४५. सिनेमा, सिनेमातला सिनेमा आणि आपण

प्रथम ‘सिनेमातला सिनेमा’ काय चीज आहे ते पाहू.

रात्रंदिवस आपल्या डोळ्यासमोर असंख्य चित्र सरकतायत आणि मनात संवाद उमटतायत, आपल्याला त्यांची जाणीव इतकी न्यून आहे की असं चाललंय हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. अर्थात सगळ्यांचीच अशी स्थिती असल्यानं हा अहोरात्र चाललेला सिनेमा आपल्या जीवनाचा भागच झालाय म्हणजे या सिनेमाशिवाय सभोवतालच्या जगाशी आपला प्रत्यक्ष संबंध येऊ शकेल याची आपल्याला कल्पना देखील नाहीये. हा सिनेमा जगण्याचा इतका अविभाज्य भाग झालाय की हा सिनेमा बघत बघतच आपण बाकी आयुष्य जगतो.

तुम्हाला खरं वाटणार नाही पण रात्री आपल्याला दिसणारी स्वप्न हा त्या सिनेमाचा केवळ अंधार व्यवस्थित झाल्यानं होणारा बोध आहे म्हणजे  सिनेमा सकाळी सुरूच असतो पण पडदे उघडल्यावर थिएटरमध्ये जसा पिक्चर फिक्का दिसायला लागतो तसा तो एकदम तीव्रतेनं जाणवत नाही एवढंच.

थोडक्यात आपल्याला सभोवतालच्या जगाचं दृष्टी, श्रवण, स्पर्श, गंध स्वाद यांनी होणारं ज्ञान, हा सिनेमा बघताना जेवढी काही उसंत मिळते त्यातून झालेलं असतं. या सिनेमानं आपलं लक्ष संपूर्ण वेधून घेतलंय हे लक्षात येणं, हा बोध, तो सिनेमा बंद करणारी पहिली कृती आहे.

हा सिनेमा म्हणजे मन आहे आणि सभोवतालचं जग हा खरा सिनेमा आहे, जोपर्यंत हा ‘सिनेमातला सिनेमा’ बंद होत नाही तोपर्यंत जग खरं वाटतं, आणि एकदा हा ‘सिनेमातला सिनेमा’ बंद झाला की मग जग निव्वळ सिनेमा होतं!
__________________________________________

आता सिनेमा म्हणजे काय ते बघू.

कोणताही सिनेमा बघणाऱ्यावर किती परिणाम करणार हे बघणारा त्यातल्या संकल्पना किती खऱ्या मानतो यावर अवलंबून असतं म्हणजे कुणीही कुणाचा प्रियकर किंवा प्रेयसी, आई किंवा वडील नसतं, कुणीही विलन नसतं पण दिग्दर्शक अशी काही मांडणी करतो आणि सिनेमात काम करणारी मंडळी असा काही प्रभावी अभिनय करतात की आपल्याला ते सगळं खरंच वाटायला लागतं! आपण त्या सिनेमात संपूर्ण गुंतून जातो, कुणीही कुणाचं काहीही नसताना आपल्याला पात्रांचा विरह दुखवून जातो, खलनायकाची चीड येते, आईचं ममत्व भावनिक करतं आणि बापाचा विरोध अनाठायी वाटायला लागतो, दुष्टांचं निर्दालन व्हावं आणि काहीही करून प्रेमिकांचं मिलन व्हावं आणि सुखांत शेवट व्हावा असं वाटायला लागतं.

तुम्हाला मी जरी उगीच स्टोरी लावतोय असं वाटत असेल तर तुम्ही तुमची टिवी सिरियल्स मधली इनवॉल्वमेंट बघा, उत्तम टिआरपी असलेल्या सिरियल्सचं यश पाहा आणि तरीही नाही पटलं तर क्रिकेटचे सामने आणि त्यात प्रचंड जनसमुदायाचे असलेले आंतरिक लागेबांधे पाहा, वास्तविक बोल्ड, कॅच, एलबीडब्ल्यू, स्कोर सगळ्या मानवी कल्पना आहेत पण मॅच चालू असताना जरा काही व्यत्यय आला किंवा तुमचा भरवशाचा फलंदाज आऊट झाला तर आपली होणारी अस्वस्थता पाहा म्हणजे मी काय म्हणतोय ते समजेल.  

तर थोडक्यात काय की प्रेक्षकाचं सिनेमा किंवा समोरचं दृश्य खरं मानणं त्याच्यावर किती परिणाम करणार हे ठरवतं. तुम्हाला एकदा तुमची इनवॉल्वमेंट तुमच्या धारणेवर अवलंबून आहे हे समजलं की परिणाम शून्यता यायला लागते, प्रसंग खरा न वाटता सिनेमा सारखा वाटायला लागतो, मग तो सिनेमा असो की क्रिकेट असो की वास्तविक आयुष्यातला प्रसंग असो!
________________________________

सिनेमाला दृक आणि श्राव्य असे दोन परिणाम आहेत आणि याच दोन संवेदनांनी आपल्या जाणीवेचा नव्वद टक्के भाग व्यापला आहे, बाकीच्या तीन संवेदना (स्पर्श, गंध आणि स्वाद) फक्त दहा टक्के आहेत.

आता हे समजून घेणं एकदम महत्त्वाचं आहे, कोणत्याही जाणीवेचा उलगडा होण्यासाठी प्रथम जाणीव त्या संवेदनेकडे उन्मुख व्हावी लागते आणि जाणीव उन्मुख होता क्षणी आपल्या सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या दृष्टी आणि श्रवण या दोन फॅकल्टीजनी आपण ती डिकोड करायचा प्रयत्न करतो. त्यातही, म्हणजे नव्वद टक्क्यातल्या दृकश्राव्य आकलनात, दृक भाग जवळजवळ पंचाहत्तर टक्के आहे आणि श्राव्य भाग पंधरा टक्के यामुळेच गायक आणि वादक दुर्मिळ आहेत कारण त्यांची श्राव्य संवेदना इतरांपेक्षा जास्त आहे.

हे लिहिण्याचं कारण असं की जर तुम्हाला दृकश्राव्य परिणामाची तीव्रता कमी करायची असेल तर इतर तीन संवेदना हळूहळू तीव्र केल्या पाहिजेत आणि त्या तीव्र करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या वापरायला हव्यात.

तुम्ही कधी दखल घेऊन बघा, आइसक्रीम खाताना आपल्याला पहिल्या स्वादाला एकदम ‘अहाहा! ’ वाटतं मग पुन्हा आपलं लक्ष संवाद किंवा सभोवतालच्या दृश्याकडे वेधलं जातं आणि मग एकदम आइसक्रीम संपल्यावरच लक्षात येतं, अरे संपलं!

स्पर्शाची संवेदना तर इतकी पुसट झालीये की फक्त तारुण्यातच काय तो स्पर्शाचा मोह असतो आणि मग नंतर सगळं इतकं रूटीन होतं की स्पर्शाप्रती आपण जवळजवळ बधिरच होतो. अंघोळ करताना पहिला पाण्याचा स्पर्श झाला की पुढे ‘सिनेमातला सिनेमा’ असा काही अवधान वेधून घेतो की बाकीचं सगळं यंत्रवत करून आपण एकदम रेडी फॉर द शो!

श्वासाकडे तर निव्वळ दुर्लक्षच आहे आणि त्यामुळे तो इतका उथळ झालाय की गंधाची जादू अभावानंच लक्षात येते.

तर सांगायचं म्हणजे आपण स्पर्श, गंध आणि स्वाद या संवेदना जितक्या प्रगल्भ करू तेवढ्या सर्व संवेदना बॅलन्स होतील आणि मग अनायासे दृकश्राव्याचा परिणामही संतुलित होईल.

बोधाच्या दृष्टीनं पाहिलं तर प्रत्येक प्रसंगात स्वस्मरण कोणत्याही प्रसंगाचा आपल्यावर होणारा परिणाम न्यून करतं कारण आपण जाणीवेचे जाणते आहोत, शुद्ध जाणीव आहोत म्हणजे इंद्रियगम्य जाणीवेचे जाणते आहोत, निराकारावर कसलाही परिणाम होत नाही!

________________________________________

दृष्टीत आणि श्रवणात सुस्पष्टता (क्लॅरिटी) आणणं मनाचा किंवा ‘सिनेमातल्या सिनेमाचा’ परिणाम शून्य करत जातं.

इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नमूद करतो, मनाचा प्रोजेक्टर नेहमी जे नाही ते दाखवत असतो, म्हणजे तुम्ही घरी आहात पण तुम्हाला ऑफिसची दृश्य आणि संवाद दिसत आणि ऐकू येत असतात किंवा तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुमच्या समोर घरचे प्रसंग चालू असतात.

साधनेच्या दृष्टीनं तुम्हाला दृष्टी आणि श्रवणाच्या मेंदूत गेलेल्या लिंक्स क्लिअर करायला हव्यात.

यासाठी सर्वोत्तम साधना म्हणजे निवांत वेळ मिळेल तेव्हा शांत पाठ टेकून बसणं आणि डोळे मिटून आतून मेंदूकडे बघणं आणि असं करत असताना आजूबाजूला जे चालू आहे ते अत्यंत अवधानपूर्वक ऐकणं. ही दुहेरी साधना आहे आणि ती मेंदूकडे डोळे आणि कानामार्फत येणाऱ्या दृकश्राव्य लिंक्स क्लिअर करत नेते.

या साधनेच्या प्रगतीचा निकष म्हणजे शरीर बसलंय आणि आजूबाजूचं स्पष्ट ऐकू येतंय हा अनुभव तुम्हाला येईल आणि मनाचा चलतपट थांबल्यानं शांत वाटायला लागेल. तुम्ही जसजसे या साधनेत प्रगत होत जाल तसे डोळे उघडे असताना तुम्हाला समोरचं स्पष्ट दिसेल आणि आजूबाजूचं स्पष्ट ऐकू येईल, तुम्ही सदैव वर्तमानात राहाल, भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्यकाळाची भीती तुम्हाला सचिंत करणार नाही. तुम्ही एकदम फोकस्ड होत जाल.
__________________________________

आता सिनेमाची संकल्पना माणसाला जीवनावरून सुचलीये म्हणजे जे वास्तविकात घडतंय ते कथा म्हणून वेगवेगळ्या प्रसंगातून आणि आकर्षक मांडणीतून दृकश्राव्य माध्यमातून दाखवणं म्हणजे सिनेमा.

जसा सिनेमाचा परिणाम बघणाऱ्याच्या मान्यतेवर आहे तसाच आयुष्यातल्या घटनांचा परिणामही आपल्या धारणेच्या सघनतेवर आहे. आपण स्वत:ला भारतीय मानलं तर इतर देशांचा धोका वाटतो, आपण स्वत:ला स्त्री मानलं तर जगात पुरुषी वर्चस्व वाटतं किंवा पुरुष मानलं तर स्त्रिया अनाकलनीय वाटतात, आपली स्वत:विषयीची मान्यता किंवा धारणा आपल्यावर प्रसंगाचा काय परिणाम होणार ते ठरवते.

जर आपण स्वत:विषयी कोणतीही धारणा ठेवली नाही तर आपण शुद्ध जाणीव होतो, खरं तर आपण शुद्ध जाणीवच आहोत हे आपल्या लक्षात येतं. मग प्रसंग फक्त घडतो आणि आपल्याला कळतो, आपण मात्र जसेच्या तसे राहतो अगदी सिनेमा बघून त्याची मजा घ्यावी तसे. सिनेमाची मजा निश्चित येते पण त्याचा आपल्यावर परिणाम मात्र काहीही होत नाही.

संजय

जे जगतो तेच लिहितो

सत्य समजणं आणि आपणच सत्य आहोत आहोत हा बोध होणं यात अंतर नाही

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १