तिन्हीसांज...२

'अरे तू काय वेगळा का आहेस? आमचा सुभाष तसा तू. काय सांगू आणि कसं सांगू? पण उद्या वेळ पडली तर आख्या चाळीत तूच एक मदतीचा आणि भरवशाचा. बाबा रे! मी केलय तसच मन घट्ट कर.... तुझ्या अप्पांना..... कॅन्सर आहे.'
'काकू..... काय सांगताय काऽऽऽय?'

'यशोदे....' दारात, हातात भाजीच्या पिशव्या घेतलेले अप्पा उभे होते.


'अहो काय हे? त्याला बिचाऱ्याला कशाला काळजीत टाकलेत?'
माझ्या बालपणा पासून मला अप्पांचा सहवास होता. सुभाष माझा खास मित्र. अत्यंत हुशार स्कॉलरशीपवर शिकला, इंजिनिअर झाला आणि पहिलीच संधी पकडून अमेरिकेला गेला. त्याचं अमेरिकेला जाणे अप्पांना आवडले नाही पण मुलाच्या भवितव्याच्या आड यायचे नाही म्हणून त्यांनी मनावर दगड ठेवला. पुढे, त्याने एका भारतिय मुलीशीच पण तिथे अमेरिकेतच लग्न केले. अप्पांना - काकूंना खूप वाईट वाटले पण त्यांनी तोही धक्का पचवला. कामाच्या व्यस्ततेमुळे सुभाषला भारतात येणे जमत नव्हते आणि अमेरिकेला जायला अप्पा तयार नव्हते. अप्पांच्या आजारपणाची बातमी माझं काळीज चिरत गेली. डोळ्यात पाणी तरळले.
'बघ! रडवलेस बिचाऱ्याला. अरे! काही नाही होत. डॉक्टरांनी सांगितलय मला. आजार तसा बळावलेला नाही. औषधांनी बराही होऊ शकेल. तुम्ही उगीचच काळजी करताय. चल. डोळे पुस आणि अहोऽऽ ही भाजी घ्या. तुम्हाला आवडतात म्हणून तोंडली आणली आहेत. आणि तूही डोळे पुस रे, रडतोस काय बायकांसारखा?'
'अप्पा, एवढा परका समजलात नं मला. आमच्या नानांमध्ये आणि तुमच्यात मी कधी फरक केला नाही पण सुभाष आणि माझ्यात फरक केलातच नं?'
अप्पा माझ्या शेजारी बसले. माझ्या पाठीवर हात फिरवत म्हणाले,'अरे! तुझ्यात आणि सुभाषमध्ये कधी फरक केला नाही म्हणूनच तुला सांगू शकलो नाही. तुम्हालाही आयुष्यात दुःख हे भोगायला लागणारच. प्रत्येकाचा वाटा देवाने बाजूला काढून ठेवलेलाच असतो. पण त्याला आत्तापासून, मीच कशाला सुरूवात करायची? म्हणून बोललो नाही हो. असो.'
अप्पांची फिलॉसॉफी माझ्या समजण्या पलीकडे होती. अप्पांच्या आजारपणाचे पेपर्स एकदा बाहेर राहिल्यामुळे काकूंना कॅन्सर बद्दल समजले आणि आज काकूं कडून मला समजले. पण अप्पा शांत होते. कमीत कमी खर्च करून काकूंसाठी शिल्लक टाकत होते. आपल्या पश्चात काकूंना कुणावर विसंबून राहावे लागू नये म्हणून कमीतकमी खर्च करून जास्तीतजास्त बचत करण्याकडे त्यांचे प्रयत्न होते. ऍलोपॅथीवर भरमसाठ खर्च होईल म्हणून, 'ऍलोपॅथीत कॅन्सरवर प्रभावी औषधे नाहीत' या सबबीखाली ते आयुर्वेदाकडे वळले. 
सुभाषला कळविल्यावर तो घाईघाईने आला. सौरभ आणि प्रगती या आपल्या नातवंडांना भेटून अप्पा आणि काकू हरखले. सुनेचे सर्व लाड काकूंनी केले. तिनेही करून घेतले. अप्पांना आणि काकूंना तीन तीन वेळा वाकून नमस्कार करताना, जमिनीवर जेवायला बसताना सुनेने आणि नातवंडांनी आढेवेढे घेतले नाहीत.  सौरभ आणि प्रगतीला 'शुभंकरोती' म्हणता येते हे पाहून अप्पा आणि काकूंचे डोळे कौतुकाने भरून आले.
काकू आणि सुनबाई स्वयपांक घरात व्यस्त होत्या. नातवंडेही तिथेच घुटमळत होती. अप्पा बाहेरच्या खोलीत, आरामखुर्चीत, सुभाषशी गप्पा मारत बसले होते. सुभाषच्या पाठीवरून हात फिरवून अप्पा म्हणाले, 'माझा सगळा राग गेला रे, बाबा. छान सुसंस्कृत सुनबाई मिळविल्या आहेस. सुखात राहा.'
'अप्पा, तुम्ही या नं अमेरीकेला. काय कमी आहे आपल्याला? चांगल्यातला चांगला डॉक्टर करू आपण. नीट व्यवस्थित उपचार होतील.' सुभाष म्हणाला.
'नको रे बाबा. तेवढे सोडून कांहीही सांग, ऐकिन मी तुझं. अमेरिकेचे नांव काढू नकोस. माझा जीव नाही रमायचा तिथल्या वातावरणात.'
'अप्पा, मी इथे येऊ शकत नाही आणि तुम्ही तिथे येऊ इच्छित नाही. काय करू मी? मला कांहीच कळत नाही.'
'अरे त्यात कळायचय काय? बरं! मी सांगू? करशील?'
'अप्पा, तुम्ही सांगाल ते मी करीन.'
अप्पांनी चष्म्याच्या काचा पुसल्या. स्वयपांकघरात काकू, सुभाषला आवडणारे बेसनाचे लाडू सुनबाईंना शिकवित होत्या. तिकडे एक दृष्टीक्षेप टाकून, चष्मा डोळ्यांवर ठेवत अप्पा म्हणाले,' आत्ता.... लगेच नाही... पण.... यू नो..... जेंव्हा गरज पडेल तेंव्हा.... तुझ्या आईला अमेरिकेला घेऊन जा आणि तिचा शेवट पर्यंत सांभाळ कर. तिला वाऱ्यावर सोडू नकोस.' 
अप्पांच्या मांडीवर डोके ठेवून सुभाष हमसाहमशी रडला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवित खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या अप्पांच्या डोळ्यातूनही दोन टपोरे अश्रू खळकन् निखळले. बापलेक एकमेकाच्या आधाराने, एकमेकांना सावरत, वाहात राहीले. स्वयपांकघरातील बेसन परतण्याचा आवाज थांबला होता. सर्वच आवाज थांबले होते. एक निशब्द शांतता वातावरणावर ओघळली होती. काकू तोंडात पदराचा बोळा कोंबून भिंतीला टेकून गदगदत होत्या. सुनबाई सासूला आपल्या कुशीत घेवून, येणारे दुःखाचे कढ परतविण्याचे प्रयत्न करीत होती. दोन्ही चिमणी बाळं आपल्या आईला बिलगली होती. उंच वळचणीला एक स्तब्ध पाल भयभित नजरेने हे सर्व पाहात होती.

दुसरा दिवस घाईघाईचा होता. सुभाषला परतावे लागणार होते. अमेरिका सोडून भारतात परतण्याचा विचार सुभाषने बोलून दाखवताच अप्पांनी ठामपणे त्याला विरोध केला. म्हणाले, 'वेड्या, प्रगतीपथावर आहेस आता वळून पाहू नकोस. पुढच्या सर्व पिढ्यांचा उद्धार कर. आम्हा म्हाताऱ्यांत जीव गुंतवू नकोस. मागे, तू गेलास तेंव्हा मी नाईलाजाने तुला निरोप दिला होता. आज तुझा संसार बघितला, सुनबाई, नातवडं भेटली, आनंद हृदयात मावत नाहीए. आज, आम्ही दोघेही, तुम्हाला स्वखुशीने सांगतो आहोत, जा, यशवंत व्हा. तुमच्या यशातच आमच्या जिवनाचं सार्थक आहे.'
सुभाषने, सुनबाईंनी आणि नातवंडांनी अप्पा आणि काकूंना वाकून नमस्कार केला. अप्पांनी नातवंडांना कॅडबरी चॉकलेट्स दिली. त्यांचे डोळे आनंदाने चमकले. सुभाषला लहानपणी कॅडबरी खूप खूप आवडायची. जड मनाने सुभाष परतला.
सुभाषच्या सहकुटुंब भेटीने अप्पा-काकू जाम खूश होते. सारखे हसत-खेळत होते. होय, पत्यातला पेशन्सचा डाव हा अप्पांचा आणि रमीचा डाव हा काकूंचा आवडता खेळ होता. त्या घरात नवचैतन्य अवतरले होते. मला वेळ मिळाला की मी त्यांच्या घरी जात होतो. दोघेही माझी वाट पाहात असायचे. माझ्यात त्यांना त्यांचा सुभाष दिसायचा. मुलावर, नातवंडांवर प्रेम करण्यापासून वंचीत, ते दोघेही, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करीत होते. मला गुदमरून टाकत होते. चमत्कार घडत होता. आयुर्वेदाचा गुण येत होता. वैद्यकिय तपासणीत, कॅन्सरने एक पाऊल मागे घेतले होते.
पण नियतीने सारीपाटावर वेगळेच फासे फेकले. फासे घरंगळले. दान मनासारखं पडलं नाही.
काकू तापाने फणफणल्या. डॉक्टरांना घरी बोलवावे लागले. डॉ. देशमुखांनी तपासले. औषधे लिहून दिली. बाहेर आल्यावर मी डॉक्टरांना म्हंटले, 'डॉक्टर, काळजीचे कारण नाही नं'
'अं' डॉक्टर तंद्रीतून बाहेर आले.' नाही. तापाची काळजी नाही मला तो उतरेल सकाळ पर्यंत गोळ्यांनी. पण....'
'पण.. काय डॉक्टर?'
'मला काळजी वाटतेय ती वाढलेल्या BPची. 250 is too high.'
पेशंटवर लक्ष ठेवा. प्रमाणा बाहेर घाम वगैरे यायला लागला तर मला रात्रीबेरात्री उठवायला संकोचू नका.'
डॉक्टरांना नाक्यापर्यंत सोडून मी परतलो.
अप्पांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
'घाबरण्याचे कारण नाही. ताप उतरेल सकाळ पर्यंत पण BP जास्त आहे.'
काकूंना झोप लागली होती. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले होते. त्या शांत झोपल्या होत्या. रात्री अकरा पर्यंत सगळे थांबले होते. पण दुसऱ्या दिवशी ऑफिस असल्यामुळे आता हळूहळू लोकं पांगायला लागली. मी रात्रभर तिथेच थांबणार होतो पण काकूंच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवता ठेवता अप्पा म्हणाले,' अरे नको उगीच जागूस. मी आहे नं. तशी कांही गरज लागली तर हाक मारीनच मी. जा तू झोप.' डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचना अप्पांच्या कानावर घालून मी घरी परतलो.
मी घरी तर परतलो, पण झोप लागेना. तास दोन तासांनी झोप लागली पण मध्येच दचकून जागा झालो. उठून खिडकीत उभा राहीलो. रात्रीचे अडीच वाजले होते. किर्ऱर्ऱ रात्रीने, काळाकुट्ट, भयाण  अंधार चाळीच्या सर्वांगाला फासला होता. भयभित रातकिडे किर्ऱकिर्ऱत होते. समोर अप्पांच्या खोलीत अजून दिवा जळत होता. काकूंच्या पलंगाशी अप्पा बसले होते. सर्व ठीक होईल असं मन सांगत होतं. पुन्हा झोपायचा प्रयत्न केला पण झोप लागेना. या कुशीवरून त्या कुशीवर होत ती अवघड रात्र ढकलत होतो. पहाटेचे चार वाजत आले आणि अचानक 'यशोदेऽऽऽऽऽऽ' अशी अप्पांची आर्त हांक कानी पडली. ताडकन् उठलो आणि अप्पांकडे धावलो. चाळीत ५-६ दिवे फटाफट लागले. मी अप्पांकडे पोहोचलो. काकूंच्या पलंगा जवळ भांडं पडलं होतं. काकूंच्या तोंडाकडून गेलेला ओघळ जमीनीवर सांडला होता. काकूंचा निर्जिव हात हातात घेऊन अप्पा ओक्साबोक्सी रडत होते.
अप्पांना जवळ घेवून त्यांचे सांत्वन करायचे म्हंटले तरी काय बोलणार? काकाच म्हणाले, 'अरे! जागी झाली आणि म्हणाली, 'घशाला कोरड पडली आहे. पाणी देता का जरा?' मी आत जाऊन पाणी आणेपर्यंत घामाने पूर्ण थबथबली. श्वास जोरात चालला होता. मी घाम पुसायला लागलो तर म्हणाली, 'आधी पाणी द्या.' मी पाणी पाजे पाजे पर्यंत डोळे फिरवले. पाणी घशात गेलच नाही, सगळं बाहेर आलं. मी हाका मारल्या पण ओ नाही दिली रे, ओ नाही दिली. असं कधी झालं नव्हतं. माझ्या हाकेला ओ दिली नाही असं कधी झालं नव्हतं.' अप्पांना शोक आवरत नव्हता. फोन गेल्या बरोबर ताबडतोब देशमुख डॉक्टर आले. त्यांनी तपासलं आणि निदान केलं........... हार्ट ऍटॅक.
सुभाष येई पर्यंत थांबणं शक्य नव्हतं. अप्पांच्या संमतीने सर्व विधी उरकण्यात आले. अस्थीविसर्जनासाठी अप्पांबरोबर नाशिकला मी जाऊन आलो. एक मुर्तीमंत वात्सल्य, अहेवपणी, साथीदाराचा हात सोडून, मुठभर अस्थीरूपात, निसर्गात विलीन झालं. मागे उरल्या फक्त आठवणी आणि उरला, चंदनाचा हार घातलेला, भिंतीवरचा, काकूंचा फोटो. 


 


क्रमशः.