कोटीच्या-कोटी: भाग-७

                                        कोटीच्या-कोटी: भाग-७

* ’सल्लागार’ ची सोन्याने केलेली व्याख्या: असा काही ’सल्ला’ देणारे लोक, की समोरचा ’गार’ होतो!
              ************
* कुठलाही कर भरताना नन्या फार वैतागतो; कर भरताना प्रत्येक वेळी तो, "ह्या  करांना, ’कर’ न म्हणता ’भयं’कर का म्हणू नये?" असे बडबडत असतो!
              ************
* आपल्या आईचा फोटो फ्रेम करुन आणल्यावर निऱ्या आपल्या आईला  उद्देशुन- "आई, तुला आता ’फ्रेमास्वरुप आई’च म्हणायला हवे!"
              ************
* एका संगीताच्या कार्यक्रम-पत्रिकेतील काही मुद्रण-दोष:-
    - सायंकाळी सहा वाजता: अमुक ह्यांचे गटार वादन
    - सकाळी दहा वाजता: अमुक ह्यांची तबेला वादन.
( प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिल्यावर मात्र मुद्रण-दोषाचे हसू न येता, तो मुद्रक किती चाणाक्ष होता ह्याची प्रचीती आली.)
             *******************************
*   स्त्रियांचे काही वैशिष्ठ्य-पूर्ण नावे..
   - भावना प्रधान
   - रागिणी भडके
   - संगीता नितसुरे
   - रजनी चांदणकर
     (कुणाच्या नावाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
            ********************************
* श्री. व्यास ह्यांचा मुलगा इतका गोल,गरगरीत आहे की, आपले ’व्यास’ हे आडनाव तो खऱ्या अर्थाने सार्थ करतो, आणि त्याचे ’मित्र-वर्तुळ’ हे केवळ त्याच्यामुळेच, खऱ्या अर्थाने ’वर्तुळ’झाले आहे, असे त्याचे मित्र त्याला गमतीने म्हणतात.( शाळेच्या फुटबॉल टीमचा तोच ’गोल’कीपर आहे)
            ********************************
* हवामान खात्याने वर्तवलेला असाही एक अंदाज-"उद्या हलका ते मध्यम स्वरुपाचा मुसळधार पाऊस पडेल".(ह्याला खऱ्या अर्थाने "अंदाज-ए-बयॉं और" म्हणावे लागेल)
            ********************************
जळगावला पाण्याची खूप टंचाई असून सुद्धा, त्या शहराचे नाव ’जळ’गाव कसे?
            ********************************
नन्याला जिचा चेहरा ’चंद्र’ वाटतो, तिला दुर्दैवाने ’मंगळ’ असतो.
            ********************************
                                                                           -मानस६