कोटीच्या-कोटी - भाग-५

                          कोटीच्या कोटी- भाग-५

मैत्रीणीच्या सततच्या गिफ्टस मागण्याने कंटाळून एका मुलाने म्हणे  'व्हॅलेंटाईन डे' च्या ऐवजी 'क्वारंटाईन डे' साजरा करायचा करण्याचे ठरविले आहे.( म्हणजे अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर व्हायरसला क्वारंटाईन करते तसे!तसेही शिवसेनावाले साजरा करु देतच नाहीत, त्यामुळे 'क्वारंटाईन डे' हेच नाव जास्त योग्य आहे, नाही का? )
                              *********
* मुन्नाभाईतील 'गांधीगिरीने' प्रभावित होऊन मटका किंग रतन खत्री ह्याने 'माझे सट्ट्याचे प्रयोग' हे पुस्तक लिहायला घेतले आहे असे कळते.
                              *********
* आमच्या विद्युत पारेषण कंपनीतील अभियंत्याच्या नियत कालिकाचे नाव 'ही वॅट दूर जाते' असे ठेवावे असा प्रस्ताव आहे.( सध्याच्या भयानक लोड शेडींगमुळे वॅट खऱ्या अर्थाने दूर गेलेली आहे, होय ना?)
                              ***********
* आमचा स्नेही सॅम ह्याला डायऱ्या जमविण्याचा खूप छंद आहे-नुसत्या डायऱ्या विकत घेत असतो;त्यामुळे त्याला नेहमी "अरे बस, नाहीतर आता तुला 'डायरीया' होईल" असे गमतीने म्हटल्या जाते.
                               ***********
* लेल्यांच्या आनंदीला गायन शिक्षक 'संगीतातील आनंदीबाई' म्हणतात- कारण?- गाताना ती हमखास 'ध' चा 'म' करते!
                              ***********
*बहुतेक कंपन्यांच्या 'कस्टमर सर्व्हीसचे' नामकरण (विशेषत: मोबाईल कंपन्यांच्या) 'कष्टमर सर्व्हीस' असे का करु नये?- अहो, कस्टमरला हवी ती सर्व्हीस मिळविण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात की तो शेवटी मरायला टेकतो.
                               ***********
* सध्या 'पाकिस्तान की शायरी' अणि 'हिंदुस्तानी ग़ज़ले' ही दोन्ही पुस्तके वाचतो आहे;पण ही दोन्ही पुस्तके एकाच शेल्फ वर ठेवायला घाबरतो, न जाणो दोन्ही पुस्तकातील 'शेरांमधेच' युद्ध पेटायचे!
                              ***********
*सहसंपादकांनी एक मुद्रणदोष संपादक महोदयांच्या ध्यानात आणुन दिला- कुठल्याश्या जाहिरातीत 'लहान शिशु गट' ह्या ऐवजी 'लहान शि.सु.गट' असे छापल्या गेले होते.त्यावर संपादक मिस्कीलपणे उदगारले" राहु द्या असेच; बाल्यावस्थेचे वर्णन करायला ह्याहून समर्पक संज्ञा दुसरी सापडणार नाही!"
                             **********
आमच्या विद्युत पारेषण कंपनीच्या काही टॉवरच्या बोल्टचे नटस जवळ जवळ मोसंबी एव्हढे मोठे आहेत; आम्ही त्यांना गमतीने 'नटसम्राट' म्हणतो!
                            **********
सगळ्यांजवळ असावी, पण मांत्रिकाजवळ 'भूतदया' असुन चालत नाही'!
                            **********
सिझेरीयन करणारे सर्जन खऱ्या अर्थाने 'सर्जनशील' असतात.
                             *********
बाहेर पाहुणे बसलेले.. आतुन यजमानीण बाईंचा बाहेर 'अहो' ला आवाज-"अहो, कीस घेताय ना, मी कधीची वाट पाहतेय"..बाहेर पाहुणे चपापले.. आज व्हॅलेंटाईन डे तर नाही ना, ह्याची त्यांनी खात्री करुन घेतली..नंतर असे कळले की त्या दिवशी एकादशी होती(हात तिच्या!!) आणि सौ. बटाट्याचा कीस खायला अहोंना आतमधे बोलावित होत्या.
                             *********
'आयफेल टॉवर' आणि 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस' ह्यांचा आपसात काहीतरी संबंध आहे असा माझा एक समज आहे.. म्हणजे आय फेल फ्रॉम टॉवर इन पॅरिस आणि मग प्लॅस्टर लागले असा काहीसा!
                             *********
दोन मराठी माणसे एकमेकांना भेटल्यावर हल्ली हमखास 'हाय' म्हणतात, त्यामुळे 'मराठी असे आमुची हायबोली' असे म्हणावे वाटते.
                             **********
हल्लीचे पटकथाकार मागणी तसा पुरवठा ह्या तत्वानुसार इतक्या भराभर पटकथा लिहुन देतात की त्यांना 'पट-पटकथाकार' म्हणावे वाटते
                             **********
विनोद कांबळीचा एकंदरीत अवतार-त्याचे कानातील डूल, त्याची केशभुषा बघता, त्याला 'विनोदी कांबळी' हे नाव जास्त शोभुन दिसावे, नाही का?
                             **********
माझा शेजारी कंपनीच्या कामासाठी नेहमी नंदुरबारला जात असतो, म्हणुन त्याला 'तुम बार-बार नंदुरबार क्यो जाते हो' असे गमतीने म्हटल्या जाते. वरुन 'फक्त नंदुरबारलाच जा; दुसऱ्या कुठल्याही बारमधे जाऊ नकोस' अशी पुस्तीही जोडल्या जाते.
                             **********
पगार वेळेवर झाला नाही की नन्या अकाऊंटस सेक्शनमधे जाऊन 'ए मेरे वेतन के लोगो, जरा आँख मे भर लो पानी' हे गीत गातो
                           **********

                                         -मानस६