नायक

'... कुमार फक्त गायक नव्हता, तो नायक होता'. पं. भीमसेन जोशींनी कुमार गंधर्वांचं एका वाक्यात केलेलं हे वर्णन! (संदर्भ - 'कुमार' - वसंत पोतदार. )
दुसऱ्या एका समर्थ नायकाबद्दल लिहिताना हे सहज आठवलं... 
किशोर कुमार हा गायक म्हणून आपल्याला नेहमीच प्रिय असतो, संगीतकार म्हणूनही तो आपल्याला आवडलेला असतो आणि नट म्हणून आठवला की काही हास्याच्या लहरी मनाला स्पर्शून, सुखावून जातात...
त्याचे चित्रपट किंवा गाणी बघताना एक वेगळेपण लक्षात यायला लागलं. एक नट म्हणून त्याची गाणी किती विविध संगीत दिग्दर्शकांकडून ध्वनिमुद्रित झाली आहेत! त्या प्रत्येक संगीतकाराला त्यानं नट आणि गायक या दोन्ही भूमिकांमधून किती न्याय दिला आहे! 
आठवता आठवता एक यादीच तयार झाली. 
१. झुमरू - स्वतः किशोर कुमार (झुमरू) - त्याची आनंदी, दु:खी, द्वंद्वगीतं, शांत, रागदारीवर आधारित अशी अनेक असली तरी या गाण्याची मजा औरच आहे. तो स्वतः शिकला नव्हता, पण 'कोई हमदम ना रहा' यावरची मूळ झिंझोटीतली चीज ऐकून त्याच्या व्यासंगाची खात्री पटते. 'भोला भोला मन' हे द्वंद्वगीत आणि 'ठंडी हवा' हे शांत सुंदर गीत... वा! (मला 'गे गे गे गेली जरा टिंबक्टू' पण आवडतं.) 'दूर गगन की छांव में' मधलं 'आ चल के तुझे' हे तर अजूनच वेगळं.
२. नखरेवाली - शंकर-जयकिशन (न्यू दिल्ली) 
रंगोलीतल्या 'छोटीसी ये दुनिया' चा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. शैलेंद्रचं अजून एक सुंदर गीत! या दोन्ही गाण्यांतून शंकर-जयकिशनच्या शैलीचाही उत्तम परिचय होतो. 
३. ऐ हसीनो - मदन मोहन (चाचा जिंदाबाद) 
या गाण्यातलं पहिल्या कडव्याच्या आधीचं 'यॉडलिंग' सर्वांत अवघड आहे असं मला वाटतं. - किशोरकुमारचं मी आयुष्यात ऐकलेलं हे पहिलंच गाणं. त्याची ओळख पटवायला खूपच योग्य आहे असं वाटतं. (लहानपणापासून लाखेच्या रेकॉर्डवर ऐकतोय...)
४. मुन्ना बडा प्यारा - सलील चौधरी (मुसाफ़िर). 'हाफ टिकट' मधलं 'झूम झूम कव्वा' हेही असंच एक सुंदर गाणं.
५. ये राते ये मौसम - रवी (दिल्ली का ठग). 'कॅट माने बिल्ली' हेही अप्रतिमच.
६. हवाओं पे लिख दो - हेमंत कुमार (दो दुनी चार)
७. पाच रुपैया बारा आना - एस. डी. बर्मन (चलती का नाम गाडी). या चित्रपटातलं कुठलं गीत निवडावं असा प्रश्न पडला, कारण सगळीच गाणी सुंदर आहेत. शेवटी अवघड यॉडलिंग हा निकष वापरला.
८. एक चतुर नार - आर. डी. बर्मन (पडोसन). या चित्रपटातलं कुठलं गीत निवडावं असा प्रश्न पडला नाही. कारण सगळीच गाणी सुंदर आहेत, पण हे केवळ अप्रतिम!
९. मेरे महबूब - लक्ष्मीकांत प्यारेलाल (मि. एक्स इन बॉम्बे*)
*तेव्हा मुंबई झालं नव्हतं. 
खरं तर हा चित्रपट बघून माझ्या मनात हा लेख लिहिण्याचा विचार आला. 'प्यार किये जा'चं संगीतही एल. पी. चंच!
१०. इना मिना डिका - सी. रामचंद्र (आशा)
११. गंगा की लहरे - चित्रगुप्त (गंगा की लहरे). चित्रगुप्त किती गोड संगीत द्यायचा याचं हे उत्कृष्ट उदाहरण.
१२. ये चार दिन बहार के - सज्जाद (रुखसाना). हे गाणं मला माहिती नव्हतं; अगदी अनपेक्षितरित्या मिळालं आणि दोघांबद्दलचा आदर अजून वाढला!
१३. मेरी नींदों में तुम - ओ. पी. नय्यर (नया अंदाज). ओ. पी. नय्यर, शमशाद बेगम आणि किशोर कुमार - वा! इतका सुंदर मेळ क्वचितच जमून येतो.
१४. प्यार का जहां हो - एन. दत्ता (जालसाज). हे सिलोनवर 'पुराने फिल्मों के गीत' मध्ये ऐकलंय. काय गोड गाणं आहे...
१५. गुणी जनो भक्त जनो - कल्याणजी आनंदजी (आंसू और मुस्कान) हे गाणंही मला माहिती नव्हतं.पण कल्याणजी आनंदजी या यादीत नसणं हेही अशक्यच होतं.
या यादीतले दोन-तीन मराठी संगीतकार बघून बरं वाटलं. त्यांची ही गाणीही अजून जना-मनात आहेतच. 
ही गाणी शोधता शोधता एक खजिनाच सापडला. यात पन्नालाल घोषांपासून उषा खन्नापर्यंत नावं सापडली! अर्थात यातल्या प्रत्येक संगीतकारानं किशोरकुमारकडून गाऊन घेतलंय की नाही हे कळलं नाही. अनिल बिस्वास यांनी 'फरेब' मध्ये एक गाणं केलं आहे असं दिसतंय, पण ते गाणं सापडलं नाही. या दुव्याचा सज्जाद आणि कल्याणजी-आनंदजींची गाणी आणि इतर उल्लेख केलेल्या संगीतकारांची इतर अनेक गाणी (किशोर कुमार या नायकासाठी केलेली) कळायला खूपच उपयोग झाला. 'गंगा की लहरे' हे चित्रगुप्तचं आहे आणि प्यार का जहां एन. दत्तांचं हेही या दुव्यामुळेच कळलं.
हे दुवे शोधताना हेही आढळून आलं की किशोर कुमारची जयंती ४ ऑगस्टला आहे. एकदा मनात आलं, हा लेख प्रकाशित करण्यासाठी तोपर्यंत थांबावं का; पण.. लगेच असंही वाटलं की किशोर कुमारची आठवण ही काही त्याच्या जयंती/मयंतीपुरती मर्यादित नाहीये...
- कुमार जावडेकर