पंछी बनू उडता फिरू...

गरमागरम धिरडी हाणली तोवर १०:४५ झाले होते. ११ ला निघायचे म्हणजे सगळ्यांना १०:४५ पासून हल्या करायला सुरू केले (पीएम ची खोड.... )शेवटी ११:०५ मिनिटांनी ७ जवानांनी साओ कॉन्राडो बीच कडे कुच केली.. तिथे पॅराग्लायडींचे कार्यालय कुठे आहे ही माहिती एप्रिल मध्ये किंमत विचारून हिंमत न झाल्याने आधीच झाली होती. तरी एकदा गुगलबाबाला शरण गेलो पेद्रो बोनीतो रँप इथे माहिती वाचली. बिगफ्लाय ह्या कंपनीची साईट बघून घेतली.. (आधी कधी काही अपघात वगैरे झाले आहेत का हे १० वेगवेगळे सर्च मारून बघितले हे वे. सा. न. ल. ). आमची टॅक्सी जशी तिथे थांबली तशी २-३ ब्राझीलीयन माणसे पोर्तुगीज भाषेत बडबडत एक फोटो अल्बम घेऊन आमच्या अंगावर आली.. भलताच विचार मनात आणू नका.. ते सर्व पायलट आहेत हे नंतर समजले.. मी पीएम पडल्यामुळे किंमत पाडायची जबाबदारी अर्थातच माझ्यावर आली. मी आपला बिगफ्लाय वाला माणूस शोधत होतो.. थोडा संवाद साधल्यावर त्यांनी एकमेकांना इशारे केले आणि २-३ ची ७-८ माणसे झाली ते पोर्तुगीज मध्ये आणि मी इंग्रजी मध्ये असा संवाद (?! )सुरू झाला.. एकदोनदा मी दोन्ही हात पसरून लहान मुले विमान उडवतात तसे ही त्यांना करून झाले.. भ ची बाराखडी तर पदोपदी तोंडात येत होती.. सगळे हातवारे खाणाखुणा करून सुद्धा... माणसांची संख्या, पॅराग्लायडींगची फी हे दोन आकडे सोडले तर मी त्यांना आणि ते मला काय सांगत होते ते कोणालाच काहीच समजलं नाही. जोडीला भारतीय भाषेत (मराठी, कानडी, तेलगू... )मध्ये टीम मेंबर आपल्यापरीने सूचना देत होते.. तेव्हढ्यात बिगफ्लायचा कार्लोस प्रगट झाला.. आणि मग आय डू.. यू टेक.. ओके.. ओके येस.. येस.. गूऊड.. आशा अस्खलित इंग्रजीत संवादाला चालना मिळाली.. दर डोई २५० रियाइज आणि फोटो आणि व्हिडिओ चे ८० रियाइज असा हिशोब कार्लोसने मला दिला, पुरावा म्हणून रेट कार्ड दाखवले.. मी मुंबई फॅशन स्ट्रीटवरचा घासाघीसीचा अनुभव पणाला लावला.. एक दोनदा चर्चा सोडून नको आम्हाला नाही करायचे वगैरे करून झाले.. मोबाईलवर आकडे टाईप करून ओ नो नो.. ओ येस येस करून झाले.. एक गठ्ठा ७ माणसे हे आमिष दाखवून झाले.. शेवटी दरडोई २५० रियाइज मध्ये फोटो+ व्हिडिओ सर्व सामाईक असा सौदा तुटला.. (दोघांनाही एकमेकांना गंडवल्याचा आनंद मिळाला हे वे. सा. न. ल. ) जरा कुठे मी मैदान जिंकल्याचा आनंद घेत होतो, तेव्हढ्यात कार्लोसने एक बाँब टाकला.. पॅराग्लायडींग करण्या पूर्वी तिथल्या असोसिएशनची मेंबरशिप घेणे गरजेचे आहे आणि त्याचे फिप्टी रियाइज वेगळे!.. झाले पुन्हा चर्चा चालू झाली.. मी आणि अजून दोघे आमच्या खिशात इतके पैसे नव्हते. जालावरती साधारणता किती खर्च येईल हा अंदाज होता आणि रिओ तसे सुरक्षित नसल्यामुळे मोजूनच पैसे नेले होते.. (आधीच खिशात २५० रियाइज आहेत ह्या कल्पनेने काही जणांना घाम फुटला होता हे वे. सा. न. ल. ).. त्यामुळे नाईलाजाने आम्ही उडायचा बेत रद्द केला. कार्लोसला थँक्यू टाटा बाय बाय केले.. ज्यांच्या कडे पैसे होते त्यांनी असू दे रे, आयुष्यात परत कुठे रिओला येणार, थोडे महाग पडते आहे पण करू, अशी एकमेकांची समजूत काढली आणि कार्लोस बरोबर असोसिएशनच्या कार्यालयात प्रवेश केला.. पैसे नसलेल्या आम्ही तिघांनी टॅक्सी थांब्याची वाट धरली.. ५ मिनिटे झाली तरी टॅक्सी काही मिळेना.. आज आपला दिवसच नाही असे मनात आले.. तेव्हढ्यात नंदादीप सुर्वे धावत आला.. सर सर ते फिप्टी नाही फिप्टीन आहे!! तेव्हढे पैसे सगळ्यांकडे मिळून होते. कार्लोसच्या इंग्रजीचा उद्धार करत, जवळ जवळ पळतच आम्ही त्या असोसिएशनचे कार्यालय गाठले. पुढची १० मिनिटे अर्ज भरणे आणि आमच्या नावाच्या स्पेलिंगची पूर्णं वाट लावलेली ओळखपत्र मिळवणे ह्यात गेली.. हे होता होता १२:३० झाले होते.. काही पायलटांना दुसरे गिऱ्हाईक मिळाल्याने ते निघून गेले आणि आदमी सात और पायलट पाच असा नवा प्रश्न आमच्या समोर दत्त म्हणून उभा ठाकला. कार्लोसने फोना फोनी केली आणि १५ मिनिटात एकास एक असा हिशोब लागला.. कोण कुणाचा पायलट हे ठरले.. एकमेकांची नावे सांगून हस्तांदोलने झाली आणि आम्ही आम्हाला नेमून दिलेल्या पायलटच्या गाडी मध्ये बसलो. साओ कॉन्राडो बीच ते पेद्रो बोनीतो रँप हा १५-२० मिनिटाचा घाटातील प्रवास पार करून आम्ही पेद्रो बोनीतो रँपच्या पार्किंग लॉट ला पोचलो.
IMG_0001
पार्किंग लॉट पासून ५० -५५ पायऱ्या चढल्या नंतर पेद्रो बोनीतो रँप नजरेस पडला.. आजूबाजूला बराच प्रेक्षक वर्ग जमला होता. काही घारी ही फिरत होत्या.. रँप नीट बघायच्या आधी समोर तोच 'पेद्रो दि गावा' चा चेहरा पुन्हा माझ्या कडे बघत होता.
DSC04161
थोडे पुढे गेल्यावर पेद्रो दि गावाचा खडा कडा दिसला.. मागच्याच आठवड्यात आपण ह्याच्या टोकावर उभे होते ह्या कल्पनेनेच एक क्षण अंगावर काटा आला. त्या काळ्याकभिन्न कातळावर नजर थांबत नव्हती.
IMG_0024
कार्लोस तिथल्या फॉरम्यालिटीज पूर्णं करत होता, तोवर आम्ही समोर दिसणारा समुद्र किनारा कॅमेऱ्यात बंद केला..
IMG_0017
आमच्या आधीच्या दोघा तिघांना त्या रँपवरून उड्या मारताना बघून आपण इथे येऊन चूक केली अस सारखे वाटू लागले.. आमची तंतरलेली बघायला बराच प्रेक्षक वर्ग पण होता. शेवटी पैसे भरले होते त्यामुळे जे होईल ते होईल असा विचार करून आम्ही हेल्मेट आणि सेफ्टी बेल्ट चढवून आमच्या नंबराची वाट पाहायला सुरुवात केली.
DSC04168
कार्लोसच माझा पायलट होता. त्याने सगळ्या सूचना दिल्या..
DSC04180
(फोटोत पाय आले नाहीत म्हणून बरं नाही त्यांची थरथर तुम्हा सुज्ञ लोकांना नक्कीच दिसली असती).
ऑल सेट फॉर गो.. येस.. आणि पुन्हा आमचे नशीब फिरले, वाऱ्याची दिशा अचानक फिरली, रँप मॅनेजरने लाल झेंडा लावला.. कार्लोसने सांगितले ह्या कंडिशन मध्ये तो उड्डाण घेणार नाही..
IMG_0028
पायाची लटपट आणि पोटातला गोळा काही काळासाठी गायब झाले.. २५ -३० मिनिटे वाऱ्याची दिशा बदलते का बघण्यात घालवली.. शेवटी एकदाचे लाल निशाण निघाले आणि आम्हाला रँपवर उभे केले.. कार्लोसने त्याचे पॅरॅशूट आमच्या पट्ट्याला अडकवले...
IMG_0037
मी डोळे गच्च बंद केले होते.. पट्टा करकचून धरला.. कार्लोस कानात काहीतरी बोलत होता ते काही कळत नव्हते.. कीप वॉकिंग फास्ट... १.. २.. ३.. फास्ट.. फास्ट.. फास्ट.. फास्ट.... पुढचे काही आठवत नाही.. पेकाटात एक लाथ बसली आणि आमच्या पाया खालची जमीन गायब झाली.. खांद्याला एक झटका बसला आणि आम्ही उडते झालो..
IMG_0039
काही क्षणांनी कार्लोस ओरडून सांगत होता हात सोड.. हात सोड.. यू आर सेफ. आम्ही घाबरत घाबरतच डोळे उघडले.. ते लगेच फिरले.. नजर स्थिर व्हायला पुढचे काही क्षण गेले.. माझ्या सर्व जाणीवा परत आल्या.. आणि मी हात सोडून जोरात ओरडलो.. आय एम फ्लाइंग लाइक अ बर्ड... (त्याक्षणी मला घारीचा प्रचंड हेवा वाटला.. हे वे. सा. न. ल. )
DSC04189
इतक्या उंचावरून दिसणारा तो नजारा केवळ अवर्णनीय होता.. पुढचे १५ ते २० मिनिटे मला काय काय डोळ्यात साठवू असे झाले होते.. कार्लोस आपला इमाने इतबारे ते सगळे कॅमेऱ्यात साठवत होता..
DSC04205

DSC04209
यथा अवकाश आमचा देह जमिनीवर आला..
पण मन अजून ही म्हणते आहे...
पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में...