कोटीच्या कोटी : भाग ८

कोटीच्या कोटी-भाग-८

जवळ-जवळ अडीच वर्षाच्या कालावधीनंतर ह्या सदराचा ८वा भाग लावताना आनंद झाला आहे.

* 'लठ्ठपणा कसा कमी करावा' ह्या विषयावरील लेखातील शेवटचे वाक्य- " ह्या विषयावरील अधिक माहिती विस्तार-भयास्तव येथे देता येत नाही"
                         ********************

* नन्याने श्रावण महिन्यात इतक्या निसर्ग-कविता 'पाडल्यात' , की त्याला आता  ' धो. धो. महानोर' म्हणून पुकारण्यात येते !

                   ***********************

* एका ऑन-लाईन गणेश-पूजेतील एक सूचना - " आता कर्सर माऊसवर नेऊन डबल-क्लीक करा " :)

              *************************

* असरानी ह्या प्रसिद्ध विनोदी नटाचे नाव खरे तर 'हसरानी' हवे, नाही का?

          ***************************

* डिस्क ऑपरेटींग सिस्टीमवरचे एक पुस्तक - 'डॉस-बोध'

       ***************************

* मखरात मागे गेलेली बाप्पाची मूर्ती समोर घेताना सुन्या- " गणपती बाप्पा, म्होरं या "  !

       ****************************

* विनोदी मासिकाच्या पहिल्या पृष्ठावरील तळटीप- " ह्या मासिकात व्यक्त झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही " :)

     *****************************

* कॉपी-राईटची दहावीच्या मुलाने केलेली व्याख्या- ’ कॉपी करणे हे 'राईट' आहे ’ ( किंबहुना तो त्याचा बर्थ-राईटच आहे).

    *****************************

* 'ओल्या पिंपात मेले उंदीर' ही मर्ढेकरांची कविता ऐकल्यावर मन्या नाक दाबून म्हणतो की ह्यांचे इनिशीयल 'बा.सी.' का बरे आहे, ते आता कळले.

     *****************************

* पशुवैद्यक शास्त्रात प्रबंध सादर केल्याबद्दल प्राध्यापक म्हैसकर ह्यांना परदेशी विद्यापीठाची '(ब)फेलो-शिप' मिळाली आहे :)

      ***************************

* अति-रिक्त आयुक्त म्हणजे अतिशय रिक्त म्हणजेच रिकामे असलेले आयुक्त का ?!

      ****************************

* नाट्यगीताच्या कार्यक्रमाचे फुकट मिळालेले पासेस बायकोला देताना पक्या- " 'फ़्री'ये पहा, 'फ़्री'ये पहा "

      **************************

* आज मी बायो-मायक्रोस्कोपमधून नेत्र-तज्ञाच्या 'डोळ्याला डोळा' भिडविला!

    ****************************

* चाळीतल्या वरिष्ठ महिलांनी केलेल्या 'लक्षणीय' साहित्यीक योगदानासाठी अकॅडमी पुरस्कारासारखाच 'अक्का-ढमी' पुरस्कार सुरु करण्यात यावा असा प्रस्ताव समोर आला आहे !:)

    ****************************

* अमेरिकी अध्यक्षांचे नाव ' बरॅक' ओबामा  करावे असे माझा मित्र म्हणतो.. कारण? जिथे-तिथे सैन्य घुसवितात म्हणून !

    ****************************

* सास-बहूच्या न संपणाऱ्या मालिकांना 'झाली-का' असेही म्हणायला हरकत नाही, कारण त्या कधीच पूर्ण होत नाहीत.

     ***************************

*  'प्रचंड' विनोदी अभिनेत्री निर्मीती सावंत ह्यांना नन्या विनोदाने विनोद-निर्मीती तथा मेद-निर्मीती सावंत म्हणतो :) ( कारण हसा (की हसवा?) आणि लठ्ठ व्हा)

    ****************************
                 -मानस६