गाण्यांतील अनावर आणि अनिवार वाद्यसंगीत!

मी पहिलीत असताना राजकपूरचा 'संगम' सिनेमा लागलेला होता. सगळी गाणी ज्याच्या त्याच्या तोडी असायची. त्यातल्या एका गाण्याच्या आठवणीवरून हा चर्चेचा विषय सुचला.

त्यात यह मेरा प्रेमपत्र पढकर हे गाणे आहे हे सगळ्यांना माहीतच आहे. त्या गाण्यात दर कडव्याचे शेवटी

इंतजारमें - इंतजारमें - इंतजारमें - टुण्

असा वाद्यसंगीताचा 'टुणत्कार' कुणी ऐकलेला नसेल असे वाटत नाही. ऐकलेल्या कुणाकडून तो विसरला जाणेही कठीण आहे. तो टुण् म्हटल्याशिवाय ते गाणे म्हणून दाखवता येणारच नाही असे वाटते. माझे हिंदी भाषेचे ज्ञान हल्लीपेक्षा(ही) त्रोटक होते तरी हे गाणे मी म्हणण्याचे सोडत नसे. एक लोटी पालथी ठेऊन बाबांच्या पूजेतल्या पळीने त्यावर टुण् असा आवाज काढायला मला फार आवडायचे

सांगायचा मुद्दा असा की हा टुणत्कार अगदी अनावर होता.

हे कशामुळे होत असावे?

संगीतकाराने तशी योजना केल्यामुळे आणि आपण ती वारंवार ऐकत असल्यामुळे आपल्याला ते वाद्यसंगीत 'अनावर' होत असावे काय?

की गाण्याला चाल लावताना असा प्रसंग येतो की असे काही वाद्यसंगीत त्यात घातल्याविना ती ओळ पुरी होणार नाही असे संगीतकार प्रतिभेने जाणतो आणि असे वाद्यसंगीत 'अनिवार' होते?

मराठीतले अगदी असे गाणे आठवायचे तर.

'पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा' हे गाणे. त्यातल्या कडव्यात.

बाजुबंद ह्या गोठ पाटल्या बिलवर नक्षीदार - टुरुडुरुडुण्
तुझ्या हृदी गं कुणी छेडिली रतिवीणेची तार - टुरुडुरुडुण्

हे ओळींच्या शेवटचे वाद्यसंगीत अगदी असेच अनावर आणि अनिवार आहे.

तुम्हाला अश्या अनावर आणि अनिवार वाद्यसंगीताच्या आणखी ओळी आठवातात का पाहा बरे! बघुया तरी मनोगती किती जमवतात अशी गाणी.

-मेन
टीपः हा प्रस्ताव आधीच लिहून तयार होता; पण नेमक्या त्याच वेळी टवाळांनी आपले भाषांतर कोडे प्रसिद्ध केले, म्हणून प्रकाशित करायची थांबले. आता ते पुष्कळ जणांनीओळखले आहे, म्हणून हा प्रस्ताव प्रकाशित करीत आहे. - मेन