कोटीच्या-कोटी....!


                                   कोटीच्या-कोटी..


पूर्वी रीडर्स डायजेस्ट' ह्या प्रसिद्ध इंग्रजी मासिकातुन 'टुवर्डस मोअर पिक्चरस्क स्पीच' ह्या नावाने एक सदर येत असे.त्यात अनेक कोट्या-युक्त,खुसखुशीत, व चटकदार वाक्यांचा समावेश असायचा.-'जसे 'व्हाय डज इट टेक अवर्स टु प्रीपेयर द मिनीटस ऑफ मीटींग?'. ह्याच धर्तीवर मराठीतील 'अमृत' ह्या मासिकात 'मुद्राराक्षसाचा विनोद' ह्या नावाने एक सदर यायचे, (आता हे मसिक प्रसिद्ध होतेय अथवा नाही ह्या विषयी मला माहिती नाही). तश्याच प्रकारचे काहीतरी मनोगतावर यावे असे बरेच दिवसांपासुन मनात होते,-त्यासाठी हा खटाटोप.
सर्व मनोगतींनी ह्यात आपले योगदान केल्यास ह्याचे एक उत्तम सदर सुद्धा होऊ शकेल. सर्व सूचनांचे मनापासुन स्वागत.
                     ---------------
 * मराठी भाषा गमतीदारच आहे- ज्या पुरुषाला, स्त्री आयुष्यभरासाठी वरते, त्याला नवरा, म्हणजे 'न'वरा म्हणजेच 'वरु नकोस' असे का म्हणतात ते कळत नाही!
                    **********
  'खाकी' वर्दी घातलेल्या प्रत्येक माणसाचा 'अरे, खा की' हाच 'खाक्या' असतो का?
                   ***********
  लोणचे घालण्याच्या कृतीला 'अचार-संहिता' का म्हणू नये?
                   ***********
 माझ्या 'रमेश' नावाची मित्राची रास त्याच्या नावात 'मेश'(आणि स्वभावात 'मेष') असुन सुद्धा 'वृषभ' कशी?- असा मला नेहमी प्रश्न पडतो
                   ***********
 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या आंतर-विभागीय नाट्य-स्पर्धेत पुढील नाटकांना पारितोषके मिळाली असे कळते- १) फिटे अंधाराचे जाळे २) दिवा जळु दे सारी रात ३) मालवून टाक दीप
                   ***********
  'कर हा करी, धरीला..' ह्या ऒळी नाट्यगीतकाराला नगर परिषदेत टॅक्स म्हणजेच कर भरताना सुचल्या असतील का?
                   ***********
  "अग दमयंती, नळ आला का पहा बरे"- हे वाक्य परवा ऐकले, नाटकात नव्हे; आमचे शेजारी त्यांच्या मुलीला नळ आला का(नगर परिषदेचा), ते बघायला सांगत होते.
                   ***********
 माझ्या संगणकाची 'रॅम' बोंबलली, (थोडक्यात- तिने 'हे राम' किंवा 'हे रॅम' म्हटले)
                  ************
 ज्यांच्या पत्नीचे नाव संगीता आहे, त्यांना 'संगीताची आवड' असणे आवश्यक असते
                  ***********
 परवा पाटी बघितली- दंतवैद्य डॉ.कवळी
                  ***********
 सांस-बहूच्या सीरीयल्स ह्या खऱ्या अर्थाने 'धारावाहीक' असतात, कारण त्यात सतत कोणाच्या तरी डोळ्यातुन 'धारा' वाहत असतात!
                  ***********                         
                                          -मानस६