तिन्हीसांज - ३

सुभाष येई पर्यंत थांबणं शक्य नव्हतं. अप्पांच्या संमतीने सर्व विधी उरकण्यात आले. अस्थीविसर्जनासाठी अप्पांबरोबर नाशिकला मी जाऊन आलो. एक मुर्तीमंत वात्सल्य, मुठभर अस्थीरूपात निसर्गात विलीन झालं. मागे उरल्या फक्त आठवणी आणि उरला, चंदनाचा हार घातलेला, भिंतीवरचा, काकूंचा फोटो. 


त्या नंतर, 'आता कोणासाठी जगायचं' असं म्हणून अप्पा स्वतःची औषधं घ्यायचे टाळत होते. मी मागे लागलो म्हणून पुन्हा घेऊ लागले. संध्याकाळी मी जाऊन बसायचो त्यांच्याकडे. भरभरून बोलायचे. म्हणायचे, 'माझ्याशी भांडायची, वाद घालायची पण तितकेच प्रेमही करायची. तीला वाटायचे, मला तिचे प्रेम दिसत नाही. अरे पण असे कसे होईल? माझ्या साठी ती जे कष्ट घ्यायची ते का मला दिसायचे नाहीत? माझी पथ्य, माझी औषधं सगळं सांभाळायची. तुला माहीत आहे, माझ्या कॅन्सरच्या बातमीने ती खचली होती. मला म्हणायची मी एकटी राहाणार नाही मागे. मी आधीच जाईन. आणि खरे  केले तिने तिचे शब्द.' मी शांतपणे ऐकत राही.

सुभाष आला तो पर्यंत अप्पा बरेच सावरले होते. त्यांनीच सुभाषचे सांत्वन केले. सुभाष एकटाच आला होता.
एकदा अप्पा स्वतःच सुभाषला म्हणाले, 'सुभाष, येतो मी अमेरिकेला.' सुभाषला खूप आनंद झाला. चला, म्हणाला, अप्पा तुम्ही अमेरिकेला. आम्ही तुमची खूप खूप सेवा करू.'  
अप्पा क्षीण हसले. अप्पा अमेरिकेला जायला का तयार झाले हे मला माहीत होते. काकूंनी अप्पांकडून तसे वचन घेतले होते. त्या म्हणाल्या होत्या, 'तुमच्या पश्चात सुभाषने मला अमेरिकेला घेऊन जावं म्हणून तूम्ही त्याला विनंती केलीत. ठीक आहे. मी जाईन. पण एका अटीवर. माझी जीवनयात्रा जर तुमच्या आधी संपली तर तुम्ही इथे एकटं राहायचं नाही. अमेरिकेला सुभाषकडे जायचं. वचन द्या मला.' अप्पांनी साश्रू नयानांनी वचन दिले होते. त्यांची खात्री होती, त्यांच्या राशीला भिडलेला कॅन्सर, त्यांच्यावर ती वेळ येऊ देणार नाही. पण आज त्या सवाष्णीचे शब्द खरे ठरले होते.

अप्पा अमेरिकेला जाणार म्हणून चाळीत उत्साहाचे वातावरण होते. घरोघरी निरोप समारंभ होत होते. अप्पा सर्वांना हात जोडून, त्यांच्या आजवरच्या शेजारधर्माचे आभार मानत होते. एक दिवस अप्पा व्हरांड्यात बसले असता......... नाडकर्णी आले.
अप्पांना आश्चर्याचा धक्काच बसला. अप्पांनी त्यांना बसायला खुर्ची दिली. आता चहा करायला ते कोणाला सांगू शकत नव्हते. अप्पा म्हणाले, 'बसा नाडकर्णी मी चहा करतो.' त्यावर खुर्चीत बसत नाडकर्णी म्हणाले, ' अप्पा.. नको. मी चहा वगैरे कांही घेत नाही आता. सगळं बंद केलय. बसा तुम्ही.' अप्पा बसले. नाडकर्णी पुढे म्हणाले, 'वहिनींबद्दल समजले. फार वाईट वाटले. पण येऊ शकलो नाही. मीच अल्सरच्या आजाराने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. आज तुम्ही अमेरिकेला जायला निघालात कळलं. आनंद वाटला. तुम्ही योग्य तोच निर्णय घेतला आहे. म्हंटलं, अभिनंदन करावं, जाऊन भेटावं. माझी तब्येत अशी. खाण्यापिण्याचे नियम फार कडक करून टाकलेत डॉक्टरांनी.'
नाडकर्ण्यांची खंगलेली तब्येत बघून अप्पा आतून हलले. 'नाडकर्णी, काय हो तुमची ही अवस्था? सांभाळा स्वतःला.'
'जाऊ द्या अप्पा. माझी आता शाश्वती राहीली नाही. पुन्हा तुम्ही कधी अमेरिकेहून परत याल तेंव्हा मी असेन - नसेन.'
'नाही, नाही नाडकर्णी अशी एकदम निर्वाणीची भाषा करू नका. माझं ऐका. आयुर्वेदात अल्सरवर फार प्रभावी औषधं आहेत.....'
एका हाताने अप्पांना थांबवत नाडकर्णी म्हणाले, 'करीन मी आयुर्वेदीक कोर्स अप्पा. तुमच्या सल्ल्याचा आदर करतो मी. पण आज मला कांही त्याहून महत्वाचं बोलायचं आहे.'
नाडकर्णींनी जरा थांबून, डोळे मिटून पोटात उठणारी कळ सोसली आणि म्हणाले, ' अप्पा, तुम्ही मला कितीतरी सिनियर. तुमच्या शेवटच्या प्रमोशनच्या वेळी मी माझे लागेबांधे वापरून तुमचे प्रमोशन डावलले आणि स्वतः मिळवले असा तुमचा गैरसमज झाला होता, असे कळले. तेच तुम्हाला सांगायला आलो आहे.... मी तसे कांही केले नाही. अप्पा विश्वास ठेवा आणि तुम्ही मनातून हे काढून टाका. तुमच्या मनातील ते किल्मिष गेल्या खेरीज माझ्या आत्म्याला, मरणोत्तरही शांती मिळणार नाही, अप्पा.'
अप्पा मंद हसले. आणि नाडकर्णींच्या हातावर थोपटत म्हणाले,' नाडकर्णी, तसे माझ्या मनात पूर्वीही कधी नव्हते आणि आजही नाही. मला माहित आहे खात्याच्या परीक्षेत तुम्हाला माझ्यापेक्षा कितीतरी जास्त गुण मिळाले होते. परीक्षेतच मी अपयशी ठरलो होतो. नुसतेच, मी माझे अपयश पचवू शकलो नाही, असे नाही तर,..... मला गुण कमी मिळाल्यामुळे माझे प्रमोशन हुकले हे मी माझ्या बायकोसमोर कबूल करू शकलो नाही. त्यामुळेच सतत मी कांगावा करीत राहिलो. उलट तुम्ही मला माफ करा.' अप्पांनी हात जोडले. त्यांचे दोन्ही हात आपल्या हाती घेत नाडकर्णी म्हणाले,' अप्पा.. अप्पा, अहो हे काय करता? आपण निवृत्त झालो तरी तुम्ही मला सिनियर आहात. तुम्ही हात जोडू नका. प्लीऽऽज. ....आज माझ्या मनावरचा एक मोठा बोजा हलका झाला. आता मरण आले तरी सुखाने स्विकारीन मी ते. येतो मी, अप्पा. काय ते म्हणतात नं....बॉन व्हॉयोज.. हं... बॉन व्हॉयोज, ते तुम्हाला.'

सुभाषने व्हिसा, तिकिटं आणली होती. जाण्याचा दिवस सुनिश्चित झाला. सुभाष अप्पांच्या प्रवासाच्या तयारीत गुंग होता. अप्पा तास न् तास काकूंच्या फोटोकडे पाहात राहायचे. डोळ्यांच्या कडा पुसायचे. एकदा मला म्हणाले,' तिला समजले असेल कारे मी तिला दिलेला शब्द पाळतोय हे?'
'अप्पा, कसे समजणार नाही? एखादी गोष्ट समजायला ती काय काकूंना कधी शब्दात सांगायला लागली का?'
'खरं आहे तू म्हणतोयस ते. तिला कधी कांही सांगायला लागलं नाही.' 

आज अप्पांचा प्रयाणाचा दिवस होता. बॅगा तयार होत्या. अप्पा नविन सुटात अवघडून बसले होते. चाळीतील माणसे भेटायला येत होती. सर्व चाळकऱ्यांनी मिळून दिलेल्या, चांदीच्या मुठीच्या, काठीशी अप्पा अस्वस्थ चाळा करीत बसले होते. सुभाष टॅक्सी आणायला गेला होता. अप्पांची अस्वस्थता वाढत होती. कोण येत आहे, कोण जात आहे याची नोंद त्यांचे डोळे घेईनात. त्यांचे हात थरथरू लागले. मी जवळच होतो. म्हंटलं,' अप्पा, कांही त्रास होतोय का?'
'कांही नाही रे. या कोटाची सवय नाही नं. उकडतय. काढून ठेवतो'
असं म्हणून अप्पा खुर्चीवरून उठू लागले. त्या प्रयत्नात त्यांच्या हातातली काठी सरकली. अप्पांना मी सावरलं. पडता पडता वाचले.
'थांबा.. थांबा अप्पा असे एकदम उठू नका. मला सांगा. मी मदत करतो.' मी अप्पांना सावरलं. पण तो पर्यंत त्यांचं शरीर थाड् थाड् उडायला लागलं.
'अप्पा.. अप्पा असं काय करताय'
तेवढ्यात सुभाष आला. त्याने अप्पांना सावरलं. अप्पांचे शरीर अस्वस्थ हालचाल करत होतं. 'सुभा...ष, य.‌. शोदे.. ला बरं वा..टेल नं रे मी आलो... तिथे...तर?...' अप्पा तुम्ही कांही बोलू नका. शांत व्हा पाहू आधी'  'Prabhakar, Call the doctor' सुभाष जवळ जवळ किंचाळलाच. मी लगेच डॉक्टर देशमुखांना फोन लावला. डॉक्टर देशमुखांनी इमर्जन्सी जाणली. ते म्हणाले,' पेशन्टला आडवे झोपवून ठेवा. मी अँब्यूलन्स पाठवतो.
सुभाष 'अप्पा... अप्पा' करत होता. अप्पांच्या कमरेपासून खाली त्राण उरले नाहीत. श्वास जोरजोरात चालू होता. अप्पा, सुभाष हातून घरंगळू लागले. त्यांना घेऊन सुभाष हळूहळू खाली बसला. त्याच्या मांडीवर डोकं ठेवलेल्या अप्पांचे डोळे सुभाषच्या चेहऱ्यावर स्थिर होते. जणू त्यांना फक्त सुभाष दिसत होता, बाकी जगाचं भान नव्हतं. दूरून अँब्यूलन्सचा सायरन ऐकू येऊ लागला. अप्पांचे डोळे, हळूहळू, सुभाषवरून  काकूंच्या, भिंती वरच्या, फोटोकडे वळले. श्वास क्षीण होत होत डोळे मिटू लागले. मध्येच श्वास वाढायचा, डोळे सताड उघडायचे. अप्पांच्या शर्टाची बटणे उघडून सुभाष त्यांची छाती चोळून देत होता. वर पंखा जोरात फिरत होता तरी घाम कमी होईना.  पुन्हा अप्पांचे डोळे मिटू लागले. ओठ 'यशोदा,यशोदा' पुटपुटत होते. हळू हळू गात्र शिथिल पडत होती. दारात येऊन थांबलेल्या ऍब्यूलन्सचा सायरन बंद झाला. आणि आंत...... अप्पांनी डोळे मिटले. आता त्यांचं शरीर शांत झाले होते. स्ट्रेचर घेऊन धावत पळत पायऱ्या चढणाऱ्या वॉर्ड बॉईजच्या कानावर सुभाषची आर्त किंकाळी पडली ....
'अप्प्पाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ.'


 


-oOo-


 संपूर्ण.