मराठी भावगीतांची वाटचाल

मुक्काम पोस्ट टिटवाळा.
काल म्हणजे अठरा फेब्रुवारीला रात्री येथे व्यास व्याख्यानमालेची सुरुवात झाली. पहिले पुष्प गुंफले  डोंबिवलीच्या विनायक जोशींनी. मराठी भावगीतांची वाटचाल हा विषय घेऊन त्यांनी सोदाहरण विवेचन केले.
नामवंत तबलापटू ऋषिराज साळवी (टिटवाळा) आणि पट्टीचे संवादिनीवादक ...प्रभू (डोंबिवली) या दोघांच्या साथीने बहार आणली.
 मराठी भावगीताची पहिली मुद्रित तबकडीचा मान जातो, तो नागोराव देशपांडे यांच्या कवितेवर जी. एन. जोशींनी सांगितिक संस्कार करून गीत बनवलेल्या ‘कसा गं बाई झाला... कुणी गं बाई केला सैल तुझा अंबाडा’ या भावगीताला. ही घटना १९३० सालची. पुढे विवेचन करताना विनायक जोशींनी एक छान कल्पना समोर ठेवली. मराठी भावगीत पुढील वर्षी एक्क्याऐंशी वर्षे पूर्ण करीत आहे म्हणून सर्व मराठी बांधवांनी मराठी भावगीताचा ‘सहस्त्रचंद्र दर्शन’ सोहळा साजरा करावा, असे त्यांनी सुचविले. खरोखर ही एक छान कल्पना आहे.
 सुरुवातीला ‘भावगीताची वाटचाल’ या दोन शब्दात असलेल्या चार पदांची फोड विनायक जोशींनी केली. भाव, गीत, वाट आणि चाल या प्रत्येक पदाने व्यक्त होत असलेल्या अर्थाकडे त्यांनी श्रोत्यांचे लक्ष वेधले. पुढील विवेचनातून यावर प्रकाश टाकताना ते विवेचन एकांगी म्हणजे सांगीतिक प्रवास दाखविणारे दाखविणारे वाटले. विशेष हे की कार्यक्रमाची सांगता करताना, ‘राधा ही बावरी’ आणि ‘कसा गं बाई झाला’ ही दोन अर्वाचीन आणि प्रारंभिक भावगीतांचे मिश्रित भावगीत गाऊन विनायक जोशींनी श्रोत्यांना ‘तुम्हीच कृष्ण व्हा आणि निवड करा’ असे आवाहन केले.
 ‘देव भावाचा भुकेला’ या उक्तीतून व्यक्त होणारा निकष ‘कृष्णा’ची आवड दाखविणारा आहे. विनायक जोशींनी केलेले विवेचन बरेचसे एकांगी वाटले ते यामुळे की त्या विवेचनात सांगीतिक वाटचाल  दाखविली गेली तरी कवी आणि त्याच्या कवितेतील भाव संगीतकार-गायक यांनी किती आणि कसा खुलविला आहे, याची उदाहरणे त्या विवेचनात फारशी अंतर्भूत केली गेली नव्हती. खरे म्हणजे मनातील भाव व्यक्त करताना शब्दांना तालबद्ध केले जाते (पद) तसेच शब्दांचा ‘मोकाट’ वापरही केला जातो (मुक्तक). मुक्तकाचे गीत होणे अवघड असले तरी अनेक नामवंत कवींची मुक्तके भाव-अभिव्यक्ती-मूल्य़ाच्या दृष्टीने फार उंची गाठलेली असतात, हेही लक्षात घ्यावे लागेल. कुणी सांगावे, वाद्यसंगीताचा मेळ घालीत एखादे मुक्तकही गीत होऊन पुढे येईल! कार्यक्रमानंतर ही गोष्ट विनायक जोशींना सुचविलीही.
 यानिमित्ताने एक विचार मनात आला की, मराठी कवी, कविता आणि तिचे झालेले गीत यातून झालेली भावाची अभिव्यक्ती, जी कवितेचे मूल्य वाढविण्याला कारण ठरलेली दिसते, अशी उदाहरणे संग्रहित व्हावीत. अशा मूल्यवर्धनात संगीतकार किंवा गायक किंवा दोघांचाही सहभाग असू शकतो. अनेक मनोगती अभ्यासू रसिक आहेत, हे निराळे सांगावयास नको. विनंती ही की मनोगतींना जाणवणारी अशी उदाहरणे उद्धृत येथे संग्रहित केली जावीत.