कुणाकुणाला जरी समजला, मला परंतू कळला नाही...

कुणाकुणाला जरी समजला, मला परंतू कळला नाही...

जुन्याच घटना कुणी कधीचे ,इथे तपासत बसले आहे
जुन्याप्रमाणे नवीन येथे ,कधी तरी का घडले आहे?

तसाच धुरळा, तशाच वाटा ,तशीच चिंता, गावी बाकी...
जिथून पक्का भरून पाया ,शहर नव्याने वसले आहे

खुशाल मोठा धरून दाणा, समोर बसली खारूताई
मिटून डोळे हळूच मागे, लबाड मांजर टपले आहे

मला पुरे भूतकाळ अपुला, खुणावती तुज सुंदर वाटा
तुलाच लाभो ,उद्यात जे जे, हवेहवेसे  दडले आहे
 
रिमझिमणारे तुषार झेलुन..तहानलेली उरते माती..
विरून शपथा, सरून प्रीती तशीच आता उरले आहे

’तुझाच मी" अन ’तुझीच मी "च्या सुरूच त्यांच्या आणाभाका...
जरी मनाला असत्य आहे कुणीतरी हे.. कळले आहे..

कुणाकुणाला जरी समजला, मला परंतू कळला नाही...
हिशोब करते शिवाय त्याच्या कितीक माझे चुकले आहे..
-सोनाली जोशी