'कोटीच्या-कोटी'- (भाग-२)

                            कोटीच्या कोटी (भाग-२)


 पुढील वेबसाईटस सुरु करायचा विचार आहे- पहिली म्हणजे चुगल.कॉम आणि दुसरी काथ्याकुट.कॉम. काथ्याकुटचा सदस्य होण्यासाठी चुगल.कॉम चा सदस्य असणे(म्हणजे 'चुगलखोर' असणे) आवश्यक राहील. काथ्याकुटवर 'स्क्रेप-बुक'मधे जास्तीत-जास्त काथ्याकुट करणाऱ्याला पुरस्कार देण्यात येईल.(काथ्याकुटवर खुप लांबुन काढलेले फोटो, अप-लोड करायला बंदी असेल.)
                       **************
  काही सिने-तारका आणि खेळाडूंच्या नावात असे बदल करावेसे वाटले
            *उर्मिला मा(झे)तोंड(गोड)कर
            *मार्टिना नवराति(ला)हवा...(अजुनही ती अविवाहीत आहे,असे म्हणतात....कोण मी?....बचाओ.ऽ..ऽ..ऽ..ऽ)
            * (जवळ)याना गुप्ता.


                       **************
  काही अचाट मराठी भाषांतरे-
     एका परग्रहवासीयांवर आधारीत असलेल्या हॉलीवूड चित्रपटाच्या नावाचे-
    * क्लोज एनकाऊंटर्स विथ द थर्ड काईंड= तृतीय पंथीयाची जवळून झालेली भेट.
    * 'ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स' प्रेसेंटस= विसाव्या शतकातला कोल्हा सादर करीत आहे (ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स ही चित्रपट निर्मीती क्षेत्रातील एक कंपनी आहे)
    * ओह, माय स्वीट हार्ट= हे माझ्या गोड हृदया!
    *आय एम नॉट फीलींग वेल- माझी विहीर रिकामी आहे
                      **************
 दादरहुन नागपुरला जाणारी 'सेवाग्राम एक्सप्रेस', जाताना,अगदी खेडवळ भासणाऱ्या, इतक्या स्टेशनवर थांबत जाते की, तिला 'सेवाग्राम'च्या ऐवजी 'ग्रामसेवा एक्सप्रेस' का म्हणु नये, असा विचार माझ्या मनात येतो.
                     ***************
  मित्राच्या शेजारचे एक वारकरी कुटुंब....नित्यनेमाने पंढरीची वारी करायचे, पण एकमेकांशी नेहमी कडाकडा भांडायचे, त्यामुळे त्यांना तो 'वॉर-करी' संप्रदायातले' म्हणायचा
                    ****************
 आमची आजी वाती वळायला बसल्यावर,आमचे आजोबा, हिचा 'वातविकार' बळावला आहे असे म्हणायचे
                    ****************
मायकेल जॅकसनच्या सगळ्या अल्बमसना मला 'शब्दांच्या पलिकडले' असे नाव द्यावेसे वाटते. कारण तो काय आणि कोणते शब्द उच्चारतो हे कोणाच्याही बापाला कळत नाही.
                   ******************
काही नाट्यगीतांची/गीतांची अशी विडंबने सुचली-
 *शेजाऱ्यांकडचा दिवाळीतील लाडू खाताना- 'कठिण, कठिण, कठिण किती, स्त्रीचे हृदय बाई.( लाडू खाताना आणि त्याची खोटी तारीफ करताना पुरुषाला किती किती 'वदन-वेदना' होत असतील ह्याचा लाडू बनविताना, करणारीने जरा सुद्धा विचार केलेला नसतो म्हणून)
 * खाणावळीतील 'नुकताच पाऊस पडून गेल्यासारखी' दाळ खाताना- 'वद खाऊ कसे हे वरण ग'
 * फटकळ शेजारणीकडे बघुन- 'चंडिका ही जणू'
 * नन्याचे बुफे पार्टीत आलू-पराठ्यांवर ताव मारताना पाहुन- 'वेगात पराठे मीच हाणले सात'(नन्याची फुकटच्या पार्ट्यातील पचनशक्ती इतकी दांडगी आहे की, तुम्ही 'सात'च्या ठिकाणी 'साठ' म्हटले तरी काहीच बिघडणार नाही..नन्याचे पोट तर नक्कीच नाही)
 * माझा मित्र मकरंदला 'रताळे' विकत घेताना पाहुन- "घेई कंद मकरंद"
                ********************
 कधी कधी आपल्या देशाचा अर्थ-संकल्प पाहुन त्याला 'अर्थहीन अर्थसंकल्प' आणि आपल्या अर्थ-मंत्र्यांना 'अर्थ-हीन अर्थमंत्री' असे नाव द्यावेसे वाटते.
               **********************
  राधाकाकू कुठलीही गोष्ट उसनी देताना उगीच 'कां-कूं' करतात...पण का..का?
               **********************
 'झटपट इंग्रजी' वर्गात इंग्रजी शिकलेले,बोलताना, इंग्रजीशी इतकी 'झटापट' का बरे करतात कुणास ठाऊक?
               **********************
                                                             -मानस६