मार्गे पॅरिस

           अमेरिकेला जाण्यापूर्वी  जशी तेथे आपण व्यवस्थित पोचतो की नाही आणि पोचल्यावरही आपल्याला योग्य शिक्के मिळून आपण देशात प्रवेश करतो की नाही ही काळजी असते तशी परतताना नसते कारण ज्या आपल्या देशात कोणीही बिनदिक्कत घुसू शकतो तेथे आपल्याला प्रवेश तरी कोणी नाकारणार नाही याची खात्री असते.यापूर्वी दोन वेळा पॅरिसवरून एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले होते पण त्या चारही वेळा पॅरिसचे नखही आमच्या दृष्टोत्पत्तीस येऊ नये याची दक्षता महाराजाने घेतली होती. उगीच वैभवसंपन्न नगरीच्या दर्शनाने भारतीयांची मति भ्रष्ट व्हायला नको असा विचार त्यामागे होता की काय कोण जाणे. पण पॅरिसमध्ये दोन तास विमान थांबले तरी तेथे उतरण्याची आम्हाला परवानगी नव्हती.त्यामुळे विमानाची साफसफाई खरंच करतात की नाही याची पाहणी मात्र आम्हांस करता येत असे,अगदी येश्टी स्टॅंडासारखे " साहेब जरा पाय वर करा " असे सफाई कर्मचाऱ्यांचे विनंतीवजा हुकूम ऐकत आपल्या पदस्पर्शाने त्यांचे मस्तक पवित्र होऊ न देण्याची दक्षता आम्हाला घ्यावी लागत असे,पण आम्ही पॆरिसपर्यंत केलेला  कचरा  पुढच्या प्रवासात आम्ही बरोबर बाळगत नसल्याची खात्री झाल्याने नवा कचरा करण्यास आम्हाला पुरेशी मोकळीकही मिळत असे.

           पण यावेळी मात्र  डेल्टा एअर लाइनने गेल्यामुळे जाताना आम्ही जरी ऍमस्टरडॅअमवरून गेलो तरी परतताना मात्र एअर फ्रान्सशी त्यांचा समझौता झालेला असल्यामुळे आम्हाला एअर फ्रान्सच्याच विमानाने  परतावे लागणार होते आणि त्यात पॅरिसला विमान बदलावेच लागत होते त्यामुळे पॅरिसचा विमानतळ काही झाले तरी पाहावा लागणारच होता त्यामुळे मी जरा आनंदात होतो पण माझ्या आनंदावर इतर पूर्वानुभवी प्रवाशांनी विरजण टाकले त्यात माझी बहीणही सामील होती.मागील वर्षी तीही त्याच विमानाने गेली असल्याने त्या विमानतळावर स्थानक (टर्मिनल) बदलावे लागते व त्यासाठी बसमधून जावे लागते असे तिने सांगितले त्याच बरोबर आमच्या एडिसनच्या वास्तव्यात त्याच प्रकारचा प्रवास केलेला एक ज्येष्ठ नागरिक भेटला व त्यानेही तेथे बयाच बसेस असतात व योग्य त्या बसमध्ये चढणे आवश्यक असते आणि मधला वेळ अगदी कमी असतो असे सांगून माझ्या विमानप्रवासाच्या भीतीत आणखी भर घातली त्यामुळे आपल्याला बस बरोबर पकडता न आल्यामुळे आपण पॅरिसच्या विमानतळावरच अडकून पडलो आहोत अशी भीषण दृश्ये मला दिसू लागली त्यामुळे बहिणीने केलेली"तू आपली चाकखुर्चीच(व्हीलचेअर)कर" ही सूचना मला पसंत पडली कारण मग तो खुर्चीवाला बरोबर जेथे जायचे तेथेच सोडेल असे तिने सांगितले.तशा माझ्या सगळ्या बहिणी भावांना फार जपतात आणि ही लहान असली तरी त्याच पठडीत तयार झालेली !

      चाकखुर्चीसाठी आम्ही नावे अगोदर तिकिटे काढतानाच नोंदवली असल्याने ती मिळण्याचा काही प्रश्न नव्हताच शिवाय मुंबई सहार विमानतळावरच आम्ही एकदा त्या सेवेचा अनुभव घेतला होताच त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ती उपलब्ध असेच .तरी ऍमस्टर्डॅम व नंतर नेवार्क दोन्ही ठिकाणी मी त्या सेवेचा लाभ घेण्याचे टाळले होते कारण ऍमस्टर्डॅमला ज्या द्वारावर आमचे विमान थांबले आणि ज्या द्वारावरून ते पुन्हा सुटणार होते त्या दोन्ही मधील अंतर इतके कमी होते की ते चालण्यासाठी लागणाऱ्या वेळापेक्षा जास्त वेळ कदाचित चाकखुर्चीचा शोध घेण्यातच गेला असता,तर नेवार्कला बॅगा हुडकण्यासाठी आपण आपल्या पायावर उभे असलेले बरे असा दृष्टिकोण ठेवल्याने तेथेही चाकखुर्चीवाल्यांची मी निराशा केली होती त्यामुळे भारतातील खुर्ची वाहकांप्रमाणे अमेरिकन किंवा डच वाहक आपल्याला योग्य स्थळी पोहोचवल्यावर आपला निरोप घेण्यापूर्वी माझ्या स्वभावानुसार मी एकादा डॉलर त्याच्या हातावर टिकवल्यावर "साहेब जरा तरी गरिबाच्या पोटाचा विचार करत जा " या अर्थाचे कोणते वाक्य म्हणतात याची मला कल्पना नव्हती.अर्थात अर्थखाते सांभाळणारी व्यक्ती फारच उदार असल्याने ती बहुधा त्यांच्या सगळ्या खानदानाचा विचार करून बक्षिशी त्यांच्या हातावर टिकवत असल्याने "द्येव तुज्या पोराबाळाचं कल्यान करील गं माय" हेच वाक्य कदाचित मला ऐकायला मिळण्याची शक्यता होती. तरीही यावेळी अगदी पहिल्या वेळेपासून म्हणजे नेवार्कपासूनच व्हीलचेअर सेवेचा लाभ आणि तो दोघांनीही घ्यायचा असे आम्ही ठरवले होते.त्याप्रमाणे नेवार्कच्या विमानतळावर बोर्डिंग पास घ्यायला गेल्यावर लगेचच खुर्चीची मागणी करायची असे ठरले.

     पण प्रथम ग्रासे मक्षिकापात: असे झाले कारण पॅरिस पर्यंतच्याच बोर्डिंगपासवर आम्हाला बैठकक्रमांक मिळाले व पुढच्या प्रवासाचे बोर्डिंग पास मिळाले तरी बैठकक्रमांक मात्र पॅरिसलाच मिळतील असे सांगण्यात येऊन माझ्या काळजीत आणखी भर टाकण्यात आली कारण हे काम काही खुर्चीवाल्यांकडून होण्यासारखे नव्हते .अर्थात आलिया भोगासी असावे सादर म्हणत आम्ही खुर्चीची मागणी केली तेव्हा तुम्ही सुरक्षा पडताळणीस जाण्यासाठी तयार व्हाल तेव्हा येथेच मागणी करा म्हणजे मिळेल असे सांगण्यात आले.त्यांचेही बरोबरच होते कारण आम्हालाही आम्ही नेहमीप्रमाणेच भरपूर आधी म्हणजे संध्याकाळी सव्वासातच्या उड्डाणासाठी दुपारी तीन वाजता  गेल्यामुळे आमचे बोर्डिंग पास घेण्याचे काम आटोपल्यावर दोन अडीच तास खुर्चीवाल्यांच्या सहवासात बसून काढण्याचे कारण नव्हते त्यामुळे विमानतळावर वरच्या मजल्यावरील खान पानसेवेचा लाभ घेण्यासाठी गेलो व तेथील कार्यभाग आटोपल्यावर खालच्या मजल्यावर खुर्चीसाठी जायला निघालो तर ज्या गेटमधून आमच्या उड्डाण स्थळाकडे जायचे ते वाटेतच दिसले व चिरंजीवांनी आम्हाला याच गेटने जायचे आहे असे सांगितल्यावर मग खाली जाऊन खुर्ची घेऊन परत वर येण्यासाठी आत्ता होते त्या अंतराच्या दुप्पट अंतर चालण्याचा  द्राविडी प्राणायाम करण्या ऐवजी सरळ त्या गेटने चालतच आत का जाऊ नये असे माझ्या मनात आले व तसे बोलून दाखवल्यावर सर्वांना विशेषत: सौ.लाही योग्य वाटले त्यामुळे आम्ही चिरंजीव व कुटुंबीयांचा तेथेच निरोप घेऊन आत शिरलो.डॉ.ए पी जे कलाम,जॉर्ज फर्नांडिस,शाहरुख अश्या बड्या बड्या लोकांना अडवणाऱ्या अमेरिकन सुरक्षा कर्मचाऱ्यांना आमच्याकडे मात्र ढुंकूनही पाहावे वाटत नाही तसेच आताही झाले व यावेळी सौ.नेही आपले सगळे धातूचे पदार्थ अगोदरच टोपलीत काढून ठेवल्याने तिलाही काही अडकावे लागले नाही आणि दहा पंधरा मिनिटातच तेथून मोकळे होऊन आम्ही टोपलीतील बूट घड्याळ,पॅन्टचा बेल्ट असा सर्व ऐवज पुन्हा आपल्या अंगावर चढवत असताना एक प्रवासी इथेही बोटाचे ठसे कशाला लागतात या चोरांना असा निषेधात्मक सूर काढत आमच्या जवळून गेला अर्थात आम्ही त्याच्याकडे सहानुभूतीचा कटाक्ष टाकण्यापलीकडे काही मदत करू शकलो नाही.व आमच्या उड्डाण द्वारापाशी जाऊन बसलो.

      सध्या इंधनदरातील प्रचंड वाढीमुळे विमानकंपन्यांच्या काटकसर मोहिमेत विमानाच्या बैठकांचा आकारही बराच आक्रसला असल्यामुळे आठ नऊ तास त्या खुर्च्यांवर बसून काढणे हे अगदी मोठे संकट वाटते.मात्र खाद्यपेयांचा मारा करून या असुविधेकडे प्रवाशांचे दुर्लक्ष होईल असे त्यांना वाटत असावे.सध्या बरोबर न्यावयाच्या सामानासाठीची मर्यादा आणखीनच कमी करून आता फक्त २३ किलोच्या एका बॅगेवर आणली आहे.काही दिवसांनी प्रवाशांचेही वजन करून अधिक वजनाच्या प्रवाशांसाठीही अधिभार लावायची कल्पना त्यांना सुचली तर नवल नाही.आम्ही जातानाचे तिकिट घेताना ती डेल्टा एअरलाईनने दोन बॅगांपुरती ठेवली असल्याने आम्हाला यावेळी तरी आमचे सामान नेण्यास अडचण आली नाही.   

      नेवार्क ते पॅरिस हा प्रवास फक्त पारिसला (खरा उच्चार पारी इति मीना प्रभु)पोचल्यावर काय होणार याची काळजी करण्यात गेला या विमानात आम्हाला खिडकीजवळच्या व दोन आसनांच्या बैठकी मिळाल्या त्यामुळे उठण्यासाठी काही अडचण आली नाही. खानपान व्यवस्था चांगली होती .या विमानात प्रथम श्रवणयंत्र (हेडफोन्स) देण्यात आले नव्हते त्यामुळे समोर दूरदर्शन पडदा असूनही त्याचा आस्वाद कसा घ्यायचा याचा पेच सौ. ल़ा पडला.यापूर्वी अमेरिकेत एका स्थानिक विमानप्रवासात आम्हाला त्यासाठी पाच डॉलर्स मोजावे लागणार होते.तसे झाले असते तर कदाचित मी श्रवणसुखावर पाणी सोडले असते पण ते सौ.ला शक्य झाले असते की नाही सांगता येत नाही  पण नंतर एकादा खाद्यपदार्थ द्यावा तसा आम्हाला श्रवणयंत्र बहाल करण्यात आल्यावर सौ. चा जीव भांड्यात पडला व लगेच तिने कानाला ते लावून दूरदर्शनवरील वाहिन्या धुंडाळायला सुरवात केली.मी बरोबर घेतलेले पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होतो पण नंतर एक इंग्रजी चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला शेवटी सौ. च्या सल्ल्यानुसार " माय नेम इस कलाम" या इंग्लिश नावाचा हिंदी चित्रपट पाहिला व तो छोटा व बरा वाटला.नंतर काही संगीत कार्यक्रम ऐकले व मध्ये मध्ये डोळे मिटून झोप घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.पॅरिसला पोचायला अपेक्षित वेळ ८ तासांचा होता व तेवढ्याच वेळात आम्ही पोचलो पण विमानतळावर पोचल्यावर जी उद्घोषणा झाली त्यानुसार आम्हाला वीस पंचवीस पायऱ्यांची शिडी उतरून बसने आमच्या २ई या उड्डानस्थानकाकडे जायचे होते याचा अर्थ स्थानकापासून बरेच दूर विमान उभे करण्यात आले होते..

      आमच्या चाकखुर्ची घेण्याच्या निर्णयास नाट लागायला सुरवात नेवार्कला झाली होतीच तिचीच आवृत्ती येथेही झाली कारण २ई पर्यंत गेल्याशिवाय खुर्ची उपलब्धच होणार नव्हती.म्हणजे पॅरिस विमानतळावर आमच्या बस प्रवासाची सुरवात झाली व पॅरिस म्हणजे बसचा प्रवास हे समीकरण ठाम होण्यास विमानतळावरीलच पुढचा प्रवास कारणीभूत ठरला.पायऱ्या उतरल्यावर बस मात्र अगदी जवळ उभी होती व खाली विमानतळावरील एक कर्मचारिणी आम्हाला दिग्दर्शन करायला उभी होती.दोन तीन बसेस मधून आमची रवानगी २ई च्या दारात झाली व आम्ही २ई उड्डाणस्थानकामध्ये प्रवेशलो.तेथे आमच्यासारखेच एक जोडपे दिसत होते तरी त्या गृहस्थाची बायको बऱ्यापैकी त्याचे ऐकत होती.ते गुजराती असले तरी त्यातील पुरुष मुंबईत राहिल्यामुळे मराठी चांगले बोलत होता. या गायवाला  नावाच्या  गृहस्थाबरोबर माझी चांगली गट्टी जमली त्यामुळे आम्ही पुढील उड्डाणाचा द्वार क्रमांक तेथे लावलेल्या दिग्दर्शन फलकावर पाहू लागलो व तेथे तो सापडणार नाही हे आमच्या दोघांचाही एकदमच लक्षात आले कारण आमच्या मुंबई कड़े जाणाऱ्या विमानाचे उड्डाणस्थानक २सी होते.आम्हाला नेवार्क वर जो बोर्डिंग पास मिळाले होते त्यात पॅरिस विमान तळावर कोणत्या स्थानकावर पोचल्यास इतर स्थानकाकडे कसे जायचे याचे स्वतंत्र नकाशे  छापलेले होते.आनंदाची गोष्ट म्हणजे  २ई स्थानकात आम्ही उभ्या असलेल्या जागीच २बी २ सी २ जी या स्थानकांकडे जाणाऱ्या बसची रांग दर्शवणारी पाटी होती व काही प्रवासी तेथे उभेही होते तेव्हा आम्ही व गायवाला दंपतीने त्या रांगेत उभे राहण्याचा निर्णय घेतला.खुर्चीवाले खरे तर आमची वाट बघत तेथे उभे होते पण बसनेच जायचे असेल तर मग त्यांची काय जरूरी हा माझा निर्णय बायकोलाही पटला.आम्ही रांगेत उभे असतानाच एकदम बस आल्याचे दिसले व बसमध्ये चढण्यासाठी असलेले स्थानकाचे दार उघडण्यात आले व आम्हाला त्यात चढण्यास सांगण्यात आले.यावेळी बसमध्ये बरेच कोंबून प्रवासी भरण्यात आले.तरी गायवाला जोडपे व आम्हाला बसायला जागा मिळाली.ती बस २बी २ सी २ जी कडे जात होती व पहिला थांबाच आमचा होता.

       या बसने आम्ही २ सी स्थानकावर पोचल्यावर मात्र एक गहन प्रश्न उभा राहिला या स्थानकावर जाण्यासाठी एस्कलेटरचा उपयोग करावा लागणार होता व तेथे सौ.चे घोडे पेंड खाते.इतरत्र बहुधा एस्कलेटरबरोबर पायऱ्यांचे जिने किंवा उद्वाहक असतात ते येथे नव्हते.मग मात्र मी तिला एस्कलेटरवर हात धरून नेण्याचे  धाडस केले आणि यावेळी मात्र प्रथमच सार्वजनिक ठिकाणी माझा हात धरण्याचे तिला करावे लागले. आम्ही व गायवाला दंपती २ सी कड़े पोचलो व तेथील फलकावर आमच्या पुढील यात्रेच्या विमानाच्या द्वारक्रमांक लिहिलेला दिसला व पुन्हा एकदा येथेही एस्कलेटरवरून जाण्याचा योग आला व पहिल्यावेळची पुनरावृत्ती करावी लागली शेवटी ८८ क्रमांकाच्या दाराजवळील खुर्चीवर जाऊन बसल्यावर मी सुस्कारा सोडला.त्या दाराबाहेरील टेबलवर कोणीही कर्मचारी नव्हते व आम्ही जवळ जवळ दोन तास अगोदरच तेथे पोचलो होतो.आमच्याबरोबर आतापर्यंतच्या प्रवासातील एक गुजराती भगिनीने खुर्चीचा वापर केला होता ती आमच्यानंतर पोचली तिच्याकडून खुर्चीवाल्यांसाठी वेगळी बस असते असे कळले.ती नंतरच्या प्रवासात आमच्याच शेजारी होती.

     पॅरिसला आम्ही सकाळी ८-१० ला पोचलो व पुढच्या उड्डाणाची वेळ १०-३० होती.बराच वेळ असल्याने मी व श्री गायवाला यांने विमानतळाचा फेरफटका घ्यायचे ठरवले.पॅरिस कितीही छान असले ते किती छान हे अजून आम्हाला कळले नाहीच-पण हा विमानतळ मात्र अगदीच छोटा वाटला.२सी या आमच्या स्थानकावर ८१ ते ९० द्वारे होती व त्यांच्यापुढील जागा प्रवाशांनी अगदी गच्च भरली होती त्यामुळे आमच्या फेरफटक्यातून परतताना बऱ्याच उड्डाणांची वेळ झाल्याने प्रवासी रांगेत उभे राहिल्यावर त्या रांगा एवढ्या लांब होत्या की परतीसाठी आम्हाला अगदी त्यांना बाजूस सारूनच परत यावे लागले त्यानंतरही आमच्या उड्डाणाचा पत्ता नसल्यामुळे आता भगिनी मंडळाने आता सौ.गायवाला,सौ.अस्मादिक व आणखी एक गुर्जर भगिनी असे मंडळ जमले होते- विमानतळाचा फेरफटका घेण्याचे ठरवले व त्यांचा फेरफटका आमच्या सारखा हा गेलो आणि हा आलो अशा स्वरूपाचा नव्हता बहुधा पुन्हा या विमानतळावर आपण कुठले यायला या विचाराने त्यांनी विमानतळातील असतील नसतील ती विक्रीकेंद्रे पाहण्याचे ठरवले असावे त्यामुळे आमच्या द्वारावर कर्मचारी आले व प्रवासी रांगेत उभे राहिले तरी त्यांचा पत्ता नव्हता व त्यात आमचे तिकिट प्रवासपरवाना वगैरे सर्व गोष्टी आमच्या सौ.च्या पर्समध्ये अर्थातच तिला शोधून आणणे मला भाग पडले व आता पुन्हा प्रवाशांच्या रांगांतून "माफ करा" चा मंत्र जपत मला ८१ क्रमांकाच्या द्वारापर्यंत जावे लागले तेव्हा भगिनी मंडळ पॅरिसलाच मुक्कामाला आल्याच्या थाटात वावरत होते मग मी ठेवणीतला आवाज काढून सौ,लाच द्वार क्रमांक ८८ कडे जाऊन बैठक क्रमांक घेण्यास सांगितले व विमानात शिरण्यापूर्वी एकदा स्वच्छतागृहास भेट देण्याचे काम केले व नंतर मात्र शक्य तो जलद हालचाली करत परतलो तो काय आमच्या उड्डाणाच्या सर्व प्रवाशांची रांग लागलेली व सौ.ला बैठक क्रमांक मिळालेच नव्हते मग मी आम्हाला मिळालेले बोर्डिंग पास घेऊन प्रवेशद्वारावरील अधिकाऱ्याला आमच्या बैठकांची अडचण निवेदन केल्यावर त्याने रांगेतच उभे राहा तुम्हाला नवे बोर्डिंग पासेस मिळतील असे सांगून आणखी एक प्रश्न विचारला " तुम्हाला खुर्ची नको का ?"आमच्या तिकिटावर खुर्चीची मागणी असल्याने हा प्रश्न होता पण आता विमानात चढताना खुर्ची कशाला हे मला समजेना व तसे मी त्याला सांगून इतका प्रवास बिनखुर्चीचाच केला असे सांगितल्यावर त्याचे समाधान होईल असे वाटले पण उलट त्याने "गेटमधून आत गेल्यावर पुन्हा जिन्यावरून खाली उतरावे लागेल आणि तेथून आणखी एका बसने विमानापर्यंत व तेथून आणखी पायऱ्यांच्या जिन्यावरून परत विमानात चढायचे आहे इतके सगळे तुला जमेल का?"असे विचारल्यावर आता माघार घ्यायची नाही असे ठरवून मी त्याला "त्याची मला काळजी नाही"असे सांगून परत जाऊन रांगेत उभा राहिलो.

     रांगेतून प्रवेशद्वारापर्यंत गेल्यावर आम्हाला आसनक्रमांक असलेले बोर्डिंग पास मिळाले व नेवार्कच्या विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ते शेजार शेजारचेच होते तरीही ते ई व एफ म्हणजे कडेचे नसावेत अशी शंका मला आली.पण विमानात चढेपर्यंत ते कळणार नव्हते.त्या अगोदर एकदा सुरक्षा तपासणी होती यावेळी नेहमीप्रमाणे आम्ही सर्व तयारीनिशी व अंगावरील कपड्याशिवाय बाकी सर्व पदार्थ टोपलीत टाकून गेल्यावर मला तर त्या चाळणीतूनही न जाता आत प्रवेश मिळाला व दुसऱ्या बाजूने आम्ही सर्व एका जिन्यावरून खाली उतरून आता तिसऱ्यांदा बसमध्ये बसून ए एफ १८ या उड्डाणाच्या विमानाकडे प्रयाण केले यावेळी मात्र पॅरिसहूनही बरेच भारतीय प्रवासी आलेले दिसले व बस अगदी मुंबईच्या बेस्ट सारखीच कोंबून भरण्यात आली त्यामुळे यावेळी आम्हाला बसमध्ये बसायला मिळाले नाही व बरोबरच्या अमेरिकन व युरोपियन प्रवाशांना "आता भारतातील बसमध्ये बसण्याचा सराव तुम्हाला होईल "असे मी विनोदाने म्हटले.ती बस विमानाच्या अगदी जवळ नेऊन उभी करण्यात आली व आम्ही आत शिरताना अगदी हिंदुस्तानी भाषेत आमचे स्वागत करण्यात आले.विमानकंपन्या आता भारतीय प्रवाशांना बऱ्याच भाव देऊ लागल्या आहेत.अगदी अमेरिकेत असतानाही आम्ही एडिसनहून फिनिक्सला यू.एस.एअरलाइनच्या विमानाने गेलो तरी कर्मचाऱ्यांनी आवर्जून हिंदीमध्ये आमचे स्वागत व आम्हाला निरोप दिला व त्याचीच आवृत्ती तेथेही झाली आता तर हे विमान भारतातच चालले असल्याने उद्घोषणाही इंग्रजी,फ्रेन्च व हिंदी भाषेत करण्यात येत होत्या पण त्याही पुढचा धक्का आम्हाला आमच्या आसनांकडे गेल्यावर बसला,माझ्या अंदाजापमाणेच या बैठका कडेच्या नव्हत्या या विमानातली आसनव्यवस्था ३,४,३ अशी होती व मधल्या चार आसनातील मधली दोन आम्हांस मिळाली होती त्यात प्रवेश करताना कडेच्या अमेरिकन महिलेने आम्हाला " या बसा" म्हटल्यावर आता विमानातल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रवाशांनाही आमच्याशी संभाषण करता यावे म्हणून काही प्रशिक्षण देण्यात आले आहे की काय याची शंका मला आली पण नंतर त्या महिलेने आणखीही मराठी संभाषण करून आमच्या आश्चर्यात भर टाकलीच शिवाय ती चाळीस वर्षापासून भारतात येत असून महानुभाव पंथ,महाराष्ट्रातील काही वास्तूंचा अभ्यास पाणीप्रश्न यावर भारतात येऊन ती संशोधन करते व त्यावर तिने डॉक्टरेटही केली आहे अशी माहिती तिने दिली व कदाचित आमच्यापेक्षाही शुद्ध मराठी बोलत आम्हांस चकित केले.जुन्या मराठी साहित्याचाही तिचा अभ्यास होता.

    बरेच भारतीय प्रवासी व अमेरिकन मराठी भाषातज्ज्ञ  यांच्या सहवासात हा प्रवास फारसा कंटाळवाणा झाला नाही व अपेक्षित वेळेपेक्षा अर्धा तास उशीरा आम्ही मुंबई सहार विमानतळावर पोचलो व आता या शेवटच्या टप्प्यात मात्र चाकाची खुर्ची वापरायचीच असे उभयतांच्या एकमताने ठरले.पॅरिसप्रमाणे येथे मात्र बसप्रवास नव्हता आम्ही बोगद्यातून बाहेर पडल्यावर खुर्चीवाले आमची वाटच पाहत बसल्यासारखे उभे होते त्यातील दोघांना आम्ही पकडले व आमचा विमानप्रवासाचा शेवटचा अध्याय सुरू झाला.येथे लगेचच उद्वाहकासमोर खुर्च्या उभ्या राहिल्या बरेच प्रवासी आमच्या सारखे खुर्चीधारी होये त्यामुळे उद्वाहकासमोर रांगच लावावी लागली कारण एका वेळी एकच खुर्ची वर जाऊ शकत होती नंतर आम्ही ज्या प्रवेश अधिकाऱ्याच्या समोर खुर्च्या आणल्या तोच कोठेतरी बेपत्ता झाला त्यामुळे खुर्चीमुळे सोयीच्या ऐवजी गैरसोयच होते की काय असे वाटू लागले पण मग दुसऱ्या टेबलावर आमची वर्णी लावण्यात आली व शेवटी तेथून आमचे प्रवास परवाने व आम्ही भरलेला तक्ता पाहून आम्हाला पुढे सोडण्यात आले.

    बॅगेजच्या पट्ट्यापुढे मात्र आम्हाला बराच काळ खुर्च्यांमध्ये बसून राहावे लागले कारण आमच्या सामानाचा पत्ताच नव्हता. बऱ्याच प्रतीक्षेनंतर ते एकदाचे आले.आमच्याच उड्डाणातील वरच्या दर्जाच्या प्रवाशांचे सामान आलेच नव्हते.आमच्या खुर्चीचालकांनी सामान व प्रवासी असे दोन्ही भार सांभाळत आम्हाला बाहेर काढले व आमच्यासाठी पाठवण्यात आलेल्या गाडीचा चालक येऊन आमचा व सामानाचा ताबा त्याच्याकडे देऊनच आमचा निरोप घेतला.