबंध वाढले तरी ते एवढे घनिष्ट होत नाहीत. त्यामुळे सुरवातीच्या काळात एखादा सभासद विश्वासाचा गैरफायदा घेऊन इतरांना फसवू शकतो. याउलट बचतगटातील सदस्य एकमेकांना सुरवातीपासून ओळखत असतात. एकमेकांची आर्थिक स्थिती, व्यवसाय, गुणदोष याबाबत एकमेकांना माहिती असते. अशा परिस्थितीत तो बचतगट स्थापन झालेला असतो. त्यामुळे कोणावर किती विश्वास ठेवावयाचा याबाबत सर्व सभासद तसे जागृत असतात.
११. कर्जवसूलीचे प्रमाण : बचतगट जी बचत दरमहा जमा करतात त्या पैशाबद्दल ते अतिशय जागरूक असतात. तसेच जे कर्ज मिळालेले असते ते पैसे त्यांना आपले वाटत असतात. सगळ्यांचीच ती सामूहिक जबाबदारी आहे हे जाणत असतात. कोणी कर्जाचा हप्ता दिला नाही तर इतर सदस्य त्याचेवर दबाव आणतात. इतकेच नव्हे तर कर्जफेड चुकविण्यासाठी एखादे खोटे कारण सांगणे शक्य नसते कारण सर्व सदस्यांना त्या सदस्याबद्दल पूर्ण माहिती असते. या सर्वांचा परिणाम म्हणून कर्जवसूली १००% असू शकते. कर्जवसूलीसाठी बँकेला अजिबात खर्च अथवा त्रास सोसावा लागत नाही.
१२. रोजगार प्रशिक्षण : बचतगटाच्या सदस्यांचा पैसे मिळविण्यासाठी कोणता ना कोणता उद्योग चालूच असतो. कुटुंबातील एक माणूस मिळवता व बाकीचे त्यावर अवलंबून अशी परिस्थिती असू शकत नाही. प्रत्येकाने कष्ट करायचे व आजच्या दिवसाच्या जेवणापोटी काहीतरी मिळवावयाचे ही त्यांची जीवनपद्धती असते. यासाठी ते जे उद्योग करीत असतील त्या उद्योगाचा उत्कर्ष कसा होईल याकडे प्रथम लक्ष द्यावे लागते. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे किंवा प्रोजेक्ट रिपोर्टची छाननी करणे हे तर बँकांचे मूलभूत कार्य आहे. त्यामुळे व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी बँकांचे कर्मचारी खऱ्या अर्थाने सक्षम असू शकतात. ज्या गावात बचतगट आहे, त्या गावाची भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध कच्चा माल, बचतगटांच्या सदस्यांचे कौशल्य, बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यांचा तौलनिक अभ्यास त्यासाठी आवश्यक असतो. तसेच मोठ्या प्रमाणावर खरेदी व विक्रीचे फायदे तसेच समूहाने काम केल्याने होणारी खर्चातील बचत यांचाही विचार करायला लागतो. या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून बचतगटांच्या सदस्यांना मार्गदर्शन करायला लागते. यासाठी बँकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर मदत होऊ शकते कारण बँकांकडे निरनिराळ्या सरकारी योजना, स्वयंरोजगार निर्मिती बाबतचे प्रशिक्षण कार्यक्रम, इतर बचत गटांनी योजलेले उपाय, वैशिष्ट्यपूर्ण व यशस्वी बचतगटांचा इतिहास याबाबत प्रचंड माहिती उपलब्ध असते.
१३. धोका : एकमेकांबद्दल अविश्वास व त्यातून होणारी भांडणे, निरक्षरतेमुळे गटाची सूत्रे एकाच साक्षर सदस्याकडे राहणे व त्यामुळे त्या सदस्याचा वरचष्मा राहणे किंवा त्यातून त्याची वृत्ती हम करे सो कायदा अशी बनणे. अज्ञानामुळे होणारे गैरसमज व ते दूर करण्यासाठी तज्ञाचे मार्गदर्शन न मिळणे या प्रमुख अडचणी आहेत. राजकारणी लोकांनी निवडणूक प्रचार करण्यासाठी अथवा एकगठ्ठा मतांसाठी त्यांचा केलेला वापर किंवा त्यांच्या मनात इतर गटांबद्दल निर्माण केलेला अविश्वास किंवा राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्याच्यात निर्माण केलेली असुरक्षितता इत्यादी घटक हानिकारक असू शकतात.