संपता संपेचना कल्लोळ ह्या देहातला
ऐकला नाहीच मी आवाज कारण आतला
एकदा केली मनावर मात मेंदूने जरा
तेवढ्यानेही किती आयुष्यभर तो मातला
आज साक्षात्कार झाला; जग असे का वागते?
आज जवळून पाहिला, मीही पशू माझ्यातला
बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला
काल आयुष्यात पहिल्यांदा पराभव चाखला
चक्क छातीवर जगाने घाव की हो घातला!
एकदा मागे जरासा गोड त्यांना लागलो
त्याक्षणापासून झालो ऊस मी चरकातला
शेवटी कंटाळुनी तो खालती आला पुन्हा
थाट सारा बेगडी होता म्हणे स्वर्गातला
लावले त्यांनी दिवे आपापल्या गावांमध्ये
दूर ना झाला तरी अंधार ह्या देशातला
काय माझी कैद ह्या जन्मी तरी संपेल का?
ह्या विचारानेच कैदी त्रस्त गाभाऱ्यातला